वन्यजीवांना मायेची ऊब देणारी ‘सिद्धार्थ-सृष्टी’!

बालपणापासूनच वन्यप्राण्यांबद्दल कळवळा असणाऱ्या सिद्धार्थ आणि सृष्टी यांनी २००३ मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू केले.

|| वसंत मुंडे

शिरूर तालुक्यातील तागडगाव परिसरात सिद्धार्थ आणि सृष्टी सोनवणे या दाम्पत्याने ‘वाइल्ड लाइफ प्रोटेक्शन अ‍ॅण्ड सँक्चुअरी असोसिएशन’च्या माध्यमातून ‘सर्पराज्ञी’ प्रकल्प हाती घेतली आहे. त्याद्वारे त्यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक वन्यजीवांवर उपचार करून त्यांना त्यांच्या मूळ अधिवासात सोडले आहे.

बालपणापासूनच वन्यप्राण्यांबद्दल कळवळा असणाऱ्या सिद्धार्थ आणि सृष्टी यांनी २००३ मध्ये या प्रकल्पाचे काम सुरू केले. सिद्धार्थ आणि सृष्टी सोनवणे यांनी स्वत:च्या मालकीच्या १७ एकरांपैकी १३ एकर जागा या वन्यजीवांसाठी म्हणून राखून ठेवली आहे. परिसरातील जखमी जनावरांचे आश्रयस्थान म्हणून ‘सर्पराज्ञी’ हा प्रकल्प ओळखला जातो.

जखमी झालेल्या वन्यजीवांना आणायचे आणि ‘सर्पराज्ञी’मध्ये उपचार करून त्यांच्या अधिवासात सोडायचे, हा या दाम्पत्याचा शिरस्ता. मात्र, जखमी वन्यप्राण्याला या प्रकल्पापर्यंत आणणे हे जिकिरीचे काम आहे. प्राण्यांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी मदत करतात. त्यांच्या मदतीवरच हे काम उभे आहे, असे सिद्धार्थ सांगतात.

‘‘हे काम करताना आनंद आहेच. पण, अडचणीही अनेक आहेत. समाजातून मिळणाऱ्या मदतीने त्यावर मात करतो. दर वर्षी ‘मूठभर धान्य प्राण्यांसाठी आणि एक रुपया पाण्यासाठी’ अशी मोहीम आम्ही हाती घेतो. त्यातून उभ्या राहणाऱ्या पैशातून वन्यजीवांना सांभाळतो,’’ असे सिद्धार्थ यांनी सांगितले. या प्रकल्पाला आता गरज आहे ती कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेची आणि वन्यजीवांच्या रक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या अभ्यास केंद्राची. प्रकल्पापर्यंत पोहोचण्यासाठी वाहनांचीही गरज आहे. त्यासाठी मदत मिळाली तर हे काम अधिक प्रभावीपणे करता येऊ शकेल. आता हे काम बाळसे धरू लागले आहे. वन्यजीव बऱ्याचदा जीव वाचविणाऱ्याच्या जवळ येऊन राहतात. पण जेथे तो जखमी झालेला असतो, त्या अधिवासात त्याला नेऊन सोडणे आवश्यक असते. वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने हे काम आम्ही करतो आहोत, पण त्याला समाजाने सहकार्य आणि आर्थिक मदत करावी, असे आवाहन सोनवणे दाम्पत्याने केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व औरंगाबाद बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sarva karyeshu sarvada 2018

Next Story
बेगमपुऱ्यातील दस्तनोंदणी; महसूल यंत्रणाही सरसावली!
ताज्या बातम्या