कोकण किनारपट्टीवरील ‘सी स्पंज’ या जलचर प्राण्यांवर संशोधन करून त्यांच्या १९ प्रजाती शोधणं, शिंपल्यांच्या शेतीविषयीचं संशोधन, ‘फिशिंग प्रेशर’चा अभ्यास करून मत्स्य उत्पादन वाढवण्यास हातभार लावणं, याशिवाय कमी होत चाललेल्या माशांच्या प्रजातींची कारणं शोधून मासेमारांच्या मदतीने त्यांचं संवर्धन करणाऱ्या डॉ. स्वप्नजा मोहिते आहेत आजच्या दुर्गा.
समुद्रातील जैविक रसायनांचा कारखाना म्हटल्या जाणाऱ्या ‘स्पंज’ या जलचर प्राण्यावर सखोल संशोधन करणाऱ्या भारतातील मोजक्या व्यक्तींपैकी त्या एक. शिंपल्यांच्या शेतीविषयीचं संशोधन, ‘फिशिंग प्रेशर’चा अभ्यास करून मत्स्य उत्पादन वाढवण्यास हातभार लावणं, लोकांच्या सहभागातून खारफुटी जंगल तसेच कांदळवनांचं संवर्धन, वाहनांच्या इलेक्ट्रिक बॅटरींमधून होणारं प्रदूषण रोखून त्यातून युरिक अॅसिडची निर्मिती, समुद्रातील प्रदूषणाची कारणं शोधून त्यावर उपाययोजना करणं… अशा अनेक गोष्टींसाठी संशोधन करणाऱ्या रत्नागिरीच्या डॉ. स्वप्नजा मोहिते यांचं योगदान समुद्र संवर्धनात महत्त्वाचं ठरलं आहे.
लहानपणापासूनच समुद्राविषयी असलेलं कुतूहल डॉ. स्वप्नजा मोहिते यांना घेऊन गेलं ते मत्स्यविज्ञानाच्या (फिशरीज् सायन्स) तंत्रशुद्ध अभ्यासाकडे. ज्या काळी मुली या क्षेत्रात येण्याचा विचारही करत नव्हत्या त्या काळात त्यांनी याच क्षेत्रात करिअर करायचं स्वप्न पाहिलं आणि अनेक अडथळे पार करून ते पूर्णही केलं. त्यांनी १९८४ मध्ये अंधेरीतील ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन’मधून ‘मत्स्य व्यवस्थापन’ विषयात एम.एस्सी. पूर्ण केलं. ‘मत्स्यजीवशास्त्र’ या विषयासाठी प्रवेश घेणाऱ्या त्या पहिल्या तरुणी होत्या.
१९८७ मध्ये डॉ. आशीष मोहिते यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्या रत्नागिरीत स्थायिक झाल्या. आणि हीच त्यांची कर्मभूमी ठरली. पुढे त्यांनी ‘जलजीव संवर्धन’ या विषयात पीएच.डी. प्राप्त केली. मात्र इथंही त्यांना लिंगभेदाचा सामना करावा लागला. विद्यालयात प्राध्यापिका म्हणून रुजू होण्यासाठी १९९३ हे वर्ष उजाडावं लागलं. त्यानंतर मात्र त्यांनी मत्स्यविज्ञान क्षेत्रातील संशोधनाकडे आपलं लक्ष वळवलं आणि पर्यावरणाला तारक ठरतील असे शोध लावले.
समुद्रातील ‘सी स्पंज’ या जलचर प्राण्याच्या संशोधनात डॉ. स्वप्नजा यांचा मोलाचा वाटा आहे. डॉ. स्वप्नजा यांनी रत्नागिरीच्या खडकाळ किनारपट्टीवर स्पंजच्या १९ प्रजाती शोधल्या. त्यामुळे संपत चाललेली ही प्रजात वाढविण्यास मदत मिळाली आहे. तसेच स्पंजमधून मिळणाऱ्या जैविक रसायनांचा मासे व मानव यांच्यावरील रोगकारक जिवाणूंचा होणारा परिणाम अभ्यासून, स्पंजमधील रसायने उपयुक्त कशी ठरतील यावर त्यांनी संशोधन केलं. पुढे प्रयोगशाळेतच समुद्रासारखी वातावरणनिर्मिती करून स्पंजच्या प्रजाती विकसित करण्यावर त्यांचं संशोधन सुरू आहे.
याप्रमाणे प्रयोगशाळेत स्पंजच्या दोन प्रजाती संवर्धित करण्यात त्यांनी यश मिळवलं. त्यांच्या आजवरच्या संशोधनातील हे मोठं काम. या संशोधनासाठी त्यांना महाराष्ट्र सरकारच्या ‘राजीव गांधी सायन्स अॅण्ड टेक्नॉलॉजी कमिशन’तर्फे ‘महाराष्ट्र जनुक कोश’ प्रकल्पांतर्गत ७७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला. २०१३ मध्ये हायड्रा या सूक्ष्मजीवावर तणनाशकांचा होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी त्यांना बंगळूरुच्या ‘इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’ची फेलोशिपही मिळाली होती. त्यांनी हे संशोधन पुण्यातील प्रख्यात ‘आघारकर इन्स्टिट्यूट’ इथं केलं.
याशिवाय त्यांचं आणखी एक महत्त्वाचं संशोधन म्हणजे ‘फिशिंग प्रेशर’ म्हणजे मासेमारीमुळे कमी होत जाणारे काही मासे. मासेमारी करताना सापडणाऱ्या माशांच्या प्रमाणांवरून त्यांच्या जीवनचक्राचा काही ठरावीक काळ अभ्यास करून कमी होणाऱ्या माशांचं उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी स्थानिक मासेमारांना मदत केली. संदाळा, बांगडे, तारली यांचे प्रमाण कमी होऊ नये यासाठी मासेमारांना दिलेल्या शिफारसी उपयोगी ठरल्या आहेत.
डॉ. स्वप्नजा आज निवृत्तीनंतरही संशोधनात मग्न आहेतच. याशिवाय रत्नागिरी परिसरातील डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धेसाठी मुलांना मार्गदर्शन करतात. यात खारफुटींपासून चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करणारा फेसपॅक, संधिवातावर बनवलेला बाम यांचा उल्लेख करावा लागेल. तसेच कोकणातील चिऱ्यांमध्ये नैसर्गिकपणे पाणी मुरविण्याविषयी संशोधनाचाही समावेश आहे.
वाहनांमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक बॅटऱ्या खराब झाल्यावर त्या कचऱ्यात टाकल्या जातात. या बॅटऱ्यांमधून निघणारं सल्फ्युरिक आम्ल, शिसं, जस्त या धातूंमुळे पाणी व जमिनीचा पोत खराब होतो. डॉ. स्वप्नजा यांनी स्थानिक मुलांच्या सहभागातून प्रयोगांती सल्फ्युरिक आम्लात कोकणात मुबलक मिळणारं गोमूत्र मिसळून युरिक अॅसिड बनवून यासाठीचं सूत्र, प्रमाण निश्चित केलं. या युरिक अॅसिडला मोठी मागणी आहे.
गावात ज्या समुद्रकिनाऱ्यावर बोटी वा जहाज बांधण्याचं काम होतं तिथं रसायनांमुळे माती व पाणी दूषित होतं. यावरील संशोधनासाठी डॉ. स्वप्नजा यांनी मुलांना घेऊन तिथली माती गोळा केली. मग त्यात कोणते जिवाणू राहू शकतात याचा अभ्यास केला. हे जिवाणू सांडपाण्यातील तेल, वंगण यांचे अपघटन घडवून आणतात. त्या जिवाणूंना कृत्रिम पद्धतीनं प्रयोगशाळेत विकसित करून त्यात जहाजबांधणी प्रकल्पातील सांडपाणी सोडल्यास, ते शुद्ध करता येतं. या अभ्यासात असं आढळून आलं की, या जिवाणूंमुळे या भागातलं प्रदूषण कमी होण्यास मदत होते. पर्यावरणाला मदत करणारे संशोधन करणाऱ्या डॉ. स्वप्नजा मोहिते यांना ‘लोकसत्ता’चा प्रणाम.
lata.dabholkar@expressindia.com