ठाण्यातील मुरबाड तालुक्यातील बुरसुंगे गावाची जिल्हा परिषदेची ही प्राथमिक शाळा. शीळ नदीच्या काठावरील व दुर्गम भागातील ८० घरांचे गाव. शेतकऱ्यांच्या मुलांना शहरी मुलांप्रमाणे दर्जेदार शिक्षण, स्वच्छता, स्वयंशिस्त, माहिती व तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, कौशल्य विकासात प्रगती व्हावी, प्रत्येक विद्यार्थी संस्कारक्षम बनावा, या उद्देशातून ही शाळा सुरू आहे. या बांधिलकीतून शाळेतील प्रत्येक शिक्षकाने काम केल्याने शाळेला स्वच्छ, सुंदर, आदर्श शाळेच्या पुरस्काराबरोबर ‘आयएसओ’ मानांकनही मिळाले आहे.
बुरसुंगे गावच्या शाळेत बहुतेक विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील. घरातून मुलांना तसे काही मार्गदर्शन नाही. होण्याची शक्यता नसते. गावात खासगी शिकवण्याही नाही. परंतु, शाळेत मुलांना संस्कारक्षम बनविण्याबरोबरच त्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ आणि अंगभूत गुणांच्या विकासासाठी शाळेचे शिक्षक महेंद्र सुपेकर, प्रणाली काळे प्रयत्नशील आहेत. शिक्षकांच्या या प्रयत्नांना ग्रामस्थही हातभार लावत आहेत.
स्वच्छतेचे उपक्रम
शाळा आपले घर आणि सरस्वतीचे मंदिर आहे; असे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले जाते. प्रत्येक विद्यार्थ्यांने त्याला दिलेली वर्ग, व्हरांडा आणि मैदान सफाईची कामे प्राधान्याने करायची. शाळेच्या आवारात कोठेही कागदाचा तुकडा दिसणार नाही याची खबरदारी घेतली जाते.
तंत्रज्ञानप्रेमी शाळा
बुरसुंगे शाळा ‘डिजिटल’ करण्यात आली आहे. शाळेत ई-लर्निगची सुविधा आहे. दृश्यचित्रफितीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. चित्रांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याने ती अभ्यासात अधिक रमतात. अवघड गणिताची प्रक्रिया पडद्यावर वस्तूंचा वापर करून सोप्या पद्धतीने शिकवली जाते. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडेल, असे सामाजिक, पर्यावरणविषयक उपक्रम डिजिटल माध्यमातून विद्यार्थ्यांना दाखवले जातात. अवांतर वाचनासाठी शाळेत ग्रंथालय आहे. सामूहिक, व्यक्तिगत पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची सवय जोपासण्याचा प्रयत्न होतो.
पर्यावरण संवर्धनाचे धडे
विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून पर्यावरणाचे महत्त्व कळले पाहिजे, म्हणून शाळेच्या आवारात विद्यार्थी, ग्रामस्थांच्या हातून दरवर्षी झाडे लावण्यात येतात. प्रत्येक झाडाच्या संगोपनाची, त्या झाडाखाली पडणारा पालापाचोळा उचलण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर सोपविण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना समूह पद्धतीने झाडे दत्तक देण्यात आली आहेत. प्रत्येक समूहाने आपल्या झाडाची जगविण्यापासून ते पूर्ण वाढ होईपर्यंत काळजी घ्यायची. झाडांच्या मुळाशी पाणी साठवणीसाठी आळी तयार करणे, त्याला खत टाकणे, झाडाला गाईगुरांपासून धोका होणार नाही म्हणून त्याच्या भोवती लाकडी संरक्षक (ट्री गार्ड) उभारण्याची कामे विद्यार्थी करतात. अंगमेहनतीच्या कामांची सवय विद्यार्थ्यांना लागली पाहिजे, हा या मागील उद्देश. विद्यार्थ्यांनी जगवलेली नारळ, काजू व अन्य फळांची झाडे तरारून वर आली आहेत.
शाळेत उत्तन येथील केशवसृष्टीने दिलेली सौर चूल आहे. सौर चुलीच्या माध्यमातून भोजन तयार करण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थी करतात. त्याच्या नोंदी ठेवतात. सौर ऊर्जेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून ते पालकांच्या मनावर बिंबवण्यासाठी हा उपक्रम नियमित राबविला जातो. निसर्ग सहल काढून जंगलातील विविध वनस्पती, झुडपे, फुले, फळे ओळखून त्यांचे महत्त्व, त्यांच्या नोंदी विद्यार्थी करतात.
कौशल्यपूर्ण अभ्यासक्रम
विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांच्या विकासासाठी टाकाऊ कागदांपासून शोभेच्या वस्तू तयार करणे, वह्यांच्या पुठ्ठय़ांपासून शाळेत येणाऱ्या पाहुण्यांना कायमस्वरूपी भेट म्हणून कलाकुसरीच्या वस्तू तयार करणे, असे उपक्रम खूप चालतात. नेमबाजीसाठी गोफण (गलोल) घेऊन एखाद्या लक्ष्याचा वेध घेण्याची स्पर्धा घेतली जाते. यामध्ये एखादा विद्यार्थी चमकतो. शाळेच्या आवारातील पाने, फुले, झाडाच्या वाळलेल्या, ओल्या काटक्या एकत्र करून विद्यार्थी आकर्षित पुष्पगुच्छ तयार करतात.
खत प्रकल्प
शाळेच्या आवारात तयार होणारा कचरा, पालापाचोळा शाळेबाहेर जाणार नाही याची दक्षता घेतली जाते. शाळेच्या आवारात एक खड्डा खणण्यात आला आहे. त्यामध्ये झाडांचा पडणारा पालापाचोळा, वाढणारे गवत काढून टाकले जाते. झाडलोटीतून निघणारा कचरा या खड्डय़ात टाकला जातो. जैविक प्रक्रियेचा अवलंब करून या खड्डय़ाच्या माध्यमातून खत तयार केले जाते. तयार खत शाळेच्या आवारातील झाडांना दिले जाते. सुट्टी असली की गुरुजी, विद्यार्थी आळीपाळीने शाळेत येऊन झाडांना पाणी व झाडलोटीची कामे करतात. शाळेची रंगरंगोटी व डागडुजीची कामे गुरुजी, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या सहकार्याने केली जातात.
सांस्कृतिक संस्कार
वर्षभरातील प्रत्येक सण, उत्सव शाळेत साजरा केला जातो. आषाढी एकादशीला विद्यार्थ्यांची दिंडी काढून ती गावभर फिरवली जाते. संत, वारकऱ्यांच्या पेहरावात विद्यार्थी सहभागी होतात. तीन दिवसांचा ‘बुरसुंगे फेस्टिव्हल’ शाळा, शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रामस्थांतर्फे आयोजित केला जातो. या कार्यक्रमात शाळेचे नोकरदार असलेले विविध ठिकाणचे माजी विद्यार्थी सहभागी होतात. या कार्यक्रमात व्याख्याने, मनोरंजन, महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केले जातात. गावातील ग्रामदेवतेविषयी गावकऱ्यांची जी भावना आहे, तशीच शाळेविषयी आहे. आपल्या मुलांना शिक्षण, नोकरी, व्यवसायाच्या संधी देणारी शाळा, म्हणून हे गावातील सरस्वतीचे दुसरे मंदिर आहे, अशी ग्रामस्थांची भावना आहे. त्यामुळे विद्यार्थी ज्या आपुलकीने शाळेच्या विकासात सहभागी होतात; त्याच्या दुप्पट भावनेने ग्रामस्थ शाळेच्या कार्यक्रमात सक्रिय सहभागी होतात.
शाळेचा चढता आलेख
बुरसुंगे शाळेने ठाणे जिल्ह्यातील ‘साने गुरुजी स्वच्छ व सुंदर शाळे’चे पहिल्या क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे. या बक्षीस रकमेतून शाळा ‘सोलार स्मार्ट’ करण्यात आली. शाळेच्या सर्वागीण विकासासाठी बालभवन विकसित करण्याचा शाळेचा मानस आहे. विद्यार्थी विकासाचे नावीन्यपूर्ण २० नियमित उपक्रम शाळेत राबविले जातात. शाळेला आतापर्यंत महाराष्ट्रातून हजारो शिक्षक, ग्रामस्थांनी भेटी दिल्या आहेत. या भेटींतून, त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या सूचनांतून, मदतीतून शाळा शैक्षणिक प्रगतीकडे वाटचाल करीत आहे.
– भगवान मंडलिक
संकलन – रेश्मा शिवडेकर
reshma.murkar@expressindia.com