scorecardresearch

लखलखते आणि..

‘लोकसत्ता’च्या ‘तरुण तेजांकित’ या उपक्रमाच्या यंदाच्या पाचव्या पर्वात वेगवेगळ्या क्षेत्रांमधले असे १७ लखलखते हिरेच आमच्या हाती लागले आहेत.

loksatta tarun tejankit initiative
लोकसत्ता’च्या ‘तरुण तेजांकित’

तरुण पिढी ही कोणत्याही समाजाचा फक्त आरसाच नसते, तर त्या समाजाचे भवितव्यही असते. ‘तुम्ही मला तुमच्या देशातील तरुणांच्या ओठांवरची गाणी सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचे भवितव्य सांगतो’, असे कुणी तरी म्हटले आहे, ते तंतोतंत बरोबर आहे ते यामुळेच. आपल्या देशाचा ‘उद्या’ कसा आहे, याचे वर्तमान सांगणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या ‘तरुण तेजांकित’ या उपक्रमाच्या यंदाच्या पाचव्या पर्वात वेगवेगळ्या क्षेत्रांमधले असे १७ लखलखते हिरेच आमच्या हाती लागले आहेत. त्यांनी निवडलेले कार्यकर्तृत्वाचे क्षेत्र, तिथली त्यांची आजवरची कारकीर्द, समाजासाठी ते देत असलेले योगदान या सगळ्याच गोष्टी खरे तर कुठल्याच तराजूत मोजता न येणाऱ्या. म्हणूनच त्यांचे कौतुक करणे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणे आणि पुढच्या कामासाठी त्यांना प्रोत्साहन देणे हे सगळ्यांचेच कर्तव्य आहे. तुम्हा-आम्हा सगळ्यांच्याच वतीने ‘लोकसत्ता’ने हा वसा घेतला आहे..

सुती डायपर्सची निर्माती

उद्योजकपल्लवी उटगी

बाळ झाल्यावर घरातील जुन्याजाणत्या महिलांकडून त्याच्या नैसर्गिक विधीसाठी लंगोट वापरण्याचा सल्ला दिला जातो. बाळाला त्रास होणार नाही आणि पर्यावरणासाठी पूरक असतील, असे डायपर्स बनवण्यासाठी काय करता येईल यावर नाशिक येथील पल्लवी उटगी यांनी विचार सुरू केला. त्यातूनच जन्माला आला सुती कपडय़ापासून तयार केलेल्या डायपर्सचा सुपरबॉटम्स हा ब्रँड. पुण्यातील कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून अभियांत्रिकीची पदवी घेतलेल्या उटगी यांच्या या उत्पादनाची स्वामित्व हक्कासाठी (पेटंट) नोंदणी झाली आहे.

सुपरबॉटम्ससाठी वापरण्यात येते ते कापड ऑरगॅनिक कॉटनपासून बनवलेले असते. या तलम आणि मऊ कापडाचे पाच, सहा थर असतात आणि त्यावर कोरडेपणा देणाऱ्या एका कापडाचा थर असतो.  बाळाच्या त्वचेला त्यापासून नुकसान होत नाही.

सद्य:स्थितीत नाशिकसह मुंबई, पुणे, चेन्नई, पंजाब, दिल्ली तसेच कतार, अमेरिका या देशांमध्येही संकेतस्थळावर जाऊन या सुती डायपरची मागणी नोंदविता येते. २०२० मध्ये त्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. सुपरबॉटम्ससाठी वापरण्यात येतं ते कापड ऑरगॅनिक कॉटनपासून बनवलेलं असतं. या अतिशय तलम आणि मऊ कापडाचे पाच सहा थर असतात आणि त्यावर कोरडेपणा देणाऱ्या एका कापडाचा थर असतो. तोही कापडाचाच असल्याने बाळाच्या त्वचेला त्यापासून काहीही नुकसान होत नाही. हा एक डायपर धुऊन  दोनशे ते तीनशे वेळा वापरता येतो. बाजारात मिळणाऱ्या डायपर्सच्या तुलनेत हे डायपर्स अर्थातच खूपच कमी प्रमाणात लागतात. सद्य:स्थितीत त्यांच्याकडे ८० महिला कर्मचारी आहेत. सुपरबॉटम्सला सर्वाधिक मागणी ऑनलाइन असते. वाढता प्रतिसाद पाहता अन्य उत्पादने आणण्याचा त्यांचा मानस आहे.

उल्लेखनीय कबड्डीपटू

क्रीडारिशांक देवाडिगा

रिशांक देवाडिगाची कबड्डीमधील सर्वोत्तम चढाईपटूंमध्ये गणना केली जाते. त्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने २०१७-१८ च्या हंगामात वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. दुबई येथे २०१८ मध्ये झालेल्या कबड्डी मास्टर्स स्पर्धेत भारतीय संघ विजेता ठरला होता. या यशात रिशांकचेही योगदान होते. आक्रमक चढाईपटू अशी  रिशांकची ओळख आहे.  प्रो कबड्डी लीगमध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी ‘यू मुम्बा’ संघाकडून खेळताना तिसऱ्या हंगामात झाली. त्याने या हंगामातील १६ सामन्यांत ११५ गुणांची कमाई केली. या हंगामात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या चढाईपटूंच्या यादीत रिशांक दुसऱ्या क्रमांकावर होता.

खेळाची पार्श्वभूमी नसताना रिशांक देवाडिगाची आतापर्यंतची कबड्डीमधली वाटचाल  ही खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. जिद्द आणि चिकाटीच्या बळावर तो आज भारतीय कबड्डीमधील एक नामांकित खेळाडू म्हणून नावारूपास आला आहे.

रिशांकने वयाच्या सातव्या वर्षी कबड्डी खेळण्यास सुरुवात केली. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे बारावी पास झाल्यावर रिशांकने एका हॉटेलमध्ये वेटरची नोकरी केली. परंतु त्याचे कबड्डीकडे कधीही दुर्लक्ष झाले नाही. त्याने जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धामधील कामगिरीमधून सर्वाचे लक्ष वेधून घेतले. प्रो कबड्डी लीग त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. त्याने ‘यू मुम्बा’कडून या लीगमध्ये पदार्पण केले. मग पाचव्या हंगामात ‘यूपी योद्धा’ने त्याला संघात समाविष्ट करून घेतले. सहाव्या हंगामात त्याला याच संघाने कायम ठेवले. त्या वेळी त्याला एक कोटीहूनही अधिक रक्कम मिळाली. कबड्डीतील उल्लेखनीय कामगिरीसाठी त्याला २०१८-१९ मध्ये शिवछत्रपती या सर्वोच्च क्रीडा पुरस्काराने गौरविण्यात आले. खेळाची पार्श्वभूमी नसताना रिशांकची ही वाटचाल वाखाणण्याजोगी आहे.

खेळाडूंसाठी योगदान

क्रीडाअदिती मुटाटकर

महाराष्ट्राची माजी आंतरराष्ट्रीय बॅडिमटनपटू असलेल्या अदिती मुटाटकर -आठल्येकडे महिला एकेरीतील सगळय़ा वयोगटांमधील नॅशनल चॅम्पियनशिपचा मान आहे. २००८ मध्ये जागतिक क्रमवारीत २७ वे स्थान आणि २०१० मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत पदक अशी अदितीची कारकीर्द आहे. मुलींसाठी त्यातही ग्रामीण भागातल्या मुला-मुलींसाठी आजही खेळात करिअर ही अवघड वाट आहे. त्यांच्यासाठी शारीरिक शिक्षण, निधी उभारणीसाठी निश्चित कार्यक्रम तयार करण्यासाठी अदितीने योगदान दिले. अदिती सांगते, मुलांची संख्या आणि खेळासाठी आवश्यक संसाधने यांचे प्रमाण व्यस्त असते. त्यामुळे काही मोजक्या मुलांनाच खेळायला मिळते. मुलींना तर अनेकदा संधीच मिळत नाही. एका सर्वेक्षणानुसार बहुसंख्य मुली मासिक पाळीमुळे खेळ सोडतात.

खेळाच्या क्षेत्रात करिअर करणाऱ्या मुलींचं प्रशिक्षण, स्पर्धा या त्यांच्या मासिक पाळीचा विचार करून आखल्या जाव्यात. त्यासाठी मासिक पाळीबाबत जागरुकता, त्या काळातील आरोग्याची काळजी याची चर्चा व्हावी यासाठी आदितीचे काम सुरू आहे.

सिंपली स्पोर्ट्स या स्टार्टअपबरोबर जोडली गेल्यावर अदितीने सिंपली पिरियड्स हा उपक्रम हाती घेतला. त्याचा परिणाम म्हणजे आज बंगलोरमध्ये प्रशिक्षकांसाठी असलेल्या अकॅडमीच्या अभ्यासक्रमात मासिक पाळी आणि त्याचा खेळावर होणारा परिणाम हा अभ्यास विषय म्हणून निवडण्यात आला आहे. खेळाच्या क्षेत्रात करिअर करणाऱ्या मुलींचं प्रशिक्षण, स्पर्धा या त्यांच्या मासिक पाळीचा विचार करून आखल्या जाव्यात. त्यासाठी मासिक पाळीबाबत बोलणे, त्या काळातील आरोग्याची काळजी, सॅनिटरी पॅड्स, मेन्स्ट्रल कप यांसारख्या गोष्टींचे पर्याय मुलींना माहिती व्हावेत असे प्रयत्न सिंपली स्पोर्ट्स आणि सिंपली पिरियड्सकडून केले जातात.

स्ट्रिंग थिअरीचा अभ्यासक

संशोधनअभिजीत गद्दे

आ यआयटी मुंबई या संस्थेतून तंत्रज्ञान विषयात पदवी प्राप्त करणाऱ्या अभिजीत गद्दे याने त्यानंतर अमेरिकेच्या न्यू यॉर्क येथील स्टोनी ब्रूक विद्यापीठातून पीएचडीचे शिक्षण पूर्ण केले आहे. विज्ञान क्षेत्रात रमलेला अभिजीत आज सैद्धांतिक भौतिक शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असून, स्ट्रिंग थिअरी हा त्याच्या अभ्यासाचा विषय आहे. सुपरकॉन्फॉर्मल फील्ड थिअरीवर अभिजीतने संशोधन केले आहे. सध्या तो मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत कार्यरत आहे. विविध विज्ञानविषयक नियतकालिकांत त्याचे आजवर ३५ शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांचा दोन हजार ३८० वेळा इतर संशोधकांनी संदर्भ वापर (सायटेशन) केला गेला आहे. अभिजीत सध्या पीएचडीच्या तीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. त्याचा एक विद्यार्थी या वर्षांच्या शेवटी इस्रायल येथे पोस्टडॉक्टरल संशोधनासाठी जाणार आहे.

सुपरकॉन्फॉर्मल फील्ड थिअरीवर अभिजीतने संशोधन केले आहे. सध्या तो मुंबईतील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत कार्यरत आहे. त्याचे आजवर ३५ शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांचा दोन हजार ३८० वेळा इतर संशोधकांनी संदर्भ वापर (सायटेशन) केला आहे.

जिज्ञासू व संशोधक वृत्तीचा अभिजीत टाटा मूलभूत संशोधन संस्थेत गणित आणि क्वांटम फील्ड सिद्धांतावर अध्यापनही करतो. अभिजीतला आजवर  रामानुजन फेलोशिप (भारत सरकार २०१७), जॉन मॅककोन फेलोशिप (कॅलिफोर्निया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी २०११), सर्वोत्कृष्ट प्रबंध पुरस्कार (अमेरिकेच्या न्यू यॉर्क येथील स्टोनी ब्रूक विद्यापीठातून २०११ साली), राष्ट्रपती रौप्य पदक (आयआयटी मुंबई २००६), राष्ट्रीय प्रतिभा शोध शिष्यवृत्ती असे विविध पुरस्कार मिळाले  आहेत. पदार्थाच्या अतिसूक्ष्म अवस्था उलगडून भविष्यातील विज्ञानाला दिशा देण्याचे संशोधनकार्य तो करतो आहे.

अपंगांचा प्रेरणास्रोत

अनघा मोडक मुलाखतकार

डें ग्यू झाल्यानंतर अनघा मोडकला दृष्टी गमवावी लागली. ही गोष्ट २०१४ सालची. अचानक आलेल्या या संकटावर मात करत अनघा आज अनेकांसाठी प्रेरणास्रोत बनली आहे. तिने आकाशवाणी, अनेक सांगीतिक कार्यक्रम आणि दूरचित्रवाणीवरून प्रेरणादायी भाषणे, व्याख्याने आणि चर्चासत्रे दिली आहेत. ती स्वत: एक मुलाखतकार, रेडिओ जॉकी आणि लेखिका आहे. अनघाने पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. सैन्यदलाविषयी प्रचंड निष्ठा असल्याने वीरमाता अनुराधा गोरे यांच्या उपक्रमांच्या माध्यमातून ती काम करते आहे.

अनघा जगातील दूरचित्रवाहिन्यांच्या इतिहासातील ती पहिलीच दृष्टिहीन सूत्रसंचालक आहे. दृष्टीहिन व्यक्ती लाइव्ह शोचे निवेदनही तितक्याच समर्थपणे करू शकते, मंचावरही लीलया वावरू शकते, हा विश्वास तिच्यामुळे अनेक अपंग बंधू-भगिनींना मिळाला.

आजाराने आलेले अंधत्वाचे संकट सकारात्मकतेने स्वीकारल्यावर आज अनघा अशा अनेक अपंगांसाठी प्रेरक असे उदाहरण ठरते आहे. दृष्टीहिन व्यक्ती लाइव्ह शोचे निवेदनही तितक्याच समर्थपणे, सहजपणे करू शकते, मंचावरही लीलया वावरू शकते हा विश्वास तिच्यामुळे अनेक अपंग बंधू-भगिनींना मिळाला. जळगावच्या दीपस्तंभ संस्थेच्या मनोबल प्रकल्पासाठी गेली तीन वर्षे अनघा सल्लागार व प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. वर्षांतील काही दिवस तेथील अपंग तसेच सर्वसामान्य विद्यार्थ्यांना ती संवादकौशल्य शिकवते, संज्ञापनातील बारकावे उलगडून दाखवते आणि याद्वारे सर्वाना स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी बहुमोल असे मार्गदर्शन लाभते. छायाचित्रकलेचा डिप्लोमा आणि गायनाचे धडेही अनघाने गिरवले आहेत. मुंबई आकाशवाणीवरील एक सुप्रसिद्ध निवेदिका म्हणून ती ओळखली जाते. जगातील दूरचित्रवाहिन्यांच्या इतिहासातील ती पहिलीच दृष्टिहीन सूत्रसंचालक आहे.

आव्हानांवर चढाई

हर्षांली वर्तक गिर्यारोहण

वसईच्या सागरशेत मांडलई परिसरात राहणाऱ्या हर्षांली वर्तकने वयाच्या दहाव्या वर्षी गिर्यारोहणाला सुरुवात केली. गेली २० वर्षे ती या क्षेत्रात असून हर्षांलीने महाराष्ट्रासह देशविदेशात अनेक शिखरे सर केली आहेत. गिर्यारोहणात पाऊल टाकण्याआधी हर्षांलीने उत्तराखंड येथील ‘नेहरू इन्स्टिटय़ूट ऑफ माऊंटेनीअरिंग’ या संस्थेतून गिर्यारोहणाचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले. याशिवाय ट्रेकिंगचे लष्करी प्रशिक्षणही तिने घेतले. वयाच्या दहाव्या वर्षी हर्षांलीने उंचच उंच भासणारा चिंचोटीचा डोंगर सर केला.

हर्षांलीने महाराष्ट्रासह देशविदेशात मोहिमा केल्या आहेत. त्यात पीर पांजाल, माऊंट फ्रेंडशिप, माऊंट हनुमान टिब्बा, माऊंट युनाम, माऊंट मॅनथोसा, माऊंट डी. के. डी. माऊंट फुजी, माऊंट किलीमंजारो, माऊंट इलंबस, माऊंट चंद्रभागा  १४ यांचा समावेश आहे.

येथूनच हर्षांलीच्या गिरिभ्रमण आणि गिर्यारोहणाला सुरुवात झाली. २००९ पासून हर्षांलीच्या गिर्यारोहणाला सिक्किमच्या ‘संदफ गुरद्’ या मोहिमेतून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सह्याद्री पर्वतरांगांतील गडांमध्ये कळसुबाई, नाणेघाट, लोहगड, हरिश्चंद्रगड, राजगड, तोरणा, कलावंतीण असे अनेक ट्रॅक तिने पूर्ण केले आहेत. त्याशिवाय हर्षांलीने फ्रेण्डशिप पीक, पीर पांजाल, माऊंट फ्रेंडशिप, माऊंट हनुमान टिब्बा, माऊंट युनाम, माऊंट मॅनथोसा, माऊंट डी. के. डी. माऊंट फुजी, माऊंट किलीमंजारो, माऊंट इलंबस, माऊंट चंद्रभागा – १४ अशा मोहिमा यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. १० फेब्रुवारी २०२३ ला नॅशनल अ‍ॅडव्हेंचर क्लब (भारत) चंडीगड येथे पार पडलेल्या सोहळय़ात तिला ‘अदम्य साहस पुरस्कार’ देण्यात आला. तिला ‘वसई गुणवंत गौरव पुरस्कार २०२२’ देऊन गौरवण्यात आले आहे. मावळा प्रतिष्ठानकडून  ‘हिरकणी’ पुरस्कार देऊन तिला गौरवण्यात आले आहे.

वाहतूक क्षेत्रातील प्रयोग

तेजस्वी सातपुते प्रशासन

तेजस्वी सातपुते या २०१२ च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत. कर्तव्यकठोर पोलीस अधिकारी म्हणून त्या परिचित आहेत. त्यांनी पोलीस दलाला अधिकाधिक समाजाभिमुख करण्यासाठी राबवलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे  समाजामध्ये पोलीस दलाच्या प्रतिमेबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांचे नीतिधैर्यही उंचावले. तेजस्वी यांना शहीद वैमानिक निर्मलसिंग यांच्या जीवनावर एक धडा होता. तो वाचून त्यांना वैमानिक होण्याची इच्छा झाली होती; पण चष्मा लागल्यामुळे त्यांचे हे स्वप्न अपुरे राहिले. पुढे विज्ञान विषयात पदवी घेतल्यानंतर  बंगलोर येथे सीएनआर राव यांनी शास्त्रज्ञ घडविण्यासाठी सुरू केलेल्या एनसी एएसआर या तीन वर्षांच्या संशोधनपर अभ्यासक्रमासाठी त्यांची निवड झाली. २००९ साली त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.

तेजस्वी सातपुते यांनी  पोलीस दलाला अधिकाधिक समाजाभिमुख करण्यासाठी उपक्रम राबवले. त्यांच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमांमुळे  समाजामध्ये पोलीस दलाच्या प्रतिमेबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांचे नीतिधैर्यही उंचावले.

पहिल्या प्रयत्नात थोडक्यात यश हुकले. दुसऱ्या प्रयत्नात २०१२ साली देशात १९८ वा क्रमांक मिळवून त्या आयपीएस झाल्या. फेब्रुवारी २०१४ ते सप्टेंबर २०१६ या काळात परीक्षाधीन कालावधी त्यांनी जळगाव येथे पूर्ण केला. त्यांची नेमणूक जालना जिल्ह्यातील परतूर येथे सहायक पोलीस अधीक्षक म्हणून झाली. तिथे त्या डिसेंबर २०१४ ते एप्रिल २०१६ दरम्यान होत्या. नंतर त्यांची नेमणूक राज्य गुप्तचर विभागात पोलीस अधीक्षक तेथून त्यांची बदली पुणे ग्रामीणला झाली.  पुणे जिल्ह्याच्या उत्तर विभागाच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक म्हणून त्या सव्वा वर्ष कार्यरत होत्या. नंतर पुणे शहर पोलीस दलात उपायुक्त (वाहतूक) या पदावर असताना पुण्याच्या वाहतुकीत त्यांनी केलेल्या यशस्वी प्रयोगांची विशेष चर्चा झाली.

आता लक्ष्य ऑलिंपिकचे

रुद्रांक्ष पाटीलक्रीडा

रुद्रांक्ष पाटील हा नेमबाजीच्या १० मीटर एअर रायफल प्रकारात जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणारा खेळाडू आहे. १९ वर्षीय रुद्रांक्षने जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत वैयक्तिक आणि सांघिक अशी दोन सुवर्णपदके पटकावली आहेत. ‘प्रेसिडेंट चषक’ नेमबाजी स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावणाऱ्या रुद्रांक्षने आतापर्यंत  १० हून अधिक आंतरराष्ट्रीय आणि २६ राष्ट्रीय पदके मिळवली आहेत. २०२२ च्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा आणि राष्ट्रीय स्पर्धा, तसेच कैरो येथे झालेल्या जागतिक एअर रायफल नेमबाजी स्पर्धेत त्याने सुवर्णपदकाची कमाई केली होती. या कामगिरीच्या आधारे त्याने पॅरिस येथे होणाऱ्या २०२४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. 

१९ वर्षीय रुद्रांक्षने जागतिक स्तरावर लौकिक सिद्ध करताना जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत वैयक्तिक आणि सांघिक अशी दोन सुवर्णपदके पटकावली आहेत. प्रेसिडेंट चषकनेमबाजी स्पर्धेतही सुवर्णपदक  मिळवले आहे.

रुद्रांक्षचे वडील बाळासाहेब पाटील हे पालघरचे पोलीस अधीक्षक आणि आई हेमांगिनी पाटील या परिवहन विभागाच्या अधिकारी आहेत. रुद्रांक्ष सध्या मुंबई विद्यापीठात कला शाखा प्रथम वर्ष (बीए) पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. वडिलांसमवेत ठाण्यातील एका नेमबाजी केंद्राचे उद्घाटन करण्यास गेला असता वडिलांच्या आग्रहास्तव रुद्रांक्षने नेमबाजीचा सराव सुरू केला. राष्ट्रीय स्पर्धामधील यशस्वी कामगिरीमुळे त्याला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. लहान वयातच त्याने देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. रुद्रांक्षचा राज्य शासनाकडूनही रोख रकमेच्या बक्षिसासह गौरव करण्यात आला आहे. आता पुढील वर्षी पॅरिस येथे ऑलिम्पक स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करून देशाला सुवर्णपदक मिळवून देण्याचे ध्येय रुद्रांक्षने बाळगले आहे.

टाकाऊतून नवनिर्मिती

शशांक निमकर उद्योजक

डिझाइन क्षेत्रातील पदवी आणि इंडस्ट्रियल डिझाइन क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या शशांकने अर्थतत्त्व ही स्वत:ची कंपनी उभारली आहे. तो या कंपनीचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. त्याची ही कंपनी टाकाऊ सिरॅमिकपासून नवीन वस्तूंची निर्मिती करते. पर्यावरणाबद्दल जागृत असलेला वर्ग, ऑरगॅनिक कॅफे आणि रेस्टॉरंट्स, हरित क्षेत्राशी निगडित प्रकल्प, सिरॅमिक इंडस्ट्रीज आणि स्टुडिओ तसेच किरकोळ विक्रेते हे त्याचे ग्राहक आहेत.

त्रुटी राहिलेले, नाकारले गेलेले सिरॅमिक संबंधित उद्योगांकडून अनेकदा फेकून दिले जाते. शतकानुशतके त्याचे विघटन होत नाही. त्यामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होते. या समस्येवर शशांक निमकरने उपाय शोधला आहे.

हजारो वर्षांच्या मानवी संस्कृतीमध्ये सिरॅमिकचा, अर्थात मातीच्या भांडय़ांचा वापर होत असल्याचं जगभरात पुरातत्त्वशास्त्रज्ञांच्या संशोधनातून दिसून आले आहे. कारण सिरॅमिकचे विघटन होत नसल्याने पूर्ण भांडी किंवा तुकडे उत्खननात सापडतात. आजच्या काळातही सिरॅमिकला मागणी आहेच.. पण अनेकदा त्रुटी राहिलेले, नाकारले गेलेले सिरॅमिक उद्योगांकडून फेकून दिले जाते आणि त्यांचे शतकानुशतके विघटन होत नाही. त्यामुळे पर्यावरणीय समस्या निर्माण होते. या समस्येवर शशांक निमकरने उपाय शोधला आहे. नॅशनल इन्स्टिटय़ूट डिझाइनमध्ये शिक्षण घेतलेल्या शशांकनं फेकून दिलेल्या सिरॅमिकच्या पुनर्वापराचे तंत्रज्ञान विकसित केले आणि त्याचे पेटंटही मिळवले. त्यामुळे फेकल्या जाणाऱ्या सिरॅमिकचा पुनर्वापर होऊ लागला आणि सिरॅमिक तयार करण्यासाठीचे उत्खनन ६० टक्क्यांपर्यंत कमी करणे शक्य झाले.  नवकल्पनेतून पर्यावरण जतनासाठी हातभार लावणाऱ्या त्याच्या तंत्रज्ञानाची आणि नवउद्यमीची फोब्र्जनंही दखल घेतली आहे.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-03-2023 at 01:27 IST

संबंधित बातम्या