शरद पवार

जॉर्ज फर्नांडिस लढवय्ये नेते होते. माझे आणि त्यांचे घनिष्ठ संबंध होते. पुलोदच्या प्रयोगापासून अनेकदा आम्ही बरोबर असायचो. एखादी गोष्ट करायची, असा निर्धार केल्यावर ते तडीस नेत असत. राजकीय विचार वेगळे असले तरी जॉर्ज माझे वैयक्तिक मित्र होते. देशातील कामगार चळवळीला बळ आणि दिशा त्यांनी दिली होती. जॉर्ज हे १९४९च्या सुमारास मुंबईत आले आणि मुंबईकरच झाले. मुंबईत कामगारांच्या समस्यांना वाचा फोडण्याकरिता किंवा त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वत:ला झोकून दिले होते. मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांची सशक्त संघटना त्यांनी उभारली होती. उद्योग, रेल्ले आणि संरक्षणमंत्रीपद भूषविताना एक प्रभावी प्रशासक म्हणून त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटविला होता. जॉर्ज एक निष्णात वाकपटू होते. विविध भाषांवरील त्यांचे प्रभूत्व वाखाणण्याजोगे होते.

वादळी पर्वाचा अस्त!

देशातील कामगार चळवळीचे प्रणेते आणि माजी संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नाडिस यांच्या निधनाने एका वादळी पर्वाचा अस्त झाला असून स्वातंत्र्योत्तर काळातील एक महत्त्वाचे राजकीय व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. देशातील कामगार चळवळीला त्यांनी संघर्षांचा एक धगधगता आयाम दिला. त्यात त्यांच्या नेतृत्त्वाखाली सत्तरच्या दशकात झालेला रेल्वे कर्मचाऱ्यांचा अभूतपूर्व संप एक महत्त्वाचा अध्याय आहे.  मुंबईसारख्या  देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक राजधानीतील संघटित कामगार हे त्यांच्या लढाऊ  संघटन कौशल्याचे फलित आहे. देशाचे संरक्षण मंत्री म्हणून जबाबदारी बजावताना त्यांनी अणुचाचण्या घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. याशिवाय केंद्रीय मंत्रिमंडळात विविध महत्त्वाच्या विभागांच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या. कोकण रेल्वेच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान होते.

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस</strong>