नवी मुंबई : कीर्तनाच्या काहीशा वेगळ्या, प्रभावी शैलीमुळे लोकप्रिय असलेले ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांनी संतांचे कार्य आणि अध्यात्म यांचा प्रसार जगभर करतानाच समाजातील वाईट गोष्टींवर प्रवचनातून प्रहार केले. कीर्तनकारांच्या घराण्यात जन्मलेल्या बाबामहाराज सातारकरांनी कुटुंबाची परंपरा जपली, जोपासली आणि पुढे नेली.

सातारच्या नामवंत गोरे सातारकर घराण्यात ५ फेब्रुवारी १९३६ रोजी त्यांच्या जन्म झाला. निळकंठ ज्ञानेश्वर गोरे हे त्यांचे मूळ नाव होते. वयाच्या आठव्या वर्षांपासून बाबा महाराज यांनी श्री सदगुरु दादामहाराज यांच्या कीर्तनात अभंगांच्या चाली म्हणायला सुरुवात केली होती. तेथेच त्यांच्या सुरेल आवाजाची चुणूक दिसली. वयाच्या ११ व्या वर्षीपासून त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ यांच्याकडून शास्त्रीय गायनाचे धडे घेतले होते. कीर्तनाच्या परंपरेत सामील होण्याचा निर्धार पक्का असतानाही त्यांनी वकिलीच्या पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले.

काही काळ व्यवसायही केला. मात्र, नंतर त्यांनी स्वत:ला समाजप्रबोधनाच्या सेवेत वाहून घेतले. पुढे त्यांच्या कीर्तनाला मिळालेल्या व्यापक स्वीकृतीतून त्यांना बाबामहाराज सातारकर हे नाव मिळाले. पुढे आयुष्यभर हे नाव त्यांच्यासोबत राहिले.

बाबामहाराजांनी १९६२ पासून कीर्तन आणि प्रवचन करण्यास सुरुवात केली. देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांचे कीर्तन ऐकण्यासाठी भक्त जमत. समाजप्रबोधनासोबतच बाबामहाराज सातारकर लाखो लोकांना वारकरी संप्रदायाची दीक्षा देत व्यसनमुक्त केले. १९८३ साली त्यांनी जनसेवेसाठी ‘श्री चैतन्य आध्यात्मिक ज्ञानप्रसार संस्था’ स्थापन केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातच नव्हे तर परदेशातही जाऊन कीर्तनाचा, संप्रदायाचा प्रसार केला होता.

ह.भ.प. बाबामहाराज सातारकर यांचे वडील दादामहाराज सातारकर यांच्या नावाने सातारा येथील बुधवार पेठेतील बुधवार नाक्यावर मठ आहे. या मठात ते पूर्वी येत असत. बाबामहाराज सातारकर यांना रा.ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने सातारा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. प्राचार्य शिवाजीराव भोसले, प्राचार्य राम शेवाळकर, चित्रपट निर्माते अरुण गोडबोले आदींशी त्यांची घनिष्ट मैत्री होती.

मुख्यमंत्र्यांकडून अंत्यदर्शन

सातारकर यांचे पार्थिव गुरुवारी नेरुळ येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी शेकडो भाविकांची रात्रीपर्यंत रीघ लागली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नगर दौऱ्यात सहभागी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

माझे वडील बाबामहाराज सातारकरांनी भक्तीपरंपरेची पताका महाराष्ट्रातच नव्हे तर देशाबाहेरही पोहचवली होती. बाबा आमच्या सातारकर कुटुंबाचे नव्हे तर समस्त वारकरी संप्रदायाचे आधार होते. त्यांनी दिलेल्या विठ्ठलभक्तीचा व कीर्तनपरंपरेचा वारसा आय़ुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत जपण्याचा प्रयत्न करू.

ह.भ.प.भगवतीताई दांडेकरबाबामहाराज सातारकर यांची कन्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बाबामहाराज सातारकरांनी लाखो वारकऱ्यांना सन्मार्गाची व भक्तिपरंपरेची, विठ्ठलनामाची परंपरा दिली. त्यांनीच मला कीर्तन शिकवले. त्यांच्या या कीर्तनपरंपरेचा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे चालत ठेवण्याचे बळ पांडुरंग आम्हास देईल.चिन्मय महाराज दांडेकर, बाबामहाराज सातारकर यांचा नातू