22 January 2021

News Flash

इस्लामने मूळ संदेशाकडे वळावे!

ख्रिस्ती आणि इस्लाम हे दोन्हीही धर्म एकाच भौगोलिक प्रदेशात तसेच एकाच युगात जन्माला आले.

हर्षवर्धन देशपांडे

ख्रिस्ती व इस्लाम हे दोन्हीही धर्म एकाच भौगोलिक प्रदेशात जन्माला आले. तरीही दोन्ही धर्माचे मार्ग अगदी वेगळे का झाले, याची कारणमीमांसा करणारा हा विशेष लेख..

अलीकडे इस्लामच्या बाबतीत अगदी विरुद्ध टोकाचा उलटसुलट युक्तिवाद केला जातो. आयसिससाठी इस्लाम हा धर्म आहे, जो मध्ययुगीन बहुपत्नीत्व तसेच शिरच्छेद करणे आणि दगडांनी ठेचून मारणे यांसारख्या क्रूर, रानटी शिक्षांचा उपयोग करण्याची परवानगी देतो. अशा अतिरेक्यांसाठी इस्लाम अन्य श्रद्धा बाळगणाऱ्यांबरोबर राहण्याची परवानगीही देत नाही. दुसरीकडे, सुसंस्कृत जगातील बहुसंख्य मुसलमान असा युक्तिवाद करतात की, इस्लाम हा शांततेचा धर्म आहे आणि ते इतर धर्माच्या लोकांबरोबर गुण्यागोविंदाने राहतात. या विरोधाभासाचे आणि द्विधा मन:स्थितीचे स्पष्टीकरण करायला हवे.

ख्रिस्ती आणि इस्लाम हे दोन्हीही धर्म एकाच भौगोलिक प्रदेशात तसेच एकाच युगात जन्माला आले. तरीही दोन्ही धर्माचे मार्ग अगदी वेगळे का? ज्या देशांमध्ये ख्रिस्ती हा मुख्य धर्म आहे, तेथील लोकांचे जीवनमान चांगले आहे; तर दुसरीकडे मुस्लीम बहुसंख्य असलेले देश तेलातून निर्माण होणारी संपत्ती वगळता, इतर कोणतीही संपत्ती निर्माण करू शकलेले नाहीत. आपण मुस्लीमबहुल देशांकडे पाहतो तेव्हा आपल्याला मोठय़ा प्रमाणावर सामाजिक अशांतता दिसून येते. तेलापासून निर्माण होणाऱ्या संपत्तीचे पृष्ठावरण काढून टाकले, तर संपत्ती निर्माण करून आपल्या नागरिकांना उत्तम जीवनमान मिळवून देणारे मुस्लीमबहुल देश क्वचितच दिसतील. यूएई आणि इराणसारखे काही लक्षात येण्याजोगे अपवाद कदाचित असू शकतात. पण यूएईने निर्माण केलेली संपत्ती ही ख्रिस्ती जगताच्या संपत्ती निर्माण करण्याच्या क्षमतेशी अगदी जवळून बांधली गेली आहे.

म्हणून प्रश्न असा की, ख्रिस्ती आणि मुस्लीम जगतातील जीवनमानांत एवढा मोठा फरक का आहे?

याचे थोडक्यात उत्तर आहे, ते म्हणजे संदर्भीकरण (कॉन्टेक्स्च्युलायझेशन)! ख्रिस्ती धर्मीयांनी (विशेषत: कॅथलिक) सक्रियपणे संदर्भीकरणाचा अवलंब केला. पाश्चिमात्य जगतातील बहुतेक शांतताप्रिय मुसलमानांनी ही कला त्यांच्या अंगी बाणवलेली आहे. दुसरीकडे, मुस्लीम बहुसंख्य असलेल्या देशांतील अनेक मुसलमान आणि हिंस्र जिहादी सक्रियपणे त्यापासून दूर जातात.

संदर्भीकरण म्हणजे नेमके काय?

संदर्भीकरण समजून घेण्यासाठी पैसे कर्जाऊ देण्याच्या दृष्टिकोनात झालेला बदल उदाहरण म्हणून घेऊ. जिझस आणि मोहम्मद दोघांनीही सावकारीच्या संकल्पनेचा तिरस्कार केला आणि दोघांनीही त्यावर बंदी घातली. सावकारी म्हणजे दुर्दैवी गरीब लोकांचा घेतलेला गैरफायदा होय असे त्यांना वाटत होते. हा दृष्टिकोन इस्लाममध्ये कधीही बदलला नाही (नफा वाटून घेण्याची संपल्पना इस्लाममध्ये नीट चालली नाही). दुसरीकडे, ख्रिस्ती धर्मात वेगळेच घडले. मध्ययुगाच्या शेवटी एक महत्त्वाची घडामोड घडली; ती म्हणजे- व्यवसाय उभा करणे; ज्या लोकांनी व्यवसायाची रचना केली, त्यांच्यापेक्षा ज्या लोकांनी व्यवसाय सुरू केला त्यांना वेगळे अस्तित्व आहे.

वेगळ्या अस्तित्वाची ही संकल्पना चर्चने स्थापन केलेल्या ऑक्सफर्डसारख्या कॉलेजेस्मधून उदयास आली आणि तिला समर्थन देणाऱ्या चर्चपासून ती वेगळी ठेवण्याची परवानगी दिली गेली. लवकरच या घडामोडीच्या बाबतीतील मोठी समस्या चर्चच्या लक्षात आली; ‘डॅम्नुमेमर्जेस’ (होणारा तोटा) आणि ‘ल्यूक्रम सेझन्स’ (नफा थांबवणे) ही ती तत्त्वे होत. या तत्त्वांमधून हे मान्य केले जाते की, जे लोक व्यवसायासाठी पैसे कर्जाऊ देतात ते जोखीम पत्करीत असतात. शिवाय जर गुंतवणूकदारांनी स्वत:च पैसे गुंतवले, तर त्यांना नफा मिळाला असता; जो आता त्यांना सोडून द्यावा लागतोय. यावरून असा निष्कर्ष काढणे नैसर्गिक आहे की, नफा कमावणाऱ्या संस्थांना पैसे कर्जाऊ देण्यासाठी काहीतरी प्रोत्साहनात्मक हवे असते. व्यवसायासाठी अर्थपुरवठा उपलब्ध होणार नसेल तर व्यापार आणि वाणिज्य यांची भरभराट होणार नाही. चर्चने असे ‘संदर्भीकरण’ केले आणि सारांश काढला की, ख्रिस्ताच्या काळात ‘व्यवसाय’ ही संकल्पना वास्तवात अस्तित्वात नसल्यामुळे त्याच्या आज्ञेत सुधारणा करणे स्वीकारार्ह आहे आणि पैशाचा उपयोग जोपर्यंत व्यवसायाला कर्जाऊ देण्यासाठी केला जातो, तोपर्यंत पैसे कर्जाऊ देणे हे स्वीकारार्ह केले गेले. असा अर्थपुरवठा उपलब्ध झाल्याने युरोपमध्ये भांडवलशाहीला सुरुवात झाली. युरोपीय सत्तांनी संपूर्ण जगभर वर्चस्व का गाजवले, याच्या प्रमुख कारणांपैकी हे एक कारण आहे. कर्जाशिवाय व्यवसाय सुरू करण्याची आणि तो चालविण्याची कल्पना करून पाहा! हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, चर्च अजूनही व्यवसायासाठी पैसे कर्जाऊ देणे आणि व्यक्ती यांमध्ये फरक करते, ज्यात व्यक्तींना पैसे कर्जाऊ देण्यावर अजूनही बंदी आहे.

सावकारीचा धंदा हा महत्त्वाचा आहे, कारण त्यामुळे व्यवसायाची वृद्धी होते आणि नोकऱ्यांच्या संधी निर्माण होतात. परिणामस्वरूपी, प्रत्येकालाच अधिक चांगले जीवनमान प्राप्त होते. दुसरीकडे, व्यवसायाची वाढ खुंटणे म्हणजे नोकरीच्या संधी कमी. पर्यायाने यामुळे गरिबी निर्माण होते आणि अतिरेकी प्रवृत्तींना पोषक वातावरण तयार होते.

इस्लाममध्ये संदर्भीकरणाची प्रक्रिया इस्लामच्या सुवर्णकाळात घडत होती. कुराणातील तथाकथित विरोधाभासी कडवी (व्हर्सेस) हे याचे उदाहरण आहे. उदाहरणार्थ, मोहम्मद सुरुवातीला असे म्हणाला होता की, पुरुषाने फक्त एक पत्नी करावी. पण नंतर मक्केतील टोळ्यांबरोबर झालेल्या युद्धात उमाहमधील (धर्माने एकत्र बांधलेले सर्व मुस्लीम समुदाय आणि ज्यांना राष्ट्रीय सीमा मान्य नसतात) पुरुषांची संख्या कमी झाली, तेव्हा त्याला पुरुषांना अधिक बायका करण्याची परवानगी द्यावी लागली. या निर्णयाशिवाय उमाहकडे तग धरण्यासाठी दुसरा पर्याय नव्हता.

पण असे नेमके काय घडले, ज्यामुळे ख्रिस्ती धर्मीयांनी ‘संदर्भीकरणा’ला आपलेसे केले, पण इस्लामने मात्र नाही? दोन्हीही प्रेषितांच्या मृत्यूनंतर काय घडले, यातच याचे उत्तर दडलेले आहे.

‘संदर्भीकरणा’च्या आधी ‘दृष्टांतकथा’ होत्या. दृष्टांतकथांची संकल्पना ग्रीकांपासून सुरू झाली, साधारण होमरच्या लिखाणापासून. विकिपेडियामध्ये दृष्टांतकथांची व्याख्या अशी दिलेली आहे : ‘लेखक आणि वक्ते यांना जो (अर्धवट ) छुपा वा गुंतागुंतीचा अर्थ सांगायचा असतो, त्यासाठी प्रतीकात्मक उदाहरणे, कृती, कल्पना किंवा प्रसंग यांच्या माध्यमातून दृष्टांतकथांचा वापर करतात, ज्यांमधून एकत्रितरीत्या नैतिक, आध्यात्मिक किंवा राजकीय अर्थ पोहोचवला जातो.’ म्हणून दृष्टांतकथांची सुरुवात नाटकांतून झाली याचे नवल वाटू नये.

संदर्भीकरण हे दृष्टांतकथांचाच विस्तार आहे. त्यातून धर्मग्रंथांत सांगितलेल्या कथांचा पुन्हा अर्थ लावण्यासाठी समर्थन पुरविले जाते, ज्यामुळे त्या बदलत्या सामाजिक-आर्थिक परिस्थितींशी जुळवून घेणे सोपे जाते. यामुळे धर्मात साचलेपणा येणार नाही याची काळजी घेतली जाते. वर दिलेल्या उदाहरणात, पैसे कर्जाऊ देण्याचा अर्थ पुन्हा नेमका असाच लावला गेला होता. या अशा प्रकारे पुन्हा अर्थ लावला नाही, तर धर्मात साचलेपणा येतो आणि त्याला आधुनिक जगाच्या आव्हानांचा सामना करणे अशक्य होते. पैसे कर्जाऊ न देणे हे असे एक उदाहरण आहे, ज्यात व्यक्तीस पैसे कर्जाऊ देणे आणि व्यवसायाला पैसे कर्जाऊ देणे यामध्ये इस्लाम भेद करीत नाही.

ख्रिस्ती धर्माच्या बाबतीत (मी इथे कॅथलिक, म्हणजे ख्रिस्ती धर्माच्या सर्वात मोठय़ा पंथाबद्दल बोलतोय) ख्रिस्ताच्या मृत्यूनंतर या धर्माला सेंट पॉल आणि सेंट ऑगस्टिन ऑफ हिप्पो यांनी आकार दिला. वास्तविक सेंट पॉलचे ख्रिस्ती धर्माला योगदान इतके मोठे आहे की, असे म्हणतात की, ख्रिस्ती धर्म जेवढा ख्रिस्ताचा आहे तेवढाच तो सेंट पॉल यांचा आहे. सेंट पॉल तसेच सेंट ऑगस्टिन या दोघांनाही ग्रीक तत्त्वज्ञान उत्तम अवगत होते. ज्याप्रमाणे प्लेटो व अ‍ॅरिस्टॉटल हे ‘संदर्भीकरणा’चे दरवाजे उघडण्यासाठी नेतृत्व करीत होते, त्याचप्रमाणे सेंट पॉलने ख्रिस्ती धर्म अभिजात ग्रीकांबरोबर अनुपूरक बनेल याची काळजी घेतली. ज्यू धर्माच्या बाबतीतही अशीच प्रक्रिया घडल्याचे दिसते, ज्यात जिझस ख्राइस्टच्या काळाच्या आसपासच दृष्टांतकथांची संकल्पना सुरू करण्यात आली. दृष्टांतकथांचा आणि संदर्भीकरणाचा प्रभाव ग्रीकांचा प्रभाव असलेल्या शिया पंथीयांमध्ये दिसून येतो. शिया पंथीयांचा (सुन्नी पंथीयांच्या उलट) असा विश्वास असतो की, हदिथचा (मोहम्मदाच्या जीवनकथा) पुन्हा एकदा नव्याने अर्थ लावला जाऊ शकतो. म्हणून या गोष्टीचे आश्चर्य वाटू नये की, सर्व मुस्लीम देशांत कदाचित इराण हाच मोठी औद्योगिक बैठक असलेला सर्वाधिक प्रगत देश आहे. या बाबतीत ख्रिस्ती मंडळींना जो लाभ मिळाला, तोच शियांनाही मिळाला. तो म्हणजे ग्रीक तत्त्वज्ञानाची कवाडे त्यांच्यासाठी उघडी होती. इराणचे ग्रीसशी घनिष्ट संबंध आहेत. ग्रीकांचा इराणी संस्कृतीवर फार मोठा प्रभाव पडलेला आहे.

आता इस्लामकडे पाहू. इस्लाममध्ये ‘संदर्भीकरण’ का घडून आले नाही? याचे कारण अरेबियामध्ये मोहम्मदापूर्वी तत्त्वज्ञानाचा समृद्ध इतिहास नव्हता आणि ग्रीकांचाही प्रभाव नव्हता. मोहम्मदापूर्वीच्या अरेबियामध्ये फक्त लढाया आणि खुनशी टोळ्या यांचाच समावेश होता. त्यांच्याकडे सुसंस्कृत, सभ्य समाज (मक्कासारखी काही अपवादात्मक उदाहरणे सोडल्यास) ही संकल्पना जवळपास नव्हतीच. मध्ययुगीन कालखंडात जग शांततापूर्ण नव्हते; परंतु क्रूर रक्तपात घडवणारा अरेबिया त्या हिंसक काळातही उठून दिसतो. सोप्या शब्दांत सांगायचे तर, मोहम्मदाच्या मृत्यूनंतर मोहम्मदाचा खरा संदेश समजणारा आणि ‘संदर्भीकरणा’ची परंपरा पुढे घेऊन जाणारा अरेबियात कोणीही नव्हता. आज मुस्लीम देशांमध्ये जे काही घडतेय, त्यात ‘संदर्भीकरणा’च्या अभावाने मोठी भूमिका बजावलेली आहे.

पण मुस्लीम सुवर्णकाळात असंख्य वैज्ञानिक शोध लावले गेले, त्याचे काय? तेव्हा बगदाद हे वैज्ञानिक केंद्र होते आणि मंगोलांनी बगदादवर विजय मिळवल्यानंतर तेराव्या शतकाच्या मध्यावर  त्या सुवर्णकाळाचा अंत झाला. या सुवर्णकाळाची सुरुवात कशी झाली, त्याचा शेवट कसा झाला आणि प्रगतीचा ऱ्हास कसा झाला? सर्वप्रथम मुस्लीम जगतातील आणि ख्रिस्ती जगतातील वैज्ञानिक शोधांमध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. ख्रिस्ती जगतात विज्ञानाला मोठय़ा प्रमाणावर चर्चद्वारे चालना दिली गेली. तर मुस्लीम जगतात राजांनी विज्ञानाला चालना दिली. पण राजकीय घराणी अल्पायुषी ठरली. विज्ञानाला राजाश्रय मिळतो; पण राजकीय पाठबळ संपले की ते संपुष्टात येते. राजकीय घराण्यांच्या निर्णयांपेक्षा धार्मिक परंपरा खूप काळापर्यंत टिकतात आणि जर धर्मानेच विज्ञानाला पाठबळ दिले तर त्याचे परिणाम अधिक काळ टिकून राहतात.

मुस्लीम जगतात बगदाद आणि अब्बासिद कॅलिफेट येथे शोध केंद्रित झाले होते आणि त्याची सुरुवात हरून-अल-रशीदच्या प्रायोजकत्वाखाली झाली होती. या राज्यावर खूप मोठय़ा प्रमाणावर पर्शियन संस्कृतीचा पगडा होता. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे, कारण वर उल्लेख केल्याप्रमाणे पर्शियन लोकांनी ग्रीक प्रभाव तसाच पुढे चालू ठेवला. बगदादमध्ये वैज्ञानिक वैभवाला मिळालेली चालना ग्रीक वैज्ञानिक साहित्याच्या भाषांतराने झाली आणि ते बहुतेक करून ख्रिस्ती, ज्यू आणि पीपल ऑफ द बुक (पीपल ऑफ द बुक म्हणजे कुराणात उल्लेख केलेले इस्लामव्यतिरिक्त इतर धर्म) यांनी केले होते. बगदादमधील राज्यकर्त्यांनी पुरस्कृत केलेले सुवर्णयुग या लोकांनी सुरू केले, ज्यांना ग्रीक संस्कृतीचे ज्ञान होते आणि म्हणून ग्रीक विज्ञानाचेही होते.

या काळात विज्ञानाला राजाश्रय असल्यामुळे मुस्लीम विचारवंतांच्या त्यानंतरच्या पिढय़ांना आणि शास्त्रज्ञांना स्फूर्ती मिळाली. त्यांनी त्यांच्या ग्रीक मुळांपासूनची विज्ञानाची परंपरा नव्या उंचीवर नेऊन ठेवली. दुर्दैवाने सुवर्णकाळ जसजसा पुढे जात राहिला, तसतसा मुस्लीम ‘धर्म’ अधिक मजबूत बनत गेला. धर्म जसा बळकट होत गेला, तसे इस्लामी मूलतत्त्ववादीही शक्तिमान झाले. या मूलतत्त्ववाद्यांनी वैज्ञानिक परंपरा कधीही सांगितल्या नाहीत आणि मंगोलांनी बगदादचा विनाश केल्यानंतर मुस्लीम जगतात विज्ञानाचे पुनरुज्जीवन कधीही झाले नाही. या ऱ्हासाला एकमेव अपवाद होता, तो म्हणजे आरोग्यविज्ञानाचा; कारण मोहम्मदाने कुराणात उत्तम आरोग्याचे महत्त्व सांगितलेले होते.

आता ख्रिस्ती धर्म आणि विज्ञानाच्या प्रगतीत चर्चची भूमिका समजून घेऊ. देवाने निसर्गाची निर्मिती केलेली आहे हा विचार सेंट पॉल आणि सेंट ऑगस्टिन ऑफ हिप्पो यांनी स्वीकारला. म्हणून निसर्गाचा म्हणजेच विज्ञानाचा अभ्यास हा देवाचा अभ्यास आहे (येथे प्लेटोचा प्रभाव दिसून येतो). जे जे घडते, उदाहरणार्थ आजारपणाची दोन कारणे असतात : कोणी आजारी पडले तर त्याचे द्वितीय व तात्कालिक कारण म्हणजे विषाणुसंसर्ग, जे तात्पुरत्या स्वरूपात ठीक केले जाऊ शकते. परंतु प्राथमिक कारण म्हणजे निसर्गाची मूलभूत शक्ती, जी फक्त देवाच्याच हाती असते. यामागचा विचार असा आहे की, द्वितीय कारणाचा शोध घेण्यात कोणतीही समस्या येऊ नये.

ख्रिस्ती धर्मीय देशांनी तेराव्या शतकाच्या आसपास अचानक जगावर अधिराज्य गाजवायला सुरुवात केली. मग तेराव्या शतकापूर्वी ख्रिस्ती जगत काय करीत होते? महत्त्वाची गोष्ट समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे- जेव्हा आपण ‘ख्रिस्ती देशांचे वर्चस्व’ असे म्हणतो, तेव्हा पाश्चिमात्य युरोपीयांविषयी बोलतो. पौर्वात्य युरोपीयांविषयी, म्हणजे सीरियातील ख्रिस्ती धर्मीयांविषयी नाही.

एक महत्त्वाचा फरक लक्षात घेतला पाहिजे, तो म्हणजे- जसे पौर्वात्य युरोपात किंवा सीरियात होते, त्याच्या उलट पाश्चिमात्य युरोपात कॅथलिक पंथीयांचे वर्चस्व होते व कॅथलिक चर्चनेच या कालखंडाच्या आधी ‘अर्थ लावण्याची’ आणि ‘दुय्यम कारणांची परंपरा’ जिवंत ठेवली. चर्चनेच ऑक्सफर्ड आणि केम्ब्रिजसारख्या विद्यापीठांची स्थापना केली होती. कॅथलिक पंथीयांनी विज्ञानाला या काळ्या युगात अडवून ठेवले, हा खूप मोठा गैरसमज आहे. वास्तविक, विज्ञानाच्या प्रगतीसाठी कॅथलिक एवढे प्रभावशाली होते की, ख्रिस्ती जगतातील जवळपास प्रत्येक वैज्ञानिक चर्चशी जोडलेला होता आणि त्यांच्यापैकी बहुतेक जण स्वत:च धर्मगुरू होते.

चौथ्या शतकात रोमचा पाडाव झाल्यानंतर ग्रीकांचे ज्ञान पूर्णत: हरवून गेले. संपूर्ण पाश्चिमात्य युरोप प्राचीन ग्रीक ज्ञानापासून वंचित राहिला आणि युरोपातील वैज्ञानिक शोध जवळपास थांबल्यासारखे झाले होते. सातव्या शतकापर्यंत कॅथलिक चर्चने युरोपातील बहुतेक टोळ्यांचे धर्मातर ख्रिस्ती धर्मात केले. शेतीसाठी वापरण्यात येणारे नांगर, पिके बदलून घेणे, पाणचक्क्या-पवनचक्क्या यांत बऱ्याच सुधारणा करण्यात आल्या. घोडय़ांची रिकिब, जीन, नाल, इत्यादींसारख्या युद्धाच्या तंत्रातही सुधारणा झाल्या.

अकराव्या शतकापूर्वी ग्रीक विज्ञानाचा आणि संस्कृतीचा शोध लागला. या कालखंडापूर्वी पाश्चिमात्य जगताने ग्रीक संस्कृतीबद्दल ऐकले होते, पण त्या संस्कृतीपर्यंत किंवा ग्रीकांच्या शोधांपर्यंत पोहोचता येत नव्हते. अकराव्या शतकाच्या दरम्यान पाश्चिमात्य जगताला आढळून आले की, बहुतेक ग्रीक विज्ञानविषयक पुस्तकांचे भाषांतर इस्लामिक सुवर्णकाळात पर्शियन भाषेत करण्यात आले आणि ते जतन करून ठेवण्यात आले. यामुळे पर्शियन ग्रीक लिखाण पुन्हा पाश्चिमात्य युरोपीय भाषांत भाषांतरित करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले, ज्यामुळे पश्चिम युरोपात विज्ञान आणि संस्कृतीचा मोठा स्फोट झाला. या कालावधीला आपण सर्वसामान्यपणे ‘रेनेसान्स (पुनरुज्जीवन)’ असे म्हणतो. ख्रिस्ती धर्माच्या इतर शाखांमध्ये ‘संदर्भीकरणा’ची संकल्पना नव्हती आणि म्हणून या बाबतीत धर्म फक्त विज्ञानातील प्रगतीपुरता मर्यादित होता.

म्हणजे, ‘संदर्भीकरणा’ने ख्रिस्ती धर्मात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि आता ‘संदर्भीकरण’ धर्माला आधुनिक मूल्यांशी अनुरूप ठेवते. याचा अर्थ असा नाही की, ख्रिस्ती धर्म पूर्णत: दोषरहित होता. उदाहरणार्थ, तो गुलामीला मान्यता देण्याबद्दल दोषी आहेच (यावर चर्चा होऊ शकते); परंतु ‘संदर्भीकरणा’च्या क्षमतेमुळे ख्रिस्ती धर्म आतापर्यंत स्वत:ला दुरुस्त करीत आलाय हेही तितकेच खरे.

इस्लाम जगतातही गोष्टी बदलताहेत. हे बदल जरी छोटेछोटे असले, तरी खूप आश्वासक आहेत. इस्लाममधील स्त्रियांची चळवळ जोर धरीत आहे. हे शहाणपणाचे आहे, कारण मोहम्मदाच्या काळात स्त्रियांना भरपूर स्वातंत्र्य होते. अशी आशा बाळगू या की, मोहम्मदाने उपदेश केल्यानुसार इस्लाम त्याच्या समानता, न्याय आणि शांतता या मूळ संदेशाकडे पुन्हा वळेल. आशा बाळगू या की, सर्व मुसलमान ‘संदर्भीकरणा’ची संकल्पना लवकरच अंगीकारतील.

लेखक अमेरिकास्थित साक्षेपी अभ्यासक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2020 12:17 am

Web Title: differences between christianity and islam religion zws 70
Next Stories
1 फ्रान्स कुठल्या वळणावर?
2 पाकव्याप्त काश्मीरचे नुकसानच!
3 चाँदनी चौकातून : सक्रिय शहा
Just Now!
X