पक्षाचे फारसे नुकसान होणार नाही, पण दुसऱ्या गटाला मात्र धक्का पोचेल, अशा बेताने राज्यातील भाजपमध्ये एकमेकांवर कुरघोडीचे प्रकार सुरू आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्याकडे राज्याचे प्रभारीपद सोपवून दीड वर्ष उलटले, तरी त्यांनी पक्षाची ताकद फार काही वाढविली आहे आणि परिस्थिती पालटली आहे, असे चित्र नाही. शेतकरी दिंडीला पक्षातील वरिष्ठ नेते नुसती हजेरी लावत आहेत, पण त्यांची मनापासून साथ नसल्याने जनतेने आणि प्रसिद्धीमाध्यमांनीही दिंडीची फारशी दखल घेतली नाही.
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या धुरंधर नेत्याच्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका या सर्वाधिक कठीण आणि कसोटीच्या ठरणार आहेत.  
प्रमोद महाजन, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारख्या दिग्गजांची साथ नाही, कौटुंबिक व तब्येतीच्या कुरबुरी या पाश्र्वभूमीवर पक्षांतर्गत विरोधाची धारही वाढलेली दिसते. मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यातील वाद जुनाच. पण राष्ट्रीय अध्यक्षपद भूषविलेल्या गडकरी आणि त्यांच्या गटातील अनेक नेत्यांची ताकद व संख्या आता आणखी वाढलेली आहे. गडकरी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष असताना मुंडे यांच्यावर महाराष्ट्रातील निवडणूक प्रभारीपदाची धुरा सोपविली. सुधीर मुनगंटीवार यांची मुदत संपल्यावर निर्माण झालेल्या प्रदेशाध्यक्षपदाच्या वादात आणि अन्य मुद्दय़ांवरही राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनीही मुंडेंच्या पारडय़ात आपले वजन टाकले आहे. पक्षांतर्गत मतभेद सध्या थंडावलेले दिसत असले तरी ते शमलेले मात्र नाहीत. पक्षाचे फारसे नुकसान होणार नाही, पण दुसऱ्या गटाला मात्र धक्का पोचेल, अशा बेताने एकमेकांवर कुरघोडीचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे मुंडे यांच्याकडे प्रभारीपद सोपवून दीड वर्ष उलटले, तरी त्यांनी पक्षाची ताकद फार काही वाढविली आहे आणि परिस्थिती पालटली आहे, असे चित्र नाही. उलट त्यांचा पुतण्या धनंजय मुंडे यांनाच फोडून राष्ट्रवादी काँग्रेसकडे वळविण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना यश मिळाले. मराठवाडय़ात मुंडे यांच्या विरोधात ताकदीचा उमेदवार देऊन मुंडे यांना मतदारसंघातच अडकवून ठेवायचे आणि महाराष्ट्रात फारसे फिरू द्यायचे नाही, असा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार आहे. त्यामुळे मुंडेंविरोधात सुरेश धस, अमरसिंह पंडित, जयदत्त क्षीरसागर आदींच्या नावांची चर्चा सुरू आहे, तर ‘मुंडे विरुद्ध मुंडे’ संघर्ष लोकसभा व विधानसभेत किती तीव्रतेने होणार याचीही चिन्हे दिसत आहेत. गोपीनाथ मुंडे हे लोकसभा निवडणूक लढविणार असले तरी महाराष्ट्रात सत्ता मिळाल्यास त्यांना येथेच रस आहे, पण मतदारसंघ िपजून काढताना, बालेकिल्ला असलेल्या मराठवाडय़ात यश मिळविण्यासाठी आणि प्रभारीपद असल्याने राज्यपातळीवर पक्षाची कामगिरी सुधारताना मुंडे यांची चांगलीच दमछाक होणार आहे. राजकीय आणि पक्षांतर्गत विरोधकांचा सामना त्यांना करावा लागत आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीच्या जागा वाढल्या नाहीत तर मुंडे यांची पक्षात अवघड परिस्थिती होईल. त्यामुळे सध्या त्यांची अवस्था ‘खिंडीत’ अडकल्यासारखी आहे. याच राजकीय अपरिहार्यतेतून मुंडे हे स्वत:चा मतदारसंघ अधिकाधिक सुरक्षित करण्यासाठी राजकीय डावपेच आखत आहेत आणि पक्षाची स्थिती सुधारण्यासाठी जिवाचे रान करीत आहेत.
सध्या मुंडेंच्या बालेकिल्ल्यात त्यांचे खंदे समर्थक आणि भाजप किसान मोर्चाचे उपाध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांच्या अनेक प्रश्नांची तड लावण्यासाठी लोदगा (लातूर) येथून १९ सप्टेंबरला दिंडी सुरू केली आहे व तिचा समारोप औरंगाबादला ७ ऑक्टोबरला होत आहे. ऊस, सोयाबीन, कापूस पिकांना चांगला भाव मिळावा, यासह शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत, पण त्या दृष्टीने राज्यभरात राजकीय वातावरण तापविण्यात पक्षाला अजिबात यश मिळालेले नाही. दिंडीत गावकरी व कार्यकर्ते फारसे सहभागी झालेले दिसत नाहीत. राज्य पातळीवरील आणि अगदी राष्ट्रीय अध्यक्षांपर्यंत मोठे नेते सहभागी होऊनही पक्षाला राजकीय फायदा होत असल्याचे चित्र दिसत नाही. ही दिंडी काढण्याचा निर्णय पक्षातील प्रदेश पातळीवरील नेत्यांशी चर्चा न करता एककल्ली पद्धतीने घेतला गेला. गणेशोत्सवानंतर लगेच आणि पाऊस कमी झालेला नसताना अयोग्य वेळी ही दिंडी काढली जात आहे, असे काही नेत्यांचे मत होते. पण तरीही अट्टहासाने ती काढली गेल्याने अनेक नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी आपले अंग काढून घेतले. या दिंडीचा प्रवास मराठवाडय़ातील चार लोकसभा मतदारसंघातून आहे. तरीही लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील इच्छुक उमेदवार, जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्षांपासून आजी-माजी पदाधिकारी आदींची िदडीच्या संपूर्ण प्रवासाला चांगली साथ लाभली आहे, असेही चित्र दिसून येत नाही.
शेतकऱ्यांचे महत्त्वाचे प्रश्न दिंडीच्या मार्गाने आंदोलन उभे करून भाजपने मांडले आहेत. ते सर्वच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे असून मराठवाडा, विदर्भ, खान्देश व पश्चिम महाराष्ट्रासह सर्व विभागांमध्ये आंदोलन व समर्थन मेळावे काढून वातावरण तापविता आले असते. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भाजपने रान उठविले आहे, असे स्वरूप या आंदोलनाला दिले गेले नाही. पक्षातील प्रदेश पातळीवरील अनेक नेत्यांनाही या दिंडीची कल्पना नव्हती. त्यामुळे मुंबईसह राज्यभरातील महत्त्वाच्या शहरांमध्ये आंदोलनाची घोषणा व प्रचारही आधी फारसा झाला नाही.  आगामी निवडणुकांसाठी केवळ मराठवाडय़ातील प्रचार फेरी, एवढेच या दिंडीचे स्वरूप मर्यादित राहिले. राजकीय फायद्यासाठी पक्षाने फारसे नियोजन केले आहे असे दिसून येत नाही.
या दिंडीच्या निमित्ताने मतदारसंघातील अगदी हजारभरापेक्षा कमी लोकसंख्येच्या गावातही मुंडे यांनी हजेरी लावली. पाशा पटेल अगदी लहानशा गावांमध्येही गावकऱ्यांमध्ये मिसळून त्यांना उमगेल अशा भाषेत व शैलीत सरकारविरोधात संताप निर्माण करीत आहेत. मुंडेही दिंडीच्या निमित्ताने मतदारसंघ व मराठवाडय़ातील काही भाग डोळ्याचे ऑपरेशन होऊनही पिंजून काढत आहेत. ऊन-पावसाची पर्वा न करता ते या शेतकरी दिंडीत पायी वाटचाल करीत आहेत. त्यांची मुलगी पंकजा पालवे-मुंडे याही दोन दिवस बऱ्याच पायी चालल्याने त्यांच्या पायाला फोड आले. अध्यक्ष राजनाथ सिंह आंदोलनाच्या समारोपासाठी येत आहेत, मात्र पक्षातील प्रदेश व स्थानिक पातळीवरील नेत्यांची व पदाधिकाऱ्यांची पुरेशी साथ नाही. त्यामुळे एवढे आंदोलन करूनही त्याला यश मिळाले नाही तर जनतेला निवडणुकीच्या वेळी काय उत्तर देणार, हा प्रश्न आहे. पक्षाने शेतकऱ्यांचा प्रश्न सोडविला, असे मांडता येणार नाही.
राजनाथ सिंह यांनी मराठवाडय़ातील भीषण दुष्काळी परिस्थितीचा चार-पाच महिन्यांपूर्वी दौरा केला होता. त्याही वेळी पक्षांतर्गत नियोजनाचा अभाव दिसून आला. दौरा अगदी अचानकपणे ठरविला गेला. त्याची अनेक नेत्यांना कल्पना नव्हती व पूर्वतयारीही करण्यात आली नव्हती. त्यामुळे खासदार रावसाहेब दानवे यांच्या मतदारसंघातील एक पाहणी दौरा आहे की काय, अशी शंका पक्षातील काही नेत्यांनाही वाटत होती. त्यामुळे दुष्काळाच्या प्रश्नासाठी राष्ट्रीय अध्यक्ष येऊनही अपेक्षित परिणाम साधला गेला नाही. मुंडे यांनी उपोषणाचे हत्यार उपसल्याने काही रकमेची तरतूद झाली. हाच प्रकार पुन्हा शेतकरी दिंडीच्या आंदोलनातूनही दिसून येत आहे. पक्षातील वरिष्ठ नेते नुसती हजेरी लावत आहेत, पण त्यांची मनापासून साथ नसल्याने जनतेने आणि प्रसिद्धीमाध्यमांनीही दिंडीची फारशी दखल घेतलेली नाही. सध्या ‘खिंडीत’ सापडलेल्या मुंडे यांनी आपली ताकद पणाला लावून ‘दिंडीत’ वाटचाल सुरू केली आहे. मात्र पक्षांतर्गत निष्ठावान ‘टाळकऱ्यांची’ त्यांना पुरेशी मदत नाही. ‘गडकऱ्यांनी’ कोट (की ‘कट’) केल्याने मुंडे यांचे मावळे मात्र पक्षात व दिंडीत एकाकी पडले आहेत की काय, अशी शंका उपस्थित होते. दिंडय़ावर दिंडय़ा निघतील, मात्र भाजपची ‘विजयी पताका’ फडकावयाची असेल, तर वारकऱ्यांची व टाळकऱ्यांची रीघ वाढविण्यासाठी मुंडेंना ‘मोदी’रूपी ‘राम’नामाचाच आधार उरला आहे.