News Flash

बौद्धिक संपदा हक्कांचा उलटा प्रवास

महान शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटनचं एक प्रसिद्ध वचन आहे.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

ओपन सोर्स संकल्पनेची सुरुवात संगणक क्षेत्रात झाली असली तरी ही संकल्पना फक्त संगणक क्षेत्रापुरती मर्यादित नाहीए. ओपन सोर्स संकल्पनेला एक व्यापक, वैचारिक बैठक आहे आणि या विचारसरणीचं मूळ तत्त्व हे वैचारिक स्वातंत्र्याचं, खुलेपणाचं आहे. आपल्या सभोवतालच्या ज्ञानसाठय़ाला बौद्धिक संपदा हक्कांच्या कृत्रिम भिंती उभारून, त्या साठय़ापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारी किल्ली ही फक्त ठरावीक विशेषाधिकार असणाऱ्या लोकांकडेच ठेवण्याला या विचारसरणीचा ठाम विरोध आहे.

महान शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटनचं एक प्रसिद्ध वचन आहे. तो म्हणतो, “If I have seen further, it is by standing on the shoulders of giants” त्याच्या आधीच्या शास्त्रज्ञांच्या (कोपर्निकस, गॅलिलिओ, केप्लर वगैरे) संकल्पना व शोध न्यूटनला उपलब्ध असणं व त्याला त्यांचं मुक्तपणे अवलोकन करता येणं हे न्यूटनने विज्ञान वा गणितात नव्या संकल्पना आणण्याच्या मागचं एक प्रमुख कारण आहे.

ओपन सोर्स संकल्पनेची वैचारिक बैठक न्यूटनच्या वरील विधानाशी बरीचशी मिळतीजुळती आहे. मागच्या लेखात चर्चिलेली बौद्धिक संपदा हक्कांबद्दलची कुठलीच गृहीतकं वा कोणतेच तर्क ओपन सोर्सच्या पुरस्कर्त्यांना (निदान सॉफ्टवेअरच्या बाबतीत) मान्य नाहीत. त्यांच्या विविध आक्षेपांचं अवलोकन करणं हे केवळ विचारप्रवर्तकच नव्हे तर ओपन सोर्स संकल्पना समजून घेण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे.

पहिलं म्हणजे, ओपन सोर्स व्यवस्थेच्या पुरस्कर्त्यांच्या मते प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर कंपन्या आपल्या सॉफ्टवेअर उत्पादनासोबत सॉफ्टवेअरचा सोर्स कोड वितरित करत नसल्यामुळे ते सॉफ्टवेअर वापरकर्त्यांच्या (मग तो आपल्या संगणकावर विंडोजसारखी ऑपरेटिंग प्रणाली वापरणारा सर्वसामान्य ग्राहक असो किंवा आपला व्यवसाय अधिक कार्यक्षमतेने चालावा म्हणून एखादी अत्याधुनिक सॉफ्टवेअर प्रणाली वापरणारी कंपनी असो) सॉफ्टवेअरमध्ये त्याच्या जरुरीनुसार बदल करण्याच्या हक्कांवर गदा आणतात. थोडक्यात, परंपरागत बौद्धिक संपदा हक्क एखाद्या दस्तावेजाच्या (सॉफ्टवेअरच्या बाबतीत सोर्स कोड) निर्मात्याचा त्या दस्तावेजावर असणारा विशेषाधिकार शाबूत ठेवतात; ज्यामुळे कोणासही त्या दस्तावेजापासून (निदान काही काळासाठी) चार हात लांब ठेवता येऊ  शकतं. यालाच इंग्रजीत ‘राइट टू एक्सक्लुड’ (वगळण्याचा विशेषाधिकार) असं म्हटलं जातं.

ओपन सोर्स व्यवस्था याच बौद्धिक संपदा हक्कांच्या नियमांना १८० अंश कोनात फिरवते. ही व्यवस्था आपल्या वापरकर्त्यांला सॉफ्टवेअरसोबत त्याचा सोर्स कोडचे वितरण करण्याचा विशेषाधिकार बहाल करते. म्हणजेच वगळण्यापासून (एक्सक्लुजन) वितरणाकडे (इन्क्लुजन) झालेला हा बौद्धिक संपदेचा उलट प्रवास आहे.

इथं एक मुद्दा विचारात घेण्यासारखा आहे. परंपरागत बौद्धिक संपदा हक्क हे कोणत्याही दस्तावेज वा कलाकृतीच्या निर्मात्याचं हित जपणारा आहे तर ओपन सोर्स व्यवस्था ही त्याच दस्तावेजाच्या वापरकर्त्यांचं हित जपणारी आहे. थोडक्यात, ओपन सोर्स व्यवस्था ही ज्ञानाच्या कक्षा रुंदावणारी आहे; ज्या ज्ञानावर काही मूठभर लोकांची वा संस्थांची मक्तेदारी आहे ती मोडून ते ज्ञान सर्वसामान्यांना खुलं करण्याची सुनिश्चिती ओपन सोर्स व्यवस्था देते. हे म्हणजे एखाद्या देशाने वर्षांनुवर्ष चालत आलेली एकाधिकारशाहीची राजकीय व्यवस्था मोडून लोकशाहीचा अंगीकार करण्यासारखं आहे.

आता यावर प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर देणाऱ्या कंपन्यांचं हे म्हणणं असतं की, सोर्स कोडचं संरक्षण करणं त्यांच्या अस्तित्वासाठी गरजेचं आहे, कारण सॉफ्टवेअर वापरण्याचा लायसन्स विकूनच या कंपन्या मुख्यत्वेकरून त्यांचा महसूल कमावतात. जर सोर्स कोड मुक्तपणे उपलब्ध असेल तर कुठलाही वापरकर्ता सॉफ्टवेअर वापरण्यासाठी पैसे का मोजेल?

या प्रश्नाचेच २ उपप्रश्न आहेत. एक म्हणजे ओपन सोर्स सॉफ्टवेअर हे मोफत (फ्री) उपलब्ध असतं का? व दुसरा म्हणजे ओपन सोर्स व्यवस्था ही फक्त काही तंत्रज्ञांचा रिकामपणाचा छंद म्हणून अस्तित्वात आहे की तिचा सॉफ्टवेअरच्या मुख्य प्रवाहात प्रवेश झालाय? पहिल्या उपप्रश्नाचं उत्तर हे स्पष्टपणे ‘नाही’ असं आहे. इथं हे समजून घेणं महत्त्वाचं की जरी ओपन सोर्स सॉफ्टवेअरला काही  Free and Open Source Software (FOSS) असं म्हटलं जात असलं तरीही इथं ‘फ्री’ हा मोफत या अर्थाने नव्हे तर ‘फ्रीडम’ अथवा स्वातंत्र्य या अर्थाने वापरला गेला आहे. सॉफ्टवेअर वापरकर्त्यांला सोर्स कोड मिळण्याचं, त्यात बदल करण्याचं व बदललेल्या सॉफ्टवेअरचं पुनर्वितरण करण्याचं स्वातंत्र्य इथं अभिप्रेत आहे.

दुसऱ्या बाजूला आज ओपन सोर्स व्यवस्था ही (मुख्यत्वेकरून सॉफ्टवेअर क्षेत्रात) सक्षमपणे उभी आहे. तिने मुख्य प्रवाहात कधीच प्रवेश केलाय व सॉफ्टवेअरच्या विविध कार्यक्षेत्रांमध्ये ती प्रस्थापितांच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. ‘रेड हॅट’सारखी १००% ओपन सोर्स सॉफ्टवेअरच्या व्यवसायात असलेली कंपनी प्रचंड यशस्वी झालीय व आज ती मायक्रोसॉफ्टसारख्या बलाढय़ कंपनीची प्रमुख प्रतिस्पर्धी आहे. रेड हॅटसारख्या कंपन्यांनी हे दाखवून दिलंय की महसूल कमावण्यासाठी सोर्स कोड गुप्त ठेवून फक्त लायसन्स विकण्याची गरज नाही; सोर्स कोड खुला ठेवूनदेखील फक्त महसूलच काय तर चांगल्यापैकी नफादेखील कमावता येतो.

प्रोप्रायटरी सॉफ्टवेअर कंपन्यांचा सोर्स कोड खुला करण्याविरोधात अजून एक युक्तिवाद हा सॉफ्टवेअर निर्माण करण्याच्या पद्धतीशी निगडित आहे. सॉफ्टवेअर (विशेषकरून व्यावसायिक) लिहिणं हे एका व्यक्तीचं काम नाही. कोणत्याही सॉफ्टवेअरची सुरुवात जरी एखाद्या माणसाने केली असली तरी त्याचा व्यापक स्तरावर वापर होण्यासाठी ज्या परिपक्वतेची गरज असते त्यासाठी अनेक संगणक तंत्रज्ञांची गरज असते. मग त्यातले काही जण त्या सॉफ्टवेअरच्या स्थापत्यशैलीवर (आर्किटेक्चर) काम करत असतील, काही अल्गोरिदम लिहीत असतील, तर काही जण सॉफ्टवेअर त्याचा नियोजित परिणाम साधतं आहे का, त्यात काही तांत्रिक उणिवा किंवा चुका राहून गेल्यात का याची चाचणी करत असतील. आता प्रोप्रायटरी सॉफ्टवेअरमध्ये वरील सर्व कामं ही कंपन्यांच्या चार भिंतींच्या आत त्या कंपनीत नोकरी करत असलेल्या संगणकतज्ज्ञांकडून होत असतात. म्हणूनच प्रोप्रायटरी कंपन्यांचा सोर्स कोड खुला करण्याच्या विरोधात एक महत्त्वाचा आक्षेप असतो की सॉफ्टवेअर बनविण्यासाठी ज्या विविध प्रकारचं कौशल्य असणाऱ्या तंत्रज्ञांची गरज असते ती फक्त कंपनी नामक संस्था एकत्र आणू शकते. मग त्यात घडविल्या गेलेल्या सॉफ्टवेअरवर संपूर्णपणे त्या कंपनीचीच मालकी असायला हवी.

ओपन सोर्स व्यवस्थेनं याही गृहीतकाला पूर्णपणे चुकीचं सिद्ध केलं आहे. आज इंटरनेट व वेब तंत्रज्ञानामुळे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसलेला तंत्रज्ञ ओपन सोर्स प्रकल्पात ऐच्छिक योगदान देऊ  शकतो. त्यासाठी विविध तंत्रज्ञांना कंपनीच्या छताखाली येण्याची काहीच गरज नाही. किंबहुना कोणत्याही ओपन सोर्स कंपनीच्या सॉफ्टवेअरमध्ये सर्वाधिक योगदान हे अशा हौशी, अर्धवेळ काम करणाऱ्या तंत्रज्ञांचंच असतं. रेड हॅटचा फेडोरा लायनक्स प्रकल्प हा याचं एक ठळक उदाहरण आहे (https://fedoraproject.org). पुढील लेखांमध्ये आपण याचा विस्तृत आढावा घेऊच.  थोडक्यात, ओपन सोर्स व्यवस्थेने बौद्धिक संपदा हक्कांच्या बाजूने देण्यात येणाऱ्या सर्व चाकोरीबद्ध गृहीतकांना निकालात काढलंय व वापरकर्त्यांच्या वितरणाचा अधिकार शाबूत ठेवून, कोणतंही लायसन्सिंग शुल्क न लावतादेखील व्यावसायिकपणे सॉफ्टवेअर विकता येतं हे दाखवून दिलंय.

ओपन सोर्स व्यवस्था ही गेल्या ३ दशकांत प्रामुख्याने उदयास आली असली तरी या संकल्पनेची बीजं साठच्या दशकातच सापडतात. अशाच एका अवलियाने निर्मिलेल्या ऑपरेटिंग प्रणालीने ओपन सोर्स व्यवस्थेत अभिप्रेत असलेल्या सहयोगाची (कोलॅबरेशन) सुरुवात झाली. त्या अवलियाचं नाव होतं- केन थॉम्पसन आणि त्याने निर्मिलेल्या ऑपरेटिंग प्रणालीचं नाव होतं- युनिक्स! ज्या युनिक्स ऑपरेटिंग प्रणालीने सॉफ्टवेअरमधील ‘ओपन’ युगाला प्रारंभ झाला, त्याच युनिक्स प्रणालीने आपण आपल्या ओपन सोर्स व्यवस्थेवरील चर्चेचा श्रीगणेशा करणार आहोत.

अमृतांशू नेरुरकर

amrutaunshu@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2018 12:13 am

Web Title: what is open source software
Next Stories
1 सॉफ्टवेअर आणि बौद्धिक संपदा हक्क
2 सॉफ्टवेअरची एक मुक्त संकल्पना
3 सॉफ्टवेअर युगाची नऋंदी
Just Now!
X