आमागी लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे काय करणार याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून आहे. याचाच अर्थ मनसेच्या ‘राज’कीय खेळीवर महायुती आणि आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे, हे अप्रत्यक्षरीत्या महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांना मान्य आहे. मनसेने महायुतीत यावे ही आजही भाजपची इच्छा दिसते. यामागे मनसेला गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मिळालेली मते हे प्रमुख कारण तर आहेच शिवाय राज ठाकरे मैदानात उतरल्यानंतर त्यांच्या पोतडीतून ते काय काढतील यावरही अनेक गणिते अवलंबून आहेत. मनसे स्वतंत्रपणे लढल्यास त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळणार हे उघड सत्य असले तरी महायुतीत जाणे हे मनसेसाठी आत्मघातकी ठरणारे आहे.
मनसेची स्थापना झाली त्याला आता सात वर्षे झाली आहेत. या काळात महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा अनुभव त्यांच्या गाठीशी असल्याने मनसेची पाटी आता कोरी नाही. आपला पक्ष आपण महाराष्ट्राला अर्पण करत आहोत, असे राज ठाकरे यांनी स्थापनादिनाच्या सभेतच जाहीर केले होते. अपर्ण करणे आणि महाराष्ट्राचा होणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. राज यांच्या सभांना पहिल्यापासून प्रचंड गर्दी जमते. ते उत्तम वक्ते आहेत. त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांना जे टायमिंग साधता येते त्याला तोड नाही. बाळासाहेबांच्या शिवसेनेप्रमाणे मनसेचाही कारभार एकछत्री चालणार आहे. बाळासाहेबांना सुदैवाने सहकारी उत्तम मिळाले. त्यांनी शिवसेनेच्या वाढीसाठी कष्टही अतोनात केले. याच्या उलट परिस्थिती मनसेमध्ये सध्या दिसते. महाराष्ट्रात मोठय़ा संख्येने तरुणवर्ग मनसेकडे वळला. सर्वसामान्यांनाही राज यांचे आकर्षण मोठे आहे. मात्र काही अपवाद सोडल्यास सरचिटणीस, आमदार तसेच अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांचा पक्षवाढीसाठी फारसा उपयोग होताना दिसत नाही. पक्षाकडून कार्यकर्त्यांना कार्यक्रम दिला जाणे आवश्यक असते. येथेच मनसे नेमकी कमी पडते. बाळासाहेबांप्रमाणे उद्धव घणाघाती भाषण करत नसले तरी त्यांनी शिवसेनेची बांधणी केली आहे, त्यांची पक्षावर पकडही जबरदस्त आहे. त्यामुळेच बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेत फूट पडेल हे काँग्रेस तसेच राजकीय पंडितांचे भाकीत खोटे ठरले. राज यांनी गेल्या सात वर्षांत मराठी पाटय़ांच्या विषयासह काही आंदोलने केली. प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पुणे व नाशिक या शहरी तसेच शिवसेनेला मानणाऱ्या शहरांमध्ये मनसेचा जम बसवला. महापालिकांमध्ये मनसेचे आज १४० नगरसेवक असून नाशिक महापालिका त्यांच्या ताब्यात आहे तर कल्याण-डोंबिवलीमध्ये विरोधी पक्षनेतेपद मनसेकडे आहे. मुंबई व पुणे महापालिकेतही मनसेच्या नगरसेवकांची आकडेवारी चांगली असली तरी त्यांची कामगिरी अपेक्षेप्रमाणे नाही. राज यांची घणाघाती भाषणे तसेच त्यांनी जो माहोल गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रात उभा केला त्यामुळे लोकांच्या अपेक्षाही मनसेविषयी उंचावल्या होत्या. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या प्रश्नावर मनसेकडून आंदोलनांची अपेक्षा होती. भ्रष्टाचार व महागाईमुळे जनता त्रस्त असताना ऊस, कापूस, वीज, गॅससह वेगवेगळ्या प्रश्नावर राज्यातील सरकारला सळो की पळो करून सोडणे शक्य होते. राज यांच्या शिलेदारांनी हे काम करणे अपेक्षित होते तथापि तळागाळातील कार्यकर्त्यांना कोणताही ठोस कार्यक्रम दिला गेला नाही की पक्षबांधणीसाठी फारसे प्रयत्नही झाले नाहीत. राजकारण असो की कोणतेही क्षेत्र असो, तुम्ही जे पेराल ते उगवते. मनसेतील ‘सवाई राजां’मुळे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. त्यातच एकीकडे नरेंद्र मोदी यांचा करिश्मा तर दुसरीकडे ‘आम आदमी पार्टी’ने देशाच्याच राजकारणाला दिलेले वेगळे आणि वेगवान वळण या साऱ्यात सध्या मनसे झाकोळून गेलेला दिसतो. आपच्या केजरीवाल यांचे साधेपण लोकांना भावते. दिल्लीची सत्ता काबीज केल्यानंतर ‘आप’ने तात्काळ वीजदर कमी करण्याचा व पाण्याचा घेतलेला निर्णय साऱ्यांनाच चकित करणारा आहे. यामुळे देशभरात ‘आप’ची लाट येईल, असे चित्र सोशल मिडिया तसेच काही प्रसारमाध्यमांनीही निर्माण करण्यास सुरुवात केली. देशात लोकसभेच्या ३०० तर महाराष्ट्रात सर्व जागा लढण्याची घोषणा ‘आप’च्या नेत्यांनी केल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्रात अनेकजण ‘आप’कडे जाऊ लागले.
या साऱ्या पाश्र्वभूमीवर मनसेने महायुतीत सामील व्हावे, असे केवळ भाजप व सेनेच्याच नेत्यांना वाटत नाही तर राज यांच्या काही शिलेदारांचीही अशीच भूमिका आहे. राज ठाकरे यांनी आपलो  पत्ते अजूनही उघड केलेले नसले तरी महायुतीत सामील झाल्यास त्यांना किती जागा मिळू शकतात याचा विचार केल्यास चार-पाच जागांपेक्षा मनसेला जास्त जागा सोडणे महायुतीला शक्य नाही. शिवाय सेना-भाजपने जिंकलेल्या १९ जागा तसेच दुसऱ्या क्रमांकाच्या जागा वगळल्यास, पडणाऱ्या जागा मनसे कशासाठी घेईल, हाही एक प्रश्नच आहे. ‘आप’ने राज्यात सर्वच्या सर्व जागा लढविण्याची घोषणा केल्याच्या पाश्र्वभूमीवर मनसेला लोकसभेच्या किमान निम्म्या तरी जागा लढवाव्या लागणार हे स्पष्ट आहे. भाजपचा भर मोदींच्या करिश्म्यावर आहे तर सेनेचा पक्षबांधणीवर आहे. राज्यातील जनतेच्या मनात खदखदत असलेल्या असंतोषाला वाट फोडून परिस्थिती बदलण्याचा विश्वास देणारा नेता लोकांना हवा आहे. हे आव्हान राज ठाकरे पेलणार का, हा प्रश्न आहे. राज यांचा करिश्मा हेच आजघडीला मनसेचे हत्यार आहे. निवडणुकीत आपल्या पोतडीमधून राज जे पत्ते काढतील त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघेल, असा विश्वास मनसेच्या नेत्यांना वाटतो. हा विश्वास मान्य केला तरी लोकांना त्यांचे दैनंदिन प्रश्न सोडविणारा पक्ष हवा आहे. सत्ता मिळाल्यास सुतासारखे सरळ करण्याची भाषा जशी चालणार नाही तसेच ‘खळ्ळ खटँक’लाही आता स्थान नाही. लोकांना ठोस कार्यक्रम हवा आहे. राज यांच्या पोतडीमधून काय निघते यावर लोकसभेत मनसेचे भवितव्य अवलंबून आहे.
मनसेचे बळ
राज्यातील महापालिकांमध्ये मनसेचे आज १४० नगरसेवक असून नाशिक महापालिका त्यांच्या ताब्यात आहे, तर कल्याण-डोंबिवलीमध्ये विरोधी पक्षनेतेपद मनसेकडे आहे.
विशालयुतीचे काय?
यापूर्वी अनेक भाषणातून मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी महाराष्ट्रत स्वबळावरच निवडणुका लढविण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मनसेने महायुतीत सामील व्हावे, असे केवळ भाजप व सेनेच्याच नेत्यांचीच नव्हे, तर मनसेच्या काही नेत्यांचीही भूमिका असली, तरी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवून ‘महाराष्ट्राचा’ होणेच राज ठाकरे पसंत करतील. अर्थात हे करताना लोकसभेपेक्षा आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासोर ठेवूनच ते लढतील.