‘भूदान’ चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांनी महात्मा गांधी यांचे ‘ग्रामस्वराज्य’चे स्वप्न साकार करण्याचा खराखुरा प्रयत्न केला. त्यांची भाषा अत्यंत सोपी होती. त्यांच्या भाषणांना व प्रवचनांना गर्दी होत
असे. गावागावात नियोजन व्हावे, खेडी समर्थ व्हावीत आणि अशा समर्थ ग्रामांचे परस्परावलंबन व्हावे, असे त्यांनी ‘सवरेदय आणि पंचायत राज’ या विषयावरील भाषणात सांगितले होते. त्या भाषणाचा संपादित भाग.

स्व राज्य मिळाल्यानंतर खेडय़ातील लोकांची स्थिती सुधारेल, अशी जनतेला आशा होती. अशी आशा राखणे चूक नव्हते. स्वराज्यात जर जनतेची स्थिती सुधारली नाहीच तर त्या स्वराज्याची काय किंमत? पण vv02स्वराज्यानंतर आमची स्थिती सुधारणे आमच्याच हातात आहे हे लोकांच्या लक्षात आले नाही. सत्ता कुणी दिल्याने मिळत नसते. सत्ता किंवा अधिकार आतून प्राप्त व्हावा लागतो. येथील लोक समजदार खरे, पण त्यांना अनेक वर्षांपासून गुलामगिरीची सवय जडली आहे. सरकार आईबापासारखी आपली काळजी घेईल, असे त्यांना वाटते. आज त्यांच्या हातात सत्ता आली असली तरी त्या सत्तेचे भान आणि प्रचीती त्यांना आली पाहिजे. आईचा अधिकार आईला कोणी देत असतो काय? तिचा तो स्वयंसिद्ध अधिकार आहे. त्याप्रमाणे स्वराज्याच्या शक्तीचे जनतेला आतून भान असावयास पाहिजे.
गावोगाव जे बुद्धिवान, संपत्तीवान आणि विचारवान लोक असतील त्यांनी गावचे मायबाप व्हावे आणि गावची सेवा करून गावचे राज्य चालवावे. स्वराज्य म्हणजे साऱ्या देशाचे राज्य. परक्या देशाची सत्ता आपल्या देशावर नसते तेव्हा त्याला स्वराज्य म्हणतात आणि जेव्हा प्रत्येक गाव स्वराज्य होते, तेव्हा त्याला ‘ग्रामराज्य’ म्हणतात. गावातील सर्व शहाणे, विचारी झाले आहेत, कुणावर सत्ता चालविण्याची आवश्यकता पडत नाही, असे झाले म्हणजे त्याला ‘रामराज्य’ म्हणतात. गावातील भांडणे गावातच मिटविण्याचे नाव आहे स्वातंत्र्य, स्वराज्य आणि गावात भांडणेच होत नाहीत, अशी स्थिती झाली तर त्याला म्हणायचे ‘रामराज्य’. आधी ‘ग्रामराज्य’आणि मग ‘रामराज्य’ करू या. देशात स्वराज्य झाले, आता आपण ग्रामराज्य करु या. त्याचसाठी भूदान यज्ञ चालला आहे. म्हणून मित्रांनो, तुमच्या गावाचे भले कशात आहे याचा विचार तुम्ही स्वत: करा. आपल्या गावाला एक राष्ट्र समजा. आज तुम्ही जसे ‘भारतमाता की जय’ म्हणता तसा आपल्या गावाचा जयजयकार करा.
आपला प्रत्येक अवयव काम करील तर सर्व शरीर काम करील. एखाद्या माणसाचे सर्व शरीर चांगले काम करत असले पण डोळा मात्र काम करीत नसला तर त्या माणसाला आंधळा म्हणतात. सारे शरीर काम करते, पण कान नीट काम करत नाही, तेव्हा त्याला बहिरा म्हणतात. त्याप्रमाणे सर्व गावे आपली कामे चांगल्या प्रकारे करत असतील तर आपले स्वराज्य चांगले ठरेल. जी राज्यसत्ता दिल्लीत एका जागी गोळा झाली आहे, तिला गावोगाव वाटावयाची आहे. परमेश्वराचे आपण भक्त आहोत. म्हणून त्याचेच उदाहरण समोर ठेवू या. देवाने जर सर्व
अक्कल वैकुंठात ठेवली असती आणि कुणाही प्राण्याला अक्कल दिली नसती, तर हे जग कसे चालते? मग कुणाला अकलेची जरुरी पडली असती तर त्याला वैकुंठाला तार पाठवून थोडीशी अक्कल मागवून घ्यावी लागली असती आणि त्याच्या मंत्र्याला विमानातून धावावे लागले असते. पण परमेश्वराने सर्वाना अक्कल वाटून देऊन किती सुंदर योजना केली आहे! माणसाला बुद्धी दिली तशीच घोडय़ाला, गाढवाला, सापाला, विंचवाला, किडय़ाला सर्वाना बुद्धी दिली आहे. त्याने एकाच जागी अकलेचे कोठार ठेवले नाही, म्हणूनच भगवान निश्चिंतपणे क्षीरसागरात निद्रा घेत आहेत. आमचे मंत्री अशी झोप घेऊ शकतात काय? जगात देवाची व्यवस्था इतकी चोख आहे की जगात देव आहे की नाही अशीच शंका कित्येकांना येते. कारण तो आपली सत्ता चालवित नाही. परंतु त्याला कोणी मानो अगर न मानो तो निश्चिंत होऊन निद्रा घेतो, इतका तो क्षमाशील आहे. असे जेव्हा दिल्लीचे राज्यकर्ते झोपू शकतील तेव्हा खरे स्वराज्य होईल.
सर्व गाव एका मनाने विचार करील. गावात पाचशे लोक असले तर तिथे एक हजार हात असतील, एक हजार पाय असतील, पाचशे डोकी असतील, पण हृदय, मन एकच असेल. गीतेच्या अकराव्या अध्यायात विश्वरूप दर्शनात हजारो हात, हजारो पाय, कान डोळे आहेत पण हृदये हजारो आहेत, असे म्हटलेले त्यात तुम्हाला आढळावयाचे नाही. विश्वरूपाचे हृदय एकच असणार. तसे गावाचे हृदय एकच असेल. पाचशे डोकी चर्चा करून निर्णय घेतील, अशी आमच्या सवरेदयाची योजना आहे. आम्हालाही परस्परावलंबन हवे आहे. आंधळ्याचे आणि लंगडय़ाचेही एक परस्परावलंबन असते. आंधळा पाहू शकत नाही, पण चालू शकतो. लंगडा चालू शकत नाही पण पाहू शकतो. म्हणून दोघे परस्परावलंबन अथवा सहकार करतात. लंगडा आंधळ्याच्या खांद्यावर बसतो. तो पाहण्याचे काम करतो आणि आंधळा चालण्याचे काम करतो. अशा प्रकारे समाजातील काही लोकांना आंधळे आणि काही लोकांना लंगडे ठेवून त्या दोघांचे परस्परावलंबन हे लोक साधू पाहात आहेत काय? विनोबालाही परस्परावलंबन हवे आहे. पण दोघांना डोळे असावेत, दोघांनाही पाय असावेत आणि मग त्या दोघांनी हातात हात घालून एकमेकांबरोबर चालावे अशी त्याची इच्छा आहे.
(अश्वमेध प्रकाशन प्रकाशित आणि मो.ग. तपस्वी संकलित व संपादित ‘बोल अमृताचे’ या पुस्तकावरुन साभार)
संकलन – शेखर जोशी

Mahayuti, Hitendra Thakur
हितेंद्र ठाकूर यांना महायुती मदत करणारा का ?
Vijay Wadettiwar On Raj Thackeray
“राज ठाकरे हा वाघ माणूस, पण त्यांचा कोल्हा करण्याचा प्रयत्न”; विजय वडेट्टीवार यांचा टोला
Blood donation by AAP
केजरीवालांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात आपतर्फे रक्तदान
mohan bhagwat remark on ram mandir
‘नीट राज्यकारभार केला नाही तर राजालाही पायउतार व्हावं लागतं’, मोहन भागवतांचा इशारा कुणाकडे?

नाथे समूह प्रस्तुत आणि पृथ्वी एडिफाइस व भारतीय आयुर्विमा मंडळ यांच्या सहकार्याने आणि जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड व तन्वी हर्बल्स यांच्या मदतीने राज्यातील आठ केंद्रांवर झालेल्या ‘लोकसत्ता’ वक्तृत्व स्पर्धेची अंतिम फेरी शनिवारी आहे.