|| प्रदीप आपटे

जी लेणी खोदायला किमान एक-दोन पिढय़ा लागल्या, त्यांचा काहीच आराखडा नसेल का? अर्थातच असेल.. पण भारत धुंडाळायला कुठूनतरी दुरून आलेल्यांकडे नव्हे! या दुरून आलेल्यांनीही नकाशे तयार केले, पण कसे?
सध्याचे जग तांत्रिक सोयीसुविधांनी भरगच्च बहरलेले आहे. अपरिचित ठिकाणी जायचे तर खिशातला गूगलवाटाडय़ा अंगठीतल्या राक्षसासारखा तत्परतेने मार्ग सांगतो.

पृथ्वीवरचे कोठलेही स्थळ हेरणारे, त्या आसपासच्या खाणाखुणा सांगणारे आणि संदेश वाहणारे हरकारे उपग्रह आहेत. पण अशी गरज भागविण्याच्या क्लृप्तींची पहिली पावले पडली ती फारफार पूर्वी!

इतर प्राण्यांशी तुलना केली तर माणसाची अनेक वैशिष्टय़े आहेत. निरनिराळ्या रीतीने चिन्हांचा वापर करणे हे त्यातले एक वैशिष्टय़. भाषा नामक ध्वनी-चिन्ह! या ध्वनींचे चित्ररूप म्हणजे ‘लेखी’ अक्षर! आदिम मानवाने त्याच्या अनुभवांची चित्रे काढून ठेवलेली आढळतात. नकाशा म्हणजे सभोवतालचा परिसर, घटना, जे घडवून आणायचे त्याचे आराखडे (संकल्पचित्र) शेलक्या चित्ररूपाने सूचित करण्याची युक्ती. या व्यापक अर्थाने नकाशांचा इतिहास बराच प्राचीन आहे. ‘चित्र’ हा संस्कृत शब्द ‘अनेक’अर्थी शब्द आहे. (संस्कृत काव्यशास्त्रामध्ये शब्दचित्र, अर्थवाच्य चित्र आणि अलंकारयुक्त कविप्रतिभेचे चित्र असे भेदवर्णन आहे). ग्रीक ‘ग्राफ’ हा छबी आणि प्रतिबिंबसूचक शब्द (आलेख परिलेख ) ‘नक्म्श’ हा रेखाचित्र अर्थाचा अरबी शब्द आहे. तोच मराठीत रूढ झाला. याउलट ज्याच्यावर चित्र रेखाटायचे ते कापड म्हणजे लॅटिन ‘मॅप’. दुसरा वस्तुवाचक लॅटिन शब्द म्हणजे ‘कार्टा’ (अरबी कागज्म)- म्हणजे सालीपासूनचा पापुद्रा.

अज्ञात अनोख्या भागात धाडसाने जाणारे बहुधा कोण असायचे? तर त्या भूभागावर ताबा करू पाहणारे सैनिक किंवा व्यापारी किंवा वाट हरवलेले भटके किंवा चौकस धाडसी प्रवासी. अपरिचित भूभागांत फिरताना धास्ती आणि विस्मय जुळ्या भावांगत सोबतीने येतात. आल्या वाटेने परत फिरायचे तरी त्याच्या काही ना काही खूणगाठी मारत पुढे जावे लागते. स्वत:ला कुठे पोहोचायचे आहे याची अगोदरच खात्री असणारा प्रवासी आणि अशी निश्चित खूणगाठ नसणारा यांच्या चौकशीत आणि नोंदींमध्ये फरक असतो. भारतात अनेक परकीय प्रवासी येऊन गेले. त्यांनी लिहिलेले प्रवासाचे वृत्तांत वाचताना या फरकांची जाणीव ठेवावी लागते.

अपरिचित भूभागाचे वर्णन करण्याच्या अनेक धाटणी आणि पैलू असतात. पूर्वीची बरीचशी वर्णने भाषेवर विसंबलेली आढळतात. त्याच्या जोडीने आराखडावजा रेखाटने असतात. छबी रेखाटण्याची साधने आणि कसब असेल तर कमी-अधिक गुणवत्तेचे चित्ररूप. जी लेणी खोदायला किमान एक-दोन पिढय़ा लागल्या, त्याचे आराखडे तर नक्कीच असणार!
कोणत्याही प्रकाराचा आणि उद्देशाचा अवलंब केला तरी अशा वर्णनातला पहिला महत्त्वाचा पैलू म्हणजे दिशा. दिशा ठरविण्याचा माणसाला गवसलेला आणि आत्मसात झालेला प्राचीन मार्ग म्हणजे आकाशातले दोन तारे – उगवतीचा आणि दिवसभराचा सूर्य आणि रात्रीचा ध्रुव. सूर्याने पूर्व-पश्चिमेची ग्वाही मिळते, तर ध्रुवामुळे उत्तर दिशेची. प्रवासी जमिनीवर असो किंवा चहुबाजूने पाण्याने वेढलेल्या सागरी पृष्ठभागावर; या दोन ताऱ्यांमुळे चार दिशा ठळकपणे ठरविता येतात. दर्यावर्दीना तर या आकाशीच्या ताऱ्यांशिवाय अन्य ‘तरणोपाय’ नसायचा. तारा किंवा नक्षत्राचे उन्नतांश मोजण्याची रीत भारतवर्षांत पूर्वापार विकसित होती. सूर्योदय-सूर्यास्त प्रत्येक ठिकाणी थोडय़ा थोडय़ा वेळेची तफावत राखून घडत जातो याची जाणीव प्राचीन आहे. चोवीस तासांत पृथ्वी फिरते म्हणून तर वरच्या तारांगणाचा उदयास्त होतो. चोवीस तासांत स्वत:भोवती गोल फिरायचे.. तीनशे साठ अंशाची गिरकी. (वर्तुळ म्हणजे तीनशे साठ अंश! हा अंशांचा आकडा सूर्याभोवतीच्या गिरकीला लागणाऱ्या दिवसांचा! ) म्हणजे ताशी पंधरा अंश फिरणे. पण तेच पंधरा अंश चालल्यागत जाणविणारी वेळ ‘भू’वरती निरनिराळ्या ठिकाणी निराळी! ‘सूर्य-सिद्धांत’ उज्जयिनी या केंद्राला आधार करून मोजमाप सांगतो.

दर्यावर्दीची पंचाईत व्हायची ती रेखांश निश्चित नसल्यामुळे. रेखांशाचा प्रश्न सुटल्यावर एकाच अक्षांशावर, पण अभिप्रेत ठिकाणापासून भलत्याच दुरावल्या अंतरावर धडकण्याचे प्रमाण कमी झाले. या क्लिष्ट रेखांश समस्येचे ‘घडय़ाळी’ निराकरण कसे घडले याचा छोटा इतिहास दाव्हा सोबेल लिखित ‘लॉन्जिटय़ूड’ या छोटेखानी पुस्तकात सुबक रेखीवपणे रेखाटला आहे.

आकाशातील नजरेस येणारी नक्षत्र चित्रे हा दर्यावर्दीचा आदिम नकाशा. त्याच बरोबरीने ‘गूढपणे’ सतत उत्तराभिमुखी राहणारी लोखंडी सुई हे दुसरे नकाशा साधन. भूमीवर असो वा अथांग जलधीवर; ही दिशादर्शी सूची आपण आत्ता कुठे आहो आणि कुठल्या दिशेने वाटचाल करायची याचा उलगडा द्यायला अतीव उपकारक होती. बऱ्याच परकीयांकडे हे साधन असे.

बऱ्याच दर्यावर्दी खलाशांचे जहाज किनाऱ्याच्या आसपास पोहोचे तेव्हा दूर अंतरावरून दिसणारी जमिनीची वळणे, कंगोरे लक्षात घेऊन त्याचे ढोबळ चित्र बनवीत. नांगर टाकण्याआधी आसपासचा परिसरदेखील नजरेखाली घालून आणि किनारपट्टीचा जमेल तेवढा आकार अजमावीत त्याचे नजरेस भावेल इतपत रेखाटन करून ठेवीत.
जहाज नांगरून जमिनीवर उतरल्यावरही तसाच उपद्व्याप केला जाई. उतरले तेथील भूमीची ठेवण- उदा. सपाटपणा, चढउतार, डोंगराळपणा, छोटी-मोठी टेकाडी, वाहते किंवा कोरडे होऊन गेलेले जलप्रवाह, माती, नजरेला भासणारे जमिनीचे ‘तुकडे’, विशेष ठळक डोळ्यांत भरणारी झाडे, त्यांच्या पर्णसंभारांच्या छत्र्या किंवा पिसारे यांचे चित्र रेखाटले जाई.

मोजमापे आणि नावे!

अशी ही वैयक्तिक स्मरण, वर्णन आणि ओळखीच्या खुणांची नोंद गोंदण्याची पद्धत! पण भूभागावर चालू लागले की किती अंतर चाललो? एखादे खुणेचे समोरच्या टेकाडापासून किती जवळ किंवा लांब आहे असेही मोजणे ओघाने येते! त्या अंतराची मोजदाद कशी करायची? किती ‘पावले’ किती हात ‘लांबी’, अशी मापे आली. उदा. भारतातली ‘अंगुली’, ‘हस्त’ ते ‘योजना’ किंवा ग्रीकांचा मधल्या बोटाचे टोक ते कोपरापर्यंतचा ‘स्टाडिआ’ ही या मोजमापाची फळे!

हे मोजमाप छोटेखानी कापडावर कसे रेखाटायचे, याचाही सावकाश.. ‘स-अवकाश’.. विचार करणे भाग झाले. एकेकाळी जमिनीचा शेतीसाठी वापर, इतर निसर्गदत्त सामुग्री (उदा. जंगले, पाणी, खनिजे) यांच्या वापराने होणारी फळनिष्पत्ती हाच अर्थव्यवस्थेचा गाभा असे. त्या उत्पादनातला वाटा आणि वापरासाठीचे ‘भाटक’ ऊर्फ भाडे हेच राज्यकर्त्यांचे मुख्य कररूपातले उत्पन्न असे. त्याची मोजदाद, वसुली हिशेब यांसाठीदेखील अशा शब्द आणि चित्ररूप नोंदी फार मोलाच्या असत.

ज्या स्थळी पोहोचलो त्याचे ‘नाव-गाव’, तिथल्या वस्तूंची /वास्तूंची / हुकमत करणाऱ्या राजांची नावे नोंदणे गरजेचे झाले. भाषेप्रमाणे ही नावेसुद्धा अनोखी. ती जशी कानी पडली असे वाटे तशी स्वकीय लिपीत लिहिली जातात. उदा. गोवे मालवणी बोलीतले प्रखर नाकातले उच्चार नोंदताना पोर्तुगीजांना सारखा एम् जोडावेसे भाग पडले. माशेलेंचे मार्सेलिम् ,पोंजेंचे पंजीम किंवा ब्रिटिशांनी केलेले खडकीचे किरकी! (आता हे गोंय कोंकण मंगळूरी सानुनासिकपण बरेच ओसरले आहे!)

ऐतिहासिक नकाशांत कुणी कुठल्या भरवशावर काय ऐकले, कसे नोंदले, नोंदणाऱ्याला मुख्यत: कशात रस होता याचे गडद ठसे राहतातच. जे पाहिले ते सगळेच नोंदले जाते असेही नाही. ईर्षां कितीही असली तरी जे नोंदले ते अगदी हुबेहूब ‘उतरते’च असेही सदासर्वदा होत नाही.. भले नोंदणाऱ्याला तसे भासले तरी! पण नोंदणाऱ्याचे हेतू आणि कार्य त्याच्यापुरते बव्हंशी भागते! अखेरीस नकाशा आकांक्षेपोटी ‘बनवला’ जातो. बनविलेल्या वस्तूत ‘बनवाबनवी’ अजाणतेपणीही येणे स्वाभाविकच! अशा बनवाबनवीपोटी अजूनही तंटे, युद्धे जारी आहेतच.

प्रवासाची साधने वाढली. त्याची वारंवारिता खूप वधारली. नव्या अपरिचित भूभागातल्या नैसर्गिक सामुग्री आणि संभाव्य संपत्तीची नवी पेवे फुटल्यागत झाले आणि व्यापाराजोग्या वस्तू भरभराटल्या. दर्यावर्दीपणाला, नवे प्रदेश धुंडाळण्याला नव्याने प्रोत्साहन मिळू लागले.

त्यामुळे या शब्द-वर्णन आणि चित्र-कृतींना जोम चढला. वस्तूंची, नावांची इतर उपयुक्त वाटू लागलेल्या तपशिलांची लांबण वाढली तसतसे निरनिराळा भर ठेवलेले वर्णन आणि चित्ररूप बनविले जाऊ लागले. जे पूर्वी व्यवसायाच्या जरुरीपुरते आपद्धर्म म्हणून केले जायचे त्याचे घासूनपुसून परजलेले शस्त्र आणि शास्त्र आकार घेऊ लागले. इतके की, ते जणू वसाहतवादाचे ठळक लक्षण वाटावे!

भारतात आलेल्या परकीयांनी जाणता-अजाणता स्वत:च्या केलेल्या आकांक्षांपोटी नकाशांची दुनिया भरभराटीला आली. ‘त्यांच्या’ भारतविद्येतले हे एक लक्षणीय दालन आहे.. त्यातल्या प्रमुख वानगींचा ओझरता आढावा पुढच्या वेळी.
लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक असून ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि विचक्षण अभ्यासक आहेत.

pradeepapte1687@gmail.com