विविध क्षेत्रांत विधायक कार्य करणाऱ्या संस्था आणि त्यांच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्याची आस असणारे संवेदनशील नागरिक यांच्यातील दुवा म्हणजे ‘लोकसत्ता सर्वकार्येषु सर्वदा’ हा उपक्रम! यात गणेशोत्सवाच्या काळात राज्यातील दहा संस्थांची ओळख करून देण्यात येते. आजवर या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील ९२ संस्थांना आर्थिक साह्य़ झाले आहे. या दानयज्ञाच्या यंदाच्या नवव्या पर्वालाही वाचकांनी भरघोस प्रतिसाद दिला. यंदाच्या पर्वाची सांगता मुंबई येथे बुधवारी, ३० ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. दानशूरांनी दिलेल्या देणग्यांचे धनादेश प्रभावळकर यांच्या हस्ते संस्थांच्या प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आले. या वेळी या संस्थांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलेली मनोगते..

 * संकलन : निलेश अडसूळ

sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
Sanjeev Sanyal
“UPSC म्हणजे वेळेचा अपव्यव”, पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीच्या सदस्याचं विधान; म्हणाले, “तुम्हाला खरोखरच…”

नवी उभारी घेण्यासाठी धीर मिळाला!

वाचनालयाला दीडशे वर्षे पूर्ण होत असतानाच महापुराने दिलेला झटका धक्कादायक होता. कित्येक वर्षांपासूनची जतन केलेली ग्रंथसंपदा वाहून गेली. पुस्तकांचेच नाही, तर कपाटे, बांधकाम सगळ्याचेच नुकसान झाले. गेलेले साहित्य पुन्हा कसे उभे करावे, हा प्रश्न असतानाच ‘लोकसत्ता’च्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’चे व्यासपीठ मिळाले. संस्थेविषयी ‘लोकसत्ता’त आलेला लेख वाचून अनेक संस्थांनी मदतीचा हात पुढे के ला. केवळ आर्थिक मदतच मिळाली नाही तर नवी उभारी घेण्यासाठी मोठा धीरही मिळाला. या उपक्रमातून अनेकांच्या मनात दातृत्वाची भावना निर्माण झाली. विशेष म्हणजे, अनेकांना दान करायचे असते, परंतु पारदर्शी व्यवहाराबाबत साशंकता असल्याने ते होत नाही. परंतु अशा सर्व घटकांना एकत्र आणून यशस्वीरीत्या सुरू ठेवलेल्या या दानयज्ञाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.

– अतुल गिजरे, सांगली जिल्हा नगर वाचनालय

पुनर्वसनाचे कार्य आता शक्य

दुर्गम भागात असलेल्या तिवरे गावावर धरणफुटीने अस्मानी संकट कोसळले. जीवितहानी झाली, अनेकांचे घर-संसार उद्ध्वस्त झाले. पूरस्थिती ओसरेपर्यंत शाळेच्या सभागृहात गावक ऱ्यांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली होती. या भागात प्रचंड गरिबी असल्याने मुलांसाठी शिक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. आजही विद्यार्थी सहा-सहा किलोमीटर दुरून चालत शाळेत येतात. त्यामुळे या दुर्घटनेनंतर शाळा, विद्यार्थी आणि समस्त ग्रामस्थांचे पुनर्वसन करणे हे संस्थेपुढे आव्हान होते. परंतु ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून मिळालेल्या मदतीने हे कार्य आता सहज शक्य झाले. ‘लोकसत्ता’च्या अनेक वाचकांनीही थेट गावात येऊन शाळेची पाहणी केली, गावक ऱ्यांना सहकार्य केले.

– रघुनाथ जाधव, दसपटी विभाग राम वरदायिनी शिक्षण संस्था (न्यू इंग्लिश स्कूल, तिवरे)

ज्ञानी आणि दानशूर मंडळी प्रकल्पाशी जोडली गेली

ज्या ठिकाणी अजूनही विकास पोहचलेला नाही, अशा किनवटसारख्या दुर्गम भागाला प्रकाशात आणण्याचे काम ‘लोकसत्ता’ने केले. २५ वर्षे तिथे मी एकटाच डॉक्टर आणि शल्यचिकित्सक आहे. अद्याप शासनाकडून कोणतीच वैद्यकीय सेवा पुरवली गेली नाही. किनवटसारख्या भागात आरोग्याविषयी अद्ययावत सुविधा देण्यासाठी माझा लढा आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’मधील लेखातून ज्या वेळी ‘साने गुरुजी रुग्णालया’विषयी लोकांना माहिती मिळाली, तेव्हा हा उपक्रम प्रकाशात आला. या कार्यासाठी एमआयडीसीने पाच एकर जागा देऊ केली आहे. इमारत उभारणीचे काम ‘लोकसत्ता’च्या सहकार्यामुळे लवकरच सुरू होईल. ‘सर्वकार्येषु सर्वदा’मुळे आज अनेक ज्ञानी आणि दानशूर लोक आमच्या प्रकल्पाशी जोडले जात आहेत.

– अशोक बेलखोडे, भारत जोडो युवा अकादमी (साने गुरुजी रुग्णालय, किनवट)

विज्ञाननिष्ठ पिढी घडवण्याचा संकल्प

जिथे विद्यार्थ्यांना मार मिळणार नाही अशी शाळा निर्माण करावी, असे स्वप्न होते. परंतु त्याचा अभ्यासक्रमही पुस्तकापलीकडचा हवा होता. याच संकल्पनेतून ‘शाश्वत कन्सेप्ट स्कूल’ उभारण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणाचे ओझे वाटता कामा नये, शिक्षणातून चुकीच्या समजुती आणि परीक्षाकें द्री ज्ञान देण्यापेक्षा प्रात्यक्षिकातून मुले घडवायला हवीत, हा आमच्या कामाचा उद्देश आहे. इथे शिकणाऱ्या मुलांना दप्तर, गणवेश आणि इतर शाळांप्रमाणे कोणतेही बंधन नाही. परंतु अशा उपक्रमाला पालकांकडूनही प्रतिसाद मिळणे गरजेचे आहे. याची सुरुवात झाली असली, तरी ‘सर्वकार्येषु सर्वदा’मुळे संस्थेचे काम राज्यभरात पोहचले याचा विशेष आनंद आहे. या माध्यमातून मिळालेल्या अर्थसाहाय्यातून अधिक अभिनव संकल्पना राबवून विज्ञाननिष्ठ पिढी घडवण्याचा आमचा प्रयत्न असेल.

– अतुल गायगोडे,

जयहिंद एज्युकेशन फाऊंडेशन (शाश्वत कन्सेप्ट स्कूल, अमरावती)

वंचितांच्या शिक्षणासाठी साथ

परभणीसारख्या दुष्काळी भागातून कामानिमित्त पुण्यात आलो, तेव्हा ग्रामीण भागातील समस्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून गेला. विशेष म्हणजे, दोन भागांमध्ये असलेली आर्थिक दरी मिटवायची असेल तर ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलांना शिक्षण देणे गरजेचे आहे, याची जाणीव झाली. आणि त्यातूनच ‘स्नेहवन’चे काम सुरू झाले. महाराष्ट्राच्या सहा जिल्ह्य़ांमधून आणि २० गावांमधून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांची निवड करण्यात आली. आज ५० विद्यार्थी या शाळेत शिकत असून शाळेसोबतच ‘स्नेहवन’ प्रकल्पातील अनेक जबाबदाऱ्या ते आवडीने पेलतात. परंतु मागील काही महिन्यांत झालेल्या जोरदार पावसामुळे संस्थेचे मोठे नुकसान झाले. त्यातून मार्ग कसा काढायचा, या विचारात असतानाच ‘लोकसत्ता’ची साथ मिळाली. ‘स्नेहवन’विषयी आलेला लेख वाचून अनेकांनी मदतीसाठी संपर्क साधला. या प्रतिसादामुळे आम्हालाही काम करण्यासाठी पुन्हा उभारी मिळाली. ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून मिळालेल्या निधीमुळे आम्हाला आणखी काही विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेता येईल.

– अशोक देशमाने, स्नेहवन

शब्दातीत दातृत्वाची भावना

लोणावळ्याजवळ एका छोटय़ा हॉटेलात चहा घेण्यासाठी म्हणून थांबलो. तिथल्या चहा देणाऱ्या मुलाने आम्हाला पाहिले आणि आत जाऊन काही तरी घेऊन आला. ‘लोकसत्ता’ने आमच्या संस्थेवर लिहिलेला लेख त्याने मोबाइलमध्ये संग्रहित केला होता. तो दाखवून- ‘‘हे तुम्हीच का,’’ असे त्याने विचारले. ओळख पटताच त्याने दोन रुपये आमच्या हाती दिले. ‘‘साहेब, माझ्याकडे एवढेच आहेत, एवढी छोटी मदत तुम्हाला चालेल का,’’ असे तो म्हणाला. त्या वेळी ती रक्कम आमच्यासाठी खूप मोठी होती; कारण पैशांपेक्षा त्यामागील दातृत्वाची भावना शब्दातीत आहे. दान किती करतो, याला महत्त्व नाही; पण ती करण्याची इच्छाशक्ती निर्माण होणे गरजेचे आहे. ती निर्माण करण्याचे काम ‘लोकसत्ता’ने के ले याबद्दल मानावे तेवढे आभार कमीच आहेत. मी ज्या वेळी गावाहून पुण्यात आलो, तेव्हा कुणीही आसरा दिला नाही. रेल्वे फलाटावर काढलेले ते दिवस खूप काही शिकवून गेले. तेव्हाच ठरवले की, माझ्यासारख्या अंध, अपंग व्यक्तींना बळ द्यायचे. अशा मुलांचे कौशल्य ओळखून त्या-त्या क्षेत्रात त्यांना संधी उपलब्ध करून देण्याचे काम गेली २० वर्षे माझ्या संस्थेमार्फत सुरू आहे. ‘लोकसत्ता’मुळे आमचे काम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. यामुळे काम करण्यासाठी अधिकच प्रोत्साहन मिळाले.

– राहुल देशमुख, नॅशनल असोसिएशन फॉर द वेल्फेअर ऑफ फिजिकली चॅलेन्जड्

जमीनदोस्त शाळा पुन्हा उभी राहील!

आपल्या हातून सामाजिक काम घडावे या उद्देशाने पन्हाळा येथे सुरू के लेल्या बालवाडीचे पुढे शाळेत रूपांतर झाले. संस्थेमार्फ त चालवल्या जाणाऱ्या या शाळेला पुढे अनुदानही प्राप्त झाले. महाराष्ट्रात जेव्हा धोधो पाऊस बरसत होता, तेव्हा आपण गडाच्या पायथ्याच्या उंचावर सुरक्षित आहोत, अशी भावना मनात येत असतानाच जमिनीला भेग पडली. ही भेग नेमकी शाळेतून गेल्याने संपूर्ण शाळा जमीनदोस्त झाली. यावर तोडगा काढण्यासाठी अनेक हात पुढे आले. परंतु मुलांच्या शैक्षणिक सोयींबाबत कमतरता जाणवत होती. ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाच्या माध्यमातून आमची व्यथा लोकांपर्यंत पोहोचली आणि मदतीचा ओघ सुरू झाला. या मदतीतून लवकरच शाळा पूर्ववत करण्याचे काम सुरू होईल.

– हंबीरराव कुराडे, नवशिक्षण प्रसारक मंडळ, पन्हाळा

प्राण्यांचे घर पूर्ववत होणार!

माझा जन्म रायगडचा असल्याने शिवाजी महाराजांचे कार्य आणि चरित्र मनामनांत ठसले आहे. परंतु समज येत गेली तसे जाणवू लागले की, आपण जे काही शिकलो ते के वळ पुस्तकापुरते मर्यादित राहिले. प्रत्यक्ष कृती करण्यासाठी मात्र २६ जुलै २००५ साली मुंबईत आलेला जलप्रलय कारणीभूत ठरला. त्या वेळी प्रत्येक जण आपल्या बचावासाठी नाना प्रयत्न करत होते, पण प्राणी मात्र दगावत होते. हे लक्षात आल्यानंतर कामाला सुरुवात झाली आणि त्या पुरातून ६७ प्राण्यांना वाचवण्यात यश आले. तिथून सुरू झालेल्या या प्रवासात आजवर जवळपास साडेचार हजार जखमी प्राण्यांवर मोफत उपचार के ले गेले. परंतु यंदाच्या पावसात आमचे २० प्राणी आणि १४ पिंजरे वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले. पुन्हा याची सुरुवात करावी का, असाही प्रश्न होता. परंतु ‘लोकसत्ता’ने के लेल्या सहकार्यामुळे आता पुन्हा माझ्या प्राण्यांचे घर पूर्ववत होणार आहे, याची खात्री वाटते!

– गणराज जैन, पाणवठा फाऊंडेशन

सर्वागीण विकासासाठी मोलाची मदत

शहापूर-मुरबाडसारख्या भागात काम करताना कामापेक्षा तिथल्या ग्रामीण समस्यांनी मला अधिक भंडावून सोडले. गरिबी, बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव, दारिद्रय़ आणि अशा किती तरी समस्यांमागे ‘पाणी’ हे एकमेव कारण असल्याचे लक्षात आले आणि तिथूनच ‘वसुंधरा’च्या कामाला सुरुवात झाली. महाराष्ट्रातील सर्वाधिक नैसर्गिक जलसंपदा लाभलेल्या या दोन तालुक्यांमध्ये पाण्याचे व्यवस्थापनच झालेले नाही. त्यामुळे अनेक ज्ञानी दिग्गजांच्या मार्गदर्शनातून हा प्रकल्प सुरू आहे. परंतु हे करताना आम्ही स्थानिक लोकसहभाग असल्याशिवाय तिथे काम करत नाही. लोकांना त्याची किं मत कळण्यासाठी त्यांचेही हात या कामात लागायलाच हवे. या कामासाठी अनेक उपकरणे, महागडी यंत्रे लागत असल्याने आर्थिक पाठबळाची मोठी आवशकता असते आणि तो हात ‘लोकसत्ता’ने पुढे के ला. ही के वळ आर्थिक मदत नाही, तर आमच्या कामाची दखल आहे. ‘सर्वकार्येषु सर्वदा’च्या माध्यमातून या प्रकल्पाला लाभलेले अनेक दानशूरांचे हात शहापूर-मुरबाडच्या सर्वागीण विकासात नक्कीच मोलाचे ठरतील.

– आनंद भागवत, वसुंधरा संजीवनी मंडळ

शास्त्रीय संगीताच्या प्रसाराला पाठबळ

२५ वर्षांपूर्वी जेव्हा नालासोपारा गावात राहायला आलो, तेव्हा संगीत कलेबद्दल इथे असलेली अनभिज्ञता लक्षात आली. ज्यांना संगीताची आवड होती, त्यांना मुंबईशिवाय पर्याय नव्हता. म्हणून याचा समन्वय साधण्यासाठी ‘स्वरांकित’ची स्थापना करण्यात आली. लहानांपासून थोरांपर्यंत प्रत्येकामध्ये शास्त्रीय संगीताची रुची निर्माण करण्याचे काम सुरू झाले. संगीत शिक्षण देणाऱ्या आणि उत्तम श्रोते घडवणाऱ्या या संस्थेच्या २५ व्या वर्षांत ‘लोकसत्ता’कडून असे साहाय्य मिळणे, हे आम्ही भाग्यच समजतो. कारण कोणतेही सामाजिक कार्य आर्थिक पाठबळाशिवाय उभे राहू शकत नाही. ‘स्वरांकित संगीत विद्यालया’ला या मदतीतून अधिकाधिक लोकांपर्यंत शास्त्रीय संगीत पोहचवता येईल.

– मधुसूदन आपटे, स्वरांकित चॅरिटेबल ट्रस्ट, नालासोपारा