शाहीर सुरेशकुमार वैराळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिंधुताई सपकाळ.. आयुष्यभर नियतीशी दोन हात करत स्वत:चेच आयुष्य सावरायची नौबत जिच्यावर पूर्वायुष्यात आली होती, त्या या माऊलीने पुढे असंख्य अनाथांवर मायेची पाखर घातली. त्यांची आयुष्ये सन्मार्गी लावली..

‘सलामी शस्त्र..

सलामी शस्त्र..

फायऽर..

फिरसे फायऽर..’

स्थळ : पुण्यातील ठोसरपागा स्मशानभूमी. प्रसंग : अनाथांची माता पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचा शासकीय इतमामात पार पडत असलेला अंत्यविधी..

प्लाटून कमांडरचा करडा आवाज घुमत होता आणि त्याबरहुकूम समोरचे लष्करी शिस्तीतील कडक गणवेशधारी पोलीस पथक मानवंदना देत होते. प्रत्येक ‘फायर’गणिक उंचावलेल्या बंदुकींमधून सुटणाऱ्या गोळ्यांचा कडकडाट आसमंतात दुमदुमत होता. तीन वेळा बंदुकीच्या फैरी झाडून झाल्यानंतर बिगुल दुमदुमला आणि शासकीय इतमामाच्या शिष्टाचारानुसार राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित मंत्र्यांनी पुष्पचक्र वाहिले. तमाम जनतेचे प्रतिनिधी म्हणून पुण्याच्या महापौरांनी पुष्पचक्र अर्पण केले. नंतर क्रमाक्रमाने अति वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, अति वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि उपस्थितांनी सिंधुताईंना श्रद्धांजली अर्पण केली. एका चौऱ्याहत्तर वर्षांच्या झंझावाती झुंजीने विराम घेतला.

पोलीस दलाचे जवान देत असलेल्या शिस्तबद्ध मानवंदनेच्या वेळी माझे मन मात्र भूतकाळात ४०-४२ वर्षे मागे सरकत गेले. १९७८-७९ चा तो काळ होता. भंडाऱ्याचे छेदीलालजी गुप्ता हे राज्याच्या मंत्रिमंडळात वनखात्याचे राज्यमंत्री होते. चिखलदरा परिसरातील एका गरीब आदिवासीवर वाघाने किंवा तत्सम वन्यपशूने केलेल्या हल्ल्यात त्याचा डोळा गेला होता. त्याला शासनाकडून मदत नव्हे, नुकसानभरपाई मिळावी यासाठी त्या माऊलीचा आक्रोश सुरू होता. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामध्ये पाळीव प्राणी जायबंदी झाले तर नुकसानभरपाई मिळते. पण माणसाचा एखादा अवयव निकामी झाला तर मात्र भरपाई नाही! हा कायदा अजब आहे, अन्यायकारक आहे असे तिचे म्हणणे होते. त्यासाठी मंत्र्यांची गाठ घेण्याकरिता मंत्रालयाच्या दारातील पोलिसांशी ती हुज्जत घालत होती. पोलिसांनी तिला प्रवेश नाकारला. महिला पोलिसांनी तिला तिथून बाहेर काढले. पण तिने त्यानंतर गेटच्या बाहेर दबा धरून मंत्रिमहोदयांची बाहेर पडणारी गाडी अडवून त्यांच्यापर्यंत आपली फिर्याद पोहोचवलीच.

नक्की पाहा – Video: नकोशी झालेली ‘चिंधी’ ते पद्मश्री पटकावणारी अनाथांची माय… सिंधुताई सपकाळ यांचा जीवनप्रवास

तिला मंत्रालयाच्या वास्तूत प्रवेश नाकारणाऱ्या पोलीस दलाच्या प्रतिनिधींनाच आज तिच्या पार्थिवाला आदराने व अदबीने मानवंदना देताना पाहून मला तो प्रसंग आठवला आणि नकळत डोळ्यांत पाणी तरळले.

कोण होती ती? वर्धा जिल्ह्यातील पिंपरी-मेघे येथील अभिमान साठे यांची कन्या चिंधी. त्याच जिल्ह्यातील माळेगाव (नवरगाव फॉरेस्ट) येथील श्रीहरी सपकाळ यांच्या घरात वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी त्यांची पत्नी म्हणून आलेली सिंधू आयुष्याच्या खडतर प्रवासात नियतीने पदरात टाकलेल्या अगणित अनाथ मुलांना हक्काचे घर, अन्न-वस्त्र-निवारा मिळावा म्हणून पायाला भिंगरी लावून वणवण भटकणारी, अखंड भ्रमंती करणारी, स्वत:चे आयुष्य जाळणारी सिंधुताई.. अगणित अनाथांची माता. अत्यंत प्रतिष्ठेचे शेकडो पुरस्कार प्राप्त झालेली, शासनाने सन्मानाने ‘पद्मश्री’ हा बहुमोल पुरस्कार दिलेली सिंधुताई सपकाळ!

सिंधू ते पद्मश्री सिंधुताई सपकाळ हा तिचा अत्यंत अवघड, अद्भुत, अचंबित करणारा आणि तितकाच खडतर असा प्रवास. त्या प्रवासाचा गेल्या सुमारे ४५ वर्षांपासूनचा मी साक्षीदार.

नक्की पाहा – Photos: माईंची खरी कमाई… सिंधुताईंनी संभाळलेल्या त्या ९ मुलींच्या लग्नाला ३००० पाहुण्यांची हजेरी

शालेय शिक्षण अवघ्या चौथ्या इयत्तेपर्यंत झालेले असले तरी तिला वाचनाची प्रचंड आवड. हातात आलेला कोणताही कागद अधाशासारखा वाचून काढायचा, ही तिची पहिल्यापासूनची सवय. अक्षरश: एकपाठी असल्याने एकदा वाचलेले थेट मेंदूच्या कुपीत साठले म्हणूनच समजा. कविता, गाणी, त्यातल्या त्यात गझल हा तिचा अत्यंत आवडीचा साहित्यप्रदेश. गझल सम्राट सुरेश भट यांचा ‘एल्गार’ त्या काळात प्रकाशित झालेला नव्हता, तरीही त्यातल्या असंख्य रचना माझ्या मुखोद्गत असल्याने मी तिला त्या ऐकवायचो. त्या गझलांमधील जीवघेणी वेदना तिच्या काळजात खोल कुठेतरी रुतून बसायची. भटसाहेबांचे शेकडो शेर तिला मुखोद्गत होते. अफाट स्मरणशक्तीची देणगी होती तिला. श्रीकृष्ण राऊत यांची ‘गुलाल’ ही रचना मी तिला फक्त एकदाच ऐकवली होती. पण ही रचना ती शेवटपर्यंत अगदी तोंडपाठ म्हणायची. भटसाहेबांचे ‘आकाशगंगा’ हे दीर्घकाव्य तिला मुखोद्गत होते. तरुण पिढीतील वैभव जोशी, सुधीर मुळीक, अमित वाघ, ममता हे तिचे आवडते गझलकार. ‘गझलरंग’ मुशायऱ्यांना उपस्थित राहून तरुण गझलकारांच्या शेरांना तिची भरभरून दाद यायची. आणि व्याख्यानात नेमक्या वेळी यातील काही समर्पक शेर आणि कविता तिच्या तोंडून उत्स्फूर्तपणे बाहेर पडायच्या.

महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे यांच्या वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम या कर्मभूमीपासून सुरू झालेला तिचा प्रवास, तिची अत्यंत आवडती दैवते महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि महर्षी कर्वे यांच्या कर्मभूमीत- पुण्यात- येऊन काहीसा विसावला. अनाथ लेकरांना केवळ निवारा किंवा मायेची सावली देऊन उपयोग नाही, ती स्वत:च्या पायावर ताठ कण्याने, कणखरपणे उभी राहिली पाहिजेत याकडे तिचा कटाक्ष होता. त्यासाठी तिने वसतिगृहे उभारली. त्यांच्या शिक्षणाची सोय केली. शिक्षणसंस्था उभारली. गाईंच्या संगोपनासाठी वर्धा येथे गोशाळा उभारली. आणि मग तेच तिचे जीवनकार्य बनून गेले. त्यासाठी केलेल्या सततच्या भटकंतीमुळे तिच्या स्वत:च्या आरोग्याची अक्षम्य हेळसांड झाली. हॉस्पिटलमध्ये असतानाही ती निकटवर्तीयांकडे सातत्याने एकाच गोष्टीची चौकशी करायची.. ‘मुलांचे व्यवस्थित सुरू आहे ना? शाळा सुरू झाल्यात का? मुलांची हेळसांड होऊ देऊ नका..’

नक्की पाहा – Photos : प्रेमाने घास भरवणारी, सर्वांना बाळा म्हणणारी अन्…; अशी होती अनाथांची माय सिंधुताई सपकाळ

मूळच्या गोड आवाजात, ओघवत्या वाणीने, आर्जवी, पण तितक्याच करारी आवेशात समोरच्या जनसमुदायातील सर्वच स्तरांतील श्रोतृवर्गाशी सहज साधला जाणारा सुसंवाद हे तिचे वैशिष्टय़. गाण्याचे शिक्षण घेतले नसले तरी सूर, ताल, लय यांवर विलक्षण हुकमत. साथीला संत तुकाराम, संत जनाबाई, बहिणाबाई, कबीर, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज ते अगदी अलीकडचे तरुण कवी यांच्या सुभाषितवजा रचनांचा परिपाक म्हणून ती व्यक्त करत असलेली आर्त वेदना थेट काळजात घुसल्यामुळे ती वेदना श्रोत्यांना आपलीच वाटायची.

व्यक्तिमत्वातून विभूतिमत्वाकडे सुरू झालेला तिचा प्रवास हा नंतर हळूहळू तिला स्वत:ला समष्टीत विलीन करत गेला आणि ती स्वत:ची राहिलीच नाही. मूलत: ती कारुण्यमूर्ती. साक्षात वात्सल्यसिंधू. तिचे खळखळून हसणे हे वाहत्या निर्झरासारखे निखळ, नितळ आणि निरागस होते. रागही अगदी क्रोध म्हणावा इतक्या पराकोटीचा. संतापली म्हणजे तिच्यासमोर उभे राहायची ममताखेरीज इतर कुणाचीही प्राज्ञा नव्हती. अर्थात हा राग अल्पकालीन असायचा.. आणि नंतर तिच्या डोळ्यांत दाटून यायचा तो! ज्याच्यावर रागावलीय त्याच्याविषयीची अतीव आर्त करुणा, क्षमाभाव तिच्या डोळ्यांतून पाझरू लागायचा.

‘जन्मलो तेव्हाच नेत्री आसवे घेऊन आलो

दे तुझी आकाशगंगा बोल मी केव्हा म्हणालो

विसरून जा विसरून जा

तुजलाच तू विसरून जा

तुझियाच आयुष्याचिया हाकांसवे हरवून जा

काय माझ्या सोसण्याची एवढी झाली प्रशंसा?

काय माझ्याहून माझा हुंदका खंबीर होता?

काय आगीत कधीही आग जळाली होती?

लोक नेतील मला खोल पुरायासाठी..’

या सुरेश भटांच्या ओळी तिच्या अत्यंत आवडत्या.. तेच तिच्या आयुष्याचे सार होते. तिचे अवघे आयुष्य म्हणजे आगीचा लोळ होता. तिच्या अंतिम इच्छेनुसार तिच्या पार्थिवाचे दहनाऐवजी दफन केले गेले.

‘माई गेली नाही, कारण आई कधीही मरत नसते..’ असे उद्गार वाहिन्यांशी बोलताना ममताने काढले. चार तारखेच्या रात्री आठ वाजल्यापासून पाच तारखेला दुपारी दोन वाजता अंत्यविधी संपेपर्यंत ममता सर्व प्रसंगाला अत्यंत धीरोदात्तपणे सामोरी गेली. अंत्यविधीनंतर कॉलेजच्या काळातल्या मैत्रिणी भेटल्या तेव्हा मात्र निग्रहाने दाबून ठेवलेला तिचा आवेग हंबरडय़ाच्या स्वरूपात बाहेर पडला.

शेकडो अनाथांचे मातृत्व निभावण्याच्या ओघात आपण पोटच्या मुलीवर कुठेतरी अन्याय केला याची माईला खंत वाटत होती. काही महिन्यांपूर्वी ममताला आजारपणामुळे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट करावे लागले तेव्हा तिला भेटून जाताना ‘पोरीची काळजी घे,’ असं मी म्हणालो तेव्हा ती हसली आणि म्हणाली, ‘तीच आता माझी आई झाली आहे. आजकाल तीच माझी काळजी घेत असते.’ तिच्या अगणित मुलांची आई होण्याची पाळी नियती इतक्या लवकर ममतावर आणील असे तेव्हा वाटले नव्हते.

(लेखक सुरेश भट गझल मंचाचे संस्थापक-अध्यक्ष आहेत. ) sureshkumarvairalkar@gmail.com

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mother of orphans sindhutai sapkal story of sindhutai sapkal zws
First published on: 09-01-2022 at 01:57 IST