सामाजिक, सांस्कृतिक, कलात्मक क्षेत्रांत आपली अमिट छाप सोडणाऱ्या प्रतिभावंतांशी संवाद साधण्याचे व्यासपीठ देणाऱ्या ‘लोकसत्ता गप्पा’ या उपक्रमाला २०१६मध्ये सुरुवात झाली. या उपक्रमाच्या पहिल्या पर्वाचे अतिथी होते एस. एल. भैरप्पा. केवळ कन्नडच नव्हे तर जागतिक स्तरावर आपल्या लेखणीचा ठसा उमटविणारे भैरप्पा आणि साहित्य, नाटय़, चित्रपट, संगीत, कला आदी विविध क्षेत्रांतील दर्दी मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले. भैरप्पा यांच्या बहुतांश कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद करणाऱ्या उमा कुलकर्णी या श्रोते आणि भैरप्पा यांच्यातील दुवा बनल्या होत्या. त्या प्रश्नोत्तर-संवादातील भैरप्पा यांच्या मनोगताचा हा निवडक अंश.
कन्नड वाचकांपेक्षाही मराठी वाचकांशी माझं अधिक जवळचं नातं आहे. मराठी वाचक भारतातला असो की परदेशातला, तो साहित्यप्रेमी आणि शास्त्रीय संगीताचाही प्रेमी आहे. माझी पहिली आवड शास्त्रीय संगीत आहे. शास्त्रीय संगीत माझं प्रेरणास्थान आहे. माझ्या कल्पनाशक्तीला शास्त्रीय संगीतामधूनच प्रेरणा मिळते. माझ्या लेखनात काही अडथळा येतो, विचार थांबतात तेव्हा शास्त्रीय संगीत ऐकल्यानंतर त्या विचारांना पुन्हा चालना मिळते. माझ्याकडे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा खूप मोठा संग्रह आहे. दोन-तीन तास ते संगीत ऐकल्यानंतर माझ्या कल्पना स्पष्ट होतात आणि याचमुळे मी मराठी वाचकांच्या अधिक जवळ आहे.
दक्षिण कर्नाटकातील एका खेडय़ातील गरीब कुटुंबातून मी आलो. अकरा वर्षांचा असताना माझी आई गेली, नंतर पंधराव्या वर्षी पाच वर्षांचा माझा भाऊ गमावला. माझ्या भावाचं पार्थिव मीच स्मशानापर्यंत नेलं. माझ्या एका लहान बहिणीचाही अकाली मृत्यू झाला. इथून माझ्या मनातील प्रश्नांना सुरुवात झाली. माणूस का मरतो, मृत्यूचा अर्थ काय असे प्रश्न माझ्या भोवती फेर धरू लागले. पुढे शिक्षणासाठी म्हैसूरला गेलो तेव्हा मनात उभे राहिलेले हे प्रश्न तत्त्वज्ञानाच्या प्राध्यापकांना विचारले. त्यावर त्यांनी मला ‘कठोपनिषद’ या ग्रंथाचं भाषांतर वाचायला दिलं.
तुम्हाला ती गोष्ट माहिती आहेच. नचिकेत यमाकडे जातो तेव्हा यम त्याला तीन वर देतो. नचिकेत यमाला विचारतो, तू मृत्यूची देवता आहेस. तुला मृत्यू म्हणजे काय हे माहिती असेलच. मृत्यूनंतर आत्मा राहतो की त्याचा नाश होतो वगैरे वगैरे. नचिकेतच्या प्रश्नांना यम जी उत्तरं देतो ती ‘कठोपनिषदा’त आहेत. प्राध्यापकांनी दिलेलं कन्नड भाषांतर मी वाचलं, पण मला काहीही कळलं नाही. हे त्यांना सांगितलं तेव्हा ते म्हणाले, हो, ते समजणं खरोखरच कठीण आहे. कठोपनिषदातील तत्त्वज्ञान तुला जाणून घ्यायचं असेल, तर तू एमएच्या अभ्यासासाठी ‘तत्त्वज्ञान’ हा विषय घे. मी तो विषय घेतला, तेव्हा ‘फिलॉसॉफी बेक्स नो ब्रेड’ हे प्रसिद्ध वाक्य तुला माहिती नाही का, असा टोमणा मित्रांनी मला लगावला. त्यावर मी त्यांना ‘मी माझी बेकरी उभारेन आणि पोट भरेन’ असे प्रत्युत्तर दिलं. या विषयासह मला उपयोजित कला, साहित्य या विषयांतही आवड निर्माण झाली.
‘तत्त्वज्ञान’ विषय घेऊन मी एमए पूर्ण केलं आणि सरदार पटेल महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलो. पुढे पीएचडी केली. त्या वेळी ए. जी. जावडेकर हे माझे मार्गदर्शक होते. जावडेकर हे आर. डी. रानडे यांचे विद्यार्थी. रानडे हे स्वत: उच्चविद्याविभूषित व उच्च साधक होते. पीएचडीसाठी प्रबंध सादर केल्यानंतर पुढे मी मुलाखतीसाठी गेलो. तिथं पुन्हा नरवणे या मराठी प्राध्यापकांशी भेट झाली. ते म्हणाले, हा प्रबंध तू पूर्ण केला आहेस तर या विषयातच सातत्य राख. ‘नैतिक मूल्ये आणि आजच्या जीवनातील मूल्ये’ या विषयावर पुस्तक लिही. डी. लिट्. पदवीच्या अभ्यासासाठी त्याचा उपयोग होईल. मग त्या कामाला मी लागलो.
या पुस्तकाच्या अगोदर मी ‘वंशवृक्ष’ या नावाने एक कादंबरी लिहिली होती. कर्नाटकातील प्रकाशकाने ती सुधारित करून द्यावी असं सुचविलं होतं. पण डी.लिट्.च्या कामात व्यग्र असल्याने ‘वंशवृक्ष’ विसरून गेलो. शेवटी प्रकाशकांनी, ‘आम्ही या कादंबरीबाबत घोषणा केली आहे, तरी तुम्ही ती का देत नाही’ असं चिडून पत्र लिहिलं. त्यामुळे ‘वंशवृक्ष’चं हस्तलिखित पुन्हा वाचायला, त्यात सुधारणा करायला सुरुवात केली. ते करत असताना हीच माझी खरी आवड आहे, हे माझ्या लक्षात आलं.
माझी कल्पनाशक्ती, निर्मितीक्षमतेचा प्रवास याच दिशेने आहे. ती प्रबंध लेखनातून नाही, तर कादंबरी लेखनातूनच व्यक्त होऊ शकते. नाहीतरी प्रबंधात काय असतं? एक विचार घ्यायचा, त्याची दुसऱ्याशी पडताळणी करायची, दुसऱ्याची तिसऱ्याशी.. त्यामुळे प्रबंध लिहिला नाही तरी चालेल, पण निर्मितीमधील सातत्य टिकवून ठेवण्यासाठी कादंबरी लेखन करायचं हे गंभीरपणे मनावर घेतलं. कादंबरी लेखनातील तांत्रिक बाबी आत्मसात केल्या आणि कादंबरीकार म्हणून सुरुवात केली.
तत्त्वज्ञान या विषयात आपण सर्जनशील व सृजनात्मक काही करू शकत नाही. उपनिषदं, वेद हेही सृजनात्मक आहेत. ‘प्रकृती व पुरुष’ यावर लिहिणारे शंकराचार्य हे उत्तम तत्त्ववेत्तेच होते. त्यांच्यानंतर रमण महर्षी, रामकृष्ण परमहंस होऊन गेले. मी तत्त्वज्ञान विषयाचा केवळ एक चांगला वाचक, शिक्षक होऊ शकतो, पण लेखक होऊ शकणार नाही आणि आपली सर्जनशीलता फक्त कादंबरी लेखनातूनच व्यक्त होऊ शकते हे मला कळले.
‘पर्व’विषयी…
महाभारतावर आधारित अनेक कविता, कथा, नाटकं नंतरच्या काळात आली आहेत. त्यात महाभारतातल्या अनेक मिथकांचा वापर केला गेला आहे. ही मिथकं किंवा या घटना आजच्या काळात मात्र नैतिकदृष्टय़ा मान्य होणार नाहीत. परंतु, यातील पात्रांचा वास्तवाशी मेळ घातल्यास महाभारताचं किंवा त्यातील पात्रांचं आकलन होण्यास मदत होते. त्या दृष्टिकोनातूनच ‘पर्व’चं लिखाण झालं आहे. ‘पर्व’बद्दल नेहमी विचारला जाणारा आणखी एक प्रश्न म्हणजे या कादंबरीमधलं युद्धाचं वर्णन, गंगा नदी आणि आसपासचा परिसर, हवामान, भौगोलिक परिस्थिती या सगळ्याचा मी अभ्यास केला की ते सगळं जाऊन प्रत्यक्ष अनुभवून लिहिलं. ‘पर्व’च्या लेखनापूर्वी युद्धविषयक बहुतांश साहित्य मी वाचलं. सैन्यदलातील अधिकारी पदावरील व्यक्तींची चरित्रं वाचली. हिटलरचं ‘गॅस चेंबर’, आफ्रिकन युद्धं आणि बरंच काही वाचलं, अभ्यासलं. त्या आधारे युद्धविषयक वर्णन केलं. लेखकाला केवळ कल्पनेने ते संपूर्ण चित्र, भावना वाचकांपुढे उभ्या करता आल्या पाहिजेत. ते करण्यात तो यशस्वी झाला तर ती खरी सर्जनशीलता असते.
‘जा ओलांडुनी’ विषयी…
जातव्यवस्था ही जगात इतर कुठेही नसलेली आणि फक्त भारतीय समाजामधेच आढळणारी व्यवस्था आहे. माझ्या ‘जा ओलांडुनी’ या कादंबरीत मी भारतातील जातप्रश्न मांडला आहे. ही कादंबरी अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवादित झाली आहे. हे अनुवाद वाचून अनेकांनी जातीचा प्रश्न इतक्या खोलवर याआधी कोणीच हाताळला नसल्याचा अभिप्राय व्यक्त केला आहे. मराठी दलित साहित्यिकांनाही ही कादंबरी आवडली. त्यांचे प्रश्न मांडले गेल्याने त्यांना ती आपलीशी वाटली असावी. मात्र कर्नाटकात ही कादंबरी आवडली नाही.
‘आवरण’विषयी…
‘आवरण’ ही हिंदू- मुस्लीम संबंधांवर भाष्य करणारी माझी कादंबरी बहुचर्चित ठरली. अमेरिकेतील दहशतवादी हल्ल्यानंतर तेथील प्रसारमाध्यमांना जे प्रश्न पडतात, मांडले जातात, ते आपल्या प्रसारमाध्यमातून मांडले जात नाहीत. हे सत्य सांगण्याचे धाडस या कादंबरीत आहे.
‘मंद्र’विषयी
तत्त्वज्ञान हा माझ्या आवडीचा विषय आहे. त्याचा शोध मी माझ्या प्रत्येक कादंबरीत घेत असतो. ‘मंद्र’मध्येही मी तो घेतला आहे. नैतिक आणि सौंदर्य हे मूल्य असा कादंबरीचा विषय आहे. वेगळी दिशा मिळेपर्यंत माझं समाधान होत नाही. जीवनात नैतिक मूल्यांबरोबरच इतर अनेक मूल्यंही तेवढीच महत्त्वाची आहेत. यात मला एका कलाकाराचं चरित्र मांडायचं होतं. त्यासाठी साहित्यिक, चित्रकार अशी पात्रं जाणीवपूर्वक घेतली नाहीत. संगीत हे सर्वसामान्यांशीही जोडलं गेलेलं असतं. ‘मंद्र’मध्ये कला, कलाकार व जीवनमूल्यं या तीन घटकांचा विचार करण्यात आला आहे. मोहनलाल, मधुमिता ही पात्रं त्यातूनच निर्माण झाली आहेत. तसंच संगीतातील विविध रागांचं वर्णन वाचताना वाचकांना त्याची अनुभूती यावी अशा प्रकारे ते केलं आहे. त्यासाठी काही रागांचं विस्ताराने वर्णन केलं आहे.
कन्नड साहित्यातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि ‘पद्मभूषण’ पुरस्कार विजेते डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या निधनाने खूप दुःख झाले. भैरप्पा यांनी साहित्य, तत्त्वज्ञान, सांस्कृतिक क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. संस्कृतीच्या मुळांशी प्रामाणिक राहून त्यांनी कन्नड साहित्याला राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांचा वारसा भावी पिढ्यांना प्रेरणा देत राहील. – द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
एस. एल. भैरप्पा यांच्या निधनाने आपण एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व गमावले आहे. ते एक निर्भय आणि कालातीत विचारवंत होते. त्यांनी आपल्या प्रेरणादायी लेखनातून कन्नड साहित्य समृद्ध केले. आपल्या इतिहास व संस्कृतीवर प्रेम असणाऱ्या अनेक पिढ्यांना ते प्रेरणा देत राहतील. – नरेंद्र मोदी, पंतप्रधान
भैरप्पा यांनी त्यांच्या अद्वितीय लेखनशैलीमुळे मोठ्या संख्येने वाचक मिळवले. ते एक बुद्धिजीव व्यक्तिमत्त्व होते, ज्यांनी आपल्या कलाकृतीने कन्नड साहित्याला जागतिक स्तरावर पोहोचवले. – एस. सिद्धरामय्या</strong>, मुख्यमंत्री, कर्नाटक
मोठ्या ताकदीचा भारतीय लेखक गेला. डॉ. एस. एल. भैरप्पा हे केवळ कन्नड लेखक नव्हते. त्यांनी भारतीय संस्कृती, भारतीय मूल्यधारणा यांचे उत्तम दर्शन आपल्या साहित्यातून घडवले. महाभारतावर लिहिण्याचे आव्हान पेलणे सोपे नसते. मात्र, त्यांनी महाभारतावर ‘पर्व’सारखी सर्वश्रेष्ठ कादंबरी लिहली. त्यांची ‘उत्तरकांड’ ही कादंबरी एका वेगळ्या दृष्टीतून सीतेची कहाणी सांगते. मराठी भाषेत भैरप्पा यांचे साहित्य उपलब्ध असणे ही मराठी साहित्याला समृद्ध करणारी गोष्ट आहे. – डॉ. अरुणा ढेरे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्ष
डॉ. एस. एल. भैरप्पा यांची ‘वंशवृक्ष’ ही कादंबरी मराठी रसिकांना भावली. संगीत क्षेत्रावर आधारलेली ‘मंद्र’ ही कादंबरी लोकप्रिय ठरली. महाभारताचे आधुनिक दर्शन घडवणारी ‘पर्व’ ही कादंबरी मराठी रसिकांना प्रचंड आवडली. मात्र, त्याच वेळी ती टीकेचा विषयही झाली. डॉ. उमा कुलकर्णी यांनी डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या जवळजवळ सर्वच कादंबऱ्या मराठीत अनुवादित केल्या. त्यांच्या प्रयत्नांमुळे भैरप्पा मराठी कांदबरीकार म्हणूनच स्वीकारले गेले. अनुवादातून रसिकांपर्यंत पोहोचणारे, त्यांच्याकडून दाद मिळवणारे फारच थोडे लेखक असतात. भैरप्पा यांना मिळालेला प्रतिसाद इतर कोणत्याही भाषेतील लेखकाला मिळालेला नाही. त्यातच त्यांचे यश दिसून येते. – डॉ. द. दि. पुंडे, ज्येष्ठ साहित्यिक-संशोधक
डॉ. एस. एल. भैरप्पा हे भारतीय पातळीवरील श्रेष्ठ कादंबरीकार होते. काळाचा मोठा पट कवेत घेण्याचे सामर्थ्य या कादंबरीकाराकडे होते. त्यांनी कादंबरीमध्ये हाताळलेल्या विषयांचे वैविध्य स्तिमित करणारे आहे. मराठी वाचकांनी त्यांच्या कादंबऱ्यांवर भरभरून प्रेम केले. पुण्याशी त्यांचा विशेष स्नेहबंध होता. त्यांच्या साहित्यकृतीतून ते अजरामर आहेत. – प्रा. मिलिंद जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ
डॉ. एस. एल. भैरप्पा हे मोठे कादंबरीकार होते. त्यांनी कादंबरीचा व्यापक पैस चांगल्या प्रकारे आपल्या कादंबऱ्यांमध्ये आणला. त्यांची महाभारतावर आधारलेली ‘पर्व’ ही कादंबरी त्याचे उत्तम उदाहरण आहे. त्यांच्या प्रतिभेला व्यासंग आणि अभ्यासाची जोड होती. त्यामुळे त्यांच्या कादंबऱ्यांना वजन प्राप्त झाले आहे. डॉ. एस. एल. भैरप्पा हे प्रदेश, भाषा यांच्या सीमा ओलांडून गेलेले राष्ट्रीय पातळीवरचे कादंबरीकार होते. – डॉ. रेखा इनामदार-साने, ज्येष्ठ समीक्षक