12 July 2020

News Flash

विदाभान : हा डबा काय साठवतो?

संगणकावरून दिलेल्या गुंतागुंतीच्या आज्ञा, सूचना समजून त्यांचं पालन करणाऱ्या कोणत्याही वस्तूला रोबॉट म्हणता येईल.

(संग्रहित छायाचित्र)

संहिता जोशी

विदा म्हणजे ‘डेटा’. विदाविज्ञान किंवा ‘डेटा सायन्स’चा होणारा वापर आपल्याला माहीत असतोच असं नाही.. पण त्याचा आपल्यावर कसा परिणाम होतो, होऊ शकतो; सध्या व्यावसायिक या विषयाचा वापर कसा करून घेत आहेत? ‘पाळत’ किंवा ‘हेरगिरी’च्या वातावरणात आपण जातो आहोत का? अशा अनेक विषयांचा ऊहापोह करणारी ही नवी लेखमाला..

व्हिडीओ कॉलवर बोलताना एका भाचरानं मागणी केली, ‘‘तुझ्याकडे रोबॉट आहे का? दाखव ना मला.’’ मी त्याला डब्यासारखं दिसणारं एक यंत्र दाखवलं. पोळीचा डबा कसा बसका, पसरट असतो, तशा आकाराचं, काळ्या प्लास्टिकचं यंत्र. ‘‘ह्यॅ, रोबॉट असा नसतो.’’

हा प्लास्टिकचा डबा मी सांगते तेव्हा घराचा केर काढतो; केर पोटात साठवतो, सगळं घर झाडून झालं की चार्जरवर जाऊन बसतो; सगळा केर काढण्याआधी बॅटरी संपली तर तो परत जाऊन रीचार्ज होतो, मग उरलेल्या घराचा केर काढतो. कोणत्या भागाचा केर काढून झाला, हे तो लक्षात ठेवतो. केर काढून झाल्याचा निरोप स्मार्टफोनवर मिळतो; तो मध्येच अडला तर तसाही निरोप मला फोनवर येतो. मात्र त्याला खुच्र्या, टीपॉय सरकवून केर काढणं अजून जमत नाही. मग हा रोबॉट आहे का?

संगणकावरून दिलेल्या गुंतागुंतीच्या आज्ञा, सूचना समजून त्यांचं पालन करणाऱ्या कोणत्याही वस्तूला रोबॉट म्हणता येईल. मालकांनी ठरवून दिलेल्या वेळी घराचा केर काढणं, केर काढून झाला की आपोआप चार्जरवर जाऊन बसणं या आज्ञा गुंतागुंतीच्या आहेत. वाटेत भिंत आली, फर्निचर आलं तर तिथे स्वत:चं ‘डोकं’ आपटून न घेता, हळूच कानाकोपऱ्यांतून, चारचारदा ब्रश फिरवून केर काढण्याचं कामही हा डबा करतो. पायरीवर सोडलं तर त्याला पायऱ्यांची चढउतार करता येत नाही, पण वरच्या पायरीवरून खाली पडायचं नाही हे त्याला बरोबर समजतं. हा डबा घरच्या वायफायशी जोडलेला आहे; त्याचं काम झालं किंवा तो अडला तर वायफाय वापरून माझ्या फोनवर निरोप पाठवणं त्याला जमतं; म्हणजे या डब्याशी माझा मर्यादित प्रकारचा संवादही होतो. तो वेगवेगळ्या खोल्यांमध्ये फिरतो; आपला चार्जर कुठे आहे हे त्याच्या लक्षात असतं; तो चार्जर हलवला तर त्याला समजतं आणि घरभर जिथे फिरला तिथला नकाशाही त्याला चितारता येतो. या सगळ्या हालचाली कशा करायच्या, काय-काय गोष्टी लक्षात ठेवायच्या, त्या माहितीचा वापर कसा करायचा, हा भाग आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा (artificial intelligence).

नऊ वर्षांच्या भाचराला हा रोबॉट वाटला नाही. रोबॉट म्हटला की तो माणसासारख्या शरीराचा आकार असणारा, दोन हात, दोन पाय, डोक्याच्या जागी गोलाकार अशा काही कल्पना त्याच्या डोक्यात आहेत. (रोबॉट म्हणून हे केराचं यंत्र दाखवल्यापासून तो पोरगा माझ्यावर अजिबातच विश्वास ठेवत नाही.) पण तो केर काढणारा डबा रोबॉटच आहे. सर्वसाधारणपणे, कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून स्वत:हून हालचाल करू शकणाऱ्या यंत्रांना रोबॉट म्हटलं जातं.

आपल्या काही धारणा, मतं वगैरे असतात. आपण आत्तापर्यंत काय बघितलं आहे, काय वाचलं आहे, काय शिकलो आहोत, यानुसार धारणा, मतं ठरतात. जुने किंवा खूप शतकांचा इतिहास असलेले विषय – गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र इत्यादी – यांचा आपल्या रोजच्या आयुष्याशी जितपत संबंध येतो, तितपत प्राथमिक माहिती आपल्याला असते. एक डझन केळ्यांचे ३५ रुपये, तर चार केळ्यांचे किती, अशी गणितं आपल्याला सहज करता येतात किंवा क्रिकेटमध्ये स्विंग आणि स्पिनमधला भौतिकशास्त्रीय फरक काय, हे आपल्याला गुगल करून शोधता येईल. (स्विंगमध्ये हवेशी घर्षणानं चेंडूची दिशा बदलते; स्पिनमध्ये मनगट-हाताच्या हालचालींनुसार चेंडूची दिशा बदलते.) किंवा वाफेचं इंजिन, कुकरमध्ये वाफ कोंडून कमी इंधनात अन्न शिजवणं हे भौतिकशास्त्राचं उपयोजन (application) आपल्या परिचयाचं असतं. अशा यंत्रांपासून आपल्याला काय धोका असू शकतो, धोका कसा टाळायचा, हेही आपल्याला माहीत असतं. ही यंत्रं आपण बरीच वर्ष वापरत आहोत.

मात्र ज्या विषयांत नवनवीन संशोधन किंवा त्यांचं उपयोजन – मूलभूत संकल्पना वापरून काही यंत्र बनवणं, त्यातून नफा मिळवणं वगैरे – हा भाग नवाच असतो, त्याबद्दल आपल्याला फार माहिती नसते.

विदाविज्ञान (Data Science), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) या गोष्टी अजूनही नव्या आहेत. या ज्ञानशाखांमध्ये संशोधन गेली काही दशकं होत होतंच; आता व्यावसायिक पातळीवर गेल्या काही वर्षांत या विषयाचा उपयोग व्हायला सुरुवात झाली आहे. या विषयांची व्याप्ती काय, किती, याचा आपल्यावर कसा परिणाम होतो, होऊ शकतो; सध्या व्यावसायिक या विषयाचा वापर कसा करून घेत आहेत; विदा (data) म्हणजे काय; आपल्या रोजच्या व्यवहारात आलेले स्मार्टफोन्स, गुगल सर्च आणि फेसबुक-इन्स्टाग्राम अपडेट्स यांचा विदाविज्ञानाशी संबंध काय आणि मुळात हे सगळं समजून घेणं का महत्त्वाचं आहे, याबद्दल ही लेखमाला असणार आहे.

या केर काढणाऱ्या रोबॉटचंच उदाहरण घेऊ. हा रोबॉट केर काढतो तेव्हा फक्त कचरा जमा करत नाही, माहितीसुद्धा जमा करतो. भिंती कुठे आहेत, फर्निचर कुठे आहे, ही माहिती रोबॉट आपटू नये म्हणून उपयुक्त आहे; पण हा रोबॉट घराचा नकाशा बनवू शकतो. (सोबतचं चित्र पाहा. यातला भरीव भाग रोबॉटनं स्वच्छ केला, पांढऱ्या भागात त्याला जाता आलं नाही, पण तो घराचा भाग आहे असं रोबॉटचं आकलन आहे आणि काळा ठिपका म्हणजे त्याचा चार्जर.) त्याला फर्निचर सरकवता येत नाही, पण फर्निचरचा आकार त्याला समजतो. घरातला सोफा किती मोठा आहे, आरामखुर्ची आहे का नाही, हे त्या माहितीमधून समजू शकतं. घराचं क्षेत्रफळ किती हे त्याला समजतं.

ही माहिती जशी माझ्या फोनवर पोहोचते, तशी ती रोबॉट विकणाऱ्या कंपनीकडेही जाते. या कंपनीनं हजारो, लाखो रोबॉट्स विकले असणार. म्हणजे रोबॉट वापरणाऱ्या लोकांच्या घरांचं क्षेत्रफळ किती असतं, घराचा किती भाग फर्निचरनं व्यापलेला असतो. जेव्हा मोठय़ा प्रमाणावर नकाशे गोळा होतात, तेव्हा लोकांच्या घरांत किती सोफे, किती आरामखुच्र्या असतात; या लोकांच्या घरात रोज किती वेळा केर काढावा लागतो; अशी बरीच माहिती या नकाशातून काढता येते. ज्या लोकांच्या घरी बरेचदा केर काढावा लागतो, त्या घरांत मुलं असतील किंवा ते लोक हायवेच्या जवळ राहत असतील. त्यांना हे समजलंच तर काय? घरी येणाऱ्या मोलकरणीला तर हे सगळं स्पष्ट दिसतं आणि लोकांना सांगताही येतं. ही माहिती फक्त रोबॉट विकणाऱ्या कंपनीपुरतीच राहिली तर फार फरक पडणारही नाही. मात्र..

लेखाची सुरुवात केली ती ‘हा केर काढणारा, पसरट, प्लास्टिकचा डबा रोबॉट आहे,’ अशी; कदाचित यावर तुमचा विश्वास बसला नसेल. केर काढणारं यंत्र फक्त रोबॉट असतो असं नाही, तर आपल्या घरातली माहिती बाहेर पाठवणारा गप्पाडय़ा ‘हेर’ही असू शकतो. या ‘हेरा’मुळे जीमेल किंवा फेसबुक वापरताना लोकांना निरनिराळ्या जाहिराती दिसू शकतात.

लेखातली चित्रं आयरोबॉट कंपनीच्या रूंबाची आहेत. ‘सध्या तरी ही माहिती विकण्याचा आमचा विचार नाही’, असं आयरोबॉट कंपनीनं गेल्या वर्षी म्हटलं होतं; पण त्यांनी माहिती विकली तर..  ते पुढच्या लेखांमधून बघू.

लेखिका खगोलशास्त्रात पीएच.डी. आणि पोस्ट-डॉक असल्या, तरी सध्या विदावैज्ञानिक म्हणून कार्यरत आहेत.

ईमेल : 314aditi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2019 1:39 am

Web Title: what does this box store
Next Stories
1 तुम्हाला जर शेतकऱ्यांनाच मदत करायची आहे..
2 संपत्तीचे वाटप न्याय्य पद्धतीने करणे हा खरा प्रश्न
3 नवीन वर्षांत वेध विश्वचषकाचा..
Just Now!
X