स्मृती कुळकर्णी-आंबेरकर

देखणा निसर्ग, लोभस माणसं हे अनुभवायचं असेल तर ईशान्य भारतासारखा दुसरा पर्याय नाही. त्यातही ही भटकंती एकटय़ाने केली तर अनुभवांच्या पोतडीत आयुष्यभर पुरेल असा खजिना जमा होतो.

shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
Indian Railway completes 171 years Boribandar to Thane local ran on 16 April 1853
भारतीय रेल्वेला १७१ वर्षे पूर्ण! १६ एप्रिल १८५३ रोजी धावली बोरीबंदर ते ठाणे लोकल
mohammed abdul arfath,
एका महिन्यापासून अमेरिकेत बेपत्ता असलेला हैदराबादचा युवक मृतावस्थेत आढळला
America Police
अमेरिकेत चाललंय काय? आणखी एका भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू, वाणिज्य दूतावासाने दिली माहिती

हे सगळं नेमकं केव्हा सुरू झालं, ते मला अगदी नीट आठवतंय.. रात्रीचे साडेअकरा वाजले होते ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपट आम्ही बहात्तराव्यांदा बघत होतो. शेवटच्या सीनमध्ये ट्रेन सुटली. अमरीश पुरीने काजोलचा हात आपल्या हातातून सोडला आणि तो तिला म्हणाला ‘जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी’.. आणि मी मनातल्या मनात पुटपुटले, ‘काश.. मला पण अशी मनासारखी ‘सिमरन जिंदगी’ जगायला मिळाली तर..  पण माझ्या सात वर्षांच्या मुलाचं- आयुषचं कसं मॅनेज होणार, छे छे!!’ मी मनातल्या मनात पुटपुटले, हा माझा समज खोटा ठरवत नवरा म्हणाला, ‘जग की तुझी सिमरन जिंदगी! एकटीने भटकंती करायची आहे तर जा. मी आणि आयुष मॅनेज करतो!’ ओह! म्हणजे मी मनातल्या मनात पुटपुटले नव्हते तर.. ‘जा सिमरन, जी ले अपनी जिंदगी’ या वाक्यातच जणू माझ्या नॉर्थ ईस्ट अर्थात ईशान्य भारताच्या सोलो भटकंतीची बीजं मनात रुजली होती आणि नियती जणू त्याक्षणी ‘तथास्तु’ म्हणाली होती. नॉर्थ ईस्टच्या या सेव्हन सिस्टर्सना एकाच वेळी भेट देण्याएवढा वेळ नव्हता आणि प्रत्येक राज्य निवांत बघायचं होतं म्हणून मी आसाम-अरुणाचल आणि मेघालय या तीन बहिणींना भेट द्यायचं ठरवलं.

गुवाहाटी एअरपोर्टला उतरल्यावर कारने प्रवास सुरू झाला आणि मी तीन तासात आसाममधून मेघालयमध्ये म्हणजे एका राज्यातून उडी मारून दुसऱ्या राज्यात पोहोचले होते. युरोपमध्येही असेच एकमेकांना चिकटून असलेले छोटे देश म्हणता म्हणता कधी पार होतात समजतही नाही. मेघालय मला भन्नाट आवडलं ते अनेक कारणांसाठी. या डेस्टिनेशनला ‘स्कॉटलंड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखतात आणि इथल्या लोकांनी खरंच हे सेमी स्कॉटलंड म्हणून जपलंय हे इथे फिरताना जाणवतं. स्वच्छ सुंदर शहराचं पारितोषिक द्यायचं झालं तर ते नक्कीच या शहराला मिळेल. ‘क्लिनेस्ट सिटी ऑफ द नॉर्थ ईस्ट’ असे बोर्ड आपल्याला इथे ठिकठिकाणी दिसतात. होìडग्ज नाहीत, िभतींवर चित्रं चिकटवलेली नाहीत, थुंकून रंगवलेल्या िभती नाहीत की गाडय़ांच्या हॉर्नचेही आवाज नाहीत. रांगडय़ा पहाडांचं सोशिकपण यांच्या अंगातच मुरलंय बहुधा. सगळे मिचमिच्या डोळ्यांचे! हसतमुख स्त्रियांनी पाठीवर बाळाचं गाठोडं टाकलं की दोन्ही हात कामाला मोकळे. इथले लोक आणि इथलं निसर्गसौंदर्य तर बेफ्फाम आहेच पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे भारतातील बहुदा एकमेव ‘मातृसत्ताक राज्य’ आहे. किती मस्त ना? इथे पुरुष लग्न करून बायकोच्या घरी जातात, एवढंच नाही तर इथे महत्त्वाचे निर्णयही महिलाच घेतात. यार, इथेच कायमचं सेटल व्हायला पाहिजे असं मनात आलं तेवढय़ात हॉटेलचा गप्पिष्ट मालक जणू मनातलं ओळखून लगेच म्हणाला, ‘स्थानिक नियमांप्रमाणे तुम्ही मेघालयमध्ये स्वतची जागा विकत घेऊ शकत नाही. पण इथे रेंटवर राहू शकता. भल्यामोठय़ा थ्री बीएचकेच्या रूमचे मासिक भाडे साधारण १८ ते २० हजार रुपये महिना आहे.’ हे ऐकलं आणि मी दणकन वास्तवात आले.

एव्हाना मेघालयमध्ये मस्त रुळले होते. भूगोलात भेटलेल्या चेरापुंजीला भेट देऊन तिथला धुवाँधार पाऊसही अनुभवला होता. या भटकंतीदरम्यान इथल्या एका सांस्कृतिक केंद्राला भेट दिली तेव्हा तिथे बिहू नृत्याची तयारी सुरू होती. आम्हा पर्यटकांचे स्वागत झाल्यावर कलाकारांनी नृत्याचा फेर धरला. उत्साही पदन्यास आणि हातांच्या मोहक हालचाली यामुळे या नृत्यात आम्ही कधी गुंतत गेलो हे समजलेही नाही. त्यांचे नृत्य झाले आणि त्यांनी आम्हा पर्यटकांना स्टेजवर बोलावले. अ‍ॅण्ड गेस व्हॉट? त्यात माझा नंबर लागला. त्यांनी मला बोलावलं. मी बिनधास्त गेले स्टेजवर. त्यांच्या पायांच्या ठेक्यावर ठेका धरला आणि छान सिंक्रोनायझेशन झालं. आहाहा काय मस्त वाटलं सांगू? मला उगाच ‘जब वुई मेट’ची ‘गीत’ असल्यासारखं फीिलग आलं. ती नाही का लडाख फेस्टिवलमध्ये ‘ये इश्क हाये, बठे बिठाये..’ या गाण्यावर मस्त डान्स एन्जॉय करते अगदी तसंच. तुम्ही जगात कुठेही जा, तुम्हाला तिथली भाषा येत नसेल तरी त्यांच्या गाण्यातून, नृत्यातून तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता. खूप पटकन कनेक्ट होता येतं या साध्याशा कृतीतून हे मी इथे अनुभवलं.

या अनुभवानंतर माझ्यासाठी अजून एक नवखा अनुभव वाट पाहात होता. हा होता काझिरंगाच्या जंगलाचा. आज माझा ईशान्य भारतातील भटकंतीचा तिसरा दिवस होता. मध्येच येणारं ऊन, मध्येच पावसाच्या सरी यामुळे काझिरंगा मस्त हिरवंगार झालं होतं. पहाटे उठून पाहिलं तर पाऊस थांबला होता. सहा वाजता गजराजांच्या पाठंगुळी बसून आम्ही वन्यप्राणी बघायला निघालो. आमची सहा जणांची ‘गजलक्ष्मी’ हळूहळू पावलं टाकत निघाली आणि तिच्या पुढेमागे आणखी आठ-दहा हत्तींचा कळप निघाला. आमचा ताफा जंगलात शिरू लागला. नजर जाईल तिथपर्यंत हिरवा गवताळ प्रदेश दिसत होता. ‘श२२२ आवाज मत करो’ असा सल्ला आमच्या माहुताने दिला आणि संथ गतीत चालणारी ‘गजलक्ष्मी’ एके ठिकाणी अचानक थांबली. डावीकडे तीन-चार गेंडास्वामी पाण्यात मनसोक्त डुंबत होते. अगदी दहा फुटांवर असलेले हे गेंडे बघणं हा शब्दातीत अनुभव होता. बाकी काहीही बोला, हत्तीवरून रपेट हा एक रोमांचकारी अनुभव असतो. दाट आणि उंचच उंच गवतातून चालताना मध्येच तो हत्ती झाडांमध्ये शिरतो तेव्हा तोंडावर हलकीशी आपटणारी झाडाची कोवळी फांदी हाताने दूर करत, कधी थोडं वाकत तर कधी पाय आवळून घेत हा प्रवास संस्मरणीय ठरतो. मात्र अशा अनवट वाटांमुळे आपण वन्यप्राणी अगदी जवळून बघू शकतो.

ही समृद्ध गज सफारी आटपून सकाळी दहा वाजेपर्यंत मी माझ्या जंगल कॉटेजमध्ये आले तेव्हा शिशिराचं छान पिवळंजर्द ऊन पडलं होत. जंगलाचं एक छान असतं, ते दिवसा तुम्हाला स्वर्गीय अनुभव देतं. त्यावेळचा अगदी फर्स्ट हॅण्ड अनुभव सांगायचा तर, इथे मस्त पिवळंधम्मक ऊन पडलंय आणि मी कॉटेजबाहेरच्या वेताच्या खुर्चीत वाफाळता चहा घेऊन मस्त हिरवंगार जंगल अनुभवतेय. पक्ष्यांच्या किलबिलाटाने गजबजलेलं, पानगळीने आच्छादून गेलेलं आणि काहीशी गुलाबी थंडीवालं हे जंगल वेड लावतं. समोर पानांवर ऊन लपंडाव खेळतंय आणि माझ्या कॉटेजसमोरच्या हिरव्यागार मदानावर सहा-सात साळुंख्या मफील जमवून बसल्यात. आत्ताच एक भारद्वाज त्यांच्या डोक्यावरून सूर मारून बिचाऱ्या साळुंख्यांना दचकवून गेला. इतक्या विविध पक्ष्यांचे आवाज एकाच वेळी ऐकू येतायत की कोणाचा आवाज कुठून येतोय हे हुडकावं लागतंय. काही बोला, कडक चहापेक्षा जंगलातली सकाळ अधिक रिफ्रेिशग असते! असा अतीव सुखाचा अनुभव घेत पहुडलेली असताना दिवस कसा आणि कधी कलला हे समजलेही नाही. इथे ईशान्य भारतात साधारण पाच-साडेपाचच्या सुमारास अंधारायला सुरुवात होते. पुस्तक वाचताना कधी अंधार पडला समजलेही नाही आणि मग जिवंतपणाची कुठलीही जाणीव नसलेलं ते जंगल नकळत भेसूर वाटू लागलं. दिवसभर वेगवेगळ्या चिवचिवाटामुळे गजबजलेलं जंगल सूर्यास्तानंतर शांत होत जातं तेव्हा तो बदल लगेच लक्षात येतो. मग मी माझी प्रवासी डायरी उघडली आणि त्यात नकळत लिहून गेले.. ‘जंगलाचं एक वाईट असतं, ते रात्री तुम्हाला उगाचच घाबरवून सोडतं. इथे संध्याकाळी साडेपाच वाजताच मिट्ट काळोखलंय आणि न बोलवता कॉटेजमध्ये आलेल्या कीटकांना हुसकावण्याचा मी केविलवाणा प्रयत्न करतेय. रातकिडय़ांच्या किरकिरीने कुजबुजणारं, झाडांच्या सळसळीमुळे उगाच संशयास्पद वातावरण निर्माण करणारं, दिव्यांच्या आजूबाजूला कीटकांची मफील जमवणारं, पराकोटीच्या नीरव शांततेचा अनुभव देणारं आणि तरीही चांदण्यांचं गच्च आभाळ आंदण देणारं काळोखं जंगल अनुभवतेय. घाबरट माणसाला अधिक घाबरवणारी आणि अंधाराची भीती नाही त्याला बेफ्फाम आवडणारी अशी ही जागा. खिडकीच्या बाहेरच्या काचेवर बसलेला तळहाताएवढा मोठा कोळी बाहेरून माझ्याकडे बघतोय आणि मी आतून त्याच्याकडे, नेमकं कोण कोणाला घाबरलंय हेच समजत नाहीए. पण काही बोला, जंगलातल्या रिफ्रेिशग सकाळपेक्षा कीटकांसोबतची रात्र अधिक फ्रस्ट्रेटिंग असते!’ वाचून स्वतलाच हसायला आलं आणि जेव्हा मुंबईची माणसं कामावरून घरी निघतात त्यावेळी म्हणजे साधारण सात ते साडेसात दरम्यान मी जेवण करून झोपायची तयारी करायला घेतली.

मेघालयातील बिहू सण

आपला जसा गुढीपाडवा तसा यांचा बिहू सण आणि हो हे सेलिब्रेशन एक-दोन दिवस नाही तर चक्क महिनाभर चालतं! वसंत ऋतूचे आगमन झाल्याच्या आनंदात हे नृत्य केले जाते. धोती आणि गामोचा हा पुरुषांचा पेहराव तर मेखला आणि चांदोर या साडीच्या प्रकारावर हेवी दागिने आणि लाल ठसठशीत कुंकू हा स्त्रियांचा पेहराव असतो. ढोल, पेपा, ताल, झुतुली, टोका, गोगोना आणि बनही या वाद्यांच्या एकत्रित वाद्यांमुळे ठेका धरायला लावणारी लय तयार होते. हळूहळू लयीत सुरू झालेले हे नृत्य, शेवटी शेवटी खूप जलद होते आणि संपते. नृत्य करताना स्वत गात असलेले ते कलाकार बघून अचंबित व्हायला होतं. साधारण २०-१५ मिनिटांचा हा कार्यक्रम पण अक्षरश खिळवून ठेवणारा ठरतो.

आसाममध्ये बघण्यासारखी तीन महत्त्वाची ठिकाणे म्हणजे, सागरासारखी दिसणारी ब्रह्मपुत्रा, चहाचे मळे आणि काझिरंगा राष्ट्रीय उद्यान. त्यातलं काझिरंगा तर बघून झालं होतं, पण एव्हाना अरुणाचल खुणावू लागलेलं. परतीच्या प्रवासात आसाममध्ये थांबा होताच म्हणून ब्रह्मपुत्रेच्या भेटीला जरा स्टॅच्यू करून अरुणाचलला निघाले.

अरुणाचल प्रदेश या नावातच जादू आहे! हिमालय एकच असला तरी याने आपल्याकडील एक खास गोष्ट, एक खास जागा प्रत्येक राज्याला बहाल केली आहे. असेच एक राज्य म्हणजे अरुणाचल प्रदेश. चीनचा शेजारी, भूतान आणि म्यानमार देशांना चिकटून असलेला आणि ईशान्य भारताचे शेवटचे टोक असलेला अरुणाचल प्रदेश अतिशय सुंदर आहे. तो सुंदर आहे कारण तो ‘रॉ’ आहे. फक्त एक लाकडी कमान ओलांडून आपण आसाममधून अरुणाचल प्रदेशमध्ये येतो. इथे लगेच वेगळेपण जाणवते ते लष्करामुळे. अरुणाचलमध्ये अनेक ठिकाणी चेकिंग होते, तुमची प्रवासाची कागदपत्रे ते दोनदोनदा तपासतात. काही ठिकाणी जाण्यासाठी तर ते तुम्हाला टोकन देतात जे परतीच्या प्रवासात परत करायचे असते. गोम्पा, मोनेस्ट्री असलेल्या या अरुणाचल प्रदेशमध्ये एक रत्न दडलेलं आहे आणि कमी प्रसिद्धीमुळे हे रत्न अजूनही त्याचे नैसर्गिक सौंदर्य पुरेपूर टिकवून आहे, हे रत्न म्हणजे सेलापास! सेलापासला पोहोचताना आपल्याला दिसू लागतात ते काळेभोर डोंगर आणि त्यावर जणू कोणीतरी शुभ्र मीठ शिंपडलंय असा तुरळक बर्फ (अर्थात हे एप्रिलमध्ये दिसणारं दृश्य आहे, यांचा हिवाळा तर अजूनच वेगळा.) पुढे पुढे हेच डोंगर संपूर्ण बर्फाच्छादित होत जातात आणि आपले दात थंडीने कडकड वाजू लागतात. शेवटी एक टर्न घेऊन गाडी थांबते तेव्हा डोळ्यांचे पारणे फिटवणारे दृश्य दिसते.. धार्मिक ओळी लिहिलेले लाल, निळे, पिवळे, हिरवे, पांढरे असे रंगीबेरंगी झेंडे फडकत असतात आणि पांढऱ्याशुभ्र तलावाच्या प्लेन कॅनव्हासवर पाण्याच्या थेंबाच्या आकाराचा सुरेख नितळ सेलालेक आळसावून पसरलेला दिसतो. डोळे चोळून चोळून मी हे दृश्य नजरेत साठवून घेत होते. इथे कारमधून उतरल्यावर मोकळा वेळ दिलेला. पर्यटकांना मोकळा वेळ दिल्यावर थांबायला म्हणून ड्रायव्हर्ससाठी पत्र्याची एकच छोटीशी चहाची टपरी इथे आहे. या जागेचे अजिबात व्यापारीकरण झालेले नाही म्हणून इथलं सौंदर्य टिकून आहे. इथे रोहतांग किंवा गुलमर्गसारखे बर्फाचे खेळ नाहीत, फोटो काढण्यासाठी खास जागा (लव्ह टनेल) निर्माण केल्या गेलेल्या नाहीत, घोडेवाले नाहीत की थंडीतील कपडय़ांची विक्री करणारे एकही दुकान नाही! इथे आपण निसर्गाला कडकडून भेटतो. अगदी मोजके पर्यटक येत असल्यामुळे चार पावलं चाललो की पायाखाली शुभ्र बर्फाची मखमली चादर येते. इथला बर्फ इतका अस्पर्शित आहे की इथे कोणत्याही पर्यटकांची पावलं उमटलेली दिसत नाहीत. त्या शुभ्र बर्फाच्या चादरीवर तुमची पावलं उमटवत तुम्ही आपली वाट निर्माण करू शकता. इतकंच काय तर तो स्वच्छ, पांढरा शुभ्र बर्फ चक्क उचलून खाऊसुद्धा शकता! कुठेही थांबा आणि आजूबाजूला निरखा, तुमच्या सोबतीला असतात त्या बर्फाच्छादित डोंगररांगा आणि निरव शांतता. इतकी शांतता की तुम्हाला डोंगरातून वाहणाऱ्या वाऱ्याचासुद्धा आवाज ऐकू येतो!!

मी बर्फात खेळले, मग अक्षरश लहान मुलीसारखी लोळले, गुडघ्यापर्यंत पाय रुतवणाऱ्या शुभ्र बर्फातून चढून जात एका उंच दगडाजवळ गेले आणि बसले. इथे आल्यावर नकळत मनात या जागेची आणि स्वित्र्झलडची तुलना होत होती. मी  स्वित्र्झलडच्या ‘टॉप ऑफ युरोप’ला भेट दिली तेव्हा तिथे मी फक्त ११ हजार ५०० फुटांवर होते. आज मी आणखी उंचीवर म्हणजे १३ हजार ७०० फुटांवर होते, म्हणजे युरोपच्या टॉप मोस्ट पीकच्याही वरती, आई शप्पथ!!! काय फीिलग होतं ते. ते फीिलग, तो आनंद, तो अनुभव मी शब्दात व्यक्तच करू शकत नाही. तो क्षण फक्त अनुभवायचा! मी त्या काळ्या दगडावर जाऊन बसले तेव्हा समोर पांढऱ्याशुभ्र पर्वतरांगा आणि तो निळाशार सेला लेक दिसत होता. मी शांत होते. मन अगदी निर्वकिार, मला कोणाचीही आठवण येत नव्हती की कशाची उणीव जाणवत नव्हती. पण नकळत डोळ्यातून आनंदाश्रू वाहात होते.

मी काहीतरी मिळवलंय, माझं काहीतरी अस्तित्व आहे, माझ्यावर घरच्यांनी विश्वास ठेवून मला सिमरन जिंदगी जगायला दिली या सगळ्याचे एकत्रित फीिलग म्हणून असावेत ते बहुधा.. एकांत वेगळा आणि एकटेपणा वेगळा! मला आज पराकोटीचा एकांत अनुभवायला मिळाला. माझा तवांगकडे प्रवास सुरू झाला आणि जोरदार पावसाला सुरुवात झाली. संध्याकाळी सहा वाजता मी तवांगच्या हॉटेलला सुखरूप पोहोचले तेव्हा तिथलं तापमान होतं चार डिग्री सेल्सिअस!

सेलापासच्या या अविस्मरणीय अनुभवातून सावरतेय नाही, तर दुसऱ्या दिवशीचा आणखी भन्नाट अनुभव माझी वाट पाहत होता, तो होता इंडो-चायना बॉर्डर भेटीचा अर्थात बुम ला पासचा! काही जागा, काही अनुभव असे असतात की ते तुमच्या केवळ नशिबात असावे लागतात! तुम्ही त्याकरिता कितीही पसे द्यायला तयार असा किंवा तुमची कितीही उच्च पदावर ओळख असो पण जगन्नियंता तुमच्या डोक्यावर हात ठेवून ‘तथास्तु’ म्हणत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही प्रयत्न करा, काही गोष्टी नाहीच मिळू शकत! जगन्नियंत्याच्या मस्तीखोर पण आवडत्या मुलांमध्ये माझं नाव नक्की लिहिलेलं आहे याची तो मला या टूरमध्ये वारंवार जाणीव करून देत होता! ही जाणीव त्याने पुन्हा एकदा करून दिली ती ‘बुम ला पास’ अर्थात भारत-चीन सीमेवरील भेटीमुळे. इथे अध्रे पर्यटक जाऊ शकत नाहीत कारण लष्कराच्या नाना तऱ्हेच्या परवानग्या लागतात. बरं त्या मिळाल्या तर निसर्गाचा वरदहस्त लागतो (म्हणजे हे ठिकाण १५ हजार २०० फुटांवर असल्यामुळे इथे खूप कमी वेळा सूर्यप्रकाश असतो. बर्फ पडला झाला की रस्ता बंद) निसर्ग तथास्तु म्हणाला तरी चिखल आणि दगडांच्या खडबडीत रस्त्यावरून ४० किलोमीटरचा प्रवास करण्याची तुमची मानसिक आणि शारीरिक तयारी असावी लागते आणि हेही करून तुम्ही पोचलात तर १५ हजार २०० फुटांवर काही जणांना ऑक्सिजनची कमतरता जाणवते म्हणून ते गाडीत बसून राहतात! देवाच्या कृपेने या चारही पायऱ्या मी विनासायास पार करून भारत-चीन सीमारेषेवर येऊन पोहोचले होते!

बुम ला पासला मोठय़ा गाडय़ा जात नाहीत, फक्त सहा सीटर जीप जातात, त्यासुद्धा दुपारी एकपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, कारण दुपारनंतर वातावरण बदलतं आणि वादळाची शक्यता असते. जीपसुद्धा एकामागोमाग एक रांगेत चालतात. कुठे कधी समस्या आली तर सगळ्या जीपचे ड्रायव्हर एकमेकांना थांबून मदत करतात. बुम ला पासला जायचा प्रवास हाडं खिळखिळी करणारा आहे, पण हाच प्रवास तुम्हाला नजरेचं पारणं फिटवणारा निसर्ग दाखवतो. खडतर प्रवासाच्या त्रासावर लक्ष द्यायचं की निसर्ग अनुभवायचा हे तुम्ही ठरवायचं. आपला प्रवास सुरू झाला की पाहिलं लागतं ते मराठा रेजिमेंट. तिथला शिवाजी महाराजांचा पुतळा बघून ऊर अभिमानाने भरून येतो. मग सुरू होतो पुढचा २३ किलोमीटरचा चिखली-दगडी रस्ता. या प्रवासाची खासियत म्हणजे हा रस्ता ‘आर्मीच्या बापाचा आहे’ असे म्हणू शकतो इतके आपण या रस्त्यावर उपरे असतो. कारण तुम्हाला कितीही घाई असली तरी जर समोरून लष्कराचे वाहन येत असेल तर गाडी गुपचुप डोंगराच्या कडेला दाबून त्यांना पहिली वाट करून द्यावी लागते. ते निघाले की मग आपला प्रवास सुरू. एखादवेळेस समोरून जर लष्करी वाहनांचा ताफा  येताना दिसला की सगळे जीप ड्रायव्हर्स जागा बघून शिस्तीत गाडी पार्क करून गप्पा मारायला बाहेर उतरतात आणि ताफा पास होण्याची वाट बघतात. बाकी काहीही बोला, ‘हम जहाँ खडे होते हैं, लाइन वही से शुरु होती है!’ हे वाक्य लष्करी ट्रक्सना इथे अगदी तंतोतंत लागू होते.

दुपारी साधारण साडेबारा वाजता मी सीमेवर पोहोचले. एव्हाना थंडीची सवय झाली होती पण तिथल्या जवानाने जेव्हा त्यावेळचे तापमान सांगितले तेव्हा दातखीळ बसायची बाकी होती. मी उणे सहा डिग्री तापमानात वावरत होते! सगळीकडे एकच रंग व्यापून राहिलेला.. शुभ्र पांढरा. ऐकून गंमत वाटेल पण समोरच्या बर्फाच्छादित डोंगराचा सुळका माझ्या अगदी नजरेसमोर होता. जणू मी माऊंट एव्हरेस्टचं शिखर सर केलंय इतका नजरेच्या टप्प्यात! दुसरा मन वेडावून घेणारा रंग होता आर्मी ग्रीन! लष्कराच्या जवानांच्या पाठोपाठ एकामागोमाग एक अशा तऱ्हेने आम्ही बर्फातून चालत साधारण अर्धा किलोमीटपर्यंत गेलो आणि मग आली प्रत्यक्ष नियंत्रण रेषा! कुठलीही आखीव रेषा नाही, कुठलेही झेंडे नाहीत, कुठलेही लष्करी ठाणे नाही. सगळीकडे फक्त बर्फ. सगळ्यात रोमांचक क्षण काय होता सांगू? मी पाठी वळून बघितलं तिथे लिहिलेलं ‘वेलकम टू इंडिया’ जवानाच्या म्हणण्यानुसार आमचा दहा जणांचा ट्रप चक्क चीनच्या भूमीवर उभा होता! पर्यटकांसाठी खास चीनच्या भूमीवर थोडेसे पुढे जाण्याची व तिथे उभे राहून फोटो काढण्याची परवानगी दोन्ही देशांनी दिली आहे. मी त्या बर्फात गुडघे टेकून नतमस्तक झाले आणि चक्क त्या जागेचे चुंबन घेतले. याच जागेवरून दलाई लामा चीनहून भारतात आले होते व त्यांनी कायमस्वरूपी इथे वस्ती केली.

‘तुमची सेप्टिपिनसुद्धा आत्ता चायनाची आर्मी बघू शकतेय इतकी त्यांची दुर्बीण शार्प आहे’ अशी माहिती जवानांनी दिल्यावर त्या थंडीतही मला दरदरून घाम फुटला! पुढे सरळ चालत गेलं की भारत-चीनची जगप्रसिद्ध मॅकमोहन लाईन येते पण तिथे जाण्यास परवानगी नाही. एव्हाना १५ हजार २०० फुटांवरील कमी ऑक्सिजनची आणि त्या उणे सहा डिग्रीची मला सवय झाली होती. पण वातावरण बदलायला लागलं, जोरदार वारे वाहू लागले आणि जवानांनी आमच्या जिप्सना परतीच्या प्रवासाला निघायला सांगितले. बुम ला पासचे सर्टिफिकेट आणि बॅच घेऊन मी परतीच्या प्रवासाला निघाले. या प्रवासात मी अगदी शांत होते कारण मी जे पाहिलेलं, अनुभवलेलं त्याला एकच शब्द होता, शब्दातीत!!

ईशान्य भारतात जाण्यापूर्वी

नॉर्थ ईस्टची एक खासियत आहे. आपल्या भारतातल्या भारतात फिरायचं असेल तरी आज ठरवलं आणि उद्या निघालो असं हे ठिकाण नाही. तुम्ही अगदी काश्मीर किंवा कन्याकुमारीलाही असे निघू शकता, पण अरुणाचल प्रदेशला भेट द्यायची तर किमान दीड महिना आधी नियोजन करावं लागतं. याचं मुख्य कारण म्हणजे इनलाइन परमिट. तुम्ही तिथे किती दिवस राहणार आहात, कोणत्या वाहनाने फिरणार आहात, किती जणं येणार आहात याची इथे सरकारी नोंद करावी लागते. तुमचे तुम्ही ठरवून जाणार असाल तर तुमची स्थानिक सोय करणाऱ्या तिथल्या टूर एजन्टला तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो पाठवावा लागतो. त्यावर तिथे कागदपत्रं बनतात आणि भटकंतीचा परवाना मिळतो. ईशान्य भारतात जाण्याकरिता मुख्य प्रवेशद्वार म्हणजे आसाम. गुवाहाटी एअरपोर्टवरून फक्त काही तासांच्या अंतरावर एकमेकांना चिकटून असलेल्या या विविध राज्यांना भेट देणं त्यामानाने सोपं जातं. मुख्य विमान कंपन्यांची विमाने मुंबई, पुणे येथून थेट किंवा हॉिपग म्हणजे कोलकोत्याला एक थांबा घेऊन मग गुवाहाटीला पोहोचतात. येथील पर्यटनाचा सर्वात उत्तम हंगाम म्हणजे ऑक्टोबर ते एप्रिलचा मध्य. साधारण ३० एप्रिलनंतर काझिरंगा अभयारण्य बंद होते.

दिवस भराभर संपत होते. एव्हाना मेघालय, आसाम आणि अरुणाचलमध्ये मनसोक्त भटकंती करून झाली होती आणि मी परतीच्या प्रवासासाठी आसामला आले होते. या १३ दिवसात सेव्हन सिस्टर्सपैकी मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि आसाम या थ्री सिस्टर्समध्ये फिरताना मला कमालीची सुरक्षितता जाणवली. लष्कराचे साम्राज्य असेल म्हणून म्हणा किंवा आपल्या कामाशी काम ठेवणारे इथले स्थानिक म्हणा. मला कुठेही, कधीही असुरक्षित वाटले नाही! मी बोटवाल्या असिफबरोबर बसून चहा प्यायले, दिल्ली गर्ल्स बाईकर्सच्या रांगडय़ा गँगबरोबर डोंगरदऱ्या पार केल्या. कधी फाइव्ह स्टारमध्ये हादडून ब्रेकफास्ट केला तर कधी रोडसाइड टपरीवर थांबून मिचमिच्या डोळ्यांच्या आसामी आजोबांशी मनसोक्त गप्पा मारत मॅगी खाल्ली. मी माझे आयुष्य जगले आणि तेही वेगवेगळ्या पातळ्यांवर! एक जबाबदार आणि सजग स्त्री, एक अल्लड अवखळ मुलगी आणि एक बॅडअ‍ॅस एक्स्पोलरर! कुठल्या वेळी काय भूमिका अंगीकारायची हे समजले की सगळंच सोप्पं होतं! ‘अच्छा, सून ना दोस्त..’ म्हणून मदत मागायला लाजले नाही आणि हे जमलं म्हणून पुढचं बरंच सोपं होत गेलं! ‘देअर आर नो स्ट्रेंजर्स हीअर, ओन्ली फ्रेण्ड्स यू हॅवन्ट मीट’ हे वाक्य, मी इथे तंतोतंत जगले! मिचमिच्या डोळ्यांची लहान मुलं, त्यांच्या कष्टकरी आया, लष्कराचे जवान, ड्रायव्हर, स्थानिक विक्रेते, नृत्य करणारा ग्रुप, देवळातील भटजी, सायकल रिक्षा चालवणारा २०-२२ वर्षांचा मुलगा, आईचे हॉटेल सांभाळणारी याँगझोम ही मुलगी, तिकीट काऊंटरवरचा पोरगा, गाईड, मॅगी विक्रेती, फ्रुट कॅण्डी विकणारा मुलगा, बाईकर्स, इतर देशातले पर्यटक अशा सगळ्या स्तरातील लोकांशी मी संवाद साधला, तिथे थांबून मनसोक्त गप्पा मारल्या म्हणून कदाचित मला या सोलो ट्रिपमध्ये कधी एकटेपणा जाणवला नाही. विश्वास दाखवलात की विश्वास वाढतो हेही मी या सोलो टूरमध्ये खूपदा अनुभवलं. मला माझे फोटो काढून देणारे भेटले, माझ्याकडून त्यांचे फोटो काढून घेणारे भेटले. ‘दीदी रुको, यहासे ज्यादा अच्छा फोटो आयेगा’ म्हणून युनिक जागा दाखवणारे भेटले तसेच एक मुलगी (मी) समोरून फोटोसाठी विचारतेय म्हणून लाजून पळून जाणारेही भेटले.

परतीच्या प्रवासात जाणवलं १५ किलोच्या विमानातील लगेज अलाऊन्सपेक्षा माझ्या मनातील आठवणींचं गाठोडं नक्कीच वजनदार होतं. १३ दिवस रिवाईंड होऊन हे सगळं आत्ता आत्ता केल्यासारखं वाटतंय.. १५ हजार २०० फुटांवरील बर्फात चढून जाणे, सेलापासचा तो नितांत सुंदर एकांत, ब्रह्मपुत्रेतील बोटिंग, वॉटरफॉल बघण्याकरिता एकटीने केलेला जंगल ट्रेक, मायनस सहा डिग्रीमध्ये बघितलेला बुम ला पास, धुक्याच्या पडद्यामधून सांभाळत पार केलेले डोंगर, चिखल-दगडांच्या रस्त्यावरील हाडं खिळखिळी करणारा प्रवास, जीप सफारी, एलिफंट राईड, बर्ड वॉचिंग टूर हे आणि असे अनेक अनुभव कायमस्वरूपी मनात कोरले गेले आहेत. इथे नॉर्थ ईस्टमध्ये अशी समजूत आहे की, ‘एकदा का तुम्ही ब्रह्मपुत्रा नदी पार केली की ती तुम्हाला परत पार करावीच लागते!’ ती नदी पार करून मी एअरपोर्टला आले तेव्हा मनातल्या मनात इच्छा केली, ‘देवा, ही स्थानिक अंधश्रद्धा टिकवण्यासाठी का होईना मला परत इथे यायची संधी नक्की मिळू दे!’