नीलेश पवार

मिरचीचे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे आगार म्हणून नंदुरबारची ओळख आहे. मोठे आणि वैशिष्टय़पूर्ण उत्पादनामुळे देशभर नंदुरबारच्या मिरचीची चर्चा असते. या मिरचीचे अस्तित्व टिकवत पारंपरिक वाणांचे जतन केले तर नंदुरबारच्या मिरचीचे वैभव पुढच्या पिढीपर्यंत जाणार आहे.

Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
dhule crime news, dhule gutkha transport marathi news,
साड्यांच्या गठ्ठ्यांआडून गुटख्याची वाहतूक, धुळे जिल्ह्यात साडेदहा लाखाचा मुद्देमाल जप्त
worth rupees 15 lakh Gutkha tranceport revealed during inspection on Kolhapur road
कोल्हापूर रोडवर तपासणीत १५ लाखाची गुटखा वाहतूक उघड
Naxalites killed
बालाघाट जिल्ह्यात पोलीस – नक्षल चकमकीत दोन नक्षलवादी ठार

मिरचीचे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदुरबारमध्ये यंदा रोगराई टळल्याने मिरचीचे पीक जोमात आले आहे. घाऊक बाजारात आवक चांगलीच वाढली. तिला चांगला भाव देखील मिळत असल्याने शेतकऱ्यांना सुखद अनुभूती मिळत आहे. मिरचीच्या जुन्या वाणांमध्ये रोग प्रतिकारक्षमता अधिक असून त्यांच्या विकासाकडे अधिक लक्ष देण्याची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे. मिरचीवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांसमोर विविध अडचणी आहेत. त्या दूर करण्यासाठी प्रयत्न झाल्यास नंदुरबारचे गतवैभव कायम राखता येईल.

मिरचीची सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या दक्षिणेतील गुंटुर परिसरात यंदा अतिवृष्टीचा फटका बसल्याने नंदुरबारच्या मिरचीच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली. त्यामुळे स्थानिक पातळीवर आवक वाढत असूनही भाव तेजीत आहे. नंदुरबारचे फापडा, शंकेश्वरी, जहरिली हे जुणे वाण परिसराचे वैभव मानले जात होते. नंतर व्हीएनआर २७७, लाली, तेजा या सारखे संकरीत वाण आले. खत, पाण्याला साद देणाऱ्या या नवीन वाणांची उत्पादनक्षमता अधिक असल्याने ती शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली. जुन्या वाणांचे क्षेत्र कमी झाले. ते वाढविण्यासाठी पारंपरिक वाणांना नवीन तंत्रज्ञानाची जोड देण्याची गरज तज्ज्ञ मंडळी व्यक्त करतात. जुन्या वाणांमध्ये रोग प्रतिकारक्षमता अधिक आहे. त्यामुळे नंदुरबारमध्ये मिरची संशोधन केंद्राची आवश्यकता वारंवार मांडली जाते. एकात्मिक कीड नियंत्रण कार्यक्रमाने उत्पादन वाढीस हातभार लागला.

जिल्ह्यात सध्या साडेतीन हजार हेक्टरवर मिरचीची लागवड केली जाते. दशकभरापूर्वी लागवडीचे क्षेत्र अधिक होते. मिरचीच्या तुलनेत कापसाला मिळणारा भाव आणि एकरी उत्पन्न यामुळे अनेक जण कापसाकडे वळले. यंदाची बाजारातील स्थिती मिरची उत्पादकांना उभारी देणारी आहे. यंदा मिरचीचा हंगाम चांगला राहण्याची प्रमुख दोन कारणे मानली जातात. एकतर पहिल्या दोन महिन्यांत वळीव आणि इतर पाऊस हा मध्यम, रिमझिम स्वरूपात झाला. एकाच दिवशी ५० मिलीमिटरची नोंद होण्यासाठी जुलैचा महिन्याचा शेवट उजाडला. मिरचीची लागवड जुलै महिन्याच्या अखेरीस होत असते. साठलेल्या किंवा जास्त झालेल्या पावसामुळे मूळ कुजवा, पीजारीयम आणि बुरशीजन्य रोगांना तोंड द्यावे लागते. कमी पावसाने यंदा मिरचीचे नेहमी होणारे नुकसान टळले. अपुऱ्या पावसामुळे रसशोषक किडीला पोषक असणारी बागायती आणि कोरडवाहू कापसाची लागवड उशिरा झाली. त्यामुळेच रसशोषक किडीचा प्रादुर्भाव लांबला. प्रारंभीचे दोन महिने हे मिरची पिकासाठी पोषक ठरल्याने उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे सांगितले जाते.

प्रक्रिया उद्योगासमोरील प्रश्न

जिल्ह्यात मिरचीवर प्रक्रिया करणारे ३२ उद्योग कार्यरत आहे. त्यांच्याकडून मुख्यत्वे मिरचीची मोठय़ा प्रमाणात खरेदी देखील होत असते. जमिनीवर मिरची सुकवून तिच्यावर प्रक्रिया केली जाते. कधीकाळी नंदुरबार शहरालालगत असलेल्या मिरचीच्या पथाऱ्या शहरीकरणामुळे आता ग्रामीण भागात विस्तारत आहे. अवकाळीने पथारीवरील मिरच्यांचे नुकसान सहन करावे लागते. पथारीसाठीच्या खर्चाचा मोठा भार सहन करावा लागत असल्याचे उद्योजक सांगतात. नंदुरबारच्या प्रक्रिया केलेल्या मिरचीला मोठी मागणी आहे. मात्र दळणवळणाच्या साधनांअभावी ती बाहेरच्या राज्यात नेण्यास व्यापाऱ्यांना अडचणी येतात. नंदुरबारची मिरची मुंबई, केरळमार्गे निर्यात होत असल्याने त्याचा स्थानिक पातळीवर थेट लाभ मिळत नाही. १०० किलो ओली मिरची सुकवून त्यातून २० किलो मिरची भुकटी (तिखट) हाती लागते. मिरची पथारींसाठी विमा कवच मिळत नसल्याने दरवर्षी लाखोंचे नुकसान सहन करावे लागत असल्याचे सांगितले जाते.

मिरची तोडण्यापासून ते पथारीवर सुकविणे, देठ काठणी, चाळणी, प्रक्रिया उद्योगातील हाताळणी या कामातील मजुरांचे वेगळे प्रश्न आहेत.

शासनाने जाहीर केलेले चिली पार्क अर्थात मिरची केंद्र अद्याप कागदावर आहे. त्यामुळे मिरची कोठारात मिरची उद्योग हवा तसा नावारूपास आला नाही. दोन-तीन वर्षांपूर्वी मिरचीची आवक देखील कमी झाली. मिरची भुकटीला मागणी वाढल्याने व्यापाऱ्यांना थेट गुंटुरवरूनच मिरची मागवावी लागली होती. या परिस्थितीतून मिरची उत्पादन व प्रक्रिया उद्योग मार्गक्रमण करत आहे.

यंदा मिरचीला कमी पर्जन्यमानाचा फटका बसण्याचा अंदाज व्यक्त झाला होता. पण, तो फोल ठरला. उलट पोषक वातावरण तयार झाल्याने आणि रोगराईपासून देखील हे पीक वाचले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरचीची आवक वाढली आहे. आणखी तीन महिने मिरचीचा हंगाम चालणार आहे. या वर्षी आतापर्यंतचा सर्वात जास्त म्हणजे दोन लाख क्विंटल आवकचा टप्पाही पार पडेल, असे बाजार समितीला वाटते. पाच वर्षांची सरासरी पाहता गेल्या वर्षी करोनाच्या काळात मिरचीची आवकच कमी झाल्याने कमाल भाव आणि किमान भाव देखील जास्त मिळाला होता. यंदा आवक वाढूनही आतापर्यंत सर्वाधिक भाव मिळून तो कायम आहे.

पाच वर्षांतील आवक आणि दर

मागील काही वर्षांची आकडेवारी आणि भाव पाहिल्यास चालू वर्षांचे वेगळेपण लक्षात येईल. २०१७-१८ वर्षी ६५ हजार क्विंटल मिरचीची आवक झाली. तिला सरासरी २०५० रुपये दर मिळाला. त्यापुढील २०१८-१९ वर्षांत एक लाख ८५ हजार क्विंटल आवक होऊन सरासरी २९७० रुपये भाव राहिले. २०१९-२० या वर्षांत एक लाख ५६ हजार क्विंटल आवक झाली तर क्विंटलला सरासरी २१०० रुपये भाव मिळाल्याची नोंद आहे. गतवर्षी म्हणजे २०२०-२१ मध्ये आवक ८५ हजार क्विंटलपर्यंत घसरली. सरासरी ३०५० रुपये भाव मिळाला. २०२१-२२ या चालू वर्षांत आतापर्यंत सव्वालाख क्विंटल मिरचीची आवक झाली असून तिला सरासरी ३२०० रुपये दर मिळाला.