उत्तर अटलांटिक सागरातले ग्रीनलँड बेट अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना का हवे आहे? या लाखमोलाच्या प्रश्नाचे उत्तर अनेक माध्यमे शोधत आहेत. डेन्मार्कचा भाग असलेले हे बेट स्वायत्त आहे. म्हणजे कालपर्यंत जसे जम्मू-काश्मीर होते तसेच. संरक्षण आणि परराष्ट्र संबंध वगळून डेन्मार्क ग्रीनलँडच्या अंतर्गत व्यवहारांमध्ये फारसे नाक खुपसत नाही. या बेटावर जमीन खरेदी करण्यास आणि तेथे तथाकथित विकास करण्यास मनाई आहे; पण ट्रम्प यांना ते हवे आहे. अर्थात, त्यांच्या या अभिलाषेला डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटी फ्रेडरिकसन यांनी हास्यास्पद ठरवून, ‘ग्रीनलँड विकणे नाही’ असे ठणकावले. ट्रम्प महाशयांच्या दृष्टीने त्या ‘नॅस्टी’ ठरल्या आणि ट्रम्प यांनी नियोजित डेन्मार्कभेटही रद्द केली.
ग्रीनलँडवर ट्रम्प यांचा डोळा का, या प्रश्नाचा शोध घेताना ‘बीबीसी’चा लेख म्हणतो : ‘आक्र्टिक भागात तेल, वायू आणि अनेक खनिजांचे समृद्ध साठे आहेत. शिवाय मालमत्ताप्रेमापोटी ट्रम्प यांना गगनचुंबी इमारती बांधण्याचा छंदही आहे. त्यासाठी जगातले सर्वात मोठे, परंतु कमी लोकसंख्येचे बेट असलेल्या ग्रीनलँडएवढी उत्तम जागा सापडणे अशक्य; परंतु बेटाचा ७५-८० टक्के भाग बर्फाच्छादित आहे..’ ट्रम्प यांनी ट्वीट केलेल्या सोबतच्या (उजवीकडील) तिरकस छायाचित्राखाली, ‘मी ग्रीनलँडवर असे काही करणार नाही,’ असे वचन दिले आहे. या वचनातला विनोदी भाग सोडला तर जगात आपली ओळख काय, हे ट्रम्प जाणून आहेत. हे छायाचित्र म्हणजे त्याची कबुलीच!
निसर्गाने पृथ्वीवर म्हणून जे काही स्वर्ग-तुकडे निर्माण केले, त्यांपैकी ग्रीनलँड हा एक. उत्तर अटलांटिक समुद्रातला हा भूभाग म्हणजे जणू पाचूचे बेटच. ग्रीनलँड भौतिकदृष्टय़ा उत्तर अमेरिकेत, पण त्याचे सांस्कृतिक नाते युरोपशी. जेमतेम ५७ हजार लोकसंख्येचे हे बर्फाच्छादित बेट ट्रम्प यांनी आपल्या महत्त्वाकांक्षेमुळे चर्चेत आणले आणि तिथली समुद्रशांतता भंग पावली.
..पण ट्रम्प यांना हे बेट का हवे आहे, या प्रश्नाचे उत्तर अर्थातच अमेरिका, चीन आणि रशिया यांच्या राक्षसी लष्करी महत्त्वाकांक्षेत दडल्याचे अनेक माध्यमांचे मत आहे. हे बेट आपल्या नियंत्रणाखाली असावे, अशी या तिन्ही महाशक्तींची महाइच्छा. चीन आणि रशियावर कुरघोडी करण्यासाठीच ट्रम्प यांनी बेटखरेदीचे घोडे दामटल्याचे ‘द न्यू यॉर्क पोस्ट’च्या लेखात म्हटले आहे. ‘बीबीसी’च्या वृत्तानुसार, चीनने आक्र्टिक भागातील बर्फ फोडण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीही खरेदी केली आहे.
जागतिक हवामान बदलामुळे आक्र्टिक भागातील बर्फ वितळू लागल्याने एक नवा सागरी मार्ग खुला होऊ घातला आहे. वाहतुकीबरोबरच लष्करी हालचाली आणि कारवायांसाठी नवा मार्ग मिळणार आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी ग्रीनलँड खरेदीचे मनसुबे जाहीर करून चीन आणि रशियाला सूचक इशारा दिला आहे, असे निरीक्षणतज्ज्ञांच्या हवाल्याने लंडनच्या ‘संडे टाइम्स’मधील लेखात नोंदवले आहे.
‘पॉलिटिको’ या अमेरिकेतील दैनिकाने मात्र वेगळे मत मांडणारा लेख प्रसिद्ध केला आहे. ‘शुअर ट्रम्प कॅन बाय ग्रीनलँड, बट व्हाय डज ही थिंक इट इज अप टू डेन्मार्क?’ या लेखात- ‘ट्रम्प यांना ग्रीनलँड खरेदी करायचे असेल तर या व्यवहारात डेन्मार्कला महत्त्व देण्यापेक्षा ग्रीनलँडमधील नागरिकांना महत्त्व द्यायला हवे,’ असे म्हटले आहे. ट्रम्प यांनी या प्रकरणावरून डेन्मार्कची नियोजित भेट रद्द केल्यामुळे आणि त्या देशाच्या पंतप्रधान फ्रेडरिकसन यांच्यावर टीका केल्याबद्दलही लेखात प्रतिकूल मत मांडले आहे. शिवाय- ‘१९ व्या शतकात रशियाकडून अलास्का आणि फ्रान्सकडून लुईझियाना खरेदी करण्याएवढे ग्रीनलँड खरेदी करणे सोपे नाही; हे २०१९ साल आहे,’ असेही या लेखात सुनावले आहे.
ग्रीनलँड खरेदीची इच्छा व्यक्त केलेले ट्रम्प हे अमेरिकेचे पहिले अध्यक्ष नाहीत. यापूर्वी असे प्रयत्न झाले होते, असे ‘प्रोव्हिडन्स जर्नल’च्या संपादकीयमध्ये म्हटले आहे. हे बेट अमेरिकी लष्कराच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे आणि चीनने या बेटावरील एक नाविक तळ खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो डेन्मार्कने हाणून पाडला, अशी माहितीही या अग्रलेखात दिली आहे. शिवाय, आजच्या परिस्थितीत ग्रीनलँड खरेदी करणे हा विनोद नाही, अशी टिप्पणीही त्यात केली आहे.
‘अमेरिकेची सुरक्षा, आर्थिक हित, पर्यावरण संरक्षणाचा विचार केला, तर ग्रीनलँड खरेदी करण्याची ट्रम्प यांची कल्पना केवळ चांगलीच नाही, तर महान आहे,’ असे ‘वॉशिंग्टन एक्झामिनर’च्या संपादकीयात म्हटले आहे. ‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या संपादकीय मंडळानेही संपादकीयामध्ये ट्रम्प यांच्या ग्रीनलँड खरेदीच्या कल्पनेचे समर्थन केले आहे!
संकलन : सिद्धार्थ ताराबाई