09 August 2020

News Flash

सांबर जलाशय स्थलांतरित पक्ष्यांची दफनभूमी

‘सांभर’ या सर्वात मोठय़ा खाऱ्या पाण्याच्या सरोवरात पक्ष्यांचे सामूहिक मृत्यू.

पक्ष्यांची एवढी मोठी दफनभूमी, तीही आपल्याच देशात आणि तीही त्यांच्या अन्न स्रोताच्या जवळ हे इतिहासात प्रथमच घडत आहे.

निमित्त
डॉ. नागेश टेकाळे – response.lokprabha@expressindia.com

‘हेडलबर्ग’ शहरात एकेकाळी जर्मन फौजांनी हजारो ज्यू नागरिकांना एकाच वेळी, एकाच ठिकाणी जिवंत दफन केले होते, ती जागा दशकापूर्वी जर्मनीला गेलो असताना बघितली. निष्पाप ज्यू लोकांच्या दबलेल्या हुंकाराचे टाहो सामावून घेणाऱ्या सामूहिक दफनाच्या अशा कितीतरी जागा त्या राष्ट्रात आहेत. माणसांसारख्याच अशा प्राणी, पक्ष्यांच्याही सामूहिक दफनभूमी असतात का?  जलाशयामधील हजारो मासे मृत होऊन पृष्ठभागावर तरंगताना कितीतरी वेळा पाहण्यात आले. प्रदूषण, पाण्यातील शून्य प्राणवायू अशी कारणे देऊन ती हजारो लाखो मत्स्यबाळे ठाणे महानगरपालिकेच्या कचऱ्याच्या डोंगरात विलीन झाली. माणूस, प्राणी, मासे यांच्यासारखेच असे पक्ष्यांचे सामूहिक मृत्यू कधी पाहण्यात आले नव्हते. पण ते घडले, तेही आपल्याच देशात जयपूर पासून ८० किमी अंतरावरील ‘सांभर’ या देशातील सर्वात मोठय़ा खाऱ्या पाण्याच्या सरोवरात. किती मृत्यू असावेत? २०१९ या वर्षी नोंव्हेबरच्या १ तारखेपासून २० तारखेपयर्ंत तब्बल १८ हजार ५००.  हे सर्व २९ प्रकारचे लहान मोठे स्थंलातरित पक्षी होते. दरवर्षी या सरोवरास उत्तर आशिया आणि सबेरियामधून अंदाजे ७९ हजार पक्षी भेट देतात, त्यांचा हंगाम नोंव्हेबर ते फेब्रुवारी असतो. या पक्ष्यांची एवढी मोठी दफनभूमी, तीही आपल्याच देशात आणि तीही त्यांच्या अन्न स्रोताच्या जवळ हे इतिहासात प्रथमच घडत आहे. कॅनडाच्या अलबर्टा प्रांतात १९९५-९७ मध्ये एकाच वेळी लाखाच्या वर पक्षी मृत पावल्याची नोंद आहे. याच काळात कॅनडाच्याच मॅनिटोबामध्ये एक लाख १७ हजार तर सॉसकॅटचेवनमध्ये हाच आकडा दहा लाखांवर पोहोचला होता. मज्जातंतूच्या आजाराने अमेरिकेमधील ‘ग्रीन सॉल्ट’ जलाशयामध्ये १९९७ मध्ये पाच लाख १४ हजार पक्षी मरण पावले. अनुभवावरून धडा घेऊन प्रत्येक जलाशयाजवळ पर्यावरण तसंच पाणी पृथ:करणाची प्रयोगशाळा निर्मिती केल्यामुळे कॅनडा आणि अमेरिकेत जलाशयात पक्ष्यांच्या मृत्यूची संख्या आता नगण्य झाली आहे. आपण मात्र या सगळ्या बाबतीत खूपच मागे आहोत.

‘रामसर’ यादीमध्ये असलेल्या या तलावास भेट देण्याची संधी मला दोन वेळा मिळाली. शाकंभरी देवीच्या वास्तव्यामुळे या खाऱ्या पाण्याच्या तलावास ‘सांभर’ सरोवर म्हणतात. तलावाच्या काठावर सांभर सरोवर शहर आहे. तेथे १२ व्या शतकामधील जुने शाकंभरीचे मंदिर आजही पाहावयास मिळते. तलावाच्या मध्यावर या देवीची मूर्ती आहे असे सांगितले जाते. महाभारतामध्ये वनपर्व भागात तीर्थयात्रा प्रकरणामध्ये तीर्थ सरोवर असा या तलावाचा उल्लेख आढळतो. सुश्रुत संहितेमध्ये या तलावातील मीठ औषधी आहे असे म्हटले आहे. तलावाच्या काठावर देवयानीचे मंदिर तसेच तेथे दैत्यगुरू शुक्राचार्याच्या आश्रमाची जागा आहे. याच मंदिर परिसरात ययाति देवयानीचे लग्न झाले असे मानले जाते.

नोंव्हेबर २०१६ मध्ये हजारो रोहित पक्ष्यांचे ते  संमेलन पाहून मी मोहित झालो होतो. आज २०१९च्या नोंव्हेबरमध्ये तलावाच्या किनाऱ्यावर हजारो राखाडी मृतदेहांचा खच पडला आहे. ३६ कि.मी. लांब आणि तीन ते ११ कि.मी. रुंद असलेल्या हा लंबाकृती तलाव अरवली पर्वताच्या छायेखाली येतो. उन्हाळ्यात सूर्याच्या उष्णतेमुळे याचे क्षेत्रफळ १९० कि.मी.पर्यंत कमी होते. पाण्याची खोली अंदाजे दोन फुटांपर्यंत येते मात्र पावसाळ्यात येणारे अरवली पर्वताराजीमधून उगम पावलेल्या पाच नद्यांचे पाणी, त्याचबरोबर पडणारा पाऊस यामुळे हेच क्षेत्र २३० ते २५० कि. मी. एवढे पसरते. सोबत पाण्याची खोली पाच-सहा फुटांपर्यंत जाते. उन्हाळ्यात बाष्पीभवनामुळे पाण्यातील मिठाचे प्रमाण वाढते, मात्र ते पावसाळ्यात झपाटय़ाने कमी होते, तरीही खारटपणा कायम असतो. आपल्या देशात लोणार, चिलका, पुलकित, पेनाँग आणि पाचपद्रा हे इतर पाच खाऱ्या पाण्याचे तलाव असले तरी मिठाचे उत्पादन करून त्याचे व्यापारी तत्त्वावर विक्री करणारा ‘सांभर’ हा राजस्थानमधील एकमेव तलाव आहे. या तलावाच्या पाण्यापासून राज्य शासनातर्फे प्रतिवर्षी अडीच लाख टन एवढे मीठ उत्पादन केले जाते, पण यापेक्षाही अनधिकृत पद्धतीने केलेले मीठ उत्पादन २० लाख टनांच्या आसपास आहे आणि हे सर्व या तलावाच्या परिसरात एक हजाराच्या वर विंधन विहिरी खोदून. या सर्व विंधन विहिरी आमदार, खासदार, राजकीय नेते, मंत्री, सरपंच यांच्या मालकीच्या अथवा भागीदारीत आहेत. हरित लवादाने या अनधिकृत मीठ निर्मितीची आणि त्याचा सांभर जलाशयामधील जैवविविधतेवर होणाऱ्या संभाव्य परिणामाची दखल २०१६ मध्ये घेऊनही परिस्थितीमध्ये अजून काहीही बदल दिसत नाही. राजस्थानला होणारा सर्व मीठ पुरवठा या तलावाद्वारे होतो. सांभर तलावामधील मिठाचे प्रमाण साडेतीन टक्क्यापासून ऋतुमानानुसार वाढत जाते आणि या बदलत्या खाऱ्या पाण्यामधील मिठाच्या प्रमाणानुसार या जलाशयामधील नील, हरित, विटकरी रंगाचे शेवाळ आणि जिवाणूंची जैवविविधताही बदलत राहते म्हणूनच येथील पाण्याचे वेगवेगळे रंग अनुभवयास मिळतात. खारटपणा कमी असतो तेव्हा तलावाच्या पाण्यात ‘स्पिरुलिना’ या हरित शेवाळाचे प्रमाण वाढते. उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन खारटपणा वाढू लागतो तेव्हा स्पिरुलिनाची जागा इतर शेवाळ घेतात. हाच खारटपणा २२ ते २४ टक्क्यांपर्यंत पोहोचतो तेव्हा ‘डय़ुनेलिया सॅलीना’ हे शेवाळ मुबलक वाढू लागते. हा काळ ऑक्टोबरच्या शेवटचा असतो आणि याच काळात हजारो मलांवरून येणारे स्थलांतरित पक्षी मोठय़ा प्रमाणात या तलावामधील हे शेवाळ खाण्यासाठी येतात. ‘सांभर’ ही पाणथळ भूमी आहे, पाण्याची खोली या काळात पाच ते सहा फूट व किनाऱ्यालगत अजून कमी असते म्हणून स्थलांतरित मोठे पक्षी बरेच खोलवर आत जाऊन शेवाळ मिळवतात. या शेवाळाबरोबर ‘बॅसीलस’ समूहामधील जिवाणूसुद्धा त्यांच्या आहारात समाविष्ट होतात. साधारणपणे फेब्रुवारीपर्यंत हा खारटपणा आणि त्यात वाढणारे शेवाळ कायम असते. उन्हाळा सुरू झाला की हा खारटपणा वाढू  लागतो आणि ‘डय़ुनेलिया’ अदृश्य होऊन त्याची जागा अति खारटपण्यामध्ये वाढणारे जिवाणू म्हणजे ‘हॅलोबॅक्टेरिया’ घेतात. हे बॅक्टेरिया डय़ुनेलियाच्या सेंद्रिय पदार्थावर वेगाने वाढतात. या बॅक्टेरियाचे तवंग पृष्ठभागावर तयार होण्याच्या आधीच स्थलांतरित पक्षी आपापल्या मायदेशी परत जातात. या वर्षी स्थलांतरित पक्षी आल्याबरोबरच लगेचच मृत्युमुखी पडण्यास सुरुवात झाली आहे. याला काय कारण असावे, याचा अभ्यास सुरू आहे. बर्डफ्ल्यूचा याच्याशी संबध नाही, मग जलाशयामधील अन्नसाखळीत काही बदल झाला असावा का? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उन्हाळ्यात तलावामधील पाणी बऱ्यापकी आटून त्याचा खारटपणा वाढलेला होता. हे प्रमाण किनाऱ्यालगत जास्त होते मग या ठिकाणाच्या अन्नसाखळीत ‘मायक्रोसिस्टीस’ या विषारी शेवाळाचा प्रवेश तर झाला नसावा?

या तलावास प्रतिवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालखंडात स्थलांतरित पक्ष्यांच्या ८३ प्रकारच्या प्रजाती भेट देत असतात. त्यामध्ये हिरव्या पंखाचे टील, लांब मानेचे िपटेल, विविध प्रकारची लहान-मोठी बदके, बगळ्यांच्या विविध जाती, काळा करकोचा, चिलखा, टिंबळा, लहान पाणकावळा, पाणपाकोळी यांची संख्या हजारोमध्ये असते. मृत पक्ष्यांत मात्र ठरावीक २५-३० पक्ष्यांच्या प्रजातीची संख्या जास्त आहे. त्यामध्ये पांढऱ्या शुभ्र छातीचे बदक, ब्राह्मी बदक, कवडय़ा टिलवा, श्याव टिटवा, तुरा असलेले बदक यांची संख्या लक्षणीय आहे. जिवांणूच्या विषामुळे ‘बोटय़ुलिझम’ हा मज्जातंतूचा आजार झाल्याने हे हजारो मृत्यू झाले हे आता सिद्ध झाले आहे.

ठाण्याच्या तलावात प्रदूषणामुळे मायक्रोसिस्टीसचे तवंग निर्माण होऊन हजारो मासे मेल्याचे मी प्रत्यक्ष पाहिलेले होते. तलावात अति खारटपणामुळे हॅलोबॅक्टेरियाचे प्रमाण वाढू लागते तेव्हा इतर जिवाणूंना तेथे वाढू द्यावयाचे नाही म्हणून हे बॅक्टेरिया आपल्या सभोवती ‘बॅक्टेरीओसीन’ हे विष म्हणजेच टॉक्सिन तयार करतात. याचे अवशेष तर सांभर जलाशयात राहिले नसतील? स्थलांतरित पक्ष्याचे मुख्य अन्न असलेले ‘डय़ुनेलिया’ त्यामुळे प्रभावित तर झाले नसेल?  या ‘टॉक्सिन’मुळे पक्ष्यांच्या मज्जातंतूवर आघात होऊन त्यांनी माना खाली टाकल्या असण्याची शक्यता जास्त आहे. हजारो मल दूरचा प्रवास, त्यात भर म्हणून या वर्षी भरपूर पाऊस, त्यामुळे पाण्यात मिठाचे प्रमाण कमी म्हणून डय़ुडोनियाची हवी तेवढी उत्पत्ती न होणे, प्रवास करून थकलेल्या पक्ष्यांना वेळेवर आवश्यक अन्न न मिळणे यामुळेही मृत पक्ष्यांची संख्या सुरुवातीस वाढली असावी. या हजारो पक्ष्यांच्या अशा मृत्यूचा संबंध बदलते पर्यावरण आणि त्यांच्या खाद्याशी आहे हे निश्चित. मृत पक्ष्यांमध्ये सबेरियाहून आलेल्या पक्ष्यांची संख्या जास्त आहे. हे सर्व पक्षी किनाऱ्यालगत तसेच तलावात पृष्ठभागावर पोहत अन्नाचा शोध घेत असतात. मृत पक्ष्यांमध्ये रोहित म्हणजेच फ्लेिमगो आढळले नाहीत ही एक आश्चर्याची बाब आहे. मृत पक्ष्यांनी ‘डय़ुनेलिया’ या शेवाळाव्यतिरिक्त इतर कोणता जल आहार घेतला होता का, त्यात न्युरोटॉक्झिन होते का याचा शोध घेणे गरजेचे आहे. ‘रामसर’ची मान्यता असलेल्या या मोठय़ा जलाशयाच्या काठावर या आजारी पक्ष्यांवर तातडीचे उपचार करण्यासाठी पक्षी दवाखाना नव्हता. अनेक पक्षी औषधाविना जागेवरच मरण पावले. ‘चिलका’ या ओरिसामधील खाऱ्या पाण्याच्या जलाशयाप्रमाणेच ‘सांभर जलाशय संवर्धन आणि संरक्षण केंद्र’ अशी स्वतंत्र संस्था या ठिकाणी गरजेची आहे. या संस्थेला केंद्र तसेच राज्य सरकारची मान्यता हवी आणि तिचे या तलावावर संपूर्ण नियंत्रण हवे. तसेच काठावर तलावाच्या पाण्याचे नियमित पृथ:करण करणारी प्रयोगशाळाही हवी. अशा प्रयोगशाळा मी जपानमधील सरोवराकाठी पाहिलेल्या आहेत. अरवली पर्वतराजीमधून ज्या पाच नद्यांचे पाणी जे सांभर जलाशयात येते ते पाणी गेले एक दशक कमी कमी का होत आहे, याचा अभ्यास करून या नद्यांचे पुनरुज्जीवन होणे गरजेचे आहे. तलावाच्या परिसरातील ३८ गावे आणि तीन लहान शहरे त्यांचे सांडपाणी या तलावाच्या पाच हजार ७०० चौ.कि.मी. क्षेत्रात सोडतात. या गावे-शहरांसाठी सांडपाणी प्रक्रिया त्वरित सुरू करणे गरजेचे आहे.

सबेरियामधून हजारो मलांचा प्रवास करून येणाऱ्या या आकाशी जीवांना अन्नपाणी देणाऱ्या सांभर जलाशयाच्याच काठावर त्यांची अशी दफनभूमी होणे हे कोणाही संवेदनशील व्यक्तीस वेदनादायी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 7, 2020 1:03 am

Web Title: sambhar lake deathbed thousands of migratory birds
Next Stories
1 अवधूत स्वामी
2 तळ्यावरचे पक्षी
3 नि:शंक- निर्भय…
Just Now!
X