|| प्रा. जयंत कुलकर्णी

विद्यार्थ्यांची वर्गवारी ‘इंजिनीअर, डॉक्टर वा अपयशी’ या तीनच प्रकारांमध्ये करण्याची पालकांची मानसिकता वाढतच चालली आहे.  यामुळे आपल्या आयुष्यालाच काही अर्थ नाही या टोकाच्या नकारात्मकतेकडे अनेक मुलांचे विचार जात आहेत. तेलंगणामध्ये बारावीत नापास झालेल्या २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने विद्यार्थ्यांच्या करिअरचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यानिमित्ताने पालकांनी आपली इच्छा मुलांवर न लादता त्यांची आवड व बौद्धिक कुवतीनुसार त्याला शिक्षण घेऊ देणेच कसे योग्य, याची चर्चा करणारा लेख.

तेलंगणात बारावीच्या निकालानंतर एकापाठोपाठ एक अशा २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. ज्यांनी आपली मुलं गमावली त्यांच्या दुखाची तीव्रता नक्कीच खूप जास्त आहे, पण तरीही आज ही काळजी, हे  दुख आणि हा प्रश्न या बाबी केवळ त्यांच्यापुरत्याच सीमित राहिलेल्या नाहीत. परीक्षेतील यशालाच सर्वस्व समजणारी आणि त्या दृष्टीनेच प्रगतिपुस्तकांत वा गुणपत्रिकांत व्यक्तिमत्त्व शोधणारी पालकांची, शिक्षकांची, शाळांची आणि अनेकदा मुलांची स्वतचीच मानसिकता हा आज प्रत्येक घराच्या दारापाशी दबा धरून बसलेला प्रश्न आहे. पालकांच्या आणि शिक्षकांच्याही सुजाणतेला हे मोठे आव्हान आहे. या समस्येचे मर्म कळाले तर जिवाशी खेळणाऱ्या अशा कठीण गाठी मुलांच्या मनात मुळात बसणारच नाहीत आणि चुकून बसल्या तरी त्यांची उकल करण्याचे मार्ग आपोआपच त्यांना उपलब्ध होतील.

मुलांच्या विचारांना दिशा देणारा घरातील संवाद आणि त्यांना ‘काय येत नाही’ हे शोधण्यापेक्षा ‘काय येते’ याचा माग घेणारे शाळांमधील शिक्षण या दोन खांबांवरच मुलांच्या आनंदी आणि अर्थपूर्ण शिक्षणाचा मोठा पूल तोलला जात असतो. हे दोन आधार बळकट असतील तरच देश घडवणारी विद्यार्थ्यांची प्रत्येक पिढी सुदृढ निपजते. कोणत्याही परीक्षेत अपेक्षित यश मिळाले नाही तर आपले आयुष्यच कवडीमोलाचे समजून ते संपवायचे असा विचार ज्या समाजात विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग सातत्याने करतो आहे तो समाज निरोगी म्हणता येणार नाही.

बारावीच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका तपासताना आणि नंतर गुणपत्रिका तयार करताना तेलंगणा राज्याच्या उच्च माध्यमिक मंडळाने या वर्षी अभूतपूर्व घोटाळे केले. अकरावीत शेकडा नव्वद ते शंभर गुण मिळवणाऱ्या अनेकांना बारावीत आपण नापास झालो आहोत वा आपल्याला अगदीच कमी गुण मिळाले आहेत याचा मोठा धक्का बसला. सग़ळीकडून  दबाव वाढला तेव्हा या मूल्यांकन प्रक्रियेत मोठा गोंधळ झाल्याचे सरकारने मान्य केले आणि नापास झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासल्या जातील असा निर्णय जाहीर केला, पण तेव्हा वेळ टळून गेली होती. अपेक्षित गुण न मिळाल्यामुळे आपले भविष्यच आता संपले या धक्क्यातून न सावरता आल्याने  मुलांनी आपले आयुष्यच संपवून टाकले.  आपणच निर्माण केलेल्या शैक्षणिक संस्कृतीच्या या धोकादायक प्रवाहाची समाजाचे सर्वच स्तर आज शिकार ठरत आहेत.

तेलंगणात घडलेल्या या दुर्दैवी घटनेला परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेचा गलथानपणाच केवळ कारणीभूत आहे असे समजणे याचा अर्थ या प्रश्नाचे खरे आकलनच आम्हाला झाले नाही असा आहे. यंत्रणेतील हा गलथानपणा हे या घटनेचे एक कारण आहे, पण एकमात्र कारण नक्कीच नाही. मुळात परीक्षेतील या तथाकथित अपयशाने कोलमडून पडेल इतकी कमकुवत मानसिकता एका रात्रीत वा एका घटनेने तयार होत नाही. आयुष्याकडे  ‘यश दाखव वा हार स्वीकार’  या केवळ दोनच अंगांनी बघण्याची सक्ती हे या कमकुवततेचे खरे कारण. अकरावी-बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनावरचा असह्य़ ताण, अपयशाची भीती, किंचितही रुची नसलेल्या विषयात दबावाखाली अभ्यास करताना होणारी त्यांची दमछाक, पुढे इंजिनीअिरगला आल्यानंतर न झेपणारा अभ्यासक्रम, मागे पडत जाण्यातील निराशा आणि या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे आपल्या आयुष्यालाच काही अर्थ नाही या टोकाच्या नकारात्मकतेकडे जाणारे त्यांचे विचार या सगळ्या गोष्टी मी गेली २० वष्रे खूप जवळून अनुभवतोय. वाढणारी लोकसंख्या, दर्जेदार शिक्षण देणाऱ्या मोजक्याच संस्था, त्यातून अपरिहार्यपणे निर्माण झालेली पराकोटीची स्पर्धा आणि मुलांच्या स्थिर व संपन्न आयुष्याची स्वप्ने पाहणारी पालकांची ‘चाकोरीबद्ध’ मानसिकता हे चारही घटक स्वतंत्रपणे पाहिले तर चूक नाहीत, पण मुलांच्या मानसिकतेवर पडणारा त्यांचा एकत्रित प्रभाव मात्र चिंताजनक आहे. हे चारही घटक नजीकच्या काळात बदलतील याची सुतरामही  शक्यता आज दिसत नाही. पण या घटकांच्या नकारात्मक प्रभावाला पुरून उरणारी ऊर्जा पालक आणि शिक्षक मुलांच्या मनात नक्कीच निर्माण करू शकतात. गरज आहे ती आपणच मारलेली ही गाठ डोळसपणे उकलण्याची आणि आपल्या व मुलांच्याही दृष्टिकोनात संवेदनशील बदल करण्याची.

मुलाची अजिबात इच्छा नसताना व त्याची ती क्षमताही नसताना त्याने इंजिनीअरिंगलाच गेले पाहिजे असा आग्रह धरणाऱ्या एका पालकाला माझ्या सहकारी शिक्षकाने मार्मिक प्रश्न विचारला, ‘तुमचे तुमच्या मुलावर प्रेम आहे की त्याने जे व्हावे असे तुम्हाला वाटते त्याच्यावर तुमचे प्रेम आहे?’ पालकांच्या मनातील हा ‘भ्रम’ हा या समस्येचे खरे उगमस्थान आहे. खलील जिब्रान हा कवी त्याच्या विशिष्ट अशा गद्य-कवितांसाठी प्रसिद्ध होता. शंभर वर्षांपूर्वीच त्याने पालक आणि मुलांच्या संबंधातील ताण-तणावाची कारणमीमांसा करताना लिहिले होते-‘‘Your children are not your children. They are the sons and daughters of Lifels longing for itself. They come through you but not from you, and though they are with you yet they belong not to you… तुमची मुले ही तुमच्याच मनाप्रमाणे बनतील असा हट्ट करू नका आणि तुमची स्वप्ने त्यांच्या डोळ्यांत वाचण्याचा वृथा प्रयत्नही करू नका!’’

तेलंगणा व आंध्र प्रदेश या दोन्ही राज्यांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची ही समस्या अधिक तीव्र बनली आहे कारण विद्यार्थ्यांची वर्गवारी ‘इंजिनीअर, डॉक्टर वा अपयशी’ या तीनच प्रकारांमध्ये करण्याची मानसिकता वर्षांनुवष्रे या ठिकाणी वाढतच चालली आहे. गेल्या २०-२५ वर्षांत इंजिनीअिरगच्या क्षेत्रातील बदल, संधी आणि त्यातून मिळणारी संपन्नता हे सगळे डोळे दिपवून टाकणारेच आहे. आपल्या मुलांच्या डोळ्यात पालक साहजिकच हीच स्वप्ने पाहतात. याचाच फायदा उठवीत शाळाही तशीच जाहिरात करतात. शाळा कमी पडल्या तर कोचिंग क्लासेस आहेतच.

विद्यार्थ्यांची नसíगक क्षमता, त्याचा कल, विशिष्ट विषयातील त्याची रुची या सर्वाचा एकत्रित विचार करून व्यक्तिमत्त्व  विकासाच्या सहज संधी त्याला उपलब्ध करून देणे हे खरे तर शाळा आणि शिक्षकांचे मुख्य काम असायला हवे. त्याच दृष्टीने पालकांशी सुसंवाद साधून ही प्रक्रिया अधिक आनंददायी करण्याचा स्वाभाविक प्रयत्न असायला हवा. अभ्यासेतर उपक्रमांमधला मुलांचा उत्स्फूर्त सहभाग त्यांना स्वतच्या खऱ्या क्षमतांची ओळख पटविण्यास मदत करतो. या आत्मविश्वासाच्या बळावर ही मुलं कठीण विषयांचाही मग जिद्दीने अभ्यास करतात. यातील प्रत्येक पायरी महत्त्वाची आहे. त्या वगळून मुलांना एकदम स्पध्रेमध्ये ढकलल्यानेच समस्येचा गुंता अधिकच वाढतो.

पुरेसा आत्मविश्वास नसणारी, स्पध्रेलाच सर्वस्व समजणारी आणि त्यातील अपयश जिव्हारी लावून घेणारी मुलं मग एका विचित्र मानसिक आवर्तनात सापडतात. अभ्यासात हुशार असणारी मुलंही आपल्याला मिळणारे गुण वा श्रेणी म्हणजेच ‘आपण’ आहोत असे समजून आयुष्याला अधिकाधिक संकुचित करतात. ‘निरुपयोगी विद्यार्थी’ या संकल्पनेवर हाडाचा शिक्षक कधीच विश्वास ठेवत नाही. प्रत्येकातील उत्तम गुण हेरून त्या गुणांच्या वाढीसाठी अवकाश उपलब्ध करून देण्याचे काम शिक्षकाचे. पण आज अशा शाळा आणि असे शिक्षक मुळात पालकांना चालणार आहेत का आणि पालकांची इच्छा असली तरी अशा शाळा आणि असे शिक्षक खरोखरच त्यांना मिळणार आहेत का हे दोन्ही प्रश्नच मुळात एकमेकांतून निर्माण झाले आहेत. शालेय जीवनात प्रत्येक इयत्तेत आपला पाल्य पहिला येणे याची जाहिरात करणे किंवा आपल्या मुलांना मिळणारी टक्केवारी कौतुकाने सांगणे यापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्त्वात प्रत्येक वर्षी नव्याने कोणती भर पडली आहे याचा विचार व चर्चा करणे अधिक महत्त्वाचे असते.

इंजिनीअिरग किंवा मेडिकलच्या अभ्यासासाठी आवश्यक असणारे गणित आणि शास्त्र हे विषय सर्वच विद्यार्थ्यांना समजायला सोपे असतील असे नाही. त्यात गती असणे हे जसे सहजपणे स्वीकारले जाते तसा कुणाला त्या विषयांचा तिटकारा असणेही स्वाभाविक समजले पाहिजे. या विषयांत मिळणारे गुण हे संपूर्ण आयुष्यालाच आकार देतात हा भ्रम आहे हे ठासून सांगितले पाहिजे. अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून शक्य तितक्या सुलभतेने हे विषय शिकवले पाहिजेत आणि मुलांना त्यात रुची वाटेल यासाठी शक्य ते सर्व प्रयत्नही केले पाहिजेत. भीती न दाखवता त्या विषयांची उपयोगिता सांगितली पाहिजे आणि त्यात अधिक गुण मिळावेत म्हणून उद्युक्तही केले पाहिजे. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे एवढे सर्व प्रयत्न करूनही त्या विषयात आवड निर्माण होत नसेल तर अकरावी-बारावीच्या टप्प्यावर ते विषय सोडण्याचा पर्याय उपलब्ध होताच तसे करण्याचे व वेगळी वाट निवडण्याचे स्वातंत्र्यही मुलांना दिले पाहिजे.

विद्यार्थ्यांच्या सर्वसाधारण व्यक्तिमत्त्वाचा अंदाज घेऊन बनवलेला दहावीपर्यंतच्या वर्गासाठीचा सक्तीचा व समान अभ्यासक्रम आणि विषयांच्या निवडीला भरपूर वाव असणारा व संधींच्या विविध वाटांकडे घेऊन जाणारा पदवी अभ्यासक्रम या दोन्हींच्या मध्ये ‘+२’ नावाचा एक िपजरा आपल्याच शिक्षणव्यवस्थेने ठेवला आहे. आजच्या काळातील स्पध्रेची अपरिहार्यता समजून घेता या टप्प्यावरील परिश्रमांना आज तरी कोणताच पर्याय उपलब्ध नाही. पण आवडीच्या विषयातील परिश्रम ओझे बनत नाहीत हे लक्षात ठेवून विषय निवडताना मुलांचा कल प्रथम पाहिला पाहिजे. परिश्रमाचे यश आणि त्याच्या मर्यादाही मुलांना सांगितल्या पाहिजेत. पालक म्हणून प्रथम त्या आपल्याही लक्षात आल्या पाहिजेत.

अकरावी-बारावीच्या या दोन वर्षांत अधिक परिश्रमांना व चुरशीच्या स्पध्रेला सामोरे जाताना तो सध्याच्या शिक्षणपद्धतीचा अपरिहार्य नसला तरी आवश्यक भाग आहे आणि तेवढय़ापुरते त्याचे महत्त्व आहे हे आवर्जून मुलांना सांगितले पाहिजे.  देशातील हजारो अभियांत्रिकी महाविद्यालयांतून दरवर्षी बाहेर पडणाऱ्या पदवीधारकांची संख्या आणि उद्योगांना हवे असणारे कौशल्य अंगी बाणवलेल्या पात्र उमेदवारांची संख्या यातील प्रचंड तफावत सांगणारे नॅसकॉमचे अहवाल नेमक्या याच वैगुण्यावर बोट ठेवतात. चेहरा हरवलेली एक पिढी अनेक मानसिक प्रश्नांशी सामना करीत, कण्हत-कुंथत शिक्षण पूर्ण करते आणि या प्रवासात जगण्याचा आनंदच हरवून बसते.

हे सगळं थांबवायला हवं.

पालक म्हणून प्रथम आपला दृष्टिकोन बदलणे आणि मुलांना या स्पध्रेपलीकडेही असणारे अर्थपूर्ण आयुष्य दाखवणे हेच या समस्येचे शाश्वत उत्तर आहे!

लेखक अभियांत्रिकी शाखेचे प्राध्यापक आहेत.

dr.jayantkulkarni@gmail.com