सागरी महासत्तेकडे भारतीय नौदलाची वाटचाल

भारतीय संरक्षण दलाच्या तीन प्रमुख अंगांपैकी एक असलेल्या भारतीय नौदलाचा संख्याबळानुसार जागतिक क्रमवारीत पाचवा क्रमांक लागतो. नौदलाच्या हवाई विभागातील पाच हजार, दोन हजार मरिन कमांडो (माकॉस) यांच्यासह ५५ हजार नौसैनिक, देशाच्या सागरी सीमांचे डोळ्यांत तेल घालून संरक्षण करीत असतात.

भारतीय संरक्षण दलाच्या तीन प्रमुख अंगांपैकी एक असलेल्या भारतीय नौदलाचा संख्याबळानुसार जागतिक क्रमवारीत पाचवा क्रमांक लागतो. नौदलाच्या हवाई विभागातील पाच हजार, दोन हजार मरिन कमांडो (माकॉस) यांच्यासह ५५ हजार नौसैनिक, देशाच्या सागरी सीमांचे डोळ्यांत तेल घालून संरक्षण करीत असतात. विमानवाहू आयएनएस विराटसह नौदलाच्या ताफ्यात १५५ हून अधिक नौका आहेत. नैसर्गिक आपत्तीवेळच्या मदतकार्यातील सहभागासह, देशविदेशातील बंदरांना भेटी, संयुक्त सराव, मानवतेच्या भूमिकेतून घेतलेल्या मोहिमांमधील सहभाग यांच्या आधारे नौदल आंतरराष्ट्रीय संबंध वृिद्धगत करण्यास मदत करते. एकत्रितरीत्या राष्ट्राच्या हितासाठी काम करण्याच्या भूमिकेतून देशाच्या सागरी संरक्षण धोरणाच्या आधारे नौदल सागरी सामथ्र्य वाढविण्याचा प्रयत्न करीत असते.
भारतीय उपसागराच्या हद्दीत महापूर, त्सुनामीसारख्या नैसर्गिक आपत्ती किंवा आक्रमणाच्या वेळी आलेल्या प्रसंगांचा मुकाबला करताना तातडीची मदत पुरविण्यात नौदलाने नेहमी मोलाची कामगिरी बजावली आहे. संरक्षण दलातील लष्कर व हवाई दलाच्या बरोबरीने नौदल अनेक महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. विदेशी आक्रमणापासून नागरिकांचे सीमेचे संरक्षण करणे, आक्रमकांना परतवून लावणे आणि आक्रमणांपासून त्यांना परावृत्त करणे ही तर मुख्य भूमिका भारतीय तटरक्षक दलाच्या मदतीने युद्ध व शांततेच्या काळात सागरी हितांचे रक्षण करणे, सागरी प्रभुत्व वाढविणे, देशाच्या आर्थिक, राजकीय, संरक्षण उद्दिष्टांची अंमलबजावणी करणे, देशाच्या सागरी हद्दीमध्ये स्थिरता व सुस्थिती राखणे, नैसर्गिक आपत्तीवेळी सागरी साहाय्य करणे, बहुकेंद्रीय आर्थिक सुरक्षित विश्वासाठी महत्त्वाची भूमिका बजावणे आदी कार्यामध्ये नौदल सहभागी होत असते.
द्विपक्षीय संबंध सुधारण्यासाठी व मजबूत करण्यासाठी दरवर्षी विविध देशांच्या नौदलाबरोबर संयुक्त सराव आयोजित केला जातो. दरवर्षी होणाऱ्या सरावांमध्ये फ्रान्सच्या नौदलाबरोबर होणाऱ्या वरुणा, इंग्लंडच्या नौदलाबरोबरच्या कोकणा, रशियाच्या नौदलाबरोबरच्या इंद्रा, अमेरिकी नौदलाबरोबरच्या मलबार आणि सिंगापूरच्या नौदलाबरोबरच्या सिम्बेकस सरावाचा समावेश आहे.
नौदलाचे आधुनिकीकरणसागरी संरक्षणाबाबतची दूरदृष्टी व नियोजनानुसार आपली क्षमता वाढविण्याच्या दिशेने नौदलाने लक्षणीय कामगिरी केली आहे. गेल्या तीन वर्षांत सागरी क्षमता दृष्टिकोन नियोजन २०१२-२७, बारावे नियोजन धोरण आणि बारावे मूलभूत संरचना नियोजनाचे लेखी सादरीकरण केले आहे. मार्चअखेर संपलेल्या अकराव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात २ लाख ७० हजार कोटींची सुमारे दोनशे कामे प्रगतिपथावर आहेत. गेल्या तीन वर्षांत विक्रमी १५ जहाजे नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहेत. यामध्ये शिवालिक, सातपुरा, सहय़ाद्री ही लढाऊ जहाजे, दीपक व शक्ती ही फ्डीट टँकर, नौदलाच्या सागरातील प्रशिक्षण देणाऱ्या सुदर्शनी लढाऊ नौका आयएनएस तेग व आठ वॉटर जेट एफएसीज यांचा समावेश आहे. अण्वस्त्रवाहू पाणबुडी आयएनएस चक्र २३ जानेवारीला नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली हा नौदलाच्या इतिहासातील सुवर्णक्षण. यामुळे अण्वस्त्रवाहू पाणबुडीची क्षमता असणाऱ्या सहा देशांच्या यादीत भारताचा समावेश झाला आहे. यामुळे आपल्या सागरी सामर्थ्यांत लक्षणीय वाढ होण्याबरोबर भविष्यातील सागरी संरक्षणाच्या धोरणाला आकार देण्यात चक्र मोलाची भूमिका बजावेल. आण्विक शक्तीवर चालणारी अरिहत पाणबुडी ताफ्यात दाखल होण्याच्या दिशेने वेगाने प्रगती करीत असून, नजीकच्या काळात नौदलाच्या सामर्थ्यांचे ती एक महत्त्वाचे अंग बनेल हे नक्की. अण्वस्त्रांचा प्रथम वापर करावयाचा नाही, या आपल्या सिद्धांताची जगभर प्रशंसा होत असली तरी प्रतिहल्ल्याची विश्वासार्ह अन् अभेद्य क्षमता आपल्याजवळ असणे अपरिहार्य ठरते. या धोरणाची पूर्तता करण्यासाठी नौदल कार्यरत असून, सागरी मार्गाने होणाऱ्या आण्विक हल्ल्यापासून सुरक्षित राहण्याचे उद्दिष्टही लवकरच पूर्ण होईल. लढाऊ जहाजे पूर्णपणे देशामध्ये बनविण्याचा कार्यक्रम विक्रम करण्याच्या मार्गावर असून देशात विविध ठिकाणी ४३ युद्धनौका निर्माण केल्या जात आहेत. यामध्ये विमानवाहू नौका, विनाशिका पाणबुडय़ांचा समावेश आहे. ‘पी पंधरा ए’ प्रकल्पातील तीन विनाशिकांमुळे आपली सागरी ताकद वाढणार आहे. ‘पी पंधरा ए’ पाठोपाठ दाखल होणाऱ्या ‘पी पंधरा बी’ नौकांसाठी एमडीएल कंपनीशी करार केला असून ते चार नौका तयार करणार आहेत. पाणबुडीतून होणारी आक्रमणे परतवून लावण्यासाठी कोलकाता येथे चार पाणबुडीविरोधी नौका तयार होत असून, यातील पहिली पुढच्या वर्षी तर बाकीच्या नौका वर्षांच्या अंतराने दाखल होतील. खोल समुद्रातील गस्त बळकट करण्यासाठी गोवा शिपयार्डमध्ये चार विशेष गस्त नौका उभारल्या जात आहेत. यातील पहिली नौका या वर्षांअखेर दाखल होईल, तर आणखी पाच गस्त नौका खासगी शिपयार्डमध्ये तयार होत आहेत. नौसैनिकांच्या प्रशिक्षणासाठी दोन नौकाही खासगी शिपयार्डमध्ये बनविल्या जात असून, स्वातंत्र्यानंतर प्रथमच आपण खासगी क्षेत्राकडून नौका बनवून घेत आहोत. आणखी आठ विमानवाहू नौकांची कोलकातामध्ये बांधणी सुरू असून, त्यामुळे अंदमान-निकोबार बेटावरील सागरी संरक्षण सामथ्र्य मजबूत होणार आहे. सव्‍‌र्हे शिप व हायड्रोग्राफर्स नौदलाच्या दृष्टीने महत्त्वाचे असून भारतीय उपसागरातील छोटय़ा राष्ट्रांकडून त्यांना मोठी मागणी आहे. टेहळणी करणाऱ्या नौकांची संख्या वाढविण्यासाठी भावनगर येथील अलकॉक अ‍ॅशडाऊन गुजरात लि. येथे सहा नौकांची बांधणी सुरू असून, यातील एकाची सागरी चाचणी झाली आहे. पहिली युद्धनौका या वर्षांच्या अखेरीस दाखल होईल तर प्रोजेक्ट ७५ अंतर्गत र्पिअन पाणबुडीचे काम प्रगतिपथावर आहे. यातील पहिली पाणबुडी २०१५ ला तर सहावी पाणबुडी २०१८ ला दाखल होईल, असा विश्वास माझगाव डॉक व संरक्षण उत्पादन विभागाने व्यक्त केला आहे. त्याशिवाय आणखी काही युद्धनौका व पाणबुडय़ांच्या निर्मितीस हिरवा कंदील मिळाला असून त्यांचे काम प्रगतिपथावर आहे. पाणबुडी व युद्धनौकांची निर्मिती जास्तीत जास्त पूर्णपणे देशी बनावटीची असावी यावर नौदलाचा भर आहे. यामुळे निर्मितीप्रक्रियेत असलेल्या ४६ पैकी ४३ नौका, पाणबुडय़ांची निर्मिती देशात होत आहे. वर्षांला सरासरी पाच पाणबुडय़ा नौका नौदलात दाखल होतील, अशा गतीने नौकानिर्मितीचा कार्यक्रम राबविला जात आहे. नौदलाची भविष्यातील जागतिक दर्जाची गरज पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक व खासगी क्षेत्र परस्परसहकार्याने काम करीत आहे. वाढीव क्षमता व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा समतोल साधत गतीने प्रगती साधण्यासाठी ‘बाय अ‍ॅण्ड मेक इंडियन’ या कार्यपद्धतीचा अवलंब केला पाहिजे.
नौदलाचा हवाई विभागही प्रगती करीत असून, नौदलाची भविष्यातील गरज लक्षात घेऊन त्याचे आधुनिकीकरण केले जात आहे. सागरी हद्दीत कार्यक्षम टेहळणी करणे, नजर ठेवण्यासाठी पी-८१ पोसायडॉन या जगातील अत्याधुनिक आठ लांबपल्ल्याच्या सागरी गस्त विमानाची मागणी नोंदवली असून, ती पुढील वर्षी नौदलाच्या ताफ्यात दाखल होतील. याशिवाय आठ मध्यम पल्ल्याची सागरी गस्त विमाने लवकरच दाखल होतील.
सागरावरील पाहणी व टेहळणी क्षमतेला बळकटी मिळावी यासाठी मानवरहित सागरी हवाई पाहणी विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या तीन वर्षांत दाखल झालेल्या मिग-२९ के विमानाने नौदलाची आक्रमणक्षमता वाढली आहे. यातील पहिली तुकडी दाखल झाली असून, अन्य विमाने नजीकच्या काळात दाखल होतील. कामोण्ह २८ व सी किंग ४२ बी हेलिकॉप्टरचे अत्याधुनिकीकरण प्रगतिपथावर असून, नव्याने येणाऱ्या आधुनिक हेलिकॉप्टरमुळे हवाई दलाची ताकद वाढेल. थोडक्यात, नौदलाचे आधुनिकीकरण योग्य मार्गाने सुरू आहे. नौदलाची जहाजे, विमाने व पाणबुडय़ांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठीचा विकास कार्यक्रम प्राधान्याने राबविला जात आहे. मूलभूत सुविधांची क्षमता वाढविण्यासाठी नौदलाने अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत. नवी साधने व नव्या तंत्रज्ञानाला सामावून घेण्यासाठी डॉकयार्ड व एअरक्राफ्ट यार्डचे सतत आधुनिकीकरण केले जात आहे. लक्षद्वीप व मिनीकॉय बेटावर नौदलाचे आयएनएस द्वीपरक्षक व ग्रेट निकोबार बेटावरील कॅम्पबेल वे येथे आयएनएस बाझ हे नौदलाचे हवाई केंद्र सुरू झाल्याने आपल्या सागरी बेटांची सुरक्षा मजबूत झाली आहे. जगातील बहुतेक विभागीय व जागतिक सत्तांचे हित केंद्रित झालेल्या मलाक्का सामुद्रधुनीवर नजर ठेवता येईल अशा धोरणात्मक मोक्याच्या जागी आयएनएस बाझ कार्यरत असणे ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. कारवार येथील आपल्या नौदल तळाची प्रगती वेगाने सुरू असून, पुढील वर्षी दाखल होणाऱ्या विक्रमादित्य या विमानवाहू नौकेच्या स्वागतासाठी सज्ज होत आहे. नौदलाच्या सागरी व्यूहरचनेमध्ये परराष्ट्रधोरण महत्त्वाचा घटक असतो. २००८ मध्ये प्रथमच झालेल्या भारतीय उपसागरातील नौदल परिषदेच्या आयोजनात भारतीय नौदलाने आघाडीची भूमिका घेतली. उपसदस्य असलेल्या भारतीय उपसागर नौदल परिषदेला दिवसेंदिवस बळकटी प्राप्त होत असून, या उपक्रमाशी नौदल कटिबद्ध आहे. भारतीय उपसागरातील छोटय़ा छोटय़ा राष्ट्रांमध्ये सागरी सहकार्य वाढविणे हे महत्त्वपूर्ण पाऊल असून, परस्परांना मदत करण्याचे सूत्र याद्वारे मजबूत होत आहे.
भारतीय उपसागरातील छोटय़ा राष्ट्रांचे सागरी सामथ्र्य वाढविण्यास व बळकट करण्यास भारतीय नौदल कटिबद्ध आहे. भारतीय नौदल व आसपासच्या राष्ट्रांचे सागरी सामथ्र्य वाढवीत संरक्षणसिद्धता प्राप्त करणे हा यामागचा सिद्धान्त आहे. या सगळ्या प्रयत्नामुळे भारतीय नौदल हा उपसागरातील आघाडीचा व्यावसायिक व क्षमतापूर्ण सागरी घटक असल्याचे दिसून येते. याशिवाय उपसागरातील छोटय़ा राष्ट्रांच्या विनंतीनुसार त्यांना प्रशिक्षणाची सुविधा पुरविली जाते. २०११ मध्ये मित्रराष्ट्रांतील ८५३ जवानांना भारताने नौदलाचे प्रशिक्षण दिले व या संख्येत वाढच होत आहे. नैसर्गिक आपत्ती काळात मदतीचा हात पुढे करण्यात भारतीय नौदल नेहमीच पुढाकार घेते. गेल्या वर्षी लिबियात जेव्हा अराजकता माजली होती, तेव्हा निरपराध नागरिकांच्या सुटकेसाठी नौदलाने पुढाकार घेतला होता. या वर्षी पोर्टब्लेअर येथे झालेल्या विभागीय नौदलाच्या मिलान या द्वैवार्षिक संमेलनास विक्रमी १५ राष्ट्रांनी हजेरी लावत मिलान यशस्वी केले.
भारतीय उपसागराबाहेरच्या नौदलाशी सहकार्य करणे हा परराष्ट्रसहकार्य कार्यक्रमातीलच एक भाग होय. अशा सहकार्यसंबंधांमागे कार्यात्मक सैद्धांतिक कौशल्य प्राप्त करणे, अनुभव-माहितीची देवाण- घेवाण, कार्यक्षमता व संरक्षण जाणीव वाढवणे आदी हेतू असतात. अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया, ब्राझील, सिंगापूर आदी राष्ट्रांच्या नौदलाबरोबरच्या संयुक्त सरावातून परस्परसहकार्यातून सामथ्र्य वाढीचा हेतू प्राप्त करता येतो. या वर्षीच्या प्रारंभी नौदलाचे पश्चिम आरमार भू-मध्य समुद्र एडनचे आखात तर पूर्व आरमार दक्षिण व पूर्व चीनमध्ये तैनात केले होते. अशा सर्व प्रयत्नांमुळे कार्यक्षमता वाढण्याचा हेतू साध्य झाला. मात्र, हे सर्व साध्य झाले ते नौसैनिक व अधिकाऱ्यांच्या एकनिष्ठेने व समर्पणाच्या भावनेमुळे. मनुष्यबळ हा नौदलाचा आत्मा आहे. अत्याधुनिक तांत्रिक कौशल्याची नौदलात जशी गरज आहे तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या कुशल व गुणवान मनुष्यबळाचीही गरज आहे. वाढती गरज भागविण्यासाठी नौसैनिकांची संख्या टप्प्याटप्प्याने वाढत आहे. एझिमाला येथील इंडियन नेव्हल अकादमीतील बी. टेक्. प्राप्त अधिकाऱ्यांची पहिली तुकडी लवकरच दाखल होईल. नेव्हल अकादमीची क्षमता ७५० वरून १२०० पर्यंत वाढविण्यात सरकारने मान्यता दिली आहे. भारतीय नौदल सातत्याने साहसी मोहिमा हाती घेत असते. यामध्ये आयएनएस तरंगिणीद्वारे सागरातून केलेली विश्वभ्रमंती, देशात बनवलेल्या म्हादेई नौकेतून एकटय़ा अधिकाऱ्याने केलेली सागर परिक्रमा-१ या महत्त्वाच्या मोहिमांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. सध्या आणखी एक नौदल अधिकारी मार्गात किंवा बंदरावर कोठेही थांबा न घेत सागरी विश्वभ्रमंती पूर्ण करण्याच्या मार्गावर आहेत. नौदलाच्या क्षमतेत अशी चारी बाजूने प्रगती होत असताना लवकरच भारतीय नौदल सागरी महासत्ता बनेल हे नक्की. सागरी सीमांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पांढऱ्या पोशाखातील अधिकारी व नौसैनिक निष्ठेने डोळ्यांत तेल घालून पार पाडत असतात म्हणून तर नागरिक शांततेने, सुखाने झोपू शकतात. नौदलाच्या अविचल निष्ठेमुळे व निर्धारामुळे भारताचे भविष्य उज्ज्वल व सुरक्षित आहे. यामुळेच लक्षावधी भारतीय युवक नौदलात सामील होण्यास व अभिमानाने देशसेवा करण्यास उत्सुक असतात, आहेत, असतील.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व विशेष बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Navy day indian navy steps towards most powerfull in seaside

ताज्या बातम्या