News Flash

..तेच आपले महातीर्थ!

पु. ल. देशपांडेंनी आपल्या नाटकात इंद्रायणीत बुडवलेली गाथा लोकगंगेनी तारली, असं दाखवलं.

 

तीर्थी धोंडा पाणीया अग्रलेखावर प्रथम पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांने मांडलेले मत.

अडल्या-नडलेल्यांची सेवा व्हावी, ज्ञानचर्चा व तत्त्वचिंतन व्हावे आणि अगदी थोडक्यात या व कल्याण करून घ्या हाच तीर्थयात्रांच्या मागचा हेतू होता. पण धर्माच्या स्वयंघोषित ठेकेदारांनी आपल्या पोटापाण्यासाठी भोंदूगिरीवर आधारलेल्या खुळचट रूढी भोळ्या भक्तांच्या मनात अगदी ठासून भरल्या.परिणामी भक्तांचे लोंढे विशिष्ट दिवस आणि वेळ शुभ मानून आजही तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी मरमरतात. त्या दगडाच्या देवाला भेटण्याची पोकळ उत्सुकता एवढी प्रचंड वाढते की, भक्तजन सारेच नियम धाब्यावर बसवून वाटेल तसं वागतात. पण मुळात मुलाबाळांना उपाशी ठेवून चारधाम यात्रेला जाण्यात कसलं आलंय पुण्य? पावित्र्य, प्रेम, संतसज्जनांचे मार्गदर्शन जेथे लाभेल तेच खरे तीर्थ. इतरत्र असलेले तीर्थक्षेत्र म्हणजे केवळ सजवलेली दगडं, धार्मिक भावनांचा बाजार आणि नद्यांचं पाणी (घाणेरडं आणि दूषित) याशिवाय दुसरं काहीच नाही. याच व्यवस्थेवर घणाघाती प्रहार करत निजलेल्यांना तुकारामांनी गर्जून ‘तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी’ हा विचारांचा सूर्य दाखवला. संत कबीरांनी सुद्धा काहीशा अशाच शब्दांमध्ये यात्रांमधून चालणाऱ्या थोतांडांवर टीका केली; पण शेवटी झाले काय तर संत रविदास, संत कबीर यांना धर्ममरतडांचा जाचच सोसावा लागला, चमत्कार पूर्णपणे नाकारणाऱ्या तुकोबांना देखील शेवटी याच भोंदूनी सदेह वैकुंठी धाडलं. दगडाच्या देवावर कडाडून टीका करणाऱ्या गाडगे महाराजांनाही आता देवत्व बहाल केलं जातय. याचाच अर्थ तुकोबा, ज्ञानेश्वर, राष्ट्रसंत साऱ्यांचेच विचार आता केवळ वांझ ठरलेत.

पु. ल. देशपांडेंनी आपल्या नाटकात इंद्रायणीत बुडवलेली गाथा लोकगंगेनी तारली, असं दाखवलं. यावरून तुकोबांना खरंच सामान्यजनांनीच उचलून धरलं हे स्पष्ट होतं; पण मग फक्तच तुकोबांना डोक्यावर घेण्याऐवजी त्यांचे लाखमोलाचे विचारही आम्ही डोक्यात का घातले नाहीत..? तसं करून जर आम्ही खरंच वळलो असतो तर आज तीर्थाच्या ठिकाणी पाप-पुण्याच्या फेऱ्यात अडकून राहावे लागले नसते आणि बुवाबाजीचे स्तोम इतके माजलेच नसते. करूरमधील महालक्ष्मी मंदिर, दक्षिणेकडील देवरागट्टू मंदिर, मक्का-मदिना, अमरनाथ यात्रा अशा ठिकाणी यात्रेच्या निमित्त भक्तांची बेसुमार फुगणारी संख्या दहशतवाद्यांसाठी जणू मेजवानीच असते. शिवाय यामुळे स्वच्छता, भौगोलिक घटकांचा ऱ्हास, त्या ठिकाणच्या रचनात्मकतेला निर्माण होणारा धोका आणि सुरक्षेचा प्रश्नही उभा राहतो. याच सगळ्यात फळ म्हणजे अमरनाथमधील १९९०च्या त्या घटनेची यंदा १० जुलैला झालेली पुनरावृत्ती आणि लागलीच १७ जुलैला बस खोल नाल्यात पडून तब्बल १६ भक्तांचा गेलेला जीव. १९९१ ते १९९५ दरम्यान अमरनाथ यात्रेवर भाविकांच्या जीवितास निर्माण झालेल्या धोक्यामुळे बंदी घातलेली होती. १९९६ मध्ये यात्रेला पुन्हा हिरवा दिवा दाखवण्यात आला आणि नेमक्या त्याच वर्षी २४२ यात्रेकरू ठार झाले, पण या घटनांमधून आम्ही काही बोध घेतला असता तरच नवल! यात्रेला तब्बल ४० दिवस महत्त्व द्यावे लागत असल्याने काश्मीरमधील इतर प्रश्नही दुर्लक्षित होण्याची शक्यता नक्कीच आहे. गेल्या काही वर्षांत देशभरात आणि महाराष्ट्रातही दगड-धोंडय़ांच्या नव्या देवांची संख्या हजारोंनी वाढली आहे. पूर्वीची प्राचीन-ऐतिहासिक तीर्थस्थळे आणि मंदिरे असतानाही, जुन्या देवांच्या संख्येत नव्या बुवांना देवतांचा रंग फासून त्यांचे मठ आणि मंदिरे बांधायचा नवाच पायंडा पडला. ज्या भक्तांना जो देव वा बुवा पावला, त्याचे मंदिर बांधायचा धडाका राज्यभर सुरू झाला. याच मंदिरांची पुढं संस्थान होतील आणि अनेक नवीन तीर्थक्षेत्रं यातून जन्माला येतील. भक्तिभावाचा इतका प्रचंड उद्रेक शंभर टक्के  समाजविघातकच आहे. तरीसुद्धा आजही शहरी आणि ग्रामीण भागात नव्या मंदिरांचे पेव फुटतात. कायद्यानुसार मंदिर, तुरबत, धार्मिक स्थळे बांधतानाही, संबंधित ग्रामपंचायती, नगरपालिका- महापालिकांची परवानगी घ्यायची गरजही, या तथाकथित भक्तगणांना आता वाटत नाही. भक्तांनी या देव-देवतांची आपल्या मर्जीने कुठे रस्त्यावर, तर कुठे सांदी कोपऱ्यात स्थापना करून आरत्या ओवाळायला सुरुवातही केली आहे. मात्र धार्मिक परंपरेनुसारही हे योग्य नाही. वाटेल तसे वागणाऱ्यांची, आपल्या भक्त वेशाचा उपयोग स्वार्थासाठी करणाऱ्यांची भलीमोठी गर्दी अशा तीर्थक्षेत्री सहजच सापडेल. हे सगळं समजून उमजून तीर्थाला मोक्षप्राप्तीसाठी,पुण्यसंचयनासाठी किंवा मग पर्यटनासाठी जाण्याची उठाठेव करायची तरी कशाला? मग गावातल्या आणि तीर्थस्थळी असलेल्या देवात फरक तरी काय?.. अंत:करण शुद्ध होणार नसेल, सज्जनांची संगतही धड लाभणार नसेल तर जगातील सर्व तीर्थे घडली तरी त्याने माणसाची अभिवृद्धी होणे नाही.. नक्कीच नाही.. पंढरपुरावरून केवळ सहा कोसावर राहून संत सावतोबांनी जन्मभर गावातच राहून पंढरीची वारी न करूनही देवाची प्राप्ती केली, भक्त पुंडलिकासाठी विठ्ठल थेट घरी येऊन अगदी विटेवर उभा राहिला.. या साऱ्या आख्यायिका हेच सुचवतात की साधकात शक्ती असेल तर साध्य हे साधलं जातंच, मग आपण राहतो तेच ठिकाण भू-वैकुंठ होऊ  शकतं आणि तीर्थाला जाण्याची तहानसुद्दा यामुळे नक्कीच शमवली जाऊ  शकते. केवळ विशिष्ट देव, विशिष्ट नद्यांचे पाणी असणाऱ्या तीर्थक्षेत्रांचे फोफावणारे साम्राज्य आणि यात आज एकविसाव्या शतकातही आनंद मानणारे भोळे भक्त ही वस्तुस्थिती पाहता तुकारामांच्या बुडता हे जन न देखवे डोळा.. या पंक्ती खरंच सार्थक ठरतात. त्यामुळे आपण राहतो तेथील सार्वजनिक स्थळच आपले महातीर्थ आहे. तीर्थात जाऊन खर्च करण्यापेक्षा सर्वाचं भलं होईल असं कार्य आपण करायला हवं. सप्ताह, यज्ञ, उत्सववादी कार्यक्रम, यात्रांसाठी जी वर्गणी होते ते सर्व काही आपण राहतो त्या ठिकाणच्या विकासासाठी खर्च केली पाहिजे. हिरा आणि काचमनी यातील फरक आता प्रत्येक भक्ताला कळायलाच हवा. सत्यार्थप्रकाश उजळून गंगा-काशी मूर्ती-माळा यांचे महत्त्व उडवून आता प्रत्येकाने मानवसेवा शिकली आणि शिकवलीच पाहिजे!

(शेठ फत्तेलाल लाभचंदजी कनिष्ठ महाविद्यालय)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 1:36 am

Web Title: blog benchers loksatta pratik thackeray loksatta campus katta
Next Stories
1 वाह! टपरी!!
2 उतरत्या दर्जाचा गुणाकार थांबणार कसा?
3 कार्यक्षम व्यक्तींचे गप्प राहणे घातक..
Just Now!
X