खुशवंत सिंग यांच्याकडे सतत विविध माणसं भेटायला यायची. त्यात कितीतरी पाकिस्तानी लोक असायचे. आपल्या मनात पाकिस्तानबद्दल खुन्नस असते, पण तशी त्यांच्या मनात नव्हती. खरंतर ते लाहोरचे. फाळणीत तेही होरपळले होते, पण तरीही त्यांनी पाकिस्तानबरोबरचं मैत्रीचं नातं कधी तोडलं नाही.
पहिली गोष्ट म्हणजे मी स्वत:ला काहीसा बोथट मानतो, समजतो. आज दुपारी जेव्हा अचानक टीव्ही लावला तर खुशवंत सिंग यांच्या निधनाची बातमी समोर होती. कुणी गेलं तर मी त्यापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतो. पण खुशवंत सिंग यांच्या बाबतीत तसं करणं मला जमू शकलं नाही. खुशवंत सिंग हे अतिशय चांगला माणूस होते. विद्वान माणूस होते. इंटलेक्च्युअल या अर्थी विद्वान नाही.. त्यांची विद्वत्ता अष्टावधानी होती. त्यांना माणसांची अतिशय उत्तम समज होती. असा लेखक आपल्यातून गेला ही अतिशय दु:खद बाब आहे. त्यांनी नुकतंच शंभरीत पर्दापण केलं होतं. अलीकडे ते ‘मी कधीही मरणार, इथून सटकणार’ असं म्हणायचे. आपल्या मरणाचीही ते सारखी थट्टा करायचे. त्यांची विनोदबुद्धी अप्रतिम होती. त्यांच्या सदराचं नाव होतं, ‘लिटल मॅलिस टुवर्ड्स वन अँड ऑल.’ ते पूर्णपणे चुकीचं नाव होतं, आणि म्हणूनच खुशवंत सिंग ते वापरायचे. कुणाला दुखवायची त्यांची इच्छा नसायची. पण याचा अर्थ ते सडेतोड नव्हते, असे अजिबात नाही. त्यांच्या या गुणांपासून मी धडे घेतले आहेत.
खुशवंत सिंग स्वत:वरही उत्तम विनोद करायचे. त्यांना कधीच कुणी बाईलवेडा म्हणू शकलं नसतं, पण त्यांनी आपलं स्त्रियांविषयीचं आकर्षण कधी लपवलं नाही. त्यांचा उघडपणा बेफाम होता. आपणा महाराष्ट्रीय माणसांना चांगलं-वाईट कसं कळत नाही, कोण गुणी आहे आणि कोण नाही, हे खुशवंत सिंग कधी विसरले नाहीत. त्यांनी शिखांचीही केवढी टिंगल केली! पण जेव्हा ‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ झालं, तेव्हा त्यांना ते पटलं नाही. त्याविषयी त्यांनी सडेतोडपणे लिहिलं. भिंद्रनवाल्यांना इंदिरा गांधींनीच आधी जवळ केलं होतं, पण शेवटी ते त्यांच्यावरच उलटले. खुशवंत सिंग आणि इंदिरा गांधी यांचे अतिशय चांगले संबंध होते. आणीबाणीत त्यांनी इंदिरा आणि संजयची बाजू घेतली होती. तेव्हा जे झालं ते त्यांनी प्रामाणिकपणे सांगितलं.
खुशवंत सिंग यांचं माझ्यावर खूप मोठं ऋण आहे. ते मला कधीच फेडता येणार नाही. त्याची मला गरजही वाटत नाही. ‘रावण अँड एडी’ ही माझी कादंबरी त्यांना खूप आवडली होती. त्यांनी धार्मिक सौहार्दाच्या पारितोषिकासाठी तिची शिफारस करून ते मिळवून दिलं. ‘ककल्ड’ही त्यांना आवडली. कितीतरी आठवडे ते आपल्या सदरातून ‘ककल्ड’मधला एक उतारा देत. मी जेव्हा दिल्लीला जायचो तेव्हा त्यांच्याकडे काहीसा कचरत जायचो. त्यांच्याकडे सतत विविध माणसं भेटायला आलेली असायची. त्यात कितीतरी पाकिस्तानी लोक असायचे. आपल्या मनात पाकिस्तानबद्दल खुन्नस असते, पण तशी खुन्नस खुशवंत सिंग यांच्या मनात नव्हती. खरंतर ते लाहोरचे. फाळणीत तेही होरपळले होते, पण तरीही त्यांनी पाकिस्तानबरोबरचं मैत्रीचं नातं कधी तोडलं नाही. त्यापासून मी खूप शिकलो. मी त्यांनाच फक्त ‘सर’ म्हणायचो.
‘ककल्ड’ प्रकाशित झाल्यानंतरची गोष्ट. मी त्यांना दिल्लीत त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेटलो. त्यांनी काय करावं? दुसऱ्या दिवशी त्यांच्या सदराची सुरुवातच ‘ककल्ड’पासून केली. खुशवंत सिंग स्वत: थोर लेखक होते. अशा लेखकानं इतर लेखकाबद्दल लिहायला मोठेपणा लागतो, खूप मोठं मन लागतं.
खुशवंत सिंग यांनी केवढय़ा गोष्टी केल्या- वकील, संपादक, उच्चालयायुक्तातील नोकरी.. ते नमूद करता येत नाही. ‘इलस्ट्रेटेड वीकली ऑफ इंडिया’ला त्यांनी कुठे नेऊन ठेवलं! तेही त्या काळात. त्यांना कशात इंटरेस्ट नव्हता! ९८ व्या वर्षांपर्यंत ते पुस्तकं लिहीत होते. आपल्याकडे कुणी मायेचा लाल असा आहे का? खुशवंत सिंग यांच्याकडे गर्व नव्हता. सगळ्यांबरोबर ते सारखंच वागायचे.