News Flash

 ‘गुरुकुल’ संस्था सुरू करावी

भारतीय वाद्यांच्या खरेदीवर शासनाने वस्तू सेवा कर (जीएसटी) लावलेला नाही ही खूप चांगली गोष्ट आहे.

पं. उल्हास बापट (ज्येष्ठ संतुरवादक)

संगीत

केवळ शास्त्रीय गायन आणि वादनच नव्हे तर सर्व प्रकारच्या कलांचे शिक्षण ‘गुरुकुल’ पद्धतीने देणारी संस्था राज्य शासनाने सुरू करावी. येथे शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांकडून माफक शुल्क आकारले जावे. म्हणजे जे खरोखरच गरजू आहेत आणि ज्यांना आर्थिक परिस्थितीमुळे कोणतीही कला शिकता येत नाही त्यांनाही येथे शिक्षण घेता येईल आणि मान्यवर दिग्गज कलाकारांचे मार्गदर्शन त्यांनाही मिळेल.

शास्त्रीय संगीत, गायन, वादन आदी विविध कलाक्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांना राज्य शासनाकडून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. हे पुरस्कार केवळ कागदोपत्री नाहीत तर त्यांचे वितरण व आयोजनही खूप चांगल्या प्रकारे केले जाते. या पुरस्कारांच्या धर्तीवर राज्य शासनाने उदयोन्मुख आणि युवा कलाकारांसाठीही पुरस्कार दिले जावेत. त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी राज्य स्तरावर राज्य शासनाने स्पर्धा सुरू करावी. यामुळे तरुण कलाकारांना प्रोत्साहन तर मिळेलच, पण त्यांचे कौतुकही होईल. अशा प्रकारची ही स्पर्धा आणि पुरस्कार सर्व कलांसाठी असावेत. वृद्ध कलावंतांना राज्य शासनाकडून मानधन दिले जाते. या कलाकारांचा उदरनिर्वाह योग्य प्रकारे होईल, त्यांना कोणापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही, अशा प्रकारे मानधनाची ती रक्कम असावी.

कलाकारांनीही त्यांच्या चांगल्या काळात त्यांना मिळालेल्या पैशांचे योग्य ते आर्थिक नियोजन करावे, योग्य ठिकाणी पैसे गुंतवावे, म्हणजे उतारवयात आणि काही काम नसतानाच्या काळात त्याचा त्यांनाच उपयोग होईल.

भारतीय वाद्यांच्या खरेदीवर शासनाने वस्तू सेवा कर (जीएसटी) लावलेला नाही ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याचप्रमाणे परदेशी वाद्यांनाही वस्तू सेवा कर आणि अन्य करांतून वगळण्यात यावे. यामुळे त्या वाद्यांची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्यात येईल आणि एखादी कला शिकणाऱ्याला ते वाद्य विकत घेता येऊ शकेल. शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वाद्य विकत घेणे ही चैन नसून ती त्याची गरज आहे.

विविध वाद्यांची निर्मिती आणि उत्पादन करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना वाद्यनिर्मितीसाठी प्रोत्साहन द्यावे. त्यासाठी काही नियम, कायदे शासनाने शिथिल करावे. त्यामुळे अधिक मोठय़ा प्रमाणात वाद्यनिर्मिती होऊ शकेल.

शास्त्रीय संगीत हा आपला अमूल्य ठेवा असून शास्त्रीय संगीतातील गायन आणि वादन या कलांचे जतन आणि संवर्धन होण्यासाठी काही व्यक्ती, संस्था प्रयत्नशील आहेतच, पण त्यांना शासनाचीही भरभक्कम साथ मिळावी.

पं. उल्हास बापट (ज्येष्ठ संतुरवादक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 1:55 am

Web Title: maharashtra government should start institution like gurukul system for all types of art
Next Stories
1 बांधकाम व्यावसायिकांना दिलासा
2 भूतदयेच्या संस्कृतीशी फारकत का?
3 रंगधानी : स्वत्वाकडून समष्टीकडे
Just Now!
X