मंजिरी घरत
सध्या चर्चेत असलेले ‘रेमडेसिविर’ हे औषधच वाचकांशी बोलत असल्याची कल्पना करून लिहिलेला हा लेख; या औषधाचा अतिवापर/ नको तिथे वापर आणि याच औषधावरला अंधविश्वास यांविषयी स्पष्ट इशारे देणारा…
‘‘नशीब काढलंस रे मित्रा. आरोग्यमंत्र्यांपासून ते लाखो सर्वसामान्य लोक, मीडिया, डॉक्टर्स, फार्मा उद्योजक, फार्मासिस्ट, राजकीय नेते, प्रशासक, समाजसेवक सगळ्यांच्या ओठी एकच नाव… सर्व व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये एकच विचारणा : कुठं मिळेल रेमडेसिविर, कुणी देईल का मला रेमडेसिविर? नावात राम नाही तुझ्या- ‘रेम’ आहे; पण जप तुझा रामनामासारखा चालूये. आहे बुवा. हेवा वाटतोय रे तुझा.’’ असं माझे अनेक औषध- मित्रमैत्रिणी मला बोलत आहेत, माझं अभिनंदन करत आहेत आणि मी? मी खरंच आनंदात आहे का? या बोलबाल्यामुळे, प्राप्त झालेल्या अनन्यसाधारण महत्त्वामुळे मी खूश आहे का? काय वाटत आहे मला? आज ठरवलं मी माझं मन मोकळं करतोच…
मंडळी, तुम्ही ऐकलं/ वाचलं असेल कदाचित, माझा जन्म झाला तो विषाणूविरोधी औषध (अँटिव्हायरल) म्हणून. अमेरिकेत साधारण दहाएक वर्षांपूर्वी जिलियाद फार्मा कंपनीच्या संशोधकांनी मला जन्माला घातलं. हेपॅटायटिस, श्वसन मार्गाची काही इन्फेक्शन्स यांविरुद्ध मी उपयुक्त ठरेन, असे त्यांचे आडाखे होते. नंतर आफ्रिकेत इबोलाची साथ आली. भात्यातील नवं शस्त्र म्हणून मला वापरून पाहिलं गेलं. मी त्या उपचारांसाठी फार यशस्वी नाही झालो. नंतर आता २०२० मध्ये माझं नशीब उजळलं. कोविडविरुद्ध परत छोट्या-छोट्या चाचण्या (ट्रायल) वेगानं झाल्या. मी थोडेसे गुण दाखवले… काठावर पास झालो म्हणा ना! म्हणजे मी काही तीव्र इन्फेक्शन असलेल्या कोविड रुग्णांचे प्राण वाचवतो किंवा मृत्युदर कमी करतो अशातला भाग नाही, तर मी मध्यम इन्फेक्शन ज्यांना आहे, ऑक्सिजनची गरज आहे पण व्हेंटिलेटरवर नाही अशा रुग्णाचा रुग्णालयातील मुक्काम ४ दिवसांनी कमी करण्यास मदत करतो असे निष्कर्ष होते. माझ्यावर सखोल चाचण्या अद्यापही चालू आहेत. कदाचित त्यातून माझे अधिक गुण/ अवगुण बाहेर येतील. पण सध्या तरी मी प्रायोगिक औषध आहे. अमेरिकेत २०२० च्या ऑक्टोबरमध्ये मला ‘आणीबाणीच्या परिस्थितीत वापरण्यासाठी’ काही अटी-शर्तींवर मान्यता मिळाली. कोविड उपचारासाठीचं पहिलं औषध असा मान मिळाला, वापरासाठी अतिशय सुस्पष्ट मार्गदर्शक तत्त्वं ठरवली गेली. मात्र नोव्हेंबर २०२० मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलं की मी काही जीवरक्षक, उपयुक्त, कोविडवरील ‘स्टॅण्डर्ड’ औषध वगैरे नाही. तरीसुद्धा अमेरिकेत आणि काही देशांत माझी उपयुक्तता नक्कीच वाटत आहे, वैद्यकजगत मला जरूर वापरत आहे, पण केवळ आणि केवळ मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तेही निवडक रुग्णांमध्ये… सरसकट, भरमसाट, अतार्किक वापर नव्हे.
आपल्याकडेही ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ (भारतीय वैद्यक संशोधन परिषद किंवा आयसीएमआर), राज्य शासनचे कोविड टास्क फोर्स यांनी वैद्यकीय व्यावसायिकांसाठी सुस्पष्ट मार्गदर्शन माझ्या वापराविषयी केलेलं आहे. मात्र ते सगळीकडे पाळलंच जातं असं नाही. २०२० मध्येच भारतात मला लोकांनी डोक्यावर घेण्यास सुरुवात झाली होती. सध्या तर कोविड रुग्णसंख्या एकदम वेगानं वाढली, मागणी वाढली, तशी टंचाई चालू झाली. ज्या रुग्णांमध्ये माझा वापर करणं योग्य आहे अशा रुग्णांनाही त्यामुळे वंचित राहावं लागतं. माझ्या पुरवठ्याच्या प्रश्नाला चक्क राजकीय रंगसुद्धा मिळाले. मी सर्व माध्यमं, समाजमाध्यमं यातून इतका प्रसिद्ध झालो (अशी प्रसिद्धी धोकादायकच) की अगदी अशिक्षित लोकसुद्धा एकमेकांना ‘‘अरे ते करोनाचे इंजेक्शन घेऊन टाक’’ अशी आत्मविश्वासाने शिफारस करू लागलेत. स्वत:हून सीटी स्कॅन करणं, सेल्फ मेडिकेशन या प्रकारांना ऊत येतो आहेच. काही रुग्ण/ नातेवाईक दबाव टाकतात, काही रुग्णालयं मार्गदर्शक तत्त्वं उत्तम पाळतात तर काही पाळत नाहीत, याचा मी साक्षीदार आहे. प्रिस्क्रिप्शन घेऊन रुग्णाची मित्रमंडळी, नातेवाईक वणवण फिरतात, लांबच लांब रांगांमध्ये उभे राहतात (या गर्दीमुळे त्यांनाही इन्फेक्शन होईल की काय ही धास्ती वाटते मला). भल्याबुऱ्या मार्गानं वाट्टेल तेवढे पैसे खर्च करून मला मिळवलं जातं. समाजावरील संकट ही नफ्याची किंवा राजकीय महत्त्व वाढवण्याची संधी मानून काही समाजद्रोही माझा काळाबाजार करतात; त्यातूनच नेहमीच्या- औचित्यपूर्ण- औषधपुरवठा साखळीच्या बाहेर मी सर्रास हाताळला जातोय. काही ठिकाणी तर ‘तो मी नव्हेच’ झालं, मी त्या इंजेक्शनच्या बाटलीत नव्हतोच. माझ्याऐवजी काही तरी दुसरं भरून विकण्याचा काळा धंदासुद्धा झाला. माझ्यापाठीच फार्मासिस्ट, आरोग्य, पोलीस आणि संबंधित यंत्रणांचा वेळ जाऊ लागला आहे. काहींनी हतबलपणे, नाइलाजाने फोन बंद करून ठेवले; कारण हजारो फोन्स फक्त माझ्यासाठी- आणि मी उपलब्धच नाही. मागील आठवड्यात अन्न आणि औषध प्रशासनानं नागपूर विभागात मला कसं वापरलं जातं याचा आढावा घेतला अशी बातमी होती. नागपूर विभागात शासकीय रुग्णालयात ३२ टक्के रुग्णांसाठी, पण खासगी रुग्णालयांत ९० ते १००% रुग्णांमध्ये माझा वापर झाला होता!
मी साऱ्या जगाला ओरडून सांगू इच्छितो, मी कोविडसाठी रामबाण उपाय नाही… मी जादूची कांडी नाही. मृत्यू थांबवतो असं नाही. मी जीवरक्षक नाही, लागण झाल्याच्या पहिल्या ९-१० दिवसांतच विशिष्ट स्थितीतील रुग्णांमध्ये माझा उपयोग होऊ शकतो- नंतर नाही- अशी मार्गदर्शक तत्त्वं, सर्व तज्ज्ञ सांगत आहेत, रुग्ण बऱ्याच उशिरा रुग्णालयात पोहोचला तर माझा उपयोग होणार का, गरज आहे का, याचा विचार व्हायला हवा ना. पहिल्या काही दिवसात (इन्फेक्शन फेज) कोविड विषाणू रुग्णाच्या शरीरात स्वत:ची जोरात उपज करत असतो, तेव्हा मी विषाणूविरोधी काम करून त्याची वाढ थांबवतो, त्यांची संख्या कमी करतो. इन्फेक्शन होऊन बरेच दिवस लोटल्यावर माझा उपयोग होत नाही, कारण तोपर्यंत कोविडने कारनामे करून दाहक प्रक्रिया (इन्फ्लेमेटरी फेज), सायटोकाईन वादळ चालू झालेलं असण्याची दाट शक्यता असते. आणि मंडळी हेसुद्धा लक्षात घ्या की, मी देवदूत नाही. माझेही पाय मातीचेच. मी यकृत किंवा मूत्रपिंडावर विपरीत परिणामही करू शकतो. माझी जी मागणी वाढवली आहे, मला मिळवण्यात जी सर्वांची ऊर्जा, पैसे खर्च होत आहे आणि समजा मी नाही मिळालो तर ते जे हवालदिल होणं आहे, ते थांबवा!
रुग्णाचं आणि नातेवाईकांचं मनोधैर्य उत्तम असणं महत्त्वाचं. माझ्याशिवायही रुग्णाचे उपचार होऊ शकतात, अनुभवाने हे सिद्ध केलेलं आहे. गेल्या एक आठवड्यापासून अनेक वैद्यकतज्ज्ञांनी व्हिडीओ, मुलाखत मार्गाने माझ्याविषयी सांगण्याचा चांगला प्रयत्न केला आहे, ते सर्वांनी ऐका जरा. आता परिस्थिती सुधारेल, नातेवाईकांची धावपळ थांबेल अशी आशा करतो; कारण शासनाच्या निर्णयानुसार आता मला परस्पर रुग्णालयांकडेच पाठवलं जाणार आहे. गोव्यासारख्या राज्यात मी आधीपासूनच फक्त ‘हॉस्पिटल सप्लाय’ होतो. शासन, फार्मा उद्योजक यांनी माझी निर्मिती वाढावी यासाठी प्रयत्न आरंभले हे स्तुत्यच. पण मुळात माझी मागणी नियंत्रित झाली पाहिजे, तार्किक- विवेकी वापरच झाला पाहिजे. ‘अमुक रुग्णाला दिलं, आमच्या रुग्णाला नाही’ असा विचार करताना त्यामागं रुग्णस्थिती, लागण झाल्याचा कालावधी वगैरे कारणं असतील हे लक्षात घ्या. उपचारसंहिता पाळणाऱ्या डॉक्टर व आरोग्य व्यवस्थेविषयी रुग्ण, नातेवाईक यांनी विश्वास आणि आदर ठेवला पाहिजे. अरे आपला सर्वांचा शत्रू कोविड आहे, तर आपण सारे ‘एकमेका साह््य करू’ या नीतीनेच राहिले पाहिजे ना! जाता जाता अजून एक महत्त्वाचं : माझा वारेमाप उपयोग झाल्यानं भविष्यात कशावरून मला कोविड विषाणू प्रतिरोध (रेझिस्टन्स) करणार नाही? आणि बंडखोर विषाणू तयार होऊन मला नामोहरम करणार नाहीत?
थोडक्यात महत्त्वाचे
* ‘कोविड म्हणजे रेमडेसिविर’ हे समीकरण पुसून या औषधाचा वापर मर्यादित रुग्णांवर, लागण झाल्याच्या पहिल्या ९-१० दिवसांतच शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार होणे आवश्यक.
* हे औषध पाचपेक्षा अधिक दिवस द्यायचे नसते.
* अतिसौम्य, सौम्य इन्फेक्शन असलेल्या रुग्णांमध्ये रेमडेसिविर वापरायचे नाही.
* या औषधाचा विवेकी वापर करून, ज्या रुग्णांसाठी ते वापरणे आवश्यक आणि योग्य आहे त्यांना ते मिळावे.
लेखिका औषधनिर्माण शास्त्राच्या अध्यापक असून ‘औषधभान’, ‘आरोग्यनामा’ ही सदरे त्यांनी ‘लोकसत्ता’त लिहिली आहेत.
ईमेल : symghar@yahoo.com