|| अक्षय वणे

करोना संक्रमणकाळात शिक्षकांनी दूरदृश्य-संवाद प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला खरा; परंतु या काळात स्थलांतरित झालेल्या, तसेच दुर्गम गावांमध्ये, शहरांतील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या आणि ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक साधन-सुविधा नसणाऱ्या विद्यार्थ्यांची झालेली शैक्षणिक हानी तपासणारे सर्वेक्षण ‘सेवा सहयोग फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेमार्फत अलीकडेच करण्यात आले. त्याविषयी…

करोना जागतिक आपत्तीचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर होत असताना शैक्षणिक क्षेत्रालाही मोठा फटका बसला आहे. विद्यार्थ्यांसमोर एक भलेमोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पालक चिंताग्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमी वर सेवा सहयोग फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने फेब्रुवारी महिन्यात कमी आर्थिक उत्पन्न असलेल्या कुटुंबांचे शैक्षणिक सर्वेक्षण केले. यात ४२ अनुसूचित जाती, ६९ अनुसूचित जमाती, ४४ इतर मागासवर्गीय, १२ भटक्या जमाती आणि ९७ अन्य अशा एकूण २६४ पालक-विद्यार्थ्यांची पाहणी करण्यात आली. मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड परिसरात करण्यात आलेल्या या सर्वेक्षणासाठी स्वयंस्फूर्तीने काही शिक्षक, स्वयंसेवक यांनी सहकार्य केले. शारीरिक अंतरासह सर्व सरकारी नियमांचे पालन करून हे सर्वेक्षण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन पालक आणि विद्यार्थी यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यांना एक प्रश्नपत्रिका देण्यात आली होती, तसेच त्यांच्याकडून एक अर्ज भरून घेण्यात आला. त्याआधारे सर्वेक्षणातील नोंदी करण्यात आल्या. या सर्वेक्षणाचा हेतू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आकलनाच्या नुकसानीचे मापन करणे हा होता. त्यादृष्टीने आवश्यक माहिती गोळा करण्यात आली.

राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमावर आधारित मराठी, गणित आणि इंग्रजी या तीन विषयांच्या ५० गुणांच्या परीक्षेद्वारे हे सर्वेक्षण केले गेले. २०० मराठी माध्यमाचे, तर ६४ सेमी इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते. यांपैकी ज्या विद्यार्थ्यांनी करोना संक्रमणाच्या काळात ऑनलाइन शैक्षणिक साधनांचा वापर करून अभ्यास केला, त्यांचे झालेले शैक्षणिक आकलन नुकसान २२ टक्के आहे. शिक्षकांशी व समान वयोगटातील विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क शाळा बंद राहिल्याने झाला नाही, त्यामुळे ही तूट आढळून आली. तर ज्या विद्यार्थ्यांना संक्रमणकाळात कुठल्याच ऑनलाइन किंवा अन्य शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत, त्यांचे शैक्षणिक आकलन नुकसान तब्बल ४५ टक्के आहे, असे सर्वेक्षणात आढळले. मूलभूत संकल्पना समजण्यात राहिलेली ही तूट शैक्षणिक भविष्याच्या दृष्टीने धोकादायक आहे.

सर्वेक्षणासाठी घेतलेल्या परीक्षेत २० टक्के विद्यार्थ्यांना सर्वसाधारण गुणांपेक्षा कमी गुण मिळाले. विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष दिले गेले नसल्याने हे झाले. इंटरनेट जोडणी अनियमित असल्याने २५ टक्के विद्यार्थी सर्वसाधारण गुणांपेक्षा कमी गुण मिळवू शकले. पालकांची करोनाकाळातील मानसिक स्थिती आणि त्यांची पार्श्वभूमी ही सर्वेक्षणादरम्यान विचारात घेण्यात आली होती.

करोना संक्रमणकाळात जवळपास वर्षभर विद्यार्थ्यांना शाळेत जाता आलेले नाही. सुरक्षित शारीरिक अंतर ठेवण्याच्या नियमामुळे शिक्षण आणि विद्यार्थी यांच्यातील अंतर वाढतच चालले आहे. शिक्षण संस्थांनी, शिक्षकांनी दूरदृश्य-संवाद प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. परंतु संक्रमण काळात स्थलांतरित झालेल्या, तसेच दुर्गम गावांमध्ये आणि शहरांतील वस्त्यांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांची झालेली शैक्षणिक हानी चिंताजनक आहे.

अजूनही आपण संक्रमणाच्या विळख्यातून पूर्णपणे बाहेर आलेलो नाही. येत्या शैक्षणिक वर्षातील शाळा सुरू होण्याचा कालावधी, परीक्षा, नियमित वर्ग यांबाबतीतले संभ्रमाचे ढगदेखील अद्याप दूर झालेले नाहीत. सद्य:परिस्थिती लक्षात घेता, विद्यार्थ्यांची झालेली ही शैक्षणिक हानी भरून काढण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवून त्यासाठी सर्वांनीच एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. यावर तातडीने करण्याचा उपाय म्हणून सध्याच्या पाठ्यक्रमाच्या आधारे पुढील तीन महिन्यांत मराठी, गणित आणि इंग्रजी या तीन विषयांचा १३० तासांचा अभ्यासक्रम सेवा सहयोग फाऊंडेशनने तयार केला आहे. अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना अभिनव पद्धतीने शिकवून त्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचा त्यामागील हेतू आहे. एकुणात, शिक्षणाचे थांबलेले चाक रुतू न देता धावते ठेवणे गरजेचे आहे.

(लेखक सेवा सहयोग फाऊंडेशनच्या शैक्षणिक उपक्रमाचे प्रवर्तक आहेत.)

          sevasahayog.org