शुद्धोदन आहेर – ahersd26@gmail.com

विद्यमान जात-वास्तवाच्या परिप्रेक्ष्यात गांधीवादाचा विचार केल्यास, ‘गांधींच्या मागे एखादी जात नाही’ हे कितपत खरे? गांधींना मारणाऱ्या शक्तींचा ‘जनाधार’ आज वाढलेला का दिसतो?

‘अखेरकमाई’ या कुसुमाग्रजांच्या सुप्रसिद्ध कवितेचा आशय असा आहे की, देशातील काही महामानवांमागे निदान एक एक जात तरी आहे. गांधीजींच्या मागे मात्र फक्त सरकारी कार्यालयाची भिंत आहे. १५० व्या जयंतीच्या निमित्ताने सद्य:स्थितीच्या संदर्भात गांधीवादाचे योगदान व मर्यादा नमूद करणे समयोचित ठरावे.

गांधीजींचा जन्म झाला तेव्हा १८५७ चे बंड उलटून एक तप झाले होते. ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता जाऊन ब्रिटिश राणीची सत्ता आली होती. या अवाढव्य देशाचा कारभार हाकताना नवीन पाश्चात्त्य मूल्ये रुजवता रुजवता ते वासाहतिक हितसंबंधांआड येणार नाहीत, याची गोरा ‘साहेब’ डोळ्यात तेल घालून काळजी घेत होता. अशा वेळेस एका संस्थानिकाच्या पदरी दिवाण म्हणून काम करणाऱ्या सुखवस्तू व कर्मठ वैश्य कुटुंबात २ ऑक्टोबर १८६९ रोजी मोहनदास जन्माला आले. वकिलीच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेत १८९३ मध्ये पाय ठेवल्यानंतर त्यांच्या कर्तृत्वाला धुमारे फुटले. पुढे भारतात आल्यावर त्यांनी टिळकोत्तर राष्ट्रीय सभेचे (काँग्रेसचे) नेतृत्व केले. असहकार, सविनय कायदेभंग व चले जाव आंदोलनांद्वारे जनमानस ढवळून काढले. मात्र दुसऱ्या महायुद्धानंतर देशाला खंडित स्वातंत्र्य प्राप्त झाल्यावर अवघ्या सहा महिन्यांच्या आत ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे या ब्राह्मण्यग्रस्त कार्यकर्त्यांने त्यांना दिवसाढवळ्या गोळ्या घातल्या. या सर्वज्ञात जीवनपटाची मूल्यव्यवस्था आजच्या भारताला मार्गदर्शन करू शकते का?

मूलत:, १८८५ साली स्थापन झालेली भारतीय राष्ट्रीय सभा ही एतद्देशीय उद्योजकव्यापार जातींचे राजकीय प्रतिनिधित्व करीत होती. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी ‘गीतारहस्य’ लिहून भारतीय राष्ट्रीय सभेला निष्काम कर्मयोगाचे तात्त्विक अधिष्ठान दिले. १८५६ ते १९२० असे आयुर्मान लाभलेले लो. टिळक हे गांधीपूर्व काळातील राष्ट्रीय सभेचे सर्वश्रेष्ठ नेते होते. तथापि, ‘वेदोक्त’ प्रकरणावरून त्यांचा कोल्हापूरच्या शाहू राजेंशी उडालेला खटका जगजाहीर आहे. अशा पारंपरिक भूमिकेमुळे ते सामाजिक परिषदेवर मात करू शकले, परंतु शूद्रांना राजकीय स्वातंत्र्याच्या चळवळीत आणू शकले नाहीत. हे महत्कार्य गांधीजींनी केले!

चातुर्वण्र्याधिष्ठित जातिसंस्थेच्या उतरंडीत वैश्य जातिसमूहाचे वैशिष्टय़ असे की, त्यांचा शूद्रांशी थेट संबंध येतो. ब्राह्मण व शूद्र यांच्यामध्ये क्षत्रिय व वैश्य हे दोन जातिसमूह असल्याने ब्राह्मणांचा शूद्र समाजाच्या सुखदु:खाशी दूरान्वयाने संबंध येत असे. जातिसंस्थेने लादलेल्या या मर्यादांमुळे इंग्रज राजवटीत विकसित झालेल्या शूद्र समूहाच्या आशाआकांक्षा समजून घेण्यात लो. टिळक अपयशी ठरले. गांधीजींनी हे नेमके हेरले व शूद्रांच्या महत्त्वाकांक्षेला स्वातंत्र्य चळवळीत योग्य ते स्थान देऊन राष्ट्रीय सभेचे हे वैगुण्य दूर केले. त्यांच्या नेतृत्वाखाली प्रथम महाराष्ट्र-गुजरात व त्यानंतर देशातील शूद्र शेतकरी व जातिसमूह राष्ट्रीय सभेचे जनतळ बनले, स्वातंत्र्याच्या आंदोलनातही उतरले. देशभरातील शूद्र जातिसमूहांमध्ये विकसित झालेली राजकीय जागृती हे गांधीवादाचे या देशाला सर्वात मोठे योगदान समजायला हवे.

युरोपीय इतिहासाशी तुलना करता, तेथील उगवत्या भांडवलदार वर्गाने जुन्या सरंजामी व्यवस्थेचा जसा यशस्वी अंत केला तसे भारतात का घडू शकले नाही, हा एक चिंतनीय प्रश्न आहे. फुले-आंबेडकरवादी अन्वेषण पद्धतीनुसार त्याचे उत्तर अर्थातच जातिसंस्था हे आहे. भारतातील उद्योजक जातिसमूह हा प्रामुख्याने वैश्य वर्णातून निर्मित जातींचा असला तरी त्यात पारशी, बोहरा मुस्लीम व ब्राह्मणही आहेत. भारताची व्यापारपेठ इंग्रजांनी काबीज केलेली आहे व इंग्रज येथून गेल्याशिवाय ती आपल्याला मिळणार नाही, यांवर या उद्योजक जातिसमूहाचे एकमत होते. म्हणून भारतीय सरंजामशाहीत अप्रवाही व कुंठितावस्थेत जाऊन वठलेली जातिसंस्था नष्ट करण्यात त्यांना काहीही स्वारस्य नव्हते. उलट, फलाची अपेक्षा न करता शूद्रादी अतिशूद्रांना स्वातंत्र्यप्राप्तीचे कार्य करण्यास उत्तेजित करणारा ‘कर्मयोग’ त्यांना फार सोयीचा होता. गांधीजींनी राष्ट्रीय सभेची टिळककालीन शूद्रांच्या अभावाची मर्यादा व्यावहारिक स्तरावर दूर केली तरी तात्त्विक स्तरावर लो. टिळक यांनी आखून दिलेली चौकट ते ओलांडू शकले नाहीत. तरीही, आपलेच तत्त्वज्ञान मानणाऱ्या गांधीजींची हत्या ब्राह्मणवाद्यांनी का केली, याचे कारण ब्राह्मण विरुद्ध वैश्य या जातिसंघर्षांत शोधता येईल का?

आधुनिक भारताच्या इतिहासाचे बहुपदरी आकलन होण्यासाठी जातिसंस्थेने बजावलेली भूमिका समजून घेणे निकडीचे आहे. विशेषत: १९२० पूर्वीच्या राष्ट्रीय सभेत पारंपरिक अंगाने जाणाऱ्या लो. टिळकांचे वर्चस्व होते तेव्हा जातिसंस्थासमर्थक आपल्या भवितव्याबाबत आश्वस्त होते. लो. टिळक १९२० साली निवर्तल्यानंतर राष्ट्रीय सभेत गांधीजींचा प्रभाव वाढू लागला आणि ही आश्वस्तता प्रथम बेचनीत व नंतर भयगंडात रूपांतरित झाली. मागील अडीच-तीन शतकांत देशात झालेले आमूलाग्र बदल विचारात न घेता आपल्या रूढीपरंपराग्रस्त मानसिकतेला घट्ट चिकटून राहणे, हे या भयगंडितांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. वेद-शास्त्रे, स्मृती-पुराणे, चातुर्वण्र्य यांचे उदात्तीकरण करताना या भयगंडितांचे प्रतिनिधी काही स्थलकालसापेक्ष तपशील वगळता एकाच सुरात बोलत असतात. गांधीवादाच्या आश्रयाला जाऊन शूद्रांनी मिळविलेला अवकाश या भयगंडितांचा थरकाप उडवीत होता. महात्मा फुले व डॉ. आंबेडकर यांच्या प्रभावामुळे शूद्रादी अतिशूद्रांत निर्माण झालेली सामाजिक जागृती हेदेखील या भयगंडाचे एक प्रमुख कारण होते. आक्रस्ताळी आक्रमकता स्वीकारून गांधीजींचा बळी घेणे हा या भयगंडिततेमधून मुक्ती मिळविण्याचा एक उपाय होता. वस्तुत: जग परिवर्तनशील आहे, असे तथागत सम्यक संबुद्ध सांगतात. म्हणून जगातील बदल मोकळ्या मनाने स्वीकारून पुढे जाणे, हाच या भयगंडिततेवर मात करण्याचा अगदी सरळसाधा व खराखुरा उपाय आहे. परंतु कपटी विकृतांना सरळसोट मार्ग नेहमी वेडावाकडा वाटत असतो. स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही हा सरळसाधा उपाय या जात्यंध भयगंडितांना दिसत नसेल तर तो दोष त्यांच्या दृष्टीचा आहे, बदलत्या जगाचा नव्हे!

आता आपणांस वैश्य जातिसमूहांसाठी गांधीजींनी दिलेल्या योगदानाचा निर्देश करणे सोपे जाईल. भारत स्वतंत्र झाला याचा भारतीय उद्योजक जातिसमूहांच्या दृष्टीने अर्थ असा की, उभ्या देशाची बाजारपेठ त्यांच्यासाठी मोकळी झाली. कुसुमाग्रज म्हणतात त्याप्रमाणे गांधीजींच्या मागे केवळ सरकारी कार्यालयाच्या भिंतीच नाहीत तर भारतात सर्वात बलाढय़ समजल्या जाणाऱ्या उद्योजक जातिसमूहांचे सामर्थ्यदेखील आहे!

गांधीवादाने आपल्या आश्रयाला आलेल्या शूद्र जातिसमूहांना एका मर्यादेपर्यंत लोकशाहीनियुक्त अवकाश दिला. तथापि, त्या बदल्यात या शूद्रांना सांस्कृतिकीकरणाची दीक्षा घ्यावी लागली. सुप्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ प्रा. एम. एन. श्रीनिवास त्यासाठी ‘संस्कृतायझेशन’ अशी संज्ञा वापरतात. महाराष्ट्रात १९३० नंतर अनेक शूद्र जाती स्वत:ला क्षत्रिय म्हणून सांगू लागल्या. या सांस्कृतिकीकरणाचा एक सुपरिणाम साहित्यिक-सांस्कृतिक क्षेत्रातही घडून आला. तथापि, त्याचा व्यवहारातील दुष्परिणाम म्हणजे या शूद्र जातिसमूहांतून एक उच्चभ्रू वर्ग तयार झाला, जो आपली नाळ सर्वसामान्य जनतेऐवजी वेदपुराणोक्त मिथकांशी जोडू लागला. या वर्गाने कालबाह्य़ रूढीपरंपरा व जातिसंस्थासमर्थक भूमिका नव्या जोमाने अंगीकारली. उदाहरणच द्यायचे म्हटले तर १९२५ साली पुणे येथे महात्मा फुले यांचा पुतळा बसविण्याबाबत झालेल्या वादंगापोटी ‘देशाचे दुश्मन’ ही पुस्तिका लिहिणाऱ्या दिनकरराव जवळकर या प्रभावशाली ब्राह्मणेतर नेत्याची डॉ. आंबेडकर यांनी निर्दोष मुक्तता केली होती; गांधीवादाने दिलेल्या मर्यादित अवकाशात सांस्कृतिकीकरण झालेल्या शूद्रांनी मात्र त्याच महाराष्ट्रात खैरलांजी, सोनई, खर्डा यांसारख्या हिंसक कारवाया करून डॉ. आंबेडकर व दिनकरराव जवळकर यांच्यातील मत्रिभावाचे वैमनस्यात रूपांतर केले. भारतीय समाजात सामंजस्य व सलोखा निर्माण करण्यात ब्राह्मणी तत्त्वज्ञान अपयशी कसे ठरले, याचाही हा पुरावा!

आज उभा देश जातीच्या अरिष्टाने ग्रासला आहे. जातिसंस्थासमर्थक मूठभर उच्च जातीय व उत्पादित मालाच्या निर्मितीविक्रीत स्वारस्य असणाऱ्या उद्योजक व्यापारी जाती यांचे हितसंबंध आता परस्परविरोधी झाले आहेत, असे ‘कास्ट्स इन डिफरंट मोल्ड’ या राजीव शुक्ला, सुनील जैन व प्रीती कक्कर लिखित ग्रंथातील आकडेवारीचे विश्लेषण आहे. अनुसूचित जाती-जमाती व ओबीसी या जनसमूहांवर दारिद्रय़ लादण्यात जातिसंस्थासमर्थक शक्तींचे जातीय हितसंबंध आहेत, तर या जनसमूहांची खरेदीशक्ती वाढवून आपला नफा वाढविण्यात उद्योजक व्यापारी जातींचे वर्गीय हितसंबंध आहेत. देशातील आर्थिक अरिष्टाचे मूळ अशा तऱ्हेने जातीय अरिष्टात आहे. या ‘जातीय विरुद्ध वर्गीय’ संघर्षांत गांधीवादी उद्योजक-व्यापारी जातींचा विजय होणे अपरिहार्य आहे. परंतु पराजित जातिसंस्थासमर्थक शक्तींचा निर्णायक पराभव गांधीवादाने होईल की आंबेडकरवादाने? या प्रश्नाचे उत्तर वाचकांवर सोपविलेले उत्तम!