News Flash

सांगलीची वाटचाल केळी उत्पादनाकडे!

केळीसाठी आवश्यक असलेले हवामान सांगली, सोलापूर जिल्ह्यात असल्याने केळी लागवड वाढत आहे

(संग्रहित छायाचित्र)

दिगंबर शिंदे

फळांमध्ये केळाचा वापर आणि उलाढाल ही सतत सुरू असते. यामुळे या फळाच्या उत्पादनालाही सतत मागणी असते. यातूनच आता सांगलीतील शेतकरी मोठय़ा प्रमाणात केळी उत्पादनाकडे वळला आहे. सांगलीच्या या नव्या ओळखीबाबत..

भारतीय संस्कृतीमध्ये केळाला महत्त्व आहे ते त्यातील पोषणमूल्यांमुळे. उष्ण कटिबंधीय प्रदेशात घेतले जाणारे केळी लागवडीमध्ये जगात भारताचा दुसरा क्रमांक असून विपणनमध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. मुसा इंडिका या नावाने केळीची ओळख असली तरी पोटातील भूक भागविण्याचा सर्वात स्वस्त आणि खात्रीलायक उपाय म्हणून केळी सेवनाकडे पाहिले जाते. आता सांगली जिल्ह्य़ातही केळीची लागवड वाढत असून जळगाव हे केळीचे आगर म्हणून ओळख असली तरी सोलापूर जिल्ह्यात अकलूजला केळी बाजारपेठ विकसित होऊ लागली आहे. सांगली जिल्ह्य़ात द्राक्ष बागांना पर्याय म्हणून नगदी पिकासाठी केळी लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा दिसत आहे.

केळीसाठी आवश्यक असलेले हवामान सांगली, सोलापूर जिल्ह्यात असल्याने केळी लागवड वाढत आहे. तासगावची द्राक्षे सातासमुद्रापार पोहोचली, द्राक्षामुळे परकीय चलनही मिळते. मात्र बदलत्या हवामानामुळे द्राक्षावर रोगांचेही आक्रमण वाढले आहे. परिणामी द्राक्ष पीक हाती येईपर्यंत हवामान बदलाचा विपरीत परिणाम होऊन कष्ट, गूंतवणूक वाया जाण्याचा धोका आहे. याच बरोबर विकलेल्या मालाचे पैसे हाती पडेपर्यंत कायम तणावाखाली राहावे लागते. या तुलनेत केळीचे उत्पादन चार पैसे कमी देत असले तरी कमी कष्टामध्ये देणारे असल्याने शेतकरी या केळी लागवडीकडे वळत आहे.

केळीची लागवड करण्याचा कालावधी जून, जुल आणि फेब्रुवारी असा असतो. जून-जुलमध्ये लागवड केलेल्या केळींना मृग बहार असे म्हटले जाते. केळीसाठी काळी, मुरमाड आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन आवश्यक असते. अलीकडच्या काळात जादा उत्पादन देणाऱ्या प्रयोगशाळेत तयार करण्यात येत असलेल्या टिश्यू कल्चर रोपांची लागवड केली जाते. साधारणपणे सात बाय पाच, सहा बाय पाच फूट अंतरावर केळी रोपांची लागवड केली जाते. एकरी साडेतेराशे ते अठराशे रोपे लागतात. एका रोपाची किंमत सर्वसाधारण सोळा ते साडेसोळा रुपये आहे. लागणीवेळी शेणखत द्यावे लागते. याचबरोबर केळीची मुळे वरच्या बाजूलाच जास्त असल्याने ठिबक सिंचनमधून नत्र, स्फुरद आणि  पालाश द्यावे लागते. एका झाडाला १०० ग्रॅम नत्र आणि स्फुरद व पालाश प्रत्येकी ४० ग्रॅम देण्याची गरज असते. तसेच केळी बागेमध्ये ताग लागवड करून त्याचा उपयोग हिरवळीचे खत म्हणून केला तर वाढीसाठी पोषक ठरते. ठिबक सिंचनाने विद्राव्य खतेही द्यावी लागतात.  लागणीनंतर सहा महिन्यात केळीला घड येतात. याला लेंगरही म्हटले जाते. एका घडाला १० फण्या आणि प्रत्येक फणीमध्ये १६ ते १८ केळी वाढीसाठी उत्तम मानली जातात. एका घडाचे वजन ४० ते ४५ किलो होते. एकरी ५० टन उत्पादन मिळते.

अतिथंडी पडली तर केळीला नुकसानकारक रोग येण्याची शक्यता असते. सतत आठ दिवसापेक्षा अधिक काळ हवेचे तपमान १३ अंशाखाली राहिले तर सिगाटोक या बुरशीजन्य रोगाला केळी बळी पडतात. अन्यथा फारसे रोग केळीच्या वाटय़ाला जात नाहीत. उष्ण कटिबंधीय प्रदेश असेल तर तपमान सातत्याने एवढे कमी असत नाही. त्यामुळे रोगाचा फारसा प्रादुर्भाव नसला तरी बाविस्टिनसारखे बुरशीवरील औषध फवारले जाते. मात्र जोरदार वारे, गारपीट यामुळे केळीचे नुकसान होऊ शकते. वाऱ्यामुळे झाडे पडण्याचा धोका असतो. जोरदार वाऱ्यामुळे होणारे नुकसान कमी  करण्यासाठी बागेभोवती शेवरीचे कुंपण करता येते.

केळीसाठी स्थानिक पातळीवर बाजारपेठ उपलब्ध असली तरी अरब राष्ट्रातही ऊर्जेचा चांगला स्रोत म्हणून केळाला मागणी आहे. मात्र यावर्षी करोना संकटामुळे बाह्य़ बाजारात माल जाणे बंद झाल्याने स्थानिक पातळीवरील बाजारावरच अवलंबून राहावे लागत आहे. केळीची खरेदी ठोक आणि वजनावर होत असल्याने संघटित व्यापाऱ्याकडून अन्य शेतीमालाप्रमाणे साखळीने दर पाडले जातात. मात्र ग्राहकांना किमान २० रुपये दरानेच बाजारात केळी खरेदी करावी लागतात. एकाच वेळी केळी येत असल्याने उत्पादकांना विक्री व्यवस्थापन जमत नाही.  परिणामी अपेक्षित उत्पादन मिळणे कठीण जाते.

जिल्ह्य़ातील काही शेतकरी केळीची निर्यात आता करू लागले आहेत. अरब देशामध्ये या केळींची निर्यात केली जात असून यासाठी व्यापाऱ्याकडून टनासाठी दहा हजार रुपयापर्यंत दर दिला जात आहे. त्या तुलनेत स्थानिक बाजारात विकल्या जात असलेल्या केळीसाठी दोन ते  पाच हजारापर्यंत माल पाहून दर दिला जात आहे. तरीही एकरी खर्च वजा जाता चाळीस ते पन्नास हजार रुपये उत्पादन मिळते. मात्र निर्यातीसाठी उत्पादित केली जाणारी केळी ही बिनडागी असणे, एकसारखे फळ असणे गरजेचे असते. यासाठी केळीच्या घडावर कागदी आच्छादन करावे लागते.

अलीकडच्या काळात द्राक्ष पिकापासून शेतकरी बाजूला जात आहे. बदलत्या हवामानामुळे द्राक्ष शेती नुकसानीत जात असल्याने हा शेतकरी केळीसारख्या नगदी पिकाकडे वळू लागला आहे. केळीची लागवड केल्यापासून एका रोपापासून सलग किमान दोन तर कमाल तीन पिके घेता येतात. उसाचा ज्याप्रमाणे खोडवा, निडवा घेता येतो, त्याच पध्दतीने केळीचाही खोडवा, निडवा घेता येतो. तसेच केळीचे पीक घेतल्यानंतर पालापाचोळा न काढता, नांगरट न करता दोन ओळीतील जागेमध्ये ऊस लागवड करता येते. अंतिम पीक घेतल्यानंतर असलेल्या केळीचा खोडाचा आणि पालापाचोळ्याचा वापर तसाच बुंध्यावर ठेवून खतासाठी केला जातो. यामुळे केळीच्या जमिनीत केलेल्या उसाचे उत्पादन एकरी शंभर टनापर्यंत जाते. जर केळीला दर मिळाला नाही तर होणारे नुकसान उसाच्या उत्पादनापासून मिळू शकते.

केळी हे ऊर्जेचा नैसर्गिक स्रोत असल्याने दोन केळी सेवनानंतर ९० मिनिटापर्यंत ऊर्जा मिळते, खेळाडूसाठी ऊर्जेचा उत्तम पर्याय मानला जातो. उच्च रक्तदाब असलेल्यांना रक्तप्रवाह सुरळीत राहणे आवश्यक असते. रक्तप्रवाह सुरळीत राहण्यासाठी पोटॅशियमची गरज असते. ही गरज केळीतून पुरवता येते. तसेच  चयापचय क्रिया गतिमान होते. हाडांमध्ये कॅल्शियमचा पुरवठा होतो. रक्तातील  हिमोग्लोबीन वाढ, बध्दकोष्ठता यासाठी आयुर्वेदाने केळी उपयुक्त मानली आहे. लठ्ठपणा कमी होण्यासाठी कच्च्या केळातील तंतुमय फायबर्सचा उपयोग होतो. भूक नियंत्रित करता येते. केळामध्ये पोटॅशियम, फॉलिकअ‍ॅसिड, व्हिटामिन सी, बी, बी-6, लोह, कॅल्शियम असल्याने पोषक तत्त्वांचा खजिना असतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

करोनामुळे बाजारपेठ बंद असल्याचा फायदा घेत काही केळी व्यापारी दर पाडून खरेदी करीत आहेत. याचा फटका उत्पादकांना बसत असून उत्पादक कर्जबाजारी आणि व्यापारी मालामाल अशी स्थिती झाली आहे. पणन विभागाने केळीलाही किमान दराच्या कक्षेत आणण्याची आणि बाजारातील तेजीमंदीचा लाभ शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शीतगृहांची गरज आहे.

– विश्वासराव पाटील, केळी उत्पादक, इस्लामपूर

केळीचा खोडवा घेतल्यानंतर खोड, पाने बाहेर न काढता उसाची लागण केली. उस भरणीवेळी केळीचा पालापाचोळा, खोड रोटरचे मातीआड केल्यानंतर ऊस उत्पादन एकरी शंभर टनापर्यंत जाऊ शकते हा अनुभव निश्चितच दिलासादायक ठरला. दोन वर्षे केळी पीक घेतल्यानंतर पीक बदल करीत ऊस उत्पादन घेतले तर निश्चितच लाभदायी ठरते.

– प्रवीण पाटील, मिरज.

digambar.shinde@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 22, 2020 12:12 am

Web Title: sangli on its way to banana production abn 97
Next Stories
1 धादान्त असत्य.. पुन:पुन्हा!
2 ‘एकाधिकार’ नकोच; पण..
3 ‘महावितरण’च्या दुखण्याचे मूळ..
Just Now!
X