माधुरी ताम्हणे

वयाच्या अवघ्या  सहाव्या वर्षी नेत्रहीन झाल्यानं अंधार हाच प्राजंल पाटील यांचा सोबती झाला खरा, पण तो कधीच अडथळा ठरला नाही. उलट संघर्ष मला जगण्याची  प्रेरणा देतो आणि शिक्षण, वाचन तुम्हाला ‘वैश्विक नागरिक’ बनवतं, असं सांगत त्या शिक्षणाच्या एकेक पायऱ्या प्रथम क्रमांकाने पार करत गेल्या. वेगळं आव्हान स्वीकारत एमए करण्यासाठी दिल्लीला ‘जेएनयू’मध्ये पोहोचल्या आणि पुढे तर  दोनदा यूपीएससीची परीक्षा देऊन आज त्या दिल्लीत साहाय्यक जिल्हाधिकारीपदावर राहून करोनाच्या विरोधातली लढाई लढत आहेत. अंधत्वावर मात करत आयएएस अधिकारी बनलेल्या प्राजंल आहेत आजच्या दुर्गा.

BJP tukde-tukde gang Kanhaiya Kumar interview delhi lok sabha election
“मी तुकडे-तुकडे गँगचा असेन तर मोदी मला अटक का करत नाहीत?”; कन्हैयाचं भाजपाला आव्हान
Ulta-Chashma
उलटा चष्मा: लोक‘शाही’ लग्न 
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ

प्रांजल पाटील. वयाच्या तिशीपर्यंतच्या टप्प्यातच धारदार संघर्षांची वेगवेगळी रूप अनुभवणारी आणि त्या तीव्र संघर्षांचंच अनमोल संधीत रूपांतर करणारी दुर्गा; स्त्रीमधील चिवट, विजिगीषू वृत्तीचं दर्शन घडवणारी. वयाच्या अवघ्या  सहाव्या वर्षी नेत्रहीन झाल्यानं अंधार त्यांचा सोबती झाला खरा, पण त्यांनी त्यावर नेहमीच मात केली. अभ्यासाच्या आवडीतून त्यांनी एम.ए., एम.फिल., दोनदा यूपीएससीची परीक्षा देऊन आधी के रळमध्ये साहाय्यक जिल्हाधिकारी आणि आता दिल्लीत साहाय्यक जिल्हाधिकारीपदावरून करोनाशी दोन हात करीत लोकांच्या मदतीला उतरल्या आहेत.

प्रांजल पाटील मूळच्या उल्हासनगरच्या. नेत्रहीन असल्याने तिथल्या स्थानिक शाळेने पुढील इयत्तेत प्रवेश नाकारल्यावर त्या दादरच्या ‘कमला मेहता अंध शाळेत’ चौथ्या इयत्तेत दाखल झाल्या. संघर्षांची सुरुवात अशी फार लवकर झाली. या शाळेतून त्यांनी दहावीला प्रथम क्रमांक मिळवला. पण तोवर  त्यांचं जग शाळा, अभ्यास, ग्रंथालयातील  पुस्तके आणि मैत्रिणी एवढय़ापुरतं सीमित होतं. दहावीपर्यंत पुस्तकंही ब्रेल लिपीतून उपलब्ध होती.

अकरावीसाठी त्यांनी  मुंबईतील प्रख्यात सेंट झेवियर्स महाविद्यालय निवडलं. मात्र तिथल्या  इंग्रजाळलेल्या वातावरणात ही मध्यमवर्गीय, मराठमोळी मुलगी सुरुवातीला बावरली. इंग्रजी भाषा परकी! त्यामुळे अभ्यास कळायचा नाही. मैत्रिणीकडून एक दिवसाच्या बोलीवर नोट्स घ्यायच्या. अक्षर जुळवत आई त्या नोट्स वाचून दाखवायची आणि प्रांजल लिहून घ्यायच्या. प्रतिकू ल परिस्थितीतही त्यांनी अभ्यासाशी मात्र छान मैत्री केली. त्यामुळे अभ्यासाचं त्यांना कधीच ओझं वाटलं नाही.

महाविद्यालयात जाण्यासाठी प्रांजल उल्हासनगर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतचा प्रचंड गर्दीचा अवघड प्रवास रोज करीत असत. लेडीज डब्यातली एखादी बाई म्हणे, ‘अगं, तू हँडीकॅप लोकांच्या डब्यातून का नाही जात?’ तर दुसरी म्हणे, ‘एवढय़ा लांबच्या कॉलेजात जायची काय गरज तुला?’ अशा प्रश्नांनी प्रांजल दुखावल्या जात, परंतु समाजा सकट स्वत:ला त्यांनी हे परखडपणे बजावलं होतं, की मला दया नको संधी हवी. मदत नको मैत्री हवी. सहानुभूती नको सहानुभाव हवा. म्हणूनच  कोणत्याही सवलती न घेता त्यांनी स्वत:ला काटेकोरपणे घडवलं. सेंट झेविअर्सच्या दोन वर्षांनी त्यांना आत्मविश्वास मिळवून दिला आणि मुंबई विद्यापीठातून त्या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. आता प्रांजल यांच्या स्वप्नांना पंख फुटले. त्या पंखांना आई, वडील, भावाने बळ दिलं.

त्यानंतर  प्रांजल यांनी आणखी एक मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. ‘इंटरनॅशनल रिलेशन्स’ या अवघड विषयात एम.ए.ची पदवी मिळवण्यासाठी थेट दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची (जेएनयू) निवड केली. घरापासून दूर एकटीनं स्वतंत्र आयुष्य जगण्याचं आव्हान स्वीकारलं. कारण त्यांच्या मते, सतत स्वत:ला मोठय़ा ध्येयाशी जोडावं तरच आपली प्रगती होते. इथे मात्र त्यांना अडचण जाणवत होती ती ज्ञानाचं भांडार असणाऱ्या इतक्या  पुस्तकांचं वाचन कसं करायचं? कारण ब्रेल लिपीचा आधार नव्हता. त्यांनी स्वत:ला तंत्रस्नेही बनवण्याचा निर्धार केला. आपल्या कॉम्प्युटरमध्ये स्क्रीन रीडर सॉफ्टवेअर टाकलं. त्याआधारे एकाग्रतेनं मन लावून अभ्यास सुरू केला. परिणामी एम. ए. पदवी उच्च श्रेणीत उत्तीर्ण करता आली. पुढे एम.फिल.ही केलं. पण शिक्षणाचा उपयोग समाजाला व्हायला हवा. त्यासाठी काय करता येईल, या विचारातून ‘यूपीएससी’ची परीक्षा देण्याचा विचार पक्का झाला. मात्र ‘यूपीएससी’साठी प्रचंड अवांतर वाचन करावं लागतं. त्यांच्या मते, वाचनामुळे आपण ‘वैश्विक नागरिक’ बनतो,  ज्ञानी होतो. त्या पुस्तक स्कॅन करून नंतर सॉफ्टवेअरमध्ये टाकत असत, परंतु हे  सॉफ्टवेअर हस्तलिखित वाचत नसल्यामुळे उपयुक्त नोट्स बऱ्याचदा वाचता येत नसत. ग्रंथालयातून आणलेल्या पुस्तकांवरील मजकूर कु णी पेनानं अधोरेखित केलेला असेल वा त्यावर खुणा केलेल्या असतील तर तो मजकूर स्कॅन होत नसे. त्यामुळे त्यांना पूर्ण पुस्तक वाचावं लागे. म्हणजेच इतरांपेक्षा दुप्पट मेहनत घ्यावी लागे. तरीही त्यांनी यूपीएससी परीक्षेत पहिल्या प्रयत्नांत ७७३ वा क्रमांक पटकावला.  त्यानुसार नोकरीसाठी त्यांना रेल्वे हे क्षेत्र मिळालं. परंतु त्या नेत्रहीन असल्याचं कारण सांगत रेल्वेनं ही नोकरी नाकारली. हा घाव फार तीव्र होता. पण त्या खचल्या नाहीत. उलट त्या म्हणतात, की निराशा वाटय़ाला येते तेव्हाच आपला संघर्ष तीव्र होतो, त्यातूनच यशाचं द्वार उघडतं. प्रांजल यांनी पुढील वर्षी पुन्हा  ‘यूपीएससी’ची परीक्षा दिली. यावेळी त्यांनी १२४ वा क्रमांक पटकावला. त्यांची तिरुवनंतपुरम येथे सहाय्यक जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली. प्रशासकीय कामाचा फारसा अनुभव गाठीशी नसतानाही केरळमध्ये जेव्हा मोठा पूर आला तेव्हा ते आव्हानात्मक काम कौशल्यानं पार पाडलं.  पुरात लाखो लोक अडकले होते. त्यांची सुटका करणं, त्यांना अन्न, निवारा पुरवणं आदी कामं त्यांना करावी लागली.

त्यानंतर यंदाच्या मार्चमध्ये त्यांना दिल्लीत साहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून पोस्टिंग मिळालं आणि त्यांचा कसोटीचा काळ सुरू झाला. कारण त्याच वेळी करोनानं आपले हात-पाय पसरायला सुरुवात केली होती. या काळात त्यांनी कन्टोनमेंट झोनमध्ये फिरून वैद्यकीय मदत पुरवली. श्रमिकांसाठी सर्व सोयींनीयुक्त निवारा केंद्रं बनवली. ‘नेस्ले’च्या मदतीनं गरजू बाळांना दुधाचे सहाशे पॅकेट्स वाटले. लोकांना अन्नधान्य पुरवलं.

त्या सांगतात, ‘‘माझ्या आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस हा नवीन संघर्ष घेऊनच उगवतो. हा संघर्ष मला जगण्याची ऊर्जा देतो, प्रेरणा देतो. माझ्या कामामुळे इतरांना प्रेरणा मिळते हेच खरं समाधान! ’’

ग्रॅव्हिटस फाऊंडेशन प्रस्तुत लोकसत्ता दुर्गा

सहप्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ

पॉवर्डबाय : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लि.

यश कार्स

राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅड फर्टिलाइजर्स लि.