सतीश कामत

जुलैच्या सुरुवातीला धरणफुटीने हाहाकार उडाला आणि चिपळूण तालुक्यातले सह्य़ाद्रीच्या कुशीत वसलेले छोटेसे तिवरे गाव दुर्घटनाग्रस्त भागांच्या नकाशावर ठसठशीतपणे दिसू लागले. दुर्घटनेतून वाचलेल्या ग्रामस्थांची गावातल्या दसपटी विभाग रामवरदायिनी शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत तात्पुरती निवासाची सोय करण्यात आली. दुर्घटनेमुळे मोठा आघात झालेली ही शाळा विद्यार्थ्यांसाठी जीवनशाळा बनली आहे.

चिपळूण तालुक्यातले सह्य़ाद्रीच्या कुशीत वसलेले छोटेसे गाव- तिवरे. गेल्या जुलै महिन्यापर्यंत तालुक्याबाहेर या गावाचे नाव फारसे कुणाला माहीतही नव्हते. पण २ जुलैच्या रात्री या गावाच्या भेंदवाडीच्या उशाशी असलेले धरण फुटून पाण्याचा मोठा लोंढा आला आणि जेमतेम तासाभरात वाडीचे अस्तित्वच पुसून गेला. वाडीतल्या १२ घरांचा घास घेतानाच या लोंढय़ाने २२ निष्पाप आयुष्येही गिळंकृत केली. त्यात कोणी आई-बाप, तर कोणी भाऊ-बहीण गमावले. रुद्र चव्हाण या चार वर्षांच्या चिमुकल्याचे आणि प्रतीक चव्हाण या २४ वर्षीय तरुणाचे तर सारे कुटुंबच काळाच्या उदरात गडप झाले. रात्रीच्या अंधारात सुरक्षित ठिकाणी पोहोचण्याची संधीच त्या अभागी जिवांना मिळू शकली नाही. जिल्हा प्रशासनाने तातडीने कार्यवाही करत या संकटातून वाचलेल्या ग्रामस्थांची गावातल्या दसपटी विभाग रामवरदायिनी शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत तात्पुरत्या निवासाची सोय केली. पुढचे सुमारे आठ दिवस ही शाळा हेच त्यांचे भोजन-निवास आणि इतर सुविधांसाठीचे केंद्र बनले आणि त्यांच्यासाठी आलेले अतिरिक्त मदत साहाय्य आजही या सभागृहात साठवून ठेवलेले आहे. संदेश धाडवे हा शाळेचा माजी विद्यार्थी आणि त्याची आई सुशीला धाडवे या दुर्घटनेत मृत्युमुखी पडले, तर वेळीच घराबाहेर पडल्यामुळे बचावलेला त्याचा धाकटा भाऊ शुभम याच शाळेत दहावीत शिकत आहे. त्याचे वडील कामानिमित्त पुण्यात असतात. त्यामुळे त्यालाही तिकडे नेण्याचा त्यांचा विचार होता. पण स्थानिक ग्रामस्थ आणि शाळेच्या चालकांनी सांभाळून घेण्याची तयारी दाखवल्यामुळे शुभमचे शिक्षण इथेच पुढे चालू राहिले आहे. या विचित्र संकटाच्या काळात वर्गातल्या मित्रांनीही त्याला चांगल्या प्रकारे साथ दिल्याचे सर्व जण आवर्जून सांगतात. अशा तऱ्हेने गावावरील आपत्तीच्या काळात सर्व प्रकारे आधार ठरलेल्या रामवरदायिनी शिक्षण संस्थेच्या या शाळेचे गावाशी अध्ययन- अध्यापनापलीकडे एक अतूट नाते निर्माण झाले आहे.

तसे पाहिले तर या नात्याची सुरुवात सुमारे ३५ वर्षांपूर्वी १९८४ मध्ये शाळेच्या स्थापनेद्वारे झाली. त्या काळात कोकणात शिक्षणाच्या सुविधा अतिशय तुटपुंजा होत्या. मग तिवरे किंवा आकलेसारख्या दुर्गम भागातली शैक्षणिक दुरवस्था विचारायलाच नको. बाकी सोडा, साधे डांबरी रस्तेसुद्धा नव्हते. जिल्हा परिषदेच्या कृपेने कुठे तरी दोन-चार किलोमीटर खडीकरण केले जायचे. बाकी रस्ते धुळीचे. पावसाळ्यात या रस्त्यांवरून जायचे म्हणजे एक दिव्यच असायचे. गावात दुचाकी वाहनेही तशी दुर्मीळ. एसटीसारखी सार्वजनिक सेवा आजही मर्यादित आहे. त्या काळात त्याची अपेक्षा करणेही चुकीचे. त्यामुळे शिक्षणासाठी दररोज काही किलोमीटरची पायपीट अटळ. इथले ग्रामस्थ वसंतराव शिंदे आणि अन्य काही जणांनी एकत्र येत या परिस्थितीवर मात करण्याचा चंग बांधला. या मंडळींनी दसपटी विभाग रामवरदायिनी शिक्षण संस्थेची स्थापना केली. उपलब्ध साधनसामग्री आणि आर्थिक बळ मर्यादित असल्याने गावकऱ्यांना मदतीसाठी साद घातली. त्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. लोकवर्गणी आणि श्रमदानातून आकले इथे मोहन विद्यालयाची टुमदार इमारत १९७० मध्ये उभी राहिली. इथे पाचवीपासून वर्ग सुरू झाले. आज या शाळेत बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जात असून पंचक्रोशीतली सुमारे साडेतीनशे मुले-मुली त्याचा लाभ घेत आहेत. सुरुवातीच्या काळात तिवरे आणि ओवळी या दोन गावांमधली मुलेही याच शाळेत येत असत. पण त्यांची येण्या-जाण्याची गैरसोय लक्षात घेऊन १९८४ मध्ये या दोन्ही गावांमध्ये स्वतंत्रपणे शाळा सुरू करण्यात आल्या. त्यापैकी आपत्तीग्रस्त तिवरे गावातल्या या शाळेत आठवी ते दहावीचे प्रत्येकी एक वर्ग असून ९३ विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत. त्यामध्ये आणखी समाधानाची गोष्ट म्हणजे, या पटामध्ये मुलींचे प्रमाण जास्त, ५१ आहे. तिवरे गावाच्या भवताली असलेल्या येडगे-धनगरवाडी, फणसवाडी, कुंभारवाडी, मोरेवाडी इत्यादी ठिकाणची मुले दररोज पायी शाळेत येतात. यापैकी धनगरवाडीतली सहा-सात मुले तरसुमारे ५ ते ७ किलोमीटर अंतर चालतात.

या सगळ्या अडथळ्यांवर मात करत १९९९ पासून शाळेचा दहावीचा निकाल सातत्याने ९० टक्क्यांच्या वर राहिला असून गेली तीन वर्षे उत्तीर्णाचे प्रमाण  १०० टक्के राहिले आहे. याव्यतिरिक्त चिपळूण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन, गणित अध्यापक मंडळ आयोजित निबंध स्पर्धा, चित्रकलेची एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षा, क्रीडा स्पर्धा, एनसीसी संचलन, अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा इत्यादी विविध उपक्रमांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग नोंदवला आहे. ़ रत्नागिरी जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळातर्फे गेल्या वर्षी आयोजित विज्ञान रंजन स्पर्धेत शाळेची विद्यार्थिनी दीक्षा मोहिते हिने प्रथम क्रमांक पटकावला. याचबरोबर शाळेतले विज्ञान शिक्षक श्रीधर जोशी यांना विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंतराव डावखरे यांच्या स्मरणार्थ असलेला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार गेल्या वर्षी प्राप्त झाला आहे. शाळेचे नाव ‘न्यू इंग्लिश स्कूल’ असले तरी इथे मराठी माध्यमातूनच शिकवले जाते. संस्थापक दिवंगत वसंतराव शिंदे यांच्या सूनबाई सुवर्णा शिंदे सध्या संस्थेच्या अध्यक्ष असून, शाळेचे मुख्याध्यापक रघुनाथ जाधव यांच्यासह चार साहाय्यक शिक्षक आहेत. त्यापैकी शंकर मिसाळ आणि रवींद्र गवळे या क्रीडा शिक्षकांनी मुलांना कबड्डी आणि मलखांबामध्ये उत्तम प्रकारे तयार केले आहे. शाळेतील ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्रीधर जोशी कार्यकर्त्यांच्या भूमिकेतून विविध जबाबदाऱ्या सांभाळत असतात. त्यांच्यामुळेच विज्ञानविषयक तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरीय उपक्रमांमध्ये मुलांचा सतत सहभाग राहिला आहे. विविध स्थानिक संस्था- संघटनांसह तिवरे-रिक्टोली परिसरातील ग्रामस्थांचे शाळेला वेळोवेळी साहाय्य, सहकार्य लाभते. पण वाढते खर्च आणि मर्यादित शासकीय अनुदानामुळे मुलांच्या शैक्षणिक विकासासाठी नवीन योजना हाती घेता येत नाहीत. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरसिंगराव शिंदे म्हणाले की, स्थानिक जिल्हा परिषद शाळेशी स्पर्धा न करता मुलांना गावातच माध्यमिक- उच्च  माध्यमिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, असा दृष्टिकोन ठेवून आम्ही या तिन्ही शाळा चालवतो. हल्ली इंग्रजी माध्यमाकडे ओढा वाढू लागला आहे. तसेच तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जाण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा परिस्थितीत मराठी माध्यमाची ही शाळा आम्ही नेटाने चालवत आहोत. या मुलांच्या गुणवत्तावाढीसाठी आमच्याकडे योजना आहेत. पण तालुक्याच्या एका टोकाला, दुर्गम भागात असल्यामुळे त्यांच्या पूर्ततेसाठी दानशूर व्यक्तींपर्यंत पोहोचू शकत नाही.

शहरी भागातल्या शाळांच्या तुलनेत ग्रामीण भागातल्या शाळांचे हे वैशिष्टय़ असते की तिथले संस्थाचालक, शिक्षक गावाच्या सुख-दु:खांशी एकरूप होऊन वाटचाल करत असतात. किंबहुना, ते त्या गावाचा अविभाज्य घटक असतात. त्या दृष्टीने विचार केला तर तिवरे गावाच्या या शैक्षणिक केंद्रबिंदूने यंदा मोठा मानसिक आघात सहन केला आहे. शाळेतल्या बालमनांवर तर त्याचा जास्त खोल परिणाम झाला आहे. त्यातून सावरत शाळा नव्या जोमाने ‘अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला’ असे म्हणत पुढील वाटचाल करू पाहत आहे. गरज आहे त्यांच्या शिडामध्ये नवे वारे भरून बळ देण्याची!

धरणफुटीच्या दुर्घटनेवेळी शाळेने आपली भूमिका चोखपणे बजावली. घरदार- संसार वाहून गेलेल्या अनेक ग्रामस्थांना शाळेने आपल्या छत्राखाली आसरा दिला, आधार दिला. त्या साऱ्यांच्या पोटापाण्याची काळजी घेतली. हे सारे करताना शाळेतल्या शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि अर्थातच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचाही पुढाकार लक्षणीय होता. विद्यार्थ्यांसाठी जीवनाच्या शाळेतला हा जणू वस्तुपाठच आहे.

-मेघना काळे, चतुरंग प्रतिष्ठान

शाळेच्या मुख्य इमारतीव्यतिरिक्त सुमारे एक एकर मोकळी जागा संस्थेकडे आहे. पंचक्रोशीला असलेला खेळाचा वारसा आणखी संपन्न करण्यासाठी तिथे उत्कृष्ट क्रीडा संकुल उभे राहू शकते. माजी आमदार दिवंगत निशिकांत जोशी यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून बांधलेल्या सभागृहाची डागडुजी करून विज्ञानविषयक सुसज्ज प्रयोगशाळा उभी राहू शकते. सध्या संगणक प्रशिक्षण अनिवार्य झाले आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्ष आणि ‘डिजिटल क्लास रूम’ गरजेचे आहेत. यापैकी एक-दोन योजना कार्यान्वित होऊ शकल्या तरी मुलांना त्याचा मोठा लाभ होईल. पण हे प्रत्यक्षात आणण्यासाठी मोठय़ा निधीची गरज आहे, असे  शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरसिंगराव शिंदे यांनी सांगितले. 

 

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

न्यू इंग्लिश स्कूल, तिवरे

मुंबई-गोवा महामार्गावरील बहाद्दूर शेख नाका येथे कराड रस्त्याकडे वळल्यानंतर खेर्डी एमआयडीसीच्या परिसरात सुमारे ५ किलोमीटर अंतरावर डावीकडे तिवरे फाटा लागतो. त्या रस्त्याने सुमारे २५ किलोमीटर अंतरावर तिवरे गावाच्या प्रवेशाद्वाराशीच उजवीकडे शाळेची टुमदार इमारत आहे.

‘दसपटी विभाग रामवरदायिनी शिक्षण संस्था’

(Daspati Vibhag Ramvardayini Shikshan sanstha)

या नावाने धनादेश काढावा. धनादेशामागे किंवा त्यासोबत देणगीदाराने आपले संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा. संस्थेकडे धनादेश ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.

धनादेश येथे पाठवा.. : एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग,मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट

नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय     

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग,

एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट

नं. १२०५/२/६, शिरोळे

रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय       

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय       

संपादकीय विभाग,

प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी, नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

औरंगाबाद कार्यालय       

संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी,  औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३

नगर कार्यालय       

संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/२४५१९०७

दिल्ली कार्यालय       

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा- २०१३०१.

०११-२०६६५१५००