जयप्रकाश सावंत

‘‘तुमच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणाकरता मी खर्च केला. पदव्युत्तर शिक्षणाचा खर्च तुम्ही स्वत:च्या कमाईतून करा. जर तुम्ही मी करीत असलेल्या वकिलीच्या व्यवसायासाठी पुढील शिक्षण घेत असाल तर मी गुंतवणूक करीन, अन्यथा तुमचे तुम्ही पाहून घ्या. माझ्या केवळ शुभेच्छा राहतील,’’ असे मी माझ्या दोन्ही मुलांना- प्रशांत आणि क्रांतीला स्पष्ट शब्दांत मध्यमवर्गीय कुटुंबातील बापाच्या भूमिकेतून सांगितलं. त्याप्रमाणे त्यांनी आपापला निर्णय स्वतंत्रपणे घेतला.

प्रशांत उच्च शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियाला गेला. मिळेल ते काम करून अर्थार्जन करत त्याने ग्रिफिथ विद्यापीठामधून ‘आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था’ या विषयावरील एमबीएची पदवी प्राप्त केली. त्याचं कसं काय चाललंय, हे पाहण्यासाठी आम्ही उभयता ऑस्ट्रेलियाला गेलो होतो. तिथलं वातावरण पुढील प्रगतीसाठी तितकंसं पोषक नसल्याचं सर्वाचंच मत झाल्याने आम्ही मुंबईला परतलो. इथे मोठय़ा उद्योगातील अनुभव मिळाल्यानंतर प्रशांतची पावलं  लंडनकडे वळली. साहस आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर त्याने बाथसारख्या पूर्णत: हेरिटेज शहरात केलेली नोकरी, तिथल्या सामाजिक उपक्रमांमधील त्याचा सहभाग, स्वावलंबन, स्वयंशिस्त, सोशिकता आणि बुद्धिमतेच्या बळावर त्याने अखेर युनायटेड किंग्डमच्या केंद्र शासनातील वाहतूक विभागात उच्च पदाची नोकरी मिळवली. लंडनसारख्या शहरात स्वत:चं घर घेतलं. नियमित व्यायामाने शरीर तंदुरुस्त ठेवलं. कारणपरत्वे तो जगभर फिरत असतो. लेखन, वाचनाबरोबरच घोडेस्वारीचाही छंद त्याने जोपासला आहे. तिथल्या वृत्तवाहिन्यांवर तो अर्थविषयक मतं मांडतो.

अधूनमधून तो आम्हाला भेटण्यासाठी मायदेशी येत असतो, तर त्याला भेटण्याच्या हेतूने आमचंही काही दिवसांकरिता परदेशगमन होत असतं. मुलाची प्रगती आनंददायी आहे. परंतु मुलगा अजून लग्न करीत नाही म्हणून त्याची आई अधूनमधून तक्रार करत असते. त्याच्या खासगी आयुष्यात आपण डोकवायचं नाही, योग्य तो निर्णय योग्य त्या वेळी घेण्यास तो समर्थ आहे, दोन पिढय़ांतील अंतराची आपण नोंद घेतली पाहिजे, ‘तो सुखी, तर आपण सुखी’ असं तिला समजावून सांगण्याचा आणि समजून घेण्याचा मी प्रयत्न करतो. जवळच राहणाऱ्या विवाहित मुलीच्या संसारात नातवाचं कोडकौतुक करण्यात प्रशांतची आई आता रममाण झाली आहे. घरच्या कामांतही ती मग्न असते. एकांत घालवण्यासाठी टेलिव्हिजन आणि मोबाइलसारख्या सोयी आणि शेजाऱ्यांची साथ आहेच सोबतीला.

मी माझ्या व्यवसायात व्यस्त आणि मस्तीत राहतो. पसे घेऊन दुसऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचा माझा वकिली व्यवसाय! मी त्यात माझ्या समस्यांची भर का टाकावी? वेळ भर्रकन् निघून जातो. आम्ही उभयता एकमेकांना सांभाळून घेतो.

परदेशी वास्तव्य करणाऱ्या मुलांच्या आई-वडिलांची अवस्था कशी असते, असं कुणी विचारलं तर मी म्हणेन, मुलगा दूर आहे असं म्हणणं आता तितकंसं बरोबर नाही. मोबाइल, व्हॉट्सअ‍ॅप, स्काईप, ई-मेल यांसारख्या आधुनिक उपकरणांनी अवघं ‘विश्वचि माझे घर’ केलेलं आहे. मी मुलाला पाहू शकतो, त्याच्याशी केव्हाही बोलू शकतो, विचारपूस करू शकतो आणि एकमेकांना मदतही करू शकतो. इकडे अतिवृष्टीमुळे आणि अन्य कारणाने ट्रेन्स बंद झाल्या असतील तर ते मला कळण्याआधीच तोच मला मोबाइलवरून ते कळवतो. त्यामुळे कसलाही दुरावा जाणवत नाही.

त्याने परदेश का स्वीकारला, याचं उत्तर तोच देऊ शकेल. परंतु इथल्या परिस्थितीला कंटाळून तो गेला, किंवा तो केवळ भरपूर पसे कमावण्याच्या उद्देशानं परदेशी गेला आहे असं म्हणता येणार नाही. परदेश प्रगत आहे, उत्तम व्यवसाय, दर्जेदार राहणीमान, विशिष्ट जीवनशैली, शिस्तप्रियता, संस्कृती, लहरी, पण उत्कृष्ट हवामान, सुव्यवस्था, स्वच्छता, पर्यावरण, चांगले अर्थार्जन अशा अनेक बाबी मन आकर्षित करणाऱ्या आणि तरुणांच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या आहेत.. आव्हानात्मक आहेत.

तो जेव्हा केव्हा इथे काही दिवसांकरता येतो तेव्हा तो इथल्या वातावरणातही तल्लीन होऊन जातो. एक अर्थतज्ज्ञ म्हणून इथल्या राजकीय-आर्थिक-सामाजिक परिस्थितीचं तो योग्य ते विवेचन करतो. इथल्या सामाजिक बदलांचंही तो स्वागत करतो. काही सामाजिक संस्थांना मदतही करतो. त्याची आपल्या मायभूमीशी नाळ तुटलेली नाही.

या सगळ्या ‘रोचक’ वर्णनामागे काही वेगळं कारण दडलंय का? त्याला काही वेगळी झालर आहे का? असुरक्षिततेची भावना त्यातून डोकावते का? काळजी जीवघेणी ठरतेय का? उतारवयात असहायता भासते आहे का? परदेशातील मुलाच्या संसाराला आपण काही हातभार लावू शकतो का? आपण केवळ व्यवहारापुरतेच उरलो आहोत का? असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात उभे राहणं स्वाभाविकच आहे. मात्र, या प्रश्नांची उत्तरं ही व्यक्तिसापेक्ष, परिस्थितीसापेक्ष आणि प्रत्येकाच्या दृष्टिकोणावर अवलंबून असतील. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी खेडेगावातून दूरवर मुंबईला शिक्षण आणि कामासाठी आलेला मी सर्वप्रथम ‘चाकरमानी’ होतो. आणि मुंबईवरून मी पाठवीत असलेल्या मनीऑर्डरचा फार मोठा आधार गावी असलेल्या माझ्या आई-वडिलांना आणि भावंडांना होता. तशी परिस्थिती आज राहिलेली नाही. खूप बदल झालाय. बहुतांशी पालक मुलांकडून मदतीची अपेक्षा ठेवत नाही. एकमेकांना साहाय्य जरूर करतात. आता जीवनात उद्भवणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी उपाययोजना करता येते, खबरदारी घेता येते आणि आयुष्याची संध्याकाळ सुसह्य करता येते. कुटुंबातील एक सदस्य परदेशात असणं म्हणजे आपलंच घर तिथपर्यंत विस्तारित झालं आहे असं समजायचं.

काळजी करण्यापेक्षा एकमेकांना ‘काळजी घ्या’ असं मन घट्ट करून सांगायचं. या बहुरंगी, बहुढंगी जीवनाचा आस्वाद घेत आनंदानं जगणं आपल्याच हाती आहे. आम्हा वृद्धांना आपल्यावर काय प्रसंग गुजरणार आहे किंवा आपल्यापुढे काय वाढून ठेवलं आहे याची कल्पना असते. त्यादृष्टीने आम्ही तयारीही केलेली असते. मी तर देहदान केलेलं आहे. त्याबद्दलची माहिती जवळच्या सर्वाना दिलेली आहे आणि सांगितलंय की,बातमी मिळाली तर धावपळ करू नका. फक्त सांगितलेल्या नंबरवर फोन करा, ते पुढची व्यवस्था करतील. कुठलाही विधी करू नका. अजूनपर्यंत सर्व काही ठीक आहे. भविष्यकाळात वृद्धाश्रमाचा पर्यायही मनात आहे. मृत्युपत्र करून ठेवलं आहे. आपली जबाबदारी कुणावर पडू नये असं वाटतं. गाठीला अनुभवाची शिदोरी आहेच. ही आनंदयात्रा शेवटास पोचेल. मोहजालात अडकणार नाही. मुलगा परदेशी असला काय किंवा मुलगी जवळपास असली काय, आपला प्रवास आपण आनंद घेत आणि दुसऱ्यांना आनंद देत स्वत:च करायचा आहे. हे विषयांतर तर झालं नाही ना?

पुन्हा परदेशातील मुलाकडे वळू या. दूरवर राहणाऱ्याच्याप्रति अधिक लळा तर लागत नाही? एक खरंय, पहिल्या वेळेस मुलगा परदेशी जातेवेळी त्याला निरोप देण्यासाठी विमानतळावर जाताना मी भावनावश होऊन खूप रडलो. असं पुढे एक-दोन वेळा घडलं. त्यानंतर मात्र तो येतो-जातो, माझं रडणं मात्र आपसूक बंद झालं आहे. का बरं? आता आम्ही सुहास्यवदनाने एकमेकांना शुभेच्छांसह निरोप देतो. याला जीवन ऐसे नाव! असतील पेच, लागत असेल ठेच, परिवर्तन म्हणतात ते हेच! मुलांच्या करिअरला अडथळा येईल असं काही होता कामा नये. ‘शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी’ असं म्हटलं जातं, ते उगीचच नाही. त्याचा अनुभव येतच असतो. परदेशी गेलेला मुलगा आपला मित्रच असतो. तिथेही सारं काही आलबेल असतं असं म्हणता येणार नाही. परिश्रम सर्वाच्याच पाचवीला पुजलेले असतात. पुढे जात राहिलं पाहिजे. अगदी सातासमुद्रापार!