News Flash

प्रतिक्रिया : आस्तिक नास्तिक

लेखातील व्याख्येचा निकष लावता मी पूर्णत: नास्तिक आहे.

45-lp-pageअलीकडेच मुंबईत ‘नास्तिकांची परिषद’ झाली. त्यानिमित्त ‘लोकप्रभा’ ने ‘नास्तिकाचं जग’ हा लेख प्रसिद्ध केला. त्यावरची प्रतिक्रिया.

‘नास्तिकांचं जग’ हा १५ एप्रिलच्या लोकप्रभेतला लेख वाचला आणि याविषयीच्या विचारांची मनात उजळणी झाली. लेखातील व्याख्येचा निकष लावता मी पूर्णत: नास्तिक आहे. संपूर्ण ज्ञात-अज्ञात अशा या विश्वामध्ये अनेक ज्ञात-अज्ञात ‘बल’ ठरावीक ज्ञात-अज्ञात नियमांनुसार कार्यरत असतात आणि परिणामत: विश्वामध्ये बदल घडत असतात असं मी मानतो. यातली थोडी बलं आणि त्यांचे नियम काही अंशी ज्ञात आहेत. (उदा. गुरुत्वाकर्षण, चुंबकत्व, अणुरेणूंमधील काही बलं इ.) अजून अज्ञात किती आहेत ते मात्र कुणीच सांगू शकणार नाही. हीच बलं विश्वात बदल घडवतात आणि प्रत्येक घटनेमागे कारण-परिणाम संबंध असतो अशा मताचा मी आहे. कुठल्याही सजीवाचा जन्म, वाढ आणि मृत्यू म्हणजे असेच कुठलेसे कारण-परिणाम संबंधानं जोडलेले बदल. त्यांतल्या एका ठरावीक  टप्प्याला आपण ‘जन्म’ म्हणतो आणि एकाला ‘मृत्यू’ म्हणतो, एवढंच. तसंच सगळ्या विश्वाचं त्याची ना निर्मिती झाली, ना शेवट होणार. ते केवळ बदलत राहणार असं आपलं माझं मत.

हे शब्दांत मांडायला सोपं आहे. पण खरी मेख आहे ‘ज्ञात’ आणि ‘अज्ञात’ यांच्यामधील फरकात. आणि तिथेच नास्तिक किंवा आस्तिक  असे विचारप्रवाह वेगळे होतात.

जे अज्ञात आहे, ज्यामागचं कारण आपल्याला माहीत नाही, त्याचं स्पष्टीकरण देण्याचा एक प्रयत्न म्हणजेच आस्तिकता. आणि त्या दृष्टीने पाहता आस्तिकता किंवा नास्तिकता या दोन्ही मतप्रवाहांत फरक असा काहीच नाही. आस्तिक आणि नास्तिक दोघेही बुद्धीच्याच निकषावर आणि तर्कानुसारच आपापल्या मतावर दृढ आहेत. विश्वातल्या एखाद्या घटनेमागचं कारण माहीत नसतं तेव्हा आस्तिक आणि नास्तिक आपापले तर्क लावतात. आस्तिक त्याला ‘देव’ म्हणतो. नास्तिक म्हणतो, ‘आपल्याला अजून ज्ञात नसलेलं कारण त्यामागे असणार खास.’ आस्तिकानं देव मानण्यामागचा हा तर्क मला असाच एकाकडून समजला. दहा-बारा वर्षांपूर्वी मी ऑफिसच्या कामासाठी चाकणला एका कंपनीत जायचो. १८-१९ वर्षांचा एक तरतरीत आणि गप्पिष्ट स्थानिक मुलगा कंपनीचा ड्रायव्हर हाता. तळेगाव स्टेशनवरून मला न्यायला-आणायला तो यायचा. एकदा कुणाकडून तरी त्याने नास्तिक विचार ऐकले बहुतेक. खूप अस्वस्थ झाला होता. म्हणाला, ‘सर, देव नाही हे कसं शक्य आहे? आता ही आपली गाडी. कुणीतरी बनवली म्हणून इथे आहे ना? मग हे डोंगर, ही झाडं, ही माणसं सगळं कुणीतरी बनवलंच असणार ना? मग ‘देव नाही’ असं कसं?’ थोडक्यात, त्याच्या आस्तिकतेमागे शुद्ध तर्कच होता.

आता माझी स्वत:ची मतं कशी बदलत गेली ते सांगतो. माझं देव मानणारं मध्यमवर्गीय घर. साहजिकच लहानपणी ‘देव आहे’ असं माझं ठाम मत. पुढे आठवी-नववीच्या सुमारास  ‘कुठलीतरी शक्ती आपलं काम करत असते’ अशा विचारांनी त्याची जागा घेतली. मग एक छोटीशी घटना. तेव्हा ती फार मोठी होती माझ्यासाठी, पण आता हसायला येतं. दहावी-अकरावीच्या वयात-जेव्हा ‘आपल्याला जे पटतं तेच आपण मानतो’ असं आपल्याला वाटत असतं तेव्हा एकदा मी जमिनीवर मांडी घालून बसलो आणि म्हणालो, ‘देवा, माझा तुझ्यावरचा विश्वास उडतोय. तो पूर्ण उडू द्यायचा नसेल, तर मला पुढल्या एका मिनिटात तुझं अस्तित्व दाखवून दे. नाहीतर ‘देव नाही’ असं मी समजेन.’ पुढलं एक मिनिट मी तसाच विनोदी प्रकारे स्तब्ध बसून राहिलो. देवाच्या अस्तित्वाची जाणीव अर्थातच झाली नाही. एका आस्तिक मित्राच्या मते देवानं तेव्हा त्याचं अस्तित्व दाखवलं होतं, पण मलाच ते समजलं नव्हतं. आणि त्या मित्राचं म्हणणं मी काही खोडून काढू शकलो नाही. पण ‘जगात देव नाही’ असं मी तेव्हापासून मानायला लागलो. कॉलेजच्या त्या वयात आपण स्वत:ला  नास्तिक म्हणवतो म्हणजे आपण विशेष आहोत आणि आपले विचार ‘रॅडिकल’ आहेत असं वाटून स्वत:च्या ‘इगो’वर छानशी फुंकर मारली जायची. ‘देव आहे’ असं ठामपणे म्हणणाऱ्यांशी वाद उकरून काढायलाही तेव्हा आवडायचं.

पण पुढे हळूहळू लक्षात यायला लागलं. आस्तिकता किंवा नास्तिकता काय, दुसऱ्याला सिद्ध करून दाखविण्याजोगा किंवा समजावून देण्याजोग्या गोष्टी नाहियेत. ‘जगाची निर्मिती आणि नियंत्रण कुणी सर्वशक्तिमान अलौकिक शक्ती करते अशी कल्पना आम्ही नाकारतो’ ही नास्तिकतेची व्याख्या जरी धरली तरी माझ्यासारखा एखादा नास्तिक ती कल्पना कशाच्या जोरावर नाकारतो? अशी शक्ती अस्त्विात नाही, हे तो सिद्ध करू शकतो का? काही अंशी हो. पण आपल्याला अज्ञात अशा ज्या गोष्टी आहेत याविषयी मी तरी नाही हे सिद्ध करून देऊ शकत. कारण एखादी गोष्ट अस्तित्वात नाही हे सिद्ध करणंच शक्य नसतं. उदाहरणार्थ, ‘केशरी रंगाचा कावळा असतो’ असं मी म्हटलं, तर तसा कावळा नसतो हे तुम्ही कसं सिद्ध करणार? तुम्ही म्हणाल, ‘तो मला दिसत नाही. म्हणून तो नाही.’ त्यावर मी म्हणेन, ‘तो जिथे असेल, तिथे जाऊन बघा म्हणजे दिसेल.’ झालं?  संपला विषय?

थोडक्यात, मी काही सर्वज्ञ नाही. पण तरी मी अशा शक्तीचं अस्तित्व मान्य करत नाही. म्हणजेच, ‘देव आहे’ हा जसा आस्तिकांचा विश्वास असतो, तसंच मीही आता म्हणतो, ‘देव नाही असा माझा विश्वास आहे’

त्यामुळे आज जसं कुणालाही ‘देव आहे’ असं मला समजावून किंवा सिद्ध करून देता येणार नाही तशीच मीही त्याला नास्तिकता समजावून किंवा सिद्ध करून देऊ शकत नाही. आणि म्हणून नास्तिकतेचा प्रचार होऊच शकत नाही असं मला वाटतं तसंच नास्तिक म्हणून माझं जग काही वेगळं आहे असंही मला वाटत नाही. किंवा मी नास्तिक आहे म्हणून माझ्याकडे आस्तिक लोक वेगळ्या नजरेनं पाहतात असंही अजिबात वाटत नाही. यावर एक मित्र म्हणाला, की ‘तू मुंबईसारख्या शहरात राहतोस म्हणून असं म्हणू शकतोस. दूरच्या गावांत परिस्थिती वेगळी असेल.’ असेलही. पण माझ्या मते तशा परिस्थितीचा संबंध आस्तिक-नास्तिकतेशी मर्यादित नसून तो आपल्या समाजातल्या भिन्न आचार-विचारांकडे पाहण्याचा एकंदर दृष्टिकोनाशी आहे. घट्ट चौकटीत राहणारा आपला समाज आताशा कुठे थोडा मोकळा होतोय. मला आठवतंय, मी प्राथमिक शाळेत असताना जीन्स-टीशर्ट, वाढवलेले केस असा पेहराव नुकताच यायला लागला होता. तेव्हाही असा पेहराव करणारी मुलं म्हणजे थोडीफार वाईट वाटेवर जाणारी असाच समज होता. तुलनेत आता शहरांमध्ये असे आचार-विचारांतले बदल लवकर पचवले जातात. तेच नास्तिकतेलाही लागू होतं.

नास्तिकांवर ‘आत एक-बाहेर एक’ असा आरोप केला जाण्याविषयी ‘नास्तिकांचं जग’ या लेखात जे म्हटलंय. तसं होत असेल तर त्यामागेही ‘वेगळे आचार-विचार’ हेच कारण असावं. पण असे आरोप प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षणपणे माझ्या तरी अनुभवाला कधी आले नाहीत. नास्तिकांच्या नास्तिकतेविषयी आस्तिकांना एवढी खरंच पडलेली असते का? किंवा पडलेली असावी का? तसंच नास्तिकांना आस्तिकांच्या आस्तिकतेविषयी काही पडलेली असायचं काय कारण? याचं याच्यापाशी, त्याचं त्याच्यापाशी.

खरं सांगायचं तर ‘नास्तिक’ या कल्पनेशी विसंगत असं मीही कधी कधी वागतो. उदाहरणार्थ, गणपतीत मी कुणाकडे जातो, तेव्हा त्या घरच्या गणपतीला फूल वाहून नमस्कार करतो. हाताच्या ओंजळीत प्रसाद घेतो. का? तर त्या व्यक्तीच्या घरी जाऊन तिच्या भावना दुखावण्यात मला काहीच सार्थक वाटणार नाही. किंवा तसा नमस्कार केल्यानं लोक माझ्या नास्तिकतेला ढोंग म्हणतील का याचाही विचार करण्याची मला गरज वाटत नाही. कारण नमस्कार करण्यानं काही साध्य होणार नसलं तरी नमस्कार न केल्यानंही मी काही साध्य करणार नाहीये. आणि त्यातून एखाद्याला माझ्या नास्तिकतेच्या खरेपणाविषयी विचार करायला किंवा बोलायला पुरेशी उत्सुकता आणि वेळ असलाच, तर म्हणू देत की तो मला खुशाल ढोंगी. पुन्हा तोच मुद्दा. त्याचं त्याच्यापाशी, माझं माझ्यापाशी.

थोडक्यात आस्तिकता आणि नास्तिकता या पटवून देण्याजोग्या गोष्टी नाहीत. आणि ‘नास्तिकाचं जग’ असा काही प्रकार आहे असंही मला वाटत नाही. त्यामुळे आस्तिकतेविषयी काय, नास्तिकतेविषयी काय. विशेष जाऊन करावं असं काहीच नाही. त्या दृष्टीनं अशी संमेलनं भरवणं किंवा न भरवणं दोन्ही सारखंच वाटतं. फक्त एवढंच की अशी संमेलनं किंवा भाषणं जेव्हा होतात-मग ती कुणाचीही असोत. आस्तिकांची, नास्तिकांची, कुणाचीही-तेव्हा आपल्याकडे नाही म्हटलं तरी दुसरी बाजू थोडी दुखावते. कारण समाज म्हणून अजून आपण पूर्णपणे ‘दुमताविषयी एकमत’ असण्याच्या (अ‍ॅग्री टू डिसअ‍ॅग्री) अवस्थेला पोचलेलो नाही. मग दुसरा गट त्यांची मतं मांडणार. कुणी भावुक होणार. उखाळ्या-पाखाळ्या निघणार. हवंय कशाला?

मग मी माझ्या नास्तिकतेचं काय करावं? तर ती स्वत: जवळ ठेवावी. आस्तिक-नास्तिकतेच्या सीमेवर कुणी संभ्रमित असेल आणि जर तो माझ्यापाशी त्यावर बोलायला आला तर त्याला माझी मतं आणि त्यामागची कारणं सांगावीत. त्यावर  तो काय विचार करेल आणि कुठल्या मतावर स्थिर होईल ते त्याला माहीत. त्याचं त्याच्यापाशी. माझं माझ्यापाशी.
प्रसाद निक्ते – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2016 1:06 am

Web Title: theist and astheistic
टॅग : Pratikriya
Next Stories
1 खटय़ाळ टॉम-जेरी
2 छोटय़ांचा दोस्त
3 समझदार नॉडी
Just Now!
X