संपदा सोवनी
पिकाची, मातीची गुणवत्ता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या ज्ञानाचा थेट फायदा व्हावा, या उद्देशाने शास्त्रज्ञ म्हणून करत असलेली प्रतिष्ठेची नोकरी सोडून दोन सहकाऱ्यांबरोबर स्टार्टअप सुरू करणाऱ्या डॉ. रेणुका आज आपल्या या कंपनीद्वारे २० लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या आहेत. ‘बायोप्राइम अॅग्री सोल्युशन्स’च्या प्रमुख कार्यकारी अधिकारी असणाऱ्या, शेतकऱ्यांसाठी ‘वरदान’ ठरणारी अनेक उत्पादनं शोधणाऱ्या यंदाच्या या दुर्गा आहेत, डॉ. रेणुका करंदीकर!
१२ संशोधन पत्रिका आणि १ पेटंट नावावर असूनही केवळ शेतकऱ्यांना आपल्या संशोधनाचा थेट उपयोग व्हावा यासाठी प्रतिष्ठेची नोकरी सोडून ‘स्टार्ट अप’ सुरू करणाऱ्या डॉ. रेणुका. ‘बायोप्राइम अॅग्री सोल्युशन्स’च्या प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि सहसंस्थापक असणाऱ्या, शेती आणि मातीची गुणवत्ता सुधारण्यासाठीच्या उत्पादनांच्या निर्मितीबरोबरच पुण्यात कृषी संशोधनोपयोगी अशी भारतातील सर्वात मोठी सूक्ष्मजीवांची ‘लायब्ररी’ तयार करण्यात पुढाकार घेणाऱ्या यंदाच्या दुर्गा आहेत डॉ. रेणुका करंदीकर.
शेतीच्या आवडीतून रेणुका यांनी गरवारे महाविद्यालयातून वनस्पतीशास्त्रात ‘बी.एससी.’ व नंतर त्याच शाखेत ‘जेनेटिक्स’ हा विषय घेऊन ‘एम.एससी.’ पदवी मिळवली. ‘पीएच.डी.’ही प्राप्त केली. आपण संशोधन करतोय, मान्यवर जर्नल्समध्ये संशोधनपत्रिका प्रकाशित होताहेत, नावावर ‘पेटंट’देखील घेत आहोत, पण याचा सामान्य माणसाला कितपत फायदा होतोय? हा विचार त्यांना अस्वस्थ करत असे. यासंदर्भात रेणुकांची सहाध्यायी डॉ. अमित शिंदे आणि डॉ. शेखर भोसले यांच्याबरोबर सातत्याने चर्चा होत होती. त्यातूनच एक ‘स्टार्टअप’ आकार घेऊ लागलं. रेणुका यांनी २०१६ मध्ये प्रथम नोकरी सोडली आणि प्रायोगिक तत्त्वावर ‘बायोप्राइम’ या कंपनीची स्थापना करण्यात आली.
हेही वाचा >>> लोकसत्ता दुर्गा २०२३ : पाणीवाली बाई !
‘स्टार्टअप’ स्थापनेनंतरचा टप्पा होता शेतकऱ्यांच्या उत्पादनाबद्दलच्या समस्या समजून घेण्याचा. खतं-कीटकनाशकांवरील खर्च वर्षांनुवर्ष वाढतोय, पण उत्पादन त्या प्रमाणात मिळत नाही, ही त्यांची प्रमुख तक्रार. लहरी हवामानामुळे होणारं पिकाचं नुकसान ही दुसरी महत्त्वाची समस्या. बाजारात उपलब्ध असलेली बहुतेक खतं, पिकांसाठीची हॉर्मोन्स, मायक्रोन्युट्रिएंटस् या समस्या सोडवण्यात अपयशी ठरताहेत, हे लक्षात आलं आणि त्यांना त्यांच्या कंपनीचं ध्येय सापडलं. हवामान- बदलापासून शेतकऱ्यांचं रक्षण करणारी, उत्पादनाबरोबरच पीक गुणवत्ताही वधारणारी उत्पादनं आपण बनवायची असं ठरलं.
करंदीकर यांच्या स्टार्टअपचं ‘व्र्हडट’नामक पहिल्याच उत्पादनाचं स्थानिक शेतकऱ्यांनी ‘वरदान’ असं नामकरण करून टाकलं! करंदीकर सांगतात, ‘‘२०१६ मध्येही ‘एन नीनो’ची समस्या असताना आम्ही नारायणगावच्या प्रयोगशील टोमॅटो उत्पादकांबरोबर काम करत होतो. तापमानातील बदलांमुळे हजारो हेक्टर जमिनीवरील टोमॅटोचं नुकसान झालं होतं. आमचं उत्पादन वापरायला तेथील १०० शेतकरी तयार झाले. ते वापरल्यावर त्यांची शेतं इतकी हिरवीगार दिसत होती, की कुणालाही वेगळी लक्षात यावीत. साहजिकच इतर शेतकरी आमचं उत्पादन मागू लागले. आमचं हे उत्पादन सूक्ष्म मॉलेक्यूल्सनी बनलेलं आहे. हे मॉलेक्यूल्स पिकाच्या वाढीच्या अंतर्गत यंत्रणेवर परिणाम करतात. स्थानिक शेतकरी ते ठिबक सिंचनातून पिकाला देत. पुढे दीड वर्ष संशोधन करून तेच आम्ही जमिनीत खतासारखे घालून, युरियात मिसळून वा स्प्रे करून पिकाला देण्याजोग्या रूपातही बनवलं.’’
हेही वाचा >>> लोकसत्ता दुर्गा २०२३ : कर्णबधिरांचा आसरा!
डॉ. करंदीकर यांनी उत्तम प्रतिष्ठा असलेली नोकरी सोडली होतीच, साहजिकच पैसे उभारण्याचा प्रश्न होता. आपल्या या व्यवसायासाठी त्यांना पहिलं भांडवल मिळालं केंद्र सरकारच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून ‘प्रूफ ऑफ कन्सेप्ट फंडिंग’ म्हणून. त्यानंतर राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (एनसीएल) ‘व्हेंचर सेंटर’मध्ये त्यांच्या कंपनीला महागडी यंत्रं व साधनसामुग्री वापरता आली. बाजारचाचणी आणि उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी पुन्हा जैवतंत्रज्ञान विभाग व नीती आयोगाकडून गुंतवणूक मिळाली. तेलंगणा सरकारद्वारे पहिला कॉर्पोरेट ग्राहक मिळाला आणि इतरही गुंतवणुकी मिळू लागल्या.
सध्या या ‘स्टार्टअप’ची संशोधन प्रयोगशाळा व भारतातील सर्वात मोठी १७ हजार सूक्ष्मजीवांची ‘लायब्ररी’ पुण्यात वडगाव-बुद्रुक इथे ५ हजार चौरस फूट जागेत आहे, जवळच ८ हजार चौरस फुटांचे उत्पादन केंद्र आणि चाचण्यांसाठी १५ हजार चौरस फुटांचे ‘ग्रीनहाऊस’ आहे. आज ‘बायोप्राइम’ची उत्पादनं महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, झारखंड, जम्मू-काश्मीर या राज्यांतील २० लाख शेतकरी वापरत आहेत, तसंच देशातील जवळपास सर्व बडय़ा कृषी कंपन्या ‘बायोप्राइम’शी जोडलेल्या आहेत. शेती उत्पादनात घट न येता युरियाचा वापर ५० टक्के कमी करण्यासाठी, तसंच नवीन कीटकनाशकं बाजारात आणण्याचं आता ‘बायोप्राइम’चं नियोजन आहे.
शेती आणि जैवतंत्रज्ञान या दोन्ही क्षेत्रांत स्त्रियांची संख्या कमी असण्याबद्दलची खंत करंदीकर व्यक्त करतात. ‘‘मी जेव्हा परिषदांना जाते तेव्हा २००-३०० पुरुषांमध्ये मी कित्येकदा एकटीच बाई असते. काही वेळा पुरुषांना एक स्त्री ‘सीईओ’च्या रूपात पाहण्याची सवय नसल्याचाही अनुभव येतो. परंतु माझं काम लक्षात आल्यावर त्यांची वागणूक बदलते.’’
करिअरमध्ये झोकून दिलं तरी बाईला कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतातच. करंदीकर सांगतात, ‘‘घर आणि कंपनी सांभाळणं कठीणच आहे. माझे सासू-सासरे व आई-वडील घर आणि मुलाला सांभाळण्यात मोठा हातभार लावतात. तसेच मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत माझे पती अजय आपणहून अनेक जबाबदाऱ्या घेतात. त्यामुळे सर्व शक्य होतं.’’ डॉ. करंदीकर यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.