20 November 2019

News Flash

पाऊस आहे ‘साथी’ला

पावसामुळे डेंग्यूच्या प्रमाणात वाढ अथवा घट होऊ शकते.

पावसाळा हा अनेक साथरोगांचा पारेषण कालावधी आहे.

आरोग्य विशेष
डॉ. प्रदीप आवटे – response.lokprabha@expressindia.com

बदलते वातावरण, वाढते शहरीकरण या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्यासमोरील साथरोगांचे आव्हान मोठे होत चालले आहे. पावसाळ्यात तर हे आव्हान अधिकच खडतर स्वरूप धारण करते. मानव, प्राणी आणि पर्यावरण यांचे आरोग्य वेगवेगळे नसून ते परस्परावलंबी आहे, ही ‘वन हेल्थ’ची संकल्पना आपण आपण ती जितक्या लवकर आत्मसात करू तितक्या लवकर साथरोग नियंत्रणात ठेवण्यात यश येईल.

भारतीय मान्सूनचे स्वरूप बदलत आहे. पश्चिम घाटाची पर्वतीय रांग १५०० किमी परिसरात दक्षिण पश्चिम पसरली आहे. भारतीय मान्सून संपूर्णपणे या पर्वतरांगेवर अवलंबून आहे. मागील काही वर्षांपासून पर्जन्यमानात १०-२० टक्के घट झाली आहे. मान्सूननंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पडणाऱ्या पावसात वाढ होत आहे. तर पश्चिम घाटाशी संबंधित कर्नाटक, केरळ, तमिळनाडू, गोवा, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांतील सरासरी तापमानात वाढ होताना दिसते. वातावरणातील बदल आणि साथरोग या संदर्भात अधिक संशोधनाची गरज आहे.

पावसाळा हा अनेक साथरोगांचा पारेषण कालावधी आहे. या कालावधीत वाढणाऱ्या साथरोगांचे वर्गीकरण मुख्यत्वे दोन विभागांत करता येणे शक्य आहे. एक म्हणजे पाण्यामुळे पसरणारे आजार अर्थात जलजन्य आजार. या गटात डायरिया, डिसेंट्री, कॉलरा, गॅस्ट्रो अशा आजारांसोबतच विषमज्वर (टायफॉईड), कावीळ अशा आजारांचा समावेश होतो. लेप्टोस्पायरोसिस हाही याच काळात बळावणारा एक आजार. दुसरा गट म्हणजे अप्रत्यक्षपणे पाण्यामुळे पसरणारे म्हणजे कीटकजन्य आजार. कारण पाणी साठल्यामुळे डासोत्पत्तीची स्थाने निर्माण होऊन डासांमुळे होणाऱ्या आजारांतही याच काळात वाढ होते. यामध्ये मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि डासांमुळे पसणाऱ्या इतर आजारांचा समावेश होतो. याशिवाय हवेवाटे पसरणारा इन्फ्लुएंझादेखील मान्सून काळात डोके वर काढतो. एकूण काय, पावसाळा नवे जीवन, नवे चतन्य देतो हे खरेच पण वाजत गाजत आलेले हे नवे नवे पाणी, आपल्यासोबत नव्या-जुन्या आजारांच्या साथीदेखील घेऊन येते. पावसाचा अंतर्विरोध आपल्या अवघ्या जगण्याच्या अंतर्विरोधाचाच एक भाग आहे. वातावरणातील दीर्घकालीन बदलांच्या पाश्र्वभूमीवर आपल्याला महाराष्ट्रातील एकूण साथरोगांची परिस्थिती पाहावी लागेल. या अनुषंगाने आपण काय उपाययोजना करत आहोत, याचा आढावा घ्यावा लागेल.

डासजन्य आजार

२०१८ मध्ये प्रथमच महाराष्ट्रातील डेंग्यू रुग्णसंख्येने दहा हजारांचा आकडा पार केला. डेंग्यू इतक्या वेगाने वाढतोय, त्याचे कारण काय? डेंग्यूच्या या वाढीकरिता अनेक कारणे आहेत आणि ती आरोग्यबाह्य़ आहेत. त्यामुळे त्याची उत्तरेदेखील आपल्याला सर्वसमावेशक धोरणात्मक नियोजनाने शोधावी लागतील. ती केवळ आरोग्यव्यवस्थेत सापडणार नाहीत.

अत्यंत वेगाने होत असलेले नियोजनशून्य शहरीकरण हे याचे एक प्रमुख कारण. वाढती लोकसंख्या, प्रचंड प्रमाणात होत असलेले राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्थलांतर, वाढते आंतरराष्ट्रीय दळणवळण, अपुऱ्या नागरी सुविधा, नॉन बायोडिग्रेडेबल वस्तूंचा (बाटल्या, डिस्पोजेबल कप, प्लास्टिक वस्तू, टायर्स इ.) मोठय़ा प्रमाणावरील वापर या व अशा अनेक कारणांनी डेंग्यूचे प्रमाण वाढत आहे.

वातावरणात होणाऱ्या बदलांनी, ग्लोबल वॉìमगनेही या आजाराला हातभार लावला आहे. साधारणपणे २५ ते ३० अंश सेल्शियस तापमानात आणि ७०-८० आद्र्रतेत डेंग्यू डासांची पैदास मोठय़ा प्रमाणात होते. अशा वातावरणात अंडी ते प्रौढ डास हा प्रवास सात ते आठ दिवसांत पूर्ण होतो. तापमान कमी असल्यास अंडी उबवण्याचा हा कालावधी वाढतो. मात्र ग्लोबल वॉìमगमुळे वाढत्या तापमानात डासाचे जीवनचक्र अधिक वेगात पूर्ण होते, त्यामुळे त्यांची उत्पत्ती वाढते. डासांच्या शरीरातील विषाणूंची वाढही अधिक वेगात होते. डास चावण्याचे प्रमाणही वाढते. पूर्वी ज्या भागात एडीसला थाराही मिळत नव्हता त्या भागातही तापमानवाढीमुळे त्याची उत्पत्ती होऊ लागली आहे.

पावसामुळे डेंग्यूच्या प्रमाणात वाढ अथवा घट होऊ शकते. खूप जोराचा पाऊस झाला तर डासांची उत्पत्तिस्थाने वाहून जातात. मात्र रिमझिम पावसाने घराभोवती एडीस डासाच्या उत्पत्तीसाठी अनुकूल स्थाने निर्माण होतात. दुष्काळी परिस्थितीत लोकांची पाणी साठवून ठेवण्याची प्रवृत्ती वाढते, हेही या डासांच्या वाढीला कारणीभूत ठरते.

डेंग्यू आणि इतर सर्वच कीटकजन्य आजार नियंत्रणासंदर्भात महाराष्ट्रासमोरील प्रश्न नेमके काय आहेत, याचा विचार करणे आवश्यक आहे. कारण डेंग्यूवर मात करायची असेल तर वैयक्तिक पातळीबरोबरच आपल्याला धोरणात्मक पातळीवरही काही प्रयत्न करावे लागतील. डेंग्यूसोबत चिकनगुनियाचे रुग्णही लक्षणीय संख्येत आढळतात. मुख्यत्वे ग्रामीण भागात आढळणारा चिकनगुनिया आता पुणे, मुंबई, सातारा, सांगली असा शहरी भागांतही दिसून येतो आहे. एडीस या डासामुळेच पसरणारा तिसरा आजार म्हणजे झिका. मागील एक-दोन वर्षांत राजस्थान, मध्य प्रदेशमध्ये झिकाचे मोठे उद्रेक दिसून आले. आजमितीला महाराष्ट्रात झिका आढळला नसला तरी त्याची भीती आहेच.

डेंग्यूच्या तुलनेत मलेरिया आता बॅकसीटवर गेला आहे. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर सध्या मलेरिया मुख्यत्वे मुंबई, ठाणे, रायगड या पश्चिम भागांत आणि गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर या पूर्व भागात प्रामुख्याने आढळून येतो. आपण येत्या पाच वर्षांत मलेरियामुक्तीच्या दिशेने नियोजन करत आहोत. शेजारच्या श्रीलंकेचे प्रेरक उदाहरण आहेच; पण असे असले तरी मलेरियाने अनेकदा ‘यू-टर्न’ घेतलेला आहे, हे लक्षात घेता आपल्याला सावध पावले उचलणे आवश्यक आहे.

आपण काय करू शकतो?

प्रभावीरीत्या डास नियंत्रणासाठी आपल्या सर्वाच्या सहभागाची आवश्यकता आहे. आपल्या घरातील पाण्याची भांडी व्यवस्थित झाकून ठेवावीत. घरात किंवा अवतीभवती नळ गळत असल्यास तो दुरुस्त करून घ्यावा. घरातील फुलदाण्यांतील पाणी दिवसाआड बदलावे. कुंडय़ांमध्ये डास, अळीनाशक ग्रॅन्युल्स टाकावेत. इमारतीतील पाण्याच्या टाक्या व्यवस्थित झाकलेल्या असाव्यात. खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळ्या बसवाव्यात. झोपताना मच्छरदाणी लावावी. घराभोवतीचा परिसर स्वच्छ ठेवावा. अवतीभोवती/घराच्या छतावर प्लास्टिकच्या वस्तू किंवा इतर खोलगट वस्तू असल्यास त्या टाकून द्याव्यात. ते शक्य नसल्यास त्या पाणी साठणार नाही, अशी स्थितीत ठेवाव्यात. परिसरात टाकलेल्या टायरमध्ये पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. ही काळजी प्रत्येकाने, नियमितपणे घेणे आवश्यक आहे. विशेषत: सुट्टीवर जाताना कमोड झाकून ठेवावा. पाण्याची भांडी रिकामी करून पालथी घालून ठेवावीत. नळ ठिबकून पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी.

जलजन्य आजार

साथीचे बहुतेक आजार पाण्यावाटे आपल्यापर्यंत पोहोचतात. स्वच्छ पाणी ही स्थानिक स्वराज्य संस्थाची महत्त्वाची जबाबदारी आहे. दूषित पाण्यामुळे डायरिया, गॅस्ट्रो, कॉलरा, टायफॉइड, कावीळ असे आजार पसरतात. राज्यातील प्रत्येक पाणीस्रोत वर्षांतून दोनदा तपासण्यात येतो. पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर राज्यभर साथरोग सर्वेक्षण करण्यात येते. पाण्याच्या गुणवत्तेनुसार ग्रामपंचायतीला हिरवे, पिवळे आणि लाल असे कार्ड देण्यात येते. मुंबईसारख्या शहरात फेरीवाले, पदपथांवर खाद्यपदार्थ विकणारे यांच्याकडील पाणी आणि बर्फ यांचीदेखील तपासणी नियमित करण्यात येते. गेल्या वर्षी मुंबईतील पदपथांवरील विक्रेत्यांकडील बर्फाचे बहुतेक नमुने दूषित असल्याचे आढळले होते. मुंबईत जलजन्य काविळीचे प्रमाणही लक्षणीय आहे, हे लक्षात घेतले तर आपण सर्वानी आपल्या पाण्याची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. कोल्हापूर, सांगली परिसरांतही जलजन्य काविळीचे आव्हान मोठे आहे. ‘रहमन पानी राखिये, बिन पानी सब सुन’ या सुप्रसिद्ध दोह्य़ानुसार पाणी राखलेच पाहिजे; पण ते शुद्ध असणेही तेवढेच आवश्यक आहे.

पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबते आणि असे पाणी उंदराच्या अथवा जनावरांच्या मूत्रामुळे दूषित होते. या पाण्यातून चालल्याने लेप्टोस्पायरोसिस हा आजार पसरतो. कोकणात भातशेतीमध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांनाही भातलावणीच्या काळात या आजाराचा प्रादुर्भाव होतो. ताप, अंगदुखी, कावीळ, खोकला अशी या आजाराची लक्षणे आहेत.

गतवर्षी मुंबईत या आजाराने १२ जण मृत्युमुखी पडले. या वर्षीही राज्यात या आजाराने पाच जणांचा मृत्यू झाला. भातशेती करणारे शेतकरी, पशुपालक, कत्तलखान्यातील कामगार, सांडपाणी वाहिन्यांची सफाई करणारे, ट्रकचालक अशा व्यावसायिकांत हा आजार अधिक प्रमाणात दिसतो. पायाला जखमा असताना पावसाच्या पाण्यातून जाताना काळजी घेणे, शेतात काम करताना हॅण्डग्लोव्हज आणि गमबूटचा वापर करणे आवश्यक आहे. उंदीर नियंत्रण, गोठे, तबेले यांची स्वच्छता हा लेप्टो नियंत्रणाचा एक आवश्यक भाग आहे.

या आजारांशिवाय विदर्भातील स्क्रब टायफस, सिंधुदुर्गातील माकडताप (के.एफ.डी.) हे साथरोग आणि राज्यभर सध्या आढळत

असलेला इन्फ्ल्युएंझा एच१एन१ म्हणजे स्वाइन फ्ल्यू हे सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेसमोरील मोठे आव्हान आहे. इन्फ्ल्युएंझा आपल्यासोबत राहणारच आहे. आपण काय करायचे, हा लाखमोलाचा प्रश्न! आपल्या हातात आहे, शहाणपणाने वागणे. आपल्याला आरोग्यदायी सवयी लावाव्या लागतील. याला कोणताच शॉर्टकट नाही.

फ्ल्यू काय किंवा सध्या आपल्यासमोर आ वासून उभा राहिलेला टीबीसारखा जीवघेणा प्रश्न काय, आपल्या काही चुकीच्या सवयी बदलून आपल्याला या आजारांवर नियंत्रण आणणे शक्य आहे. हे आजार हवेवाटे म्हणजे िशकण्या-खोकण्यातून पसरतात. त्यात अनेक जण इतस्तत: थुंकत राहतात, त्यामुळे या आजारांचा प्रसार वाढतो. या चुकीच्या सवयी बदलल्या तरी या आजारांचे प्रमाण कमी होण्यास हातभार लागेल.

ज्याला आपण रेस्पिरेटरी एटीकेटस म्हणतो, ते पाळायला हवेत. िशकताना-खोकताना नाका-तोंडावर रुमाल धरणे, हात पुन:पुन्हा स्वच्छ धुणे, आपल्याला फ्ल्यूची लक्षणे असतील तर आपला जनसंपर्क कमी करणे, या साध्या साध्या गोष्टी आपले फ्ल्यूपासून रक्षण करतील. महत्त्वाचे म्हणजे आहार आणि विहार. शारीरिक व मानसिक ताण टाळणे, भरपूर पाणी पिणे, धूम्रपान टाळणे आणि हस्तांदोलनाऐवजी आपला खणखणीत भारतीय नमस्कार घालणे फ्ल्यूला ‘राम राम’ करण्यासाठी आवश्यक आहे.

सर्वसाधारणपणे फ्ल्यू हा सौम्य स्वरूपाचा आजार आहे; पण तरीही सर्दी-खोकला अंगावर काढू नये. डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेण्याबरोबरच गरम पाण्यात मीठ, हळद टाकून गुळण्या करणे, गरम पाण्याची वाफ घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे हा उपचारांचाच एक भाग आहे, याचे विस्मरण होऊ नये. फ्ल्यूविरोधी लसीकरण हाही एक महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय आहे.

बदलते वातावरण, वाढते शहरीकरण या पाश्र्वभूमीवर सार्वजनिक आरोग्यासमोरील साथरोगांचे आव्हान मोठे होत चालले आहे. सक्षम सर्वेक्षण व्यवस्था, प्रयोगशाळा सुविधा, प्रतिबंध आणि नियंत्रणामध्ये लोकसहभाग, नव्या उपाययोजना सुचविणारे प्रभावी संशोधन या वाटेने या आव्हानाला समर्थपणे उत्तर द्यायला हवे. मुळात मानव, प्राणी आणि पर्यावरण यांचे आरोग्य वेगवेगळे नसून ते परस्परावलंबी आहे, ही ‘वन हेल्थ’ची संकल्पना आपल्याला जितक्या लवकर समजेल आणि आत्मसात होईल तितक्या लवकर साथरोग नियंत्रणात ठेवण्यात यश येईल आणि सार्वजनिक आरोग्य जपणाऱ्या शाश्वत विकासाची गोष्टही आपल्या पचनी पडेल.

‘हम साथ साथ है’ हा नारा ही केवळ शाब्दिक कोटी नाही. साथींच्या कोटीच्या कोटी उड्डाणांवर प्रतिबंध करण्यासाठी तेच तर हवे आहे.

First Published on June 21, 2019 1:02 am

Web Title: monsoon and viral diseases
Just Now!
X