कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील ४० गावांवर हक्क सांगत असताना महाजन आयोगाच्या अहवालाचा आधार घेतला असला तरी कर्नाटकातील मराठी भाषिक गावांबाबत अवाक्षरही काढले नाही. मात्र, यामुळे एक बरे झाले, जत तालुक्याच्या पूर्व भागातील ४० गावे महाराष्ट्रात आहेत आणि तीही सांगली जिल्ह्यात आहेत याची जाणीव राज्यकर्त्यांना झाली. गेल्या कित्येक निवडणुका पाण्याच्या प्रश्नावर लढविल्या गेल्या. पाणी काही आले नाही, दुष्काळाची साथ काही केल्या सुटता सुटत नाही हे खरे येथील जनतेचे दुखणे आहे. मात्र कर्नाटकने कुरापत काढताच पाणी प्रश्न आम्हीच सोडवू शकतो हे सांगण्यासाठी राजकीय नेत्यांचे तू की मी चालले आहे. मतांच्या गठ्ठय़ावर डोळा ठेवून चालू असलेले हे श्रेयवादाचे राजकारण पुन्हा विकासापासून वंचित असलेल्या या पूर्व भागातील जनतेच्या दुखण्यावर मीठ चोळण्याचाच प्रकार म्हटला पाहिजे.

सरकार कसं चालतं?

लाल दिव्याच्या गाडीतून उतरल्यावर, मागे-पुढे पळणारे भारतीय प्रशासनातील अधिकारी, दोन-तीन पीए हातात फायलीचे भिंडोळे बगलेत मारून दिमतीत असतात. त्या कागदात असतात नुसतेच आकडे. कधी रस्त्यांचे, कधी विहिरींचे. पण खूप साऱ्या तक्रारींचे कागद असतात. पण तक्रार कोण आणतो आणि ती कशी सोडवायची, याचे एक सूत्र असते. औरंगाबादच्या पालकमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांकडे एका तलाठय़ाने मागितले २० हजार रुपये. मग ज्याचे काम त्याच्या विरोधात नोटिसा, कारवाया हे सारं सुरू झाले. कार्यकर्ता वैतागला. मग पालकमंत्रीही म्हणाले, तलाठी ऐकत नाही, त्रास देतो अशी त्यांची अडचण आहे. तेवढी सोडवायला काय लागतं? त्याचा घ्या पदभार काढून असा सल्ला दिला गेला आणि पालकमंत्री म्हणाले, ‘बगा बरं, उगं तुम्ही अडचण सांगिता. पटाकदिशी टाका बदली करुन. त्यांना नको आहे तो तलाठी. द्या बदलून.’ सरकार कसं चालतं. आपला माणूस खुर्चीत बसला पाहिजे मग खातं रोहयो असो किंवा कृषी!

 धास्ती कशाला?

तत्कालीन उद्धव ठाकरे सरकार कोसळण्यास कारणीभूत ठरलेल्या शिवसेनेतील मोठय़ा बंडाच्या नाटय़मय घडामोडींमध्ये सहभागी झालेल्या ४० आमदारांपैकी सांगोल्याचे आमदार अ‍ॅड. शहाजीबापू पाटीला समाज माध्यमांतून देशात रातोरात स्टार बनल्याचे बहुधा एकमेव उदाहरण असावे. गुवाहाटीच्या मुक्कामात आपल्या रांगडय़ा माणदेशी भाषाशैलीत, ‘काय डोंगार.. काय झाडी.. अन् काय हाटिल’ हा केलेला संवाद शहाजीबापूंना वलयांकित करून गेला. त्यांची अनेक भाषणे समाजमाध्यमांवर प्रसारित होत असतात. त्यावर चांगल्या-वाईट प्रतिक्रियाही येत असतात. शहाजीबापूंच्या विरोधकांनी आता त्यांची काही जुनी आक्षेपार्ह प्रकरणे समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांचे काही समर्थक अस्वस्थ झाल्याचे दिसून येतात. शहाजीबापूंच्या एका समर्थक वकिलाने त्यांच्या बाजूने जल्पकांना चक्क दमच भरला आहे. शहाजीबापूंच्या विरोधात काही आक्षेपार्ह पोस्ट, लिखाण करणाऱ्यांना थेट न्यायालयात खेचण्याचा सज्जड इशारा समर्थकाने दिला आहे. ज्या समाजमाध्यमांच्या आधारे शहाजीबापू रातोरात स्टारह्ण बनले, त्याच समाजमाध्यमांची धास्ती शहाजीबापू समर्थकांना वाटू लागली की काय, अशी कुशंका माणदेशी पट्टय़ात व्यक्त होऊ लागली आहे.

शिवसेनेतील हसमुखराय

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक विधान केल्याच्या मुद्दय़ावरून विरोधकांनी राजकीय वातावरण तापवायला सुरुवात केली आहे. कोल्हापुरात या प्रश्नी शिवसेना भलतीच आक्रमक झाली आहे. राज्यपाल, भाजपचे प्रवक्ते, पदाधिकारी यांना लक्ष्य करणारी मोहीम राबवायला सुरुवात केली आहे.  शिवसेनेने कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी तुळजाभवानी जागर आंदोलन करणार असल्याचे घोषित केले. त्यासाठी समाजमाध्यमातून माहिती देणारी पत्रक माध्यमकर्मी ,कार्यकर्त्यांना पाठवले. वास्तविक हे आंदोलन गंभीर प्रश्नावरील. मुद्दाही महत्त्वाचा. पण प्रसिद्धी करताना नेहमीच्या शैलीत कोल्हापूर जिल्ह्यातील संजय पवार , विजय देवणे यांच्या हसतमुख प्रतिमा पत्रकातून प्रसिद्ध केल्या. आंदोलनाचे गांभीर्य न ठेवता अशा प्रकारच्या उथळ प्रसिद्धीमूलक शिवसेनेचे हसमुखराय पाहून सुज्ञांना प्रश्न न पडला तर नवल!

प्रश्न विचारायचा नसतो फक्त ऐकायचे असते

नागरी हवाई वाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यात भाजपची संघटनात्मक बांधणी भक्कम करण्यावर भर दिला. या निमित्ताने भाजप, संघपरिवार, युवक , महिला संघटन ग्रामीण संघटन अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमावर भर होता. पहिल्या दिवसाचा दौरा संपला आणि पदाधिकारी, कार्यकर्ते दुसऱ्या दिवसाच्या नियोजनाचा आढावा घेत होते. तेव्हा एका कार्यकर्त्यांने पुढील दिवशीचा कार्यक्रम कोणता आहे, हे समजावून घेण्यासाठी पदाधिकाऱ्याला विचारणा केली. त्यावर पदाधिकाऱ्यांनी मंत्रीमहोदयांचे भेटीचे ठिकाण, संपर्क व्यक्ती, संपर्क क्रमांक असा बारीकसारीक तपशीलवार पुरवायला सुरुवात केली. भलतेच लांबलेले हे विवेचन ऐकताना कार्यकर्ता पार कंटाळून गेला. अहो, ही माहिती थोडक्यात हवी होती, असे कार्यकर्त्यांने सांगितल्यावर पक्ष शिस्तीतील दक्ष पदाधिकारी म्हणाला, ‘‘भाजपत प्रश्न विचारला की सविस्तर उत्तर ऐकावेच लागते. ते तुला ऐकावे लागले,’’ असे सांगताना त्यानेच पुढे ‘एक तर प्रश्न विचारू नये. विचारले तर असे निरूपण ऐकावे लागेल,’ असा गोड सल्लाही नवागत कार्यकर्त्यांला दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(सहभाग : दिगंबर शिंदे, एजाज हुसेन मुजावर, सुहास सरदेशमुख, दयानंद लिपारे)