News Flash

अक्षम ते सक्षम!

बौद्धिक अक्षम मुलांचे संगोपन करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणे हे काम अवघडच.

चित्रकला, शिल्पकला, हस्तकलेचे प्रशिक्षण देऊन या मुलांना सक्षम बनविण्याचा प्रयत्न संस्था नेटाने करत आहे.

बौद्धिक अक्षम मुलांचे संगोपन करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करणे हे काम अवघडच. या मुलांना सर्वागाने सक्षम बनवण्याचा वसा कोल्हापुरातील ‘चेतना अपंगमती शिक्षण संस्थे’ने हाती घेतला आहे. या मुलांना मायेची ऊब देण्याबरोबरच भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखांत बळ देण्याचे काम संस्था करत आहे. बौद्धिक अक्षम मुलांमध्ये चेतनेचे स्फुल्लिंग चेतवण्याचे संस्थेचे काम प्रेरणादायी आहे.

त्यां ची शारीरिक, मानसिक वाढ खुंटलेली. त्यांच्या संगोपनाच्या समस्येने पालकही चिंतेने ग्रासलेले. समाजाकडून होणारी अवहेलना आणि बदलत्या जीवनशैलीत अशा अपत्यांचा सांभाळ करायचा कसा, ही चिंता सातत्याने डंख मारणारी. सगळेच भयाण आणि विषण्ण करणारे. अशावेळी या बालकांना जिद्दीने स्वत:च्या पायावर उभे करण्याची उमेद घेऊन एक संस्था पुढे येते काय आणि त्यांना स्वबळावर जगण्याचे स्व-भान मिळवून देत स्वावलंबनाचे धडे देते काय, हे सारे स्वप्नवत वाटणारे. ‘बौद्धिक अक्षम’ मुलांमध्ये चेतनेचे स्फुल्लिंग  चेतवण्याचे काम करायचे म्हणून मग संस्थेचे नावही ‘चेतना अपंगमती विकास संस्था’ असे ठेवलेले. नियतीने हिरावलेल्या बौद्धिक क्षमतेवर मात करून सक्षमतेचे तेजपुंज ‘वरदान’ मिळवून देणाऱ्या कोल्हापुरातील शेंडा पार्कातील संस्थेचे हे कार्य निश्चितच प्रेरणादायी आहे.

अपंगांचे वेगवेगळे प्रकार आहेत. बौद्धिक अक्षम मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या समस्या इतर अपंगांहून वेगळ्या. त्यामुळे बौद्धिक क्षमता कमी असलेल्या विशेष मुलांसाठी खास शाळा सुरू करण्याचा संकल्प पवन खेबुडकर आणि त्यांच्या ध्येयवेडय़ा सहकाऱ्यांनी तीन दशकांपूर्वी केला. ते वर्ष होते १९८६. विज्ञान शाखेची पदवी, कोल्हापूर  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची सुरक्षित नोकरी आणि ‘प्रत्यय’ नाटय़संस्थेतून प्रायोगिक नाटके करीत आपले छंद  जोपासणारे पवन खेबुडकर. सोलापूरच्या ‘जिव्हाळा’ संस्थेतील बौद्धिक विकलांग मुले पाहून हे कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगतात. अशा मुलांना नित्य – नियमित कौशल्ये शिकवून त्यांना सामान्य मुलांचे जीवन देण्याचा आणि पालक व समाजाने त्यांना स्वीकारावे यासाठी आपला प्रयत्न असल्याचेही ते नमूद करतात.

बौद्धिक अक्षम मुलांसाठी शाळा तर सुरू करायची पण पहिलाच प्रश्न होता जागेचा. अशावेळी एका हितचिंतकाने आपली गॅरजेवजा जागा देऊ केली. दोन खोल्यांच्या तोकडय़ा जागेत चेतना अपंगमती विकास संस्थेचा शैक्षणिक संसार सुरू झाला. तेव्हा शाळेत प्रवेश केलेल्या मुलांची संख्या होती अवघी वीस. संस्थेचे काम तर सुरू झाले. पण, ते शास्त्रशुद्ध असावे यासाठी खेबुडकरांनी पुणे येथे प्रशिक्षण घेतले. संस्थेचे काम नुकतेच सुरू झाले असताना दोनच वर्षांनंतर जागा रिकामी करून देण्याची त्यांच्यावर वेळ आली. नव्याने जागेचा शोध सुरू झाला आणि दुसरीकडे जागा मिळाल्यावर तेथे कामकाज सुरू झाले. पण, जागेचा हा आनंदही दीड वष्रे इतकाच अल्पकालीन ठरला. पुन्हा जागेसाठी शोध सुरू झाला तेव्हा शेंडा पार्क भागामध्ये जिल्हा परिषदेच्या काही खोल्या आणि जागा रिकामी असल्याचे लक्षात आले. खरे तर ही जागा कुष्ठरुग्णांच्या निवास- पुनर्वसनासाठीची. पण, जागेची निकड इतकी तीव्र होती की काही करून ही जागा मिळवायचीच या जिद्दीने प्रयत्न सुरू झाले. शासकीय दरबारी हेलपाटे मारल्यानंतर बऱ्याच प्रयत्नांनी जागा भाडेपट्टय़ाने ताब्यात मिळाली. तेव्हापासून आजवर संस्थेने आपल्या कार्याचा तंबू इथे ठोकला आहे.

जागा ताब्यात आल्यानंतर खऱ्या अर्थाने इथे ‘चेतना’चे शैक्षणिक विश्व अंकुरू लागले. पाच ते अठरा वयोगटातील बौद्धिक अक्षम विद्यार्थी हाताळणे म्हणजे शिक्षकांच्या संयमाची कसोटी असते. एकतर यांना कोणतीच समज नसल्याने त्यांना सूचना, शिस्त, आरडाओरडा करता येत नाही. त्यामुळे उठणे, मुखमार्जन, प्रातर्वधिी, कपडे घालणे, भोजन अशी साधी कौशल्ये शिकवणे हेच प्राथमिक मुख्य शिक्षण. त्यातील हरेकाची क्षमता व समस्या अगदीच भिन्न. त्यानुसार प्रथम वैयक्तिक पातळीवर प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर हळूहळू सामाजिक, शैक्षणिक व व्यावसायिक पातळीकडे घेऊन जायचे, असा शिरस्ता असतो. अभ्यास, खेळ, करमणूक, व्यक्तिगत आविष्करण, व्यवसाय शिक्षण याचा यामध्ये समावेश असतो. त्यासाठी वैद्यकीय सुविधा, मानसोपचार, वाचा संस्कार व उपचार, भौतिक उपचारांची मदत घ्यावी लागते. हे बदल कसे घडवले, काय बदल घडवले, त्याचे स्वरूप कोणते हा भागही रंजक तितकाच प्रेरकही. त्यामागील तळमळ तर थक्क व्हायला लावणारी.  इथल्या पाच खेळाडूंनी विदेशात आपले क्रीडा कौशल्य सिद्ध केले आहे. संस्थेच्या भरीव कार्याची नोंद घेऊन केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय मंत्रालयामार्फत राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.संस्थेचे प्रयत्न, पालकांमध्ये येत असलेली जागृती आणि समाजाची सकारात्मक वृत्ती यातून या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे. तरी अजून बरचं काही गाठणं बाकी आहे.

जागेचा प्रश्न कायम

गेली तीन दशके या संस्थेची यशस्वी वाटचाल सुरू असली तरी जागेचा प्रश्न कायम आहे. जिल्हा परिषद आणि आरोग्य विभाग यांच्यातील समन्वयाअभावी संस्थेला सातत्याने जागा रिकामी करण्याच्या नोटिसा येत राहतात. संस्थेला कायमस्वरूपी जागेची नितांत आवश्यकता आहे. विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे. त्यामुळे कायमस्वरूपी जागा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे.

भविष्यातील कार्यविस्तार

संस्थेला कदाचित जागा मिळेलही. पण, पुढे बरीच कामे करायची आहेत. संस्थेला या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अनेक योजना राबवायच्या आहेत. निवासी वसतिगृह, मदान, प्रशासकीय इमारत, वैद्यकीय थेरपी सेंटर आदींसाठी संस्थेने भविष्यात कार्य करायचे ठरवले असून त्याचा खर्च काही कोटींत जाणारा आहे. अर्थात, या अडचणी असल्या तरी या मुलांना खेळ, करमणूक आणि जीवनातील आनंद देताना मिळणारे समाधान पाहून आíथक विवंचनेचा काहीसा विसर पडतो.

व्यक्तीप्रमाणेच संस्थेच्या वाटचालीतही ऊन-पावसाचा चाललेला हा खेळ कदाचित उद्याच्या भविष्यात सार्थकतेचे इंद्रधनुष्य क्षितिजावर प्रकटेल, याच आशेवर अधिक उत्साहाने विश्वस्त कार्यरत आहेत. संस्थेचे अध्यक्ष नरेश बगरे, उपाध्यक्ष सुनील पाटील, कार्यकारी अध्यक्ष पवन खेबुडकर, सचिव दिलीप बापट, श्रीराम भिसे, डॉ. पी एम. चौगुले, डॉ. शरद भुताडिया, डॉ. विद्या ठकार, दया बगरे, सुधीर कुलकर्णी, सुनील करकरे या विश्वस्तांनी या मुलांच्या उत्थानाचा ध्यास घेतला आहे. पण, कुठल्याही उपक्रमाची सुरुवात पशाशिवाय होत नाही. पुरेशी आर्थिक मदत झाली तर दुर्लक्षित बालकांच्या नशिबाची ससेहोलपट थांबेल.

गणपतीला सुबक आकार

शिक्षण – प्रशिक्षणातून इथली मुले कलेपासून व्यावसायिक मूल्य असलेल्या विक्रीयोग्य नानाविध वस्तू बनवण्यापर्यंत पारंगत झाली आहेत. पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी कागदी लगद्यापासून आकर्षक गणेशमूर्ती बनवल्या आहेत. बुद्धीची देवता असणाऱ्या गणपतीला सुबक आकार देण्याचे काम ही मुले करतात. या मूर्ती शंभर टक्के पर्यावरणपूरक आहेत. फाइल्सपासून पर्सपर्यंत कित्येक वस्तू बनवल्या जातात. त्याची विक्री केल्यानंतर येणाऱ्या रकमेतून विध्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जाते. आयुष्यभराचे ओझे म्हणून या मुलांकडे पाहणाऱ्या पालकांच्या हाती जेव्हा दरमहा त्यांच्या परिश्रमाची कमाई पोहोचते तो क्षण केवळ अवर्णनीय. वर्षांकाठी चेतनात तयार होणाऱ्या दहा लाख रुपयांच्या वस्तूंची विक्री होते. बाजार भरवणे, उद्योग केंद्र, क्रीडा केंद्र, उपाहार केंद्र चालवणे, सहली, पालक मेळावे, प्रदर्शन भरवणे,  चित्रकला, शिल्पकला, नृत्य, हस्तकला अशा अनेक क्षेत्रात इथल्या मुलांची कामगिरी दाद द्यावी अशीच. या मुलांमधील कार्यक्षमता, अभिव्यक्ती याचे अवलोकन करून अभिराम भडकमकर यांनी बौद्धिक अक्षम अशा मुख्य पात्रावर आधारित ‘आम्ही असू लाडके’ या चित्रपटाचे बहुतेक चित्रीकरण याच जागी, याच मुलांसोबत केले.

यासाठी मदत हवी

सद्य:स्थितीत शाळेत ५० मुलांना व आठ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता आहे. बौद्धिक क्षमतेनुसार विद्यार्थ्यांचे चार टप्पे करण्यात आले आहेत. मंजूर विद्यार्थ्यांची संख्या ५० असताना प्रत्यक्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ११६ इतकी मोठी आहे. त्यामुळे मंजूर ८ शिक्षक अपुरे पडतात. परिणामी आणखी तितकेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी शिक्षणानंतर मुलांना व्यावसायिक कौशल्ये शिकवतात. त्यासाठी स्वतंत्र कार्यशाळा आहे. मात्र, उर्वरित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा भार संस्थेलाच उचलावा लागतो. त्यासाठी दरमहा दीड लाख म्हणजे वर्षांकाठी सुमारे वीस लाख रुपयांची गरज आहे. सजग नागरिक, दानशूर व्यक्ती, उदार धनिकांकडून गरजेइतकी रक्कम कशीबशी हाती पडते. परंतु, आíथक तजवीज करण्यासाठी विश्वस्तांच्या धावपळीस पूर्णविराम द्यायचा असेल तर शासनाची कृपादृष्टी, दानशूरांच्या दातृत्वाची गरज आहे.

संस्थेपर्यंत कसे जाल?

 • चेतना अपंगमती विकास संस्था कोल्हापुरात आल्यानंतर शेंडा पार्क या भागात जायचे. तिथे संस्थेची वास्तू आपल्या प्रतीक्षेत आहे.
 • धनादेश -‘चेतना अपंगमती विकास संस्था’ (chetana apangmati vikas sanstha) या नावाने काढावा. धनादेशामागे अथवा सोबत देणगीदाराने त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. त्यावरून संस्थेला पावती पाठविता येईल. संस्थेकडे धनादेश सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.
 • देणगी ‘८०-जी’ अंतर्गत करसवलतीस पात्र.

धनादेश येथे पाठवा.. एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

 • मुंबई कार्यालय : लोकसत्ता, संपादकीय विभाग, मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१, ०२२-६७४४०२५०
 • महापे कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०. ०२२-२७६३९९००
 • ठाणे कार्यालय : संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे. ०२२-२५३९९६०७
 • पुणे कार्यालय : संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४. ०२०-६७२४११२५
 • नाशिक कार्यालय : संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१. ०२५३-२३१०४४४
 • नागपूर कार्यालय : संपादकीय विभाग, प्लॉट नं. १९, ग्रेट नागरोड, उंटखाना, नागपूर – ४४०००९, ०७१२ – २७०६९२३
 • औरंगाबाद कार्यालय : संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३
 • नगर कार्यालय : संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७
 • दिल्ली कार्यालय : संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा – २०१३० उत्तर प्रदेश. ०११- २०६६५१५००

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 1, 2017 2:49 am

Web Title: sarva karyeshu sarvada 2017 chetana apangmati vikas sanstha
Next Stories
1 निराधारांच्या कल्याणाची ‘रचना’
2 आदिवासींच्या सक्षमीकरणाचा वसा
3 वंचितांचे ‘शांतिवन’!
Just Now!
X