डॉ. कविता सातव
विवेक गिरधारी
आजारी पडल्यावर डॉक्टरांकडे जायचंही माहिती नसणाऱ्या आदिवासींना डोळ्यांसाठी खास डॉक्टर असतात आणि ते अंधत्व रोखू शकतात हे पटवून देणाऱ्या, त्यासाठी कोकरू बोलीभाषा शिकून घेणाऱ्या डॉ. कविता सातव. आत्तापर्यंत त्यांनी येथील आदिवासींच्या
२ हजारांच्या वर मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या असून २० हजारांहून अधिक रुग्णांना अंधत्व येण्यापासून वाचवले आहे. त्याही पलीकडे जात नवजात बाळाची घरीच काळजी घेण्याच्या त्यांच्या प्रशिक्षणाने येथील बालमृत्युदरही आटोक्यात आला आहे. गेली २० वर्षे मेळघाटात राहून रुग्णसेवा करणाऱ्या आजच्या दुर्गा आहेत, डॉ. कविता सातव.
बालमृत्यू व कुपोषण यामुळे कुपरिचित असणाऱ्या मेळघाटमध्ये गेली दोन दशके प्रत्यक्ष राहून वैद्यकीय सेवा देत असलेल्या
डॉ. कविता सातव या स्थानिक कोरकू आदिवासींसाठी फार मोठे आशास्थान आहे. एम.एस. (नेत्रचिकित्सा) पर्यंत वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉ. कविता या मेळघाटमधील एकमेव नेत्रशल्यचिकित्सक असून २० हजारांहून जास्त आदिवासी रुग्णांना अंधत्व येण्यापासून त्यांनी वाचवले आहे.
डॉ. कविता सातव या मूळच्या विदर्भातील अकोल्यात राहणाऱ्या. त्यांची आई प्राथमिक शाळेची शिक्षिका होती. आईच्या कष्टाळू जीवनपद्धतीचा व अडीनडीला शेजारपाजाऱ्यांच्या मदतीला धावून जाण्याचा त्यांच्यावर प्रभाव पडला. वडील वन खात्यात होते. अत्यंत संवेदनशील, सेवाभावी व धार्मिक असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्याचाही खोल ठसा डॉ. कविता यांच्यावर उमटला. त्यांच्याकडे कौटुंबिक संस्कारांतून आलेला ‘सहज सेवाभाव’ होता. त्यामुळे कोणत्याही वैचारिक भूमिकेचे एकारलेपण नव्हते. पूर्वी कधी त्यांनी सामाजिक कार्य करण्याचे स्वप्न बघितलेले नसले तरी विवाहाच्या टप्प्यावर मात्र मेळघाट हीच कर्मभूमी करण्याचा काहीसा अनपेक्षित पण धाडसी निर्णय त्यांनी घेतला व गेली वीस वर्षे त्या तो यशस्वीपणे निभावत आहेत.
नेत्रचिकित्सेमध्ये एम. एस. असूनही डॉ. कविता यांनी शहरामध्ये रुग्णालय थाटण्याचा विचार न करता विवाहानंतर लगेचच म्हणजे १९९८ पासून मेळघाटात काम करण्याचे निश्चित केले. अमरावती जिल्ह्य़ातील धारणी व चिखलदरा या तालुक्यात पसरलेल्या आणि दीडशेहून अधिक आदिवासी पाडे वा गावे असलेल्या मेळघाटात काम करणे तसे सोपे नव्हते. मुळात डॉक्टर अशी काही संकल्पना असते हेच येथील आदिवासींना माहीत नव्हते. त्यात डोळ्यांसाठीही वेगळा डॉक्टर असतो याची माहिती असणे शक्यच नव्हते. त्यामुळे तिथे डोळ्यांचा दवाखाना सुरू केल्यानंतरसुद्धा पहिली एक ते दोन वर्षे कोणीही त्यांच्याकडे फिरकले नाही. अशा परिस्थितीत आपणच रुग्णांकडे जायला हवे, याची खूणगाठ
डॉ. कविता यांनी बांधली आणि मेळघाटातील पन्नासहूनअधिक गावांना भेटी दिल्या. उद्देश एकच. आदिवासींमध्ये डोळ्यांच्या आरोग्याविषयी जागृती करणे. त्यासाठी गावातले प्रत्येक घर त्यांनी ठोठावले. त्यांच्या डोळे तपासणीचे काम अत्यंत चिकाटीने केले. त्यावेळी त्यांचा मुलगा अथांग अवघा चार महिन्यांचा होता. पण त्याला वाढवणं कधीही त्यांच्या कामाआड आले नाही.
अनेक अंधश्रद्धेमुळे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घ्यायला आदिवासी मंडळी पुढे येत नसत. पण त्याची गरज तर जाणवत होती. अशा वेळी त्यांनी दहा आदिवासींना त्याचे फायदे सांगत राजी केले आणि त्यांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत घडवून आणल्या. हळूहळू या शस्त्रक्रियांचा फायदा लक्षात यायला लागला आणि रुग्ण शस्त्रक्रियेसाठी तयार होऊ लागले. आत्तापर्यंत दोन हजारांहून अधिक मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया घडवून आणण्याइतपत स्थानिक आदिवासींचा विश्वास डॉ. कविता यांनी संपादन केला आहे. डॉ. कविता यांच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांपैकी ७५ टक्क्यांहून अधिक लोक हे आदिवासी कोरकू जमातीचे असतात. त्यांची बोलीभाषाही वेगळी आहे. त्यांच्या जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे त्यांची भाषा शिकून घेणे. डॉ. कविता नित्य उपयोगात येणारे शब्द शिकल्या आणि त्यांच्याशी सहजपणे संवाद साधू लागल्या. त्याचा परिणाम रुग्णसंख्या वाढण्यातही झाला. आत्तापर्यंत
२० हजारांहून अधिक आदिवासी रुग्णांना शस्त्रक्रिया व ओपीडीतील उपचारांच्या माध्यमातून अंधत्व येण्यापासून रोखण्यात डॉ. कविता सातव यांचा सिंहाचा वाटा आहे. डॉ. कविता या नेत्रचिकित्सेच्या बरोबरीने गावोगावच्या आरोग्य सेविकांनाही सातत्याने प्रशिक्षण देत असतात. मेळघाटातील एकूण ९३ पाडय़ांत या आरोग्यसेविका असून त्यांनी प्रशिक्षणानंतर आत्तापर्यंत गावोगावच्या ७५ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. विशेष म्हणजे नवजात बाळाची घरीच देखरेखीखाली काळजी घेण्याने बालमृत्युदरही आटोक्यात आला आहे. आता हेच मॉडेल संपूर्ण मेळघाटात राबवण्याचा विचार महाराष्ट्र शासन करीत आहे, हे विशेषत्वाने नमूद करण्यासारखे आहे.
लग्नापूर्वी साधारण वर्षभर आधी त्यांचे पती डॉ. आशीष सातव यांनी मेळघाटात १९९७ च्या सुमारास आपला दवाखाना थाटला. डॉ. आशीष हेही एम.डी.(मेडिसिन)असून आदिवासींपर्यंत आरोग्यसेवा नेण्याचे त्यांचे स्वप्न होते. जे आता पूर्णत्वाला पोहोचते आहे. तेव्हा मेळघाटातील दवाखाना थाटणाऱ्या या डॉक्टरकडे जाण्यास स्थानिक आदिवासी धजत नसत. आज हे चित्र पूर्णपणे बदलले आहे. दोन ऑपरेशन थिएटर व तातडीच्या रुग्णवाहिका असलेले सुसज्ज रुग्णालय तिथे उभे राहिले आहे. ‘महान न्यासा’तर्फे त्यांचे हे सर्व काम चालते. या न्यासामार्फत ‘महात्मा गांधी आदिवासी रुग्णालय’ चालविले जाते. स्थानिक गरज लक्षात घेता फक्त नेत्रचिकित्सेपुरते आपले काम मर्यादित ठेऊन डॉ. कविता सातव यांना चालणारे नव्हते तर सर्व प्रकारच्या वैद्यकीय उपचारांत/तपासणीत सहभागी होण्याशिवाय पर्याय नव्हता. आत्तापर्यंत गेल्या वीस वर्षांत जवळपास दोन लाख आदिवासी रुग्णांची तपासणी व उपचार या रुग्णालयातर्फे करण्यात आलेले आहेत. यामुळे हजारो आदिवासी मृत्यूच्या कचाटय़ातून वाचले आहेत.
ग्रामीण भागात जाण्यास डॉक्टर मंडळी तयार नसतात. शासनाने विद्यार्थी डॉक्टरांना तेथे जाण्यास बंधनकारक केले तरी ते जाण्यास नाखूश असतात. या पाश्र्वभूमीवर मेळघाटातील आदिवासींमध्ये गेली वीस वर्षे राहून त्यांना आरोग्यसेवा पुरवण्याचे काम करणाऱ्या डॉ. कविता सातव या दुर्गेचे उदाहरण तरुण डॉक्टर मंडळीना नक्कीच प्रेरणा देणारे आहे.
संपर्क :
डॉ. कविता सातव
महात्मा गांधी आदिवासी रुग्णालय, धारणी तालुका, अमरावती -४४४ ७०२
भ्रमणध्वनी- ९५४५९५११७७
वेबसाइट : http://www.mahantrust.in
ई-मेल : cao@mahantrust.org
ग्रॅव्हिटस फाऊंडेशन प्रस्तुत लोकसत्ता दुर्गा सहप्रायोजक – एन के जी एस बी को.ऑप. बँक लि. आणि व्ही. पी. बेडेकर अॅण्ड सन्स पॉवर्ड बाय- व्ही. एम. मुसळुणकर अॅण्ड सन्स ज्वेलर्स प्रा. लि., राष्ट्रीय केमिकल्स अॅण्ड फर्टलिाइजर्स लि., पितांबरी प्रॉडक्ट प्रा. लि., डेंटेक टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा
ई-मेल : cao@mahantrust.org