09 July 2020

News Flash

एक तरी वारी अनुभवावी…

वारी ही महाराष्ट्राची लोकपंरपरा आणि विठोबा हे लोकदैवत.

संग्रहीत छायाचित्र

-सुनिता कुलकर्णी

करोनाची महासाथ आटोक्यात ठेवायची तर यंदाच्या वारीचं स्वरूप वेगळं असलं पाहिजे, मानवी संपर्क टाळला पाहिजे हे प्रशासनाचं म्हणणं मान्य करत यंदा वारकऱ्यांनी वारीला गर्दी न करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आणि समाजहिताचा विचार करायच्या ज्ञानोबा, तुकोबांच्या परंपरेचे आपण खरे पाईक आहोत हे दाखवून दिलं. आधुनिक विचार म्हणतात तो हाच. अध्यात्मिक लोकशाहीचा आधुनिक विचारही याच वारकरी पंथाने शेकडो वर्षांपूर्वी रुजवला होता.

गेली कित्येक शतकं महाराष्ट्रात या काळात ‘ग्यानबा तुकाराम’चा जयघोष केला जातो. पुण्याजवळच्या आळंदी आणि देहूहून वारकरी ज्ञानोबा तुकारामांच्या पालख्या घेऊन निघतात आणि पुढचे पंधरा दिवस पंढरीच्या वाटेवर विठूचा गजर होत हरिनामाचा झेंडा फडकत राहतो. चंद्रभागेच्या तीरावर असलेल्या पंढरीमध्ये पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला तो विठूदेखील या सगळ्या मंडळींची आतुरतेने वाट बघत असतो. शेकडो मैलांचं अंतर ऊनपावसाची पर्वा न करता आपल्यासाठी तुडवत येणाऱ्या या भक्तांचं त्याला कोण कौतुक.

आणि हे भक्तही कसे, तर त्यांना त्यांचा विठूराया भेटलाच पाहिजे असंही नाही. एवढी पायपीट करून गेल्यावरही त्याच्या कळसाचं दर्शन घेऊन ते तसेच माघारी फिरतात. पंढरीच्या वाटेवर उराउरी भेटणारा प्रत्येक जण त्यांच्या दृष्टीने त्यांचा विठूच असतो.

जगाच्या पाठीवर कुठेही गेलात तरी त्या त्या समाजाचं वैशिष्ट्य ठरेल अशी काहीतरी स्थानिक परंपरा असते. तशी वारी ही महाराष्ट्राची लोकपंरपरा आणि विठोबा हे लोकदैवत. ज्ञानेश्वर, तुकाराम, एकनाथ, नामदेव, गोरा कुंभार, सावता माळी, बहिणाबाई… आणखी कितीतरी जण वारीची लोकपरंपरा असलेल्या या वारकरी पंथाचे अर्ध्वयू.

आज जगात सगळीकडे लोकशाहीचा बोलबाला आहे. पण या सगळ्यांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या मातीत गेली शेकडो वर्षे अध्यात्मिक लोकशाही रुजवली. जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून कुणीही विठ्ठलाची आराधना करू शकतो, त्याच्यापुढे सगळेजण सारखेच आहेत हा विचार रुजवला.

आज महाराष्ट्र हे राज्य देशातल्या इतर कोणत्याही राज्यापेक्षा वेगळं, प्रगत आहे कारण त्याच्या मनाची मशागत अशा संतपरंपरेने केली आहे आणि त्यात वारकरी पंथाचं स्थान अग्रगण्य आहे.

करोनाच्या महासाथीमुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे यंदाची वारी नेहमीसारखी नाही. ग्यानबा तुकारामाचा जयघोष करत, टाळ चिपळ्या वाजवत यंदा देहू आळंदीहून पालख्या निघाल्या नाहीत. पुणे शहरात त्यांनी दिमाखात प्रवेश केला नाही. धावत धावत दिवे घाट उतरला नाही. वाटेवरच्या गावांमधले मुक्काम झाले नाहीत. ठिकठिकाणी रिंगण झाले नाही. समोरच्या प्रत्येकाला विठूचा अवतार समजत वारकरी एकमेकांना उराउरी भेटले नाहीत. पण गेल्या शेकडो वर्षांमधलं अडथळा आलेलं हे फक्त एक वर्ष आहे. त्यात खंड पडल्यामुळे उलट वारीची परंपरा आणखी उजळून निघाली आहे. ‘एक तरी ओवी अनुभवावी’ असं तुकोबा ज्ञानेश्वरीबाबत म्हणतात तसं यापुढच्या काळात ‘एक तरी वारी अनुभवावी’ असं आता प्रत्येक मराठी माणसाला वाटत असेल.

उद्या आषाढी एकादशी. यंदाही नेहमीप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची महापूजा होईल. पण आपले नेहमीचे भक्त भेटले नाहीत, याचं शल्य त्यालाही असेलच. अर्थात हा स्वल्पविराम आहे हे तोही जाणतोच. या एका वर्षाच्या खंडामुळे वारीच्या या परंपरेला अधिक बळकटी येवो आणि काळाबरोबर अधिकाधिक आधुनिक होण्याचं बळ तिला मिळो, हेच विठूरायापाशी मागणं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 10:27 am

Web Title: experience wari at least once msr 87
Next Stories
1 ब्युटी पार्लरमध्ये काय असतं ?
2 ‘पिझ्झागेट’चं भूत बाटलीबाहेर
3 साहेब, रजेस कारण की…
Just Now!
X