scorecardresearch

Premium

अभिकल्प : डिझाइन म्हणजे काय?

शास्त्र आणि कलांचा मेळ घालून जगणं सुसह्य़ करणाऱ्या ‘डिझाइन’विषयीचं नवं पाक्षिक सदर..

आणखी दोन पलू कारखान्यांतून तयार होणाऱ्या मूर्त (टँजिबल) वस्तूंच्या डिझाइनबाबत महत्त्वाचे आहेत.
आणखी दोन पलू कारखान्यांतून तयार होणाऱ्या मूर्त (टँजिबल) वस्तूंच्या डिझाइनबाबत महत्त्वाचे आहेत.

शास्त्र आणि कलांचा मेळ घालून जगणं सुसह्य़ करणाऱ्या ‘डिझाइन’विषयीचं नवं पाक्षिक सदर..
‘डिझाइन म्हणजे काय?’ या प्रश्नाचं उत्तर खरा डिझाइनर हमखास टाळेल. उपयोगाचा विचार करून वस्तू किंवा चिन्हाला ‘रूप देणं’ म्हणजे डिझाइन का? – होय, पण आणखीही उत्तरं आहेत..
एक दिवस मी एका भोजनालयात जेवायला गेलो होतो. माझ्या शेजारील टेबलावर एक सात-आठ वर्षांचा मुलगा व त्याचे आई-वडील, असं एक कुटुंब बसलं होतं. त्या टेबलापलीकडे एक काचेची िभत होती. काचेवर बारीक नक्षी कोरलेली होती. आई-वडील मेनूमधील जिन्नस निवडण्यात गुंतले होते. मुलगा मात्र बराच वेळ त्या नक्षीकडे बघण्यात गर्क होता. अचानक त्याने नक्षीच्या एका भागाकडे बोट दाखवत वडिलांना विचारलं, ‘‘डॅडी ये क्या है?’’ डॅडींनी तीन सेकंद मेनूतून मान वर करून त्या नक्षीकडे पाहिल्यासारखं केलं आणि परत खाली मान घालता घालता म्हटलं, ‘‘बेटा वो उसका डिज़ाइन है।’’
डिझाइनची अशी सहजसोपी व्याख्या आपण बऱ्याच लोकांकडून ऐकली असेल. हे पेनाचं टोपण असंच का आहे? या शर्टाची कॉलर छोटीच का? ती गाडी एवढी आकर्षक का दिसते? या सोलापुरी चादरीवर ही फुलं उलटसुलटच का काढलीएत? कांचीवरम साडीचा रंग असाच का? त्या मोबाइल फोनची पाठ काही ठिकाणी गुळगुळीत तर काही ठिकाणी खरखरीत, असं का? माझ्या महागडय़ा लॅपटॉपची कड माझ्या हाताला नेहमी का काचते? टूथपेस्ट टय़ूबमध्येच का मिळते? बरणीत का मिळत नाही? शेजारीपाजारी, मित्रमत्रिणी, नातलग आणि विशेषकरून दुकानदारांनी या नि असल्या प्रश्नांचं एकच उत्तर दिलं असेल- ते त्याचं डिझाइन आहे.
पण एखाद्या डिझाइनरला विचारा, ‘डिझाइन म्हणजे काय?’ आणि व्यक्ती तितक्या व्याख्या मिळतील. खरं तर हाडाचा डिझाइनर या प्रश्नाचं सरळ उत्तर द्यायचं हमखास टाळेल. याचं प्रामाणिक कारण म्हणजे डिझाइन या शब्दाचे अनेक पलू आहेत. व्याकरणातून जायचं झालं, तर डिझाइन हे एक क्रियापद आहे- डिझाइनर जे करतो ते डिझाइन असं आपण म्हणू शकतो. पण असं केलं की डिझाइनची व्याख्या उगाचच फार रुंद होते. एखादा डिझाइनर बऱ्याच गोष्टी करत असेल आणि त्यातल्या बऱ्याच गोष्टींचा डिझाइनशी सरळ संबंध असलेच असं नाही.
याउलट, डिझाइन हे एक नामदेखील आहे (इंग्रजी शब्दांचं हे एक वैशिष्टय़ आहे- कुठल्याही क्रियापदाचं सहज नाम होऊ शकतं आणि टेबल, चेअर अशी अनेक सामान्य नामं क्रियापदं म्हणून सहज खपू शकतात. हे पुढे कधी तरी परत येईलच.). तर डिझाइनची व्याख्या आपण नामातून बनवू शकतो. जे बनलं ते डिझाइन. पण असं केलं तर ही व्याख्या खूपच अरुंद वाटते. त्या डिझाइनमागचं तत्त्वज्ञान, राजकारण, कळकळ, विचार, खटपट हे सगळं झाकलं जातं (म्हणजे तसं आम्हा डिझाइनर लोकांना तरी वाटतं आपलं!). तेव्हा डिझाइनची सरळ व्याख्या विचारण्यापेक्षा जर आपण त्या डिझाइनरला असा प्रश्न विचारला, की बाबा रे, तू डिझाइन करतोस म्हणजे नक्की काय करतोस (किंवा करतेस), तर या प्रश्नाचं उत्तर देणं जरा सोपं जाईल (यावरदेखील अगदी एकमत होणं तसं कठीणच आहे, पण प्रयत्न करून पाहू या.). लोकांच्या दैनंदिन क्रियाकलापांचं, गरजांचं, त्यांना भासणाऱ्या समस्यांचं आणि उपलब्ध होऊ पाहणाऱ्या संधी यांचं मंथन करून डिझाइनर योग्य तो तोडगा शोधायचा प्रयत्न करतात.
डिझाइनरांना एक काम नेहमी करावं लागतं ते म्हणजे वस्तूला नवं रूप देणे (इंग्रजीत याला फॉर्म असं म्हणतात.). रूप देण्याचं काम अनेक क्षेत्रांत महत्त्वाचं असतं. सर्वसामान्य लोकांच्या दृष्टीनं डिझाइन म्हणजे रूप. वर सांगितलेल्या गोष्टीत काचेच्या िभतीवर कोरलेली नक्षी म्हणजे तिचं रूपच. साडीचा रंग, शर्टाची कॉलर, मोबाइल फोनची पाठ, टूथपेस्टचा आकार हे सर्व याखाली मोडतात. आयडीसीतून प्रसिद्ध झालेली काही महत्त्वाची रूपकेंद्रित डिझाइनची उदाहरणं म्हणजे र. कृ. जोशींनी बनवलेली पंजाब नॅशनल बँकेची नाममुद्रा (लोगो), उदय कुमारांनी बनवलेलं रुपयाचं चिन्ह (?) आणि गिरीश दळवींनी बनवलेला एक मुक्त देवनागरी टंक (फॉण्ट). रूप देणं हे काम वाटतं तितकं सोपं नाही. एक तर रूप नवीन असायला हवं. नक्कल करणारे डिझाइनर कोणालाच आवडत नाहीत. त्याव्यतिरिक्त ते रूप दिसायला सुंदर हवंच हवं. घाणेरडय़ा दिसणाऱ्या रूपासाठी कोण डिझाइनरांना पसे देणार? शिवाय त्या रूपातून हवा असलेला भाव किंवा अभिव्यक्ती (एक्स्प्रेशन) प्रकट व्हायला हवी. याशिवाय ते रूप डिझाइनच्या अनेक पलूंशी सुसंगत असायला हवं. हे पलू आपण एकेक करून पाहू.
पहिला महत्त्वाचा पलू म्हणजे त्या वस्तूचा हेतू किंवा त्याचं कार्य (फंक्शन). लॅपटॉपचं रूप नवीन, सुंदर व इष्ट अभिव्यक्ती प्रकट करणारं तर असावंच पण वापरताना लोक त्याच्या कडेवर हात ठेवून तासन्तास काम करणार – तेव्हा ती कड हाताला टोचता कामा नये. शिवाय वापरणाऱ्यांची उंची वेगवेगळी असणार, तेव्हा त्याचा स्क्रीन हा वेगवेगळ्या कोनात वळवता यावा. लॅपटॉप फार छोटा असू नये, नाही तर त्यावरचं दृश्य दिसायला अवघड जाईल. फार जड असू नये – कारण तो पाठीवरून वाहून न्यायचा आहे. प्रत्येक वस्तूची काय्रे वेगळी असतात – खुर्ची ही एक ‘बसण्याचं उपकरण’ असतं. खुर्ची डिझाइन करताना बसणाऱ्यांचं शरीरशास्त्र ध्यानात ठेवून त्यांना आधार द्यायची सर्वोत्कृष्ट पद्धत शोधावी लागते. तसंच फोन हा बोलण्यासाठी असतो. चमचा हा खाण्यासाठी असतो. अक्षरं ही वाचण्यासाठी असतात. चिन्ह हे पटकन ओळखू येण्यासाठी असतं. रस्त्यावरच्या पाटय़ा मार्ग शोधण्यासाठी असतात. या नि असल्या प्रत्येक कार्याशी बनवलेले ते नवीन रूप सुसंगत असायला हवं. आयडीसीतील उदय आठवणकरांनी बनवलेलं कमी खर्चाच्या घरांचं डिझाइन हे रूप आणि कार्य यांच्या सुसंगतीचं उत्तम उदाहरण आहे.
आणखी दोन पलू कारखान्यांतून तयार होणाऱ्या मूर्त (टँजिबल) वस्तूंच्या डिझाइनबाबत महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे ती वस्तू ज्यापासून बनवण्यात येणार आहे ते पदार्थ (मटेरियल) आणि ती वस्तू तयार करण्याची प्रक्रिया (प्रोसेस). पदार्थ आणि प्रक्रिया या दोन्हींशी त्या रूपाने प्रतारणा करता कामा नये. पितळाला उगाच सोन्याचा लेप देण्यात अर्थ नाही – पितळ उघडं पडतंच कधी तरी.
संगणक, मोबाइल फोन, स्मार्टफोनवरील अ‍ॅप (अनुप्रयोग) व तत्सम अन्योन्यक्रिया (इंटरॅक्शन) असलेल्या वस्तूंची रूपं ही सतत बदलणारी असतात. आपण जेव्हा या वस्तू वापरतो, तेव्हा आपल्या प्रत्येक स्पर्शाला त्या प्रतिसाद देत असतात. फोनचं कुलूप काढलं की तो वेगवेगळे पर्याय दाखवतो. लॅपटॉपवर टाइप करताना अधूनमधून हात टचपॅडवर लागणार – अशा वेळी नको असलेल्या ठिकाणी माऊस क्लिक होऊ नये. तास-दोन तास तरी लॅपटॉपची बॅटरी टिकली पाहिजे आणि संपायच्या आधी पाच मिनिटं तरी आपल्याला कळलं पाहिजे. रूप, माहिती आणि वर्तन यांमधील सुसंगतीची आयडीसीतील काही उदाहरणं म्हणजे रवी पुवैया आणि एजी राव यांनी डिझाइन केलेलं आणि भारतभर निवडणुकांत वापरलं जाणारं इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम), थोडय़ाच अवधीत अ‍ॅण्ड्रॉइड फोनवर लोकप्रिय झालेला स्वरचक्र मराठी कीबोर्ड आणि उदय आठवणकरांनी बनवलेले अनेक शैक्षणिक खेळ.
मग तुम्ही विचाराल की नावीन्य, सौंदर्य, अभिव्यक्ती, कार्य, पदार्थ, प्रक्रिया, आशय, वर्तन या व अशाच अनेक पलूंचा वस्तूच्या रूपाशी सुसंवाद साधण्याची कसरत करणं, याला डिझाइन असं म्हणायचं का? नाही हो, तेवढंच नाही. त्याशिवाय अजून बरंच काही असतं. पण ते येईलच ओघानं.
९ तीनही लेखक आयआयटी- मुंबई येथील ‘औद्योगिक अभिकल्प केंद्रा’त (आयडीसी- इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर) प्राध्यापक या नात्याने कार्यरत आहेत. ई-मेल

– anirudha@iitb.ac.in 

s.s. swaminathanProfessor M S Swaminathan, Farmer , Farmer Scientist ,revolution in agriculture
एम. एस. स्वामिनाथन.. शेतकऱ्यांचे शास्त्रज्ञ
teacher teach me science
मला घडवणारा शिक्षक : विज्ञाननिष्ठ दृष्टी मिळाली!
upsc Social Psychology 14
यूपीएससीची तयारी: सामाजिक मानसशास्त्र वृत्ती अथवा दृष्टिकोन
financial planning
UPSC-MPSC : आर्थिक नियोजन ही संकल्पना काय आहे? त्यातील महत्त्वाचे घटक कोणते?

 

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व अभिकल्प बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Design is the creation of a plan or convention for the construction of an object or a system

First published on: 02-01-2016 at 03:32 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×