भारताने पाकिस्तानच्या हॉकी संघावर मिळवलेला विजय हा साऱ्याच भारतीयांचा आनंदक्षण ठरला. असे वाटण्यामागे तात्त्विक कारणे आहेत. त्यासाठी क्रीडा आणि अध्यात्म यांचा संबंध उलगडून पाहायला हवा..
प्राणीसृष्टीमध्ये मानवाची संहारक शक्ती साऱ्या विश्वाला घातक ठरू शकेल इतकी प्रचंड आहे. सारे तत्त्वज्ञान शांतीचीच आवश्यकता आपल्यापुढे मांडत असते. वैज्ञानिक प्रगतीमुळे सुखोपयोगाची साधने मोठय़ा प्रमाणात उपलब्ध झाली आहेत. जाहिरातीच्या या युगात त्यांची आकर्षकता प्रकर्षांने आपल्यासमोर येत आहे. प्रलोभनाच्या गराडय़ातच मानवी जीवन सापडलेले आहे. ही साधने मिळवायची तर त्यासाठी समृद्धी हवी. समृद्धी मिळवण्याचे सहजसोपे साधन म्हणजे सत्ता. मग ती कोणत्याही मार्गाने मिळवायची. त्यासाठी समाजाचा नाश झाला तरी चालेल अशी प्रवृत्ती लोकनेत्यांमध्ये बळावल्याने भ्रष्टाचार माजतो. समाजही प्रलोभनांच्या मागे लागून भ्रष्ट होतो. अडीच-तीन हजार वर्षांपूर्वी ग्रीक राष्ट्रे पर्शियन साम्राज्याच्या गुलामीच्या जोखडात होती. तेव्हा त्या राष्ट्रांचे आपसात पटत नसे आणि सतत युद्धे होत राहत. त्या वेळच्या ग्रीक समाजधुरीणांच्या ही बाब लक्षात आली की, युवा वर्ग चनीची ओढ लागल्याने सुस्त आणि भित्रा झाला आहे. पर्शियन सत्ताधारी कितीही जुलूम करीत असले तरी त्यांच्याविरुद्ध लढय़ाला उभे राहण्याची त्याची तयारी नाही. आपसातल्या युद्धांमुळे राष्ट्रांमधली तेढ वाढतीच राहात आहे आणि पर्शियनांना आपली सत्ता टिकवून ठेवणे त्यामुळेच सहज साधते आहे. तेव्हा इसवी सनापूर्वी आठव्या शतकात ऑलिम्पिक चळवळ उभी राहिली. झिअस देवतेच्या उत्सवाच्या निमित्ताने सर्व राष्ट्रांतील ग्रीक जनता ऑलिरपस पर्वतावर यात्रेसाठी एकत्र येत असे. तेव्हा खेळांच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. या काळात एक महिनाभर सर्व ग्रीक राजांमध्ये एक शांतता करार राबवला जात असे. अशासाठी की कोणीही एकमेकांबरोबर युद्ध करू नये आणि आपली श्रेष्ठता क्रीडा स्पर्धातच सिद्ध करावी.
क्रीडांगणावर कणखर शरीर आणि मन असलेले युवक एकत्र येऊ लागले. राजे, त्यांचे सेनापती आणि सनिकच नव्हे तर तत्त्वज्ञसुद्धा या स्पर्धात हिरिरीने भाग घेत असत. सॉक्रेटिस, प्लेटो, अॅरिस्टॉटल, पायथागोरस हे सारे तत्त्वज्ञ ऑलिम्पिकचे अजिंक्यवीर होते. ओळीने सात ऑलिम्पिक स्पर्धात अजिंक्यपद मिळवणारा मिलोन हा खेळाडू पायथागोरसचा शिष्य होता. पायथागोरसकडे तो भूमिती नव्हे तर कुस्ती आणि मुष्टियुद्ध शिकत असे. अशा या ऑलिम्पिक स्पर्धात तयार झालेल्या युवकांचे सन्य मग पर्शियनांना युद्धात भारी पडू लागले. असे सन्य घेऊन ग्रीक सम्राट अलेक्झांडरने पर्शियनांचा दोन मोठय़ा युद्धांत पराभव केला.
रोमन साम्राज्यातही ऑलिम्पिक खेळ खूप लोकप्रिय झाले. पुढे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या एका रोमन सम्राटाने झिअस देवतेची आराधना हेच पाखंड आहे असे म्हणून ऑलिम्पिक स्पर्धा बंद करून टाकल्या. त्याचे परिणाम रोमन साम्राज्याला भोगावे लागले. युरोप व आशिया खंडांतल्या रानटी टोळ्यांनी हल्ले करून रोमन साम्राज्य नष्ट करून टाकले. पराक्रमी फ्रेंच सम्राट नेपोलियनने युरोपात फ्रेंचांचे वर्चस्व सन्यबळावर स्थापन केले. पण त्याचा पुतण्या तिसरा नेपोलियन याच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या फ्रेंच सन्याचा दारुण पराभव झाला. हे शल्य उराशी बाळगत असलेल्या फ्रेंच उमराव क्युबर्तीन याच्या ध्यानात आले की, फ्रेंच युवक वर्ग क्रीडा स्पर्धापासून दूर गेल्याने, दुबळा, भित्रा आणि आळशी झालेला आहे. त्याने ऑलिम्पिक क्रीडा चळवळीचा अभ्यास केला आणि १८९६ साली तिचे पुनरुज्जीवन केले. त्या वर्षी ग्रीसमध्ये अथेन्स येथे ऑलिम्पिक स्पर्धा भरविण्यात आल्या आणि पूर्वीप्रमाणेच दर चार वर्षांनी त्या स्पर्धा भरत आल्या आहेत. युद्धाला हा शांततामय पर्याय म्हणूनच आता ऑलिम्पिक चळवळीकडे पाहिले जाते. हॉकी, फुटबॉल आदी सांघिक खेळांसाठी एकेका खेळापुरत्या भरविल्या जाणाऱ्या स्पर्धा, या तत्त्वत: त्या ऑलिम्पिक चळवळीचेच लघुरूप ठरतात.
पदकविजेत्या खेळाडूंच्या राष्ट्रांचे ध्वज पदक समारंभात फडकावले जातात आणि सुवर्णपदक जिंकणाऱ्या खेळाडूच्या देशाचे राष्ट्रगीत पदक समारंभात वाजवले जाते. हा त्या राष्ट्राच्या संस्कृतीचा मोठा विजय मानला जातो. म्हणूनच महासत्ताच नव्हे तर छोटी छोटी राष्ट्रेसुद्धा ऑलिम्पिक पदके पटकावण्याच्या शर्यतीत उतरतात. दर चार वर्षांनी भारतीयांना मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर मानहानी सहन करावी लागते. आम्ही क्रीडासंस्कृती निर्माण करण्याचा प्रयत्नसुद्धा करीत नाही. म्हणून आपला संपूर्ण समाज स्वप्नाळू, दुबळा आणि भित्रा झालेला आहे. आपले पौरुषत्व सिद्ध करण्यासाठी आपले लोक महिलांवर बलात्कार करतात. सारा युवा वर्ग पद्धतशीरपणे गुन्हेगारीकडे ढकलला जात आहे. महासत्ता व्हायला निघालेला भारत रिओ ऑलिम्पिकमध्ये ६७व्या क्रमांकावर येतो. फिजी बेटासारखी छोटी राष्ट्रेसुद्धा सुवर्णपदक मिरवतात, तर भारतात एक रजत, एक कांस्यपदक मिळवून राष्ट्रीय महोत्सव साजरा होतो!
केवळ शौर्यच नव्हे, तर आत्मविश्वास, एकाग्रता, निर्णयशक्ती, संघभावना हे सारे गुण क्रीडांगणावरच विकसित होतात. नियम पाळूनच आपली श्रेष्ठता सिद्ध करायची असते. आपल्या कौशल्याचा विकास करण्यासाठी स्वयंशिस्त पाळावी लागते हे स्पर्धात्मक खेळात भाग घेतल्यानेच समजते आणि उमजते हे आजच्या समाजाला कळत नाही, पण समाजाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी घेतलेल्यांना वा विद्वानांनाही कळू नये? अिहसाव्रताचा वारसा सांगणाऱ्या भारताने तर क्रीडा क्षेत्राचा विकास करूनच हा युद्धाला उत्तम पर्याय आहे हे जगाला पटवून देण्याची गरज आहे. सबलांनीच शांती निर्माण करायची आणि टिकवायची असते. भारतीय अध्यात्मालाही असला भेकडपणा मान्य नाही. अध्यात्माची साधना करणाऱ्या ऋषींनीच राजांना क्षात्रधर्म, शस्त्र आणि अस्त्र विद्या शिकवून ‘अन्याय करायचा नाही आणि तो होऊ द्यायचा नाही’ हे शिकवले आणि प्रसंगी हातात शस्त्रही घेतले.
शांती ही तीन प्रकारची असते. आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक. म्हणूनच उपनिषदांचा पाठ करताना सुरुवातीला आणि पाठ संपल्यावर तीन वेळा शांतीचा उद्घोष केला जातो. पहिला शांती राखण्याचा संकल्प आहे तर नंतरचा तसे केल्याबद्दलचा समाधानाचा उद्गार आहे. बाल आणि युवा वयात क्रीडा साधना योग्य प्रकारे केली तर आयुष्यभर या तिन्ही शांती राखणे शक्य होते. क्रीडाक्षेत्रात सुदृढ शरीर आणि कणखर मन यांचा लाभ होत असतो. त्यामुळे अशा व्यक्तीला त्रास देऊन शांती भंग करण्याचा प्रयत्नच फारसा होत नाही.
युवा वयात असंख्य प्रलोभने असतात आणि सुखाची चटक लागते. त्यामुळे आरोग्याचा ऱ्हास तर होतोच, पण कर्तबगारीवरही अनिष्ट परिणाम होतो. क्रीडाक्षेत्रात उतरल्यास आरोग्याची महत्ता कळते आणि स्वयंशिस्तही लागते. केवळ आवड आणि नावड यांनाच प्राधान्य देत गेल्यास प्रगती होऊ शकत नाही हेही ध्यानात येते. आपल्यासाठी काय चांगले आहे आणि काय वाईट आहे यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे हेही कळते. घरातले कुटुंबीय सोडले तर बाहेरचे जग आपल्या विरुद्धच असते. अशा परिस्थितीत स्वत:चा विकास आणि उन्नती साधणे, मित्र जोडणे, संघभावना निर्माण करून कामाचा दर्जा वाढवणे आणि मुख्य म्हणजे हार व जीत या दोन्ही बाबी पचवून नव्या आव्हानाला सामोरे जाण्याची तयारी करणे ही सारी क्षमता स्पर्धात्मक खेळातच निर्माण होते. चार धक्के घेतले आणि चार धक्के दिले म्हणजे अंगात कणखरपणा येतो. कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी लागणारी धमक आणि निर्णयशक्तीसुद्धा खेळाच्या मदानावरच उत्तम प्रकारे विकसित होते.
मन आणि शरीराचीच शक्ती ज्याच्याजवळ नसेल त्याला पहिली आध्यात्मिक शांतीच मिळणे कठीण होते तर दुसऱ्या दोन शांती कशा मिळणार? आत्मिक शांती सहनशक्तीवरच अवलंबून असते. दुबळ्या शरीराच्या माणसाला ती साधणे शक्यच नाही. स्वत:ची शांती गमावून बसलेली माणसे समाजातही अशांतता पसरवतात. दुसरी आधिभौतिक शांती ही भोवतालचे वातावरण चांगले राखणे आणि आपल्या संपर्कात ज्या व्यक्ती येतात त्यांच्याशी चांगले संबंध राखणे यातून येते. यासाठी पर्यावरण शुद्ध आणि स्वच्छ राखणे ही पहिली बाब आणि दुसरी म्हणजे कोणावरही अन्याय होऊ न देता समाजात शांती राहील हे पाहणे या दोन्ही बाबी अत्यंत आवश्यक आहेत. स्पर्धात्मक क्रीडा प्रकारात प्रावीण्य मिळवण्यासाठी आरोग्य आणि शिस्त पाळणे हे गरजेचे असते. त्यामुळे स्वच्छतेचा आणि सामाजिक न्यायाचा विचार रुजणे आणि रुजवणे साध्य होऊ शकते. नियम पाळूनच आपले श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची सवय खेळाच्या मदानावर लागते. मग अशा व्यक्तींवर सामाजिक न्यायाचा संस्कार करणे समाजधुरीणांना शक्य होते.
आता या पहिल्या दोन प्रकारच्या शांती ज्यांना साधतील त्यांच्या बाबतीत विश्वातल्या साऱ्या शक्ती हळुवार होतात आणि त्यांचे रक्षण करून त्यांना तिसऱ्या आधिदैविक शांतीचा लाभ करून देतात. असे नसते तर मानवी संस्कृती टिकलीच नसती, कारण मानवी संस्कृतीचा विकास शांतीवरच अवलंबून असतो. क्रीडा क्षेत्रावरच स्पध्रेचे खरे महत्त्व कळते. स्पर्धा ही कधीच शत्रूबरोबरच नसते. ती भावंडांबरोबर, सहकाऱ्यांबरोबर आणि मित्रांबरोबर असते. स्पर्धा संपताक्षणी, भाग घेणाऱ्यांनी एकमेकांशी हस्तांदोलन करायचे असते. शत्रुभावना नसलेला हा स्पर्श म्हणजे एकमेकांचा मित्र आणि बंधुत्वाच्या भावनेने स्वीकार करण्याची तयारी. ही भावनाच समाजामध्ये शांती प्रस्थापित करायला उपयोगी पडते.
राष्ट्रांनी एकमेकांशी युद्धे करीत राहण्याऐवजी व्यापार, तसेच पर्यटन, ज्ञान, कला, कौशल्य यांची देवाणघेवाण करीत राहण्यानेच त्यांच्यामधले संबंध सुधारतात. क्रीडा स्पर्धा अशा देवाणघेवाणीसाठी फारच पोषक ठरतात. कला आणि क्रीडा क्षेत्रातला विकास हा त्या त्या देशातल्या समृद्धीचा द्योतक असल्याचे जगभर मानले जाते. कारण ज्या देशातल्या नागरिकांना पोट भरण्याचीच वाण असेल, तिथे त्यांना खेळ खेळण्याचे आणि त्यात प्रगती करण्याचे कसे सुचणार?
भीष्मराज बाम
bpbam.nasik@gmail.com
लेखक क्रीडा-मानसशास्त्राचे जाणकार व ‘पुरुषोत्तम अकॅडमी’चे प्रमुख आहेत.