सोनाली प्रकाश शिराळकर sonalishiralkar3888@gmail.com

मुंबई पोलीस दलात कार्यरत महिलांच्या सद्य:स्थितीचा मागोवा घेणाऱ्या शोधनिबंधाचे हे सार. या शोधनिबंधाला  आंतरमहाविद्यालयीन ‘आविष्कार रिसर्च कन्व्हेन्शन’मध्ये प्रथम क्रमांकाने गौरवण्यात आले आहे.

heavy traffic jam for two hours in dombivli
डोंबिवली दोन तासांपासून अभूतपूर्व वाहतूक कोंडीत; रविवारी खरेदीसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना फटका
Garbage picker to video journalist Maya Khodve Journey
कचरा वेचक ते व्हिडिओ जर्नलिस्ट! माया खोडवे यांच्या जिद्दीचा प्रवास
Marriage to a minor girl
पुणे : अल्पवयीन मुलीशी विवाह, मारहाण करून गर्भपात; पतीसह पाचजणांवर गुन्हा
Failed Robbery Attempt
माय-लेकींच्या धाडसाला सलाम! दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चोरांशी भिडल्या; व्हिडीओ व्हायरल, पोलिसांकडून आरोपींना अटक

महिलांचे पोलीस दलातील योगदान लक्षणीय आहे. काम करताना रोज उभी ठाकणारी आव्हाने असोत किंवा कोविडच्या साथीसारखा कठीण काळ, त्या नेहमीच संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज असतात. त्यांच्या सद्य:स्थितीचा आणि त्यांच्यापुढील आव्हानांचा आढावा घेण्यासाठी, ९८ महिला पोलिसांशी बोलून प्रारंभिक अभ्यास (पायलट स्टडी) केला. यात निम्म्याहून अधिक महिला पोलीस ३१ ते ४० वयोगटातील होत्या. त्यांनी विविध अडथळय़ांवर मात करत केलेल्या वाटचालीचा मागोवा घेणे हा या अभ्यासाचा उद्देश होता.

पोलीस क्षेत्रात कार्यरत असताना सतत सतर्क राहून कर्तव्य बजावणे आव्हानात्मक असते. या क्षेत्रातही प्रचंड स्पर्धा असते, हे या अभ्यासातून निदर्शनास आले.  आपल्या पुरुषप्रधान देशात आजही अनेकदा स्त्रियांच्या कार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. आता नोकरभरतीत स्त्रियांना ३३ टक्के आरक्षण आहे. स्त्री- पुरुषांच्या कार्यक्षमतेचा तुलनात्मक अभ्यास केला असता लिंग आणि कार्यक्षमता यांचा दुरान्वयेही संबंध नसल्याचे स्पष्ट होते. अमेरिकेत महिलांना पोलीस दलात संधी मिळावी, यासाठी १९६० सालापासून लढा उभारण्यास सुरुवात झाली. त्यांच्या या लढय़ाचे सकारात्मक परिणाम १९७०च्या आसपास दिसू लागले. त्याच सुमारास भारतात कायदा आणि व्यवस्थापन क्षेत्रात स्त्रियांचा प्रवेश झाला.

गणवेशधारी दलांमध्ये महिला रुजू झाल्यानंतरची तीन दशके भारतातील कायदा व व्यवस्थापनाच्या जडणघडणीला कलाटणी देणारी ठरली. तरीही आजही भारतातील पोलीस दलांत महिलांचा सहभाग खूपच कमी आहे. जनतेची मानसिकता, समाजाचा स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन, कामाचे स्वरूप, कामाच्या ठिकाणचे वातावरण आणि आव्हाने ही यामागची महत्त्वाची कारणे आहेत. २००५ ते २०१० पर्यंतचा काळ महिला पोलिसांसाठी फारच अवघड होता. भारतातील अनेक राज्यांतील महिला पोलीस दलात येण्यास उत्सुक नव्हत्या. राजस्थान, हरियाणा, आसाममधील महिलांचा पोलीस दलात उल्लेखनीय सहभाग नव्हता. ‘कॉमनवेल्थ ह्युमन राइट्स इनिशिएटिव्ह २००७’ नुसार, महिलांसाठी पोलीस खात्यात नोकरी हा करिअरचा पर्याय नव्हता. कुटुंबाचा पाठिंबा नसणे, कामाचे स्वरूप, कामाच्या ठिकाणचे वातावरण, स्त्री-पुरुष भेदभाव, मानसिक-लैंगिक छळ ही त्यामागची कारणे होती. कित्येक महिलांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांना प्राधान्य देत, या क्षेत्रात पुढे जाण्याची तयारी दर्शवली नाही.  आजही मुंबईसारख्या महानगरात, मुंबई पोलिसांच्या हद्दीत ९१ पोलीस ठाणी आहेत. त्यापैकी फक्त आठ पोलीस ठाण्यांच्या प्रमुखपदी महिला आहेत.

या अभ्यासात असे निदर्शनात आले की, शासन महिलांना पुरुषांच्या बरोबरीने पुरेशा संधी उपलब्ध करून देत आहे. पोलीस दलात महिलांची संख्या वाढत राहिल्यास तो महिला सबलीकरणाचा संकेत ठरेल, असे मत ८५ टक्के महिला पोलिसांनी व्यक्त केले. पोलिसांची भरती योग्य निकषांवर केली जाते, असे ८४ टक्के पोलिसांचे म्हणणे असले तरीही, उर्वरित १६ टक्के पोलिसांच्या मते आजही सकारात्मक बदलांना वाव आहे. ८६ टक्के पोलिसांच्या मते आपल्या क्षमता सिद्ध करण्यासाठी प्रत्येकाला समान संधी मिळते; मात्र उर्वरित १४ टक्के महिला पोलीस मात्र त्यांच्याशी सहमत नाहीत. महिलांसाठी घर आणि काम यांचा समतोल साधणे, हे सर्वात मोठे आव्हान आहे, असे ९९ टक्के पोलिसांचे मत आहे. कामाचा ताण, कामाचे अधिक तास आणि वेळीअवेळी काम करावे लागणे, त्यामुळे जीवनातील समतोल बिघडणे, हे आव्हानात्मक घटक आहेत, असे ९२ टक्के महिला पोलिसांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर स्वत:साठी आणि कुटुंबासाठी दर्जेदार वेळ मिळत नसल्याची खंत ९० टक्के पोलिसांनी व्यक्त केली.

महिला पोलिसांना समान संधी उपलब्ध असल्या, तरी त्यांना प्रत्यक्षात या संधींचा लाभ घेता येतो का, या प्रश्नाचे उत्तर शोधले असता, असे निदर्शनात आले की, या क्षेत्रात अनेक पोलिसांनी आपले प्रामाणिक योगदान दिले आणि तरीही त्यांना एकाच पदावर अनेक वर्षे राहावे लागले. घर आणि कामात समतोल साधणे हे महिलांसाठी सर्वात मोठे आव्हान आहे. दोन्ही आघाडय़ांवर क्षमता सिद्ध करताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागते.  पोलिसांच्या कामाचे स्वरूप हे इतर कार्यक्षेत्रांच्या तुलनेत खूपच वेगळे आहे. वाढता ताण आणि त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे कामाचे अतिरिक्त तास हा कळीचा मुद्दा ठरतो. वाढता ताण, शारीरिक-मानसिक दडपण, आरोग्यावर होणारा परिणाम, वाढत्या अपेक्षा, अशी कसरत करत असताना करिअरच्या कक्षा रुंदावत ठेवणे हे महिला पोलिसांसाठी शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे.  समाजाचा स्त्रियांविषयीचा दृष्टिकोन, कुटुंबाकडून सहकार्याचा अभाव, प्रोत्साहनाचा अभाव, पुरुषांशी तुलना हे स्त्रियांच्या प्रगतीतील अडथळे ठरतात. आजही स्त्रियांना अनेक प्रकारच्या भेदभावांचा सामना करावा लागतो. स्त्रियांकडे एकाच वेळी अनेक कामे हाताळण्याचे कौशल्य असूनही, त्यांच्या कार्यक्षमतेविषयी साशंकता व्यक्त केली जाते. महिला पोलिसांची बदली लग्न अथवा मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या इच्छेनुसार करण्याची तरतूद असल्यास त्यांच्या प्रगतीला हातभार लागेल. पोलिसांचे आरोग्य आणि तंदुरुस्तीकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कामाच्या ताणामुळे महिला पोलीस आयुष्यातील ज्या आनंदापासून वंचित राहतात, त्याची भरपाई योग्य मोबदल्याच्या स्वरूपात मिळाल्यास, त्यांना काम करण्यास प्रेरणा मिळेल. पोलिसांना त्यांच्या तंदुरुस्तीसाठी दिवसातील काही काळ मिळेल, याची तरतूद कामाच्या ठिकाणी करावी. त्यांना त्यांच्या कार्यक्षमता वाढण्यासाठी वेळोवेळी योग्य प्रशिक्षण दिले जावे. तसे झाल्यास समाजात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवणे सहज शक्य होईल.

कामकाजाच्या समस्यांशिवायही अनेक समस्यांचा सामना पोलिसांना करावा लागतो. विशेषत: महिला पोलिसांची या समस्यांमुळे फारच कोंडी होते. बऱ्याच ठिकाणी पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध नसते, स्वच्छतागृहे नसतात, असल्यास ती अस्वच्छ असतात. बंदोबस्तासाठी नेमण्यात आलेल्या महिला पोलिसांना अनेकदा अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अनुभवाने ज्येष्ठ असूनही तुलनेने कनिष्ठ पदावर काम करणाऱ्या पोलिसांना न्याय मिळायला हवा. अधिक काम करूनही भत्ता न मिळणे, वाढत्या महागाईच्या काळात तुटपुंज्या पगारात कुटुंबाची जबाबदारी पेलावी लागणे, अशी आव्हाने पोलिसांसमोर आहेत, त्यासंदर्भातही ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.  असे अनेक प्रश्न असले, तरीही आता चित्र बदलत आहे. हळूहळू महिला पोलिसांविषयी जनतेत आदर निर्माण होऊ लागला आहे. आज त्यांना गरज आहे ती खंबीर पाठिंब्याची आणि योग्य मार्गदर्शनाची. त्यांच्या कामातील अतिरिक्त हस्तक्षेप टाळल्यास आणि त्यांचे आवश्यक तेव्हा समुपदेशन केल्यास, त्या मिळालेल्या संधींना न्याय देऊ शकतील. महिलांना बदलांचा सामना करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे खूप गरजेचे आहे. योग्य प्रकारची सुसज्ज वाहनेही दिली जावीत. त्यांना स्वत:चा विकास साधण्यासाठी पुरेसा वेळ द्यावा.

महिला पोलिसांनी विविध आव्हानांचा सामना करत प्रगतीच्या मार्गावर वाटचाल केली आहेच. कामाच्या ठिकाणी पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्यास, कामाच्या तासांवर आणि वेळांवर योग्य नियंत्रण ठेवल्यास, समान संधी दिल्यास आणि बदलत्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिल्यास त्या अधिक खंबीरपणे पुढे जाऊ शकतील.

(लेखिका मुंबई विद्यापीठाच्या, सिद्धार्थ महाविद्यालय संशोधन केंद्रातून मुंबईतील महिला पोलिसांच्या स्थितीबाबत संशोधन करत आहेत.)