|| किरणकुमार जोहरे

प्रशासन आणि हवामान खाते यांच्यात आजही समन्वय नाही. आपल्याकडे अजूनही पारंपरिक २४ ते ४८ तासांचे मुसळधार पावसाचे अंदाज दिले जात आहेत आणि ते चुकीचे ठरत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या महापुराने हेच तर अधोरेखित केले आहे..

भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर आधारित आहे आणि या शेतकी व्यवस्थेचा मुख्य आधार आहे पावसाद्वारे मिळणारे पाणी! भारताची कृषी अर्थव्यवस्था मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे आणि पावसाचा अंदाज देणारे हवामान खाते सातत्याने अंदाज चुकवत आले आहे. इतकेच नव्हे, तर हवामान हा विषय नागरिकांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे, याबाबत हवामान खात्यात गांभीर्य नाही. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी हवामानाचे अंदाज सातत्याने चुकण्याचे प्रमाण वाढले आहे. हवामान खात्याचा रोजचा पावसाचा अंदाजदेखील चुकलेला आहे. देशाची आíथक राजधानी असलेल्या मुंबईत आतापर्यंत किमान चार ते पाच वेळा अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. यातला एकही अंदाज प्रत्यक्षात उतरला नाही. ज्या वेळी मुंबईत अतिवृष्टी झाली, त्या वेळी जनताच काय, पण शासनालाही अंदाजच दिला गेला नव्हता. त्यामुळे मुंबईकरांचे पावसाने अतोनात हाल झाले. महालक्ष्मी एक्स्प्रेस अडकली तेव्हा एक हजार मिलिमीटरपेक्षाही जास्त पाऊस पालघरजवळ झाला. मात्र हवामान खात्याच्या २०० किमीपर्यंत किती पाऊस पडणार, याचा वेध घेणाऱ्या मुंबईच्या डॉप्लर रडारवर ढगच दिसले नाहीत, त्यामुळे हवामान खात्याकडून प्रशासनाला इशारा दिला गेला नाही.

सलग दोन आठवडय़ांत खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला, पण एकदाही तो प्रत्यक्षात उतरला नाही. कोकण किनारपट्टी, मुंबई, नाशिक, धुळे, जळगाव, कोल्हापूर, सांगली आदी ठिकाणी किती पाऊस पडणार, याची खात्रीपूर्वक माहिती हवामान खात्याकडे नव्हती. त्यामुळे धरणातून कोणत्या भागात किती आणि केव्हा पाण्याचा विसर्ग करायचा, याचे नियोजन होऊ शकले नाही. परिणामी महापूर आले. अब्जावधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान तर झालेच, पण जीवितहानीही झाली. यास हवामान खात्यातील अंदाधुंद कारभार व बेफिकीर वृत्ती जबाबदार आहे. अद्ययावत उपकरणे नाहीत, कधी निधी आणि मनुष्यबळ नाही, तर कधी जनतेपर्यंत हवामानाची माहिती पोहोचविणारी यंत्रणा उपलब्ध नाही, असे बहाणे करीत, कारणे देत हवामान खात्याचा ‘पांढरा हत्ती’ आज कार्यरत आहे.

कृष्णा आणि तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यात पडणारा पाऊस, धरणांतील पाणीसाठा आणि अतिरिक्त पाणीसाठय़ाचा विसर्ग याचे नियंत्रण करण्यासाठी सांगली येथे सांगली, सातारा, कोल्हापूर आणि कर्नाटकातील अलमट्टी धरणाचा नियंत्रण कक्ष २००५ नंतर स्थापन करण्यात आला. पण कोठे, किती, कसा आणि केव्हा पाऊस पडेल, याची कुठलीही माहिती या नियंत्रण कक्षाला न मिळाल्याने नियंत्रण कक्षच कुचकामी ठरल्याने कृष्णा नदीकाठी महापुराने थमान घातले.

धरण क्षेत्रात किती पाऊस पडतोय, धरणात किती पाणी येतेय आणि पाऊस पडतच राहणार असेल तर धरणातून किती पाणी सोडायला हवे, याचे एक गणित आहे; जे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना, पूरनियंत्रण कक्षाची जबाबदारी सांभाळणाऱ्या अधिकाऱ्यांना माहीत असते. मात्र, या वेळी धरणातून कधी पाणी सोडावे, याचे नियम पाळले गेले नाहीत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोयना धरणात २७ जुल ते ४ ऑगस्ट या काळात सलग आठ दिवस अतिवृष्टी झाली. ज्यामुळे धरणात तब्बल ३८ टीएमसी पाणी केवळ वरील आठ दिवसांत जमा झाले. त्यामुळे धरणातून पाणी सोडून देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्याच वेळी इकडे सांगली जिल्ह्य़ातील वारणा नदीवरील चांदोली धरणही भरले. त्यामुळे या धरणातूनही ३३ हजार क्युसेक पाणी सोडावे लागले. कोल्हापूर जिल्ह्य़ातील राधानगरी धरण शंभर टक्के भरले आणि त्याचे स्वयंचलित दरवाजे उघडले गेले. याशिवाय कृष्णेला येऊन मिळणाऱ्या सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्य़ांतील ३० नद्याही दुथडी भरून वाहत होत्या. त्यांचेही पाणी कृष्णेत मिसळत होते. या सर्व ३३ नद्यांचे पाणी एकाच वेळी कर्नाटकातील अलमट्टी धरणात जात होते. एकाच वेळी कोयना, धोम, कण्हेर, चांदोली, राधानगरी धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने सर्वच नद्यांना पूर येणे गृहीतच होते. पण पुढे साऱ्याच नद्या प्रचंड वेगाने वाहत असल्याने त्या एकमेकांच्या प्रवाहांना अडथळा देत होत्या. या साऱ्या नद्यांचे पाणी पुढे सरकण्यात सर्वात मोठा अडसर होता, तो महाराष्ट्राच्या सीमेपासून अलमट्टीपर्यंत असलेल्या मांजरा पुलाजवळील बंधारा, हिप्परगी धरण आणि अलमट्टी धरण. या साऱ्या बंधारे, धरणांमुळे पुराचे पाणी पुढे सरकताना गती मंदावत होती आणि नेहमी पडतो त्यापेक्षा किती तरी अधिक प्रमाणात पाऊस कोसळत होता. इतका पाऊस पडेल याचा अंदाज येऊन धोक्याचा इशारा देण्यात हवामान खाते अयशस्वी ठरले.

प्रशासन आणि हवामान खाते यांच्यात आजही समन्वय नाही. भारतात अजूनही पारंपरिक २४ ते ४८ तासांचे मुसळधार पावसाचे अंदाज दिले जात आहेत आणि ते चुकीचे ठरत आहेत, हेच या वेळी पुन्हा एकदा सिद्ध झाले.

Kkjohare@hotmail.com