|| डॉ. बाळ राक्षसे

करोनाने भारतात प्रवेश केला, तसे मुखपट्टी वापरणे, सतत हात धुणे, शारीरिक अंतर राखणे यांसारख्या आवाहनांबरोबरच कठोर संचार-निर्बंधही योजले गेले. आता वर्षभरानंतरही हेच सारे पुन:पुन्हा सांगावे/योजावे लागते आहे. पण त्यास प्रतिसाद न देणारेही आहेतच. वाढत्या करोना-प्रादुर्भावातदेखील हे ‘धाडस’ कशामुळे येते?

 

एखादी व्यक्ती, समूह किंवा समाज कसा आणि तसेच का वर्तन करतो, हा मानसशास्त्राचा अभ्यासविषय आहे. काही वेळा समाजात किंवा राष्ट्रात अपवादात्मक परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी समूह किंवा व्यक्ती कसे वर्तन करतो/करते किंवा करेल, अथवा अपेक्षित वर्तन का करत नाही, याचा अंदाज हा काही प्रस्थापित सिद्धान्तांच्या आधारे बांधता येतो. अमेरिकेत १९५० च्या दशकात तत्कालीन सरकारने त्यांच्या नागरिकांना क्षय रोगाची चाचणी मोफत उपलब्ध करून दिली. इतकेच नाही, तर चाचणी करणारी फिरती व्हॅन त्यांच्या दारापर्यंत नेऊन उभी करूनसुद्धा लोक चाचणी करून घेण्यास तितके उत्सुक नसत. हे असे का घडत होते, हे समजून घेण्यासाठी समाज-मानसशास्त्रज्ञांचा एक समूह अभ्यास करीत होता. त्या वेळी समाज-मानसशास्त्रज्ञ अध्ययनाच्या दोन महत्त्वाच्या दृष्टिकोनांतून हे वर्तन समजावून घेण्याचा प्रयत्न करीत होते (या ठिकाणी अध्ययन म्हणजे वर्तनात होणारा टिकाऊ, कायमस्वरूपी बदल). एक म्हणजे उद्दीपक-प्रतिक्रिया सिद्धान्त (वॉटसन, १९२५) आणि दुसरा बोधात्मक सिद्धान्त (लेव्हिन आणि टोलमन, १९३२).

यातील पहिला सिद्धान्त या गृहीतकावर आधारला आहे की, व्यक्तीचे (किंवा प्राण्याचे) वर्तन अशा घटनेमुळे दृढ होते, ज्यामुळे त्याच्या शारीरिक गरजा पूर्ण होतात. याला बी. एफ. स्किनर हा अमेरिकी मानसशास्त्रज्ञ ‘प्रबलक (रीइन्फोर्सर, रीइन्फोर्समेंट)’ असे संबोधतो. स्किनरच्या मते, वर्तन आणि त्यापाठोपाठ मिळणारे प्रबलक यांच्यातील साहचर्यामुळे व्यक्तीचे वर्तन घट्ट होत जाते. याउलट, अध्ययनाचा बोधात्मक दृष्टिकोन असे सांगतो की, व्यक्तीची विशिष्ट कृती किंवा वर्तन हे त्याच्या वैयक्तिक गृहीतके, वैयक्तिक अपेक्षा, एखादे विशिष्ट वर्तन केल्यावर त्यातून मिळणारा फायदा किंवा मूल्य या सर्वांना अनुसरून घडते. म्हणजेच यात व्यक्तीची आकलनशक्ती, अनुमान करण्याची (रिझनिंग) शक्ती यांचा अंतर्भाव होतो. म्हणजे बोधात्मक दृष्टिकोन असे मानतो की, प्रबलक वर्तनाला निर्धारित करीत नाही, तर व्यक्तीच्या घडणाऱ्या परिस्थितीबद्दल काय अपेक्षा आहेत आणि त्याच्या दृष्टीने त्याचे काय मूल्य आहे, यावर व्यक्तीचे वर्तन अवलंबून असते. आता या ‘अपेक्षा मूल्य (व्हॅल्यू-एक्स्पेक्टन्सी)’ या संकल्पनेला आरोग्य-वर्तनाच्या बाबतीत पाहायचे असल्यास दोन गोष्टींचा विचार करावा लागेल : (१) आजाराला टाळणे/बरे होणे याचे मूल्य व्यक्तीच्या दृष्टीने किती आहे. (२) एखादी विशिष्ट कृती केल्याने आजाराला प्रतिबंध (किंवा आजार सुसह््य) होऊ शकतो का, याबद्दल त्या व्यक्तीला काय अपेक्षा आहेत.

अपेक्षा-मूल्य या संकल्पनांचा आधार घेऊनच पुढे ‘हेल्थ बीलिफ मॉडेल’ अर्थात आरोग्य-विश्वास प्रारूपाची निर्मिती झाली. यात अजूनही काही संकल्पना वापरल्या आहेत त्या पुढे येतीलच. लोक आजाराला प्रतिबंध करण्यासाठी एखादी कृती किंवा वर्तन का करतात, आपल्याला एखादा आजार झाला आहे किंवा कसे यासाठीच्या चाचण्या का करतात आणि एखादा आजार झाल्यावर त्याला नियंत्रित करण्यासाठी किंवा बरे होण्यासाठी वा आजार सुसह्य व्हावा यासाठी कसे वर्तन करतात, याबद्दल पूर्वकथन करण्याचा प्रयत्न हे प्रारूप करते. प्रस्तुत लेखात केवळ वैयक्तिक वर्तनाचा विचार केलेला आहे, समूह वर्तनाच्या विश्लेषणासाठी इतर अनेक दृष्टिकोनांतून विचार केला जाऊ शकतो.

भारतात गतवर्षी जानेवारीच्या शेवटाकडे पहिला करोनाबाधित सापडला आणि त्यानंतर शासकीय यंत्रणांनी या रोगाच्या नियंत्रणासाठी समूहाने कसे वर्तन करावे याकरिता काही दिशानिर्देश जारी केले. उदाहरणार्थ, शारीरिक अंतर पाळावे, नियमितपणे साबणाने हात धुवावेत, अनावश्यक स्पर्श टाळावेत, नियमितपणे मुखपट्टी वापरावी, आदी. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये व्यक्ती आणि समूहाच्या वर्तनात परिस्थितीनुरूप बदल घडविणे आणि त्यासाठी योग्य संप्रेषण (संवाद) करणे हाच एक उपाय अनेक वेळा असू शकतो. यासाठी शासनाने योग्य ते सामाजिक आणि वर्तनबदल संप्रेषण घडवून आणले, असे सकृद्दर्शनी तरी दिसते. इतके करूनही एक वर्षानंतर परिस्थिती काय आहे? कोविड रुग्णांची संख्या वाढतच गेली आणि आता पुन्हा एकदा टाळेबंदी करण्याची पाळी शासनावर आली. शासन पुन:पुन्हा निर्देश देऊनही लोक असे का वागत आहेत? पोलिसांच्या काठ्या खाऊनही ते रस्त्यांवर का येत आहेत? त्यांना त्यांच्या आरोग्याची काळजी वाटत नाही का? या प्रश्नांची उत्तरे आपण आरोग्य-विश्वास प्रारूपामध्ये वापरलेल्या संकल्पनांच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न करू या.

(१) ज्ञात संवेदनशीलता : म्हणजे व्यक्तीला तिच्या ज्ञात शारीरिक आणि मानसिक स्थितीचे ज्ञान असणे आणि त्याआधारे स्वत:ला संबंधित आजार होण्याची संभावना किती आहे याबद्दलचा तिचा विश्वास/श्रद्धा. अर्थात, तिचा हा विश्वास हा तिला असणाऱ्या ज्ञानाच्या आधारावर असतो. कदाचित तो चुकीचादेखील असू शकतो. उदाहरणार्थ, मला असे अनेक जण भेटले- जे म्हणतात की, दारू पिणाऱ्याला संसर्ग होत नाही, कापूर हुंगल्यामुळे संसर्ग होत नाही; म्हणजे ते स्वत:ला ‘रिस्क झोन’मधले मानत नाहीत. याउलट, करोनाचा संसर्ग कुणालाही होऊ शकतो असा विश्वास ज्या वेळी व्यक्तीला असतो, त्या वेळी ती व्यक्ती संसर्ग रोखण्यासाठी अपेक्षित वर्तन करण्याची शक्यता जास्त असते.

(२) ज्ञात तीव्रता : याचा अर्थ, जर मला कोविड झाला तर काय किंवा मला योग्य उपचार मिळाले नाही, माझा मृत्यू झाला तर काय होईल, याचे गांभीर्य होय. यात माझ्या कुटुंबाची होणारी हानी, आर्थिक आणि मानसिक त्रास या सर्व बाबी आल्या.

(३) ज्ञात फायदे : जरी एखाद्या व्यक्तीला असे वाटत असेल की, मला कोविड होऊ शकतो आणि याचे गंभीर परिणाम माझ्या आरोग्यावर होणार आहेत, तसेच माझ्या कुटुंबाची यामुळे आर्थिक, सामाजिक आणि मानसिक हानी होणार आहे; तरी ती व्यक्ती करोनाला प्रतिबंध करण्यासाठी किंवा धोका कमी करण्यासाठी आवश्यक असणारे निर्देशित वर्तन करेलच की नाही, हे अनेक घटकांवर अवलंबून असते. जसे की, आर्थिक साधनांची उपलब्धता, कौटुंबिक परिस्थिती, आजूबाजूचा परिसर, आरोग्य साधनांची उपलब्धता, इतर संसाधने, आदी. उदाहरणार्थ, हात धुण्यासाठी पाणीच नसेल तर काय करणार? किंवा बाहेर पडल्याशिवाय चूलच पेटणार नसेल तर काय? मुंबईसारख्या ठिकाणी दहा बाय दहाच्या खोलीत दहा जण राहत असतील, तर शारीरिक अंतर कसे पाळणार? म्हणजेच व्यक्तीचे आरोग्य-वर्तन हे केवळ निर्देश देऊन बदलता येणार नाही, तर त्यासाठी इतर सामाजिक आणि आर्थिक निर्धारकांचा विचार करावा लागेल.

(४) ज्ञात अडथळा : इतके असूनही आरोग्यदायी/पूरक वर्तन किंवा कृती करण्यासाठी व्यक्तीपुढे अडथळे निर्माण होत असतात. अर्थात, हे अडथळे हे त्या व्यक्तीच्या जाणिवेच्या आणि नेणिवेच्या पातळीवर असतात. उदाहरणार्थ, मुखपट्टी वापरल्यामुळे दम लागतो, अवघडल्यासारखे होते, गर्दीत जाणे टाळणे मला शक्य नाही, इत्यादी. म्हणजे आरोग्यदायी कृती करण्याचे सर्व नकारात्मक घटक ती व्यक्ती पाहत असते. तसेच कृतीचे फायद्या-तोट्याचे गणित ही व्यक्ती मांडते. जर फायदा कमी आणि तोटाच जास्त असेल (तिच्या दृष्टीने), तर साहजिकच कृती टाळली जाते.

(५) कृती करण्यासाठी संकेत/सूचना : आपल्या आजूबाजूच्या वातावरणात असे अनेक घटक असतात, जे आपणास विशिष्ट वर्तन किंवा कृती करण्यासाठी उद्युक्त करत असतात किंवा कृती करण्यापासून परावृत्त करत असतात. याचा विचार धोरणकत्र्यांनी जास्त करायला हवा. आज आपण ज्या वेळी आजूबाजूची सामाजिक आणि राजकीय परिस्थिती पाहतो, त्या वेळी असेच संकेत जास्त मिळतात, ज्यामुळे सामान्य व्यक्ती आरोग्यदायी वर्तन करण्यापासून परावृत्त तरी होते किंवा ती ते गांभीर्याने घेत नाही. दूरचित्रवाणीवर मोठमोठाल्या राजकीय सभा, धार्मिक कार्यक्रम, जत्रा आदी बिनदिक्कतपणे चालू असल्याचे दिसत असताना, शासनाने म्हणायचे- ‘शारीरिक अंतर पाळा आणि मुखपट्टी लावा’; तर सामान्य व्यक्ती ते किती गांभीर्याने घेईल? काही नेते पत्रकारांनाही सांगतात की, ‘‘मी लावत नाहीच, पण तुम्हीदेखील मुखपट्टी लावू नका’’! सामान्य माणूस त्यांना माध्यमावर पाहतो, अशा वेळी त्याच्याकडून योग्य वर्तनाची अपेक्षा कशी करायची?

(६) स्व-सामथ्र्य : आरोग्याच्या संदर्भात स्व-सामथ्र्य, म्हणजे व्यक्तीचा आपण योग्य कृती किंवा वर्तन करू शकतो याबद्दलचा आत्मविश्वास होय. हा भागदेखील अनेक घटकांवर अवलंबून असतो; जसे की, व्यक्तीचे शिक्षण, तिच्या अभिवृत्ती, कौटुंबिक वातावरण, सामाजिक आधार, इत्यादी.

वरील संकल्पनांचे विवेचन वाचल्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवेल की, व्यक्तीचे आरोग्याला पूरक असे वर्तन विलग करून पाहता येत नाही. शासनाने एखाद्या समूहाला महासाथीच्या नियंत्रणासाठी निर्देश द्यावेत आणि समूहाने ते जसेच्या तसे पाळावेत असे सहसा होत नाही. हे आपल्याच देशात नाही, तर अमेरिकेसारख्या प्रगत देशातदेखील दिसून येते. प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वत:चा सर्वांगीण विकास करून घेण्याची- अपवाद वगळता- क्षमता असते. परंतु त्यास अनेक पूरक घटक असतात, जे व्यक्तीचे वर्तन निर्धारित करत असतात. उदाहरणार्थ, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वातावरण हे अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असते, हे विसरून चालणार नाही. करोना महासाथीने संपूर्ण जगाला अनेक धडे शिकविले आहेत, हेही विसरून चालणार नाही.

(लेखक मुंबई येथील टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या आरोग्यविषयक धोरण, नियोजन आणि व्यवस्थापन केंद्राचे प्रमुख आहेत.)

bal.rakshase@tiss.edu