महाराष्ट्राचा ‘बायो’डेटा
वृक्षवल्ली
राकट, कणखर असे वर्णन केलेल्या महाराष्ट्रात वैशिष्टय़पूर्ण अशी वनसंपदा आहे. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागांमध्ये मिळून  १८७ कुळांतील एक हजार ८१ जातींच्या तीन हजार २५ प्रजाती सापडतात

महाराष्ट्र राज्याची स्थापना १ मे १९६० साली झाली. पूर्व ते पश्चिम ८०० किलोमीटर लांब आणि उत्तर ते दक्षिण ७०० किमी लांब अशा अनियमित पंचाकृती आकाराचं हे राज्य आहे. ते अक्षांश २२ अंश १’ ते १६ अंश ४’ उत्तर ते रेखांश ७२ अंश ६’ ते ८० अंश ९’ पूर्व यामध्ये व्यापले आहे. ते साधारणपणे ३,०७,७६२ स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ आहे. त्याच्या पश्चिमेला ७२० किमी लांबीची समुद्रकिनारपट्टी, दक्षिणेला गोवा आणि कर्नाटक ही राज्यं, दक्षिण पूर्वेला आंध्र प्रदेश, पूर्व आणि उत्तर दिशेला मध्य प्रदेश असून उत्तर पूर्व दिशेला गुजरात राज्य आहे. समुद्रसपाटीपासून उंची आणि भूभाग त्याचे यावरून साधारणपणे कोकण आणि देश असे दोन विभाग पडतात. कोकण हा एक जमिनीने व्यापलेला समुद्रकिनाऱ्यालगतचा चिंचोळा भाग आहे. तसंच देश हा सह्यद्रीने व्यापला असून दख्खन, विदर्भ आणि मराठवाडा असे त्याचे तीन भाग पडतात. दख्खन या प्रदेशात मुंबईचा समावेश होतो. राज्याचा बराचसा भाग पठाराने व्यापला असून पूर्वेकडचा भाग सपाट आहे आणि पश्चिमेकडचा भाग तीव्र उताराचा आहे. याच पठारावर महाबळेश्वर आणि पांचगणी ही पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणं आहेत. या क्षेत्रात कृष्णा, कोयना, वेण्णा आणि सावित्री या बारमाही नद्या असून कोयना, ढोम आणि कन्हर ही धरणे आहेत. सह्य़ाद्रीचा कडा हा या पठाराला कोकणापासून वेगळा करतो. कोकण आणि देश यांना जोडणारे आणि सह्यद्रीच्या डोंगराळ प्रदेशातून जाणारे १९ ते २० घाट रस्ते अस्तित्वात आहेत. देशाकडील भागात नर्मदा, तापी, पूर्णा, वर्धा, गोदावरी, भीमा आणि कृष्णा या महत्त्वाच्या नद्या महाराष्ट्राला समृद्ध करतात. या पश्चिम घाटाबरोबरच नाशिक आणि औरंगाबाद भागांत सातपुडा पर्वताची रांगही आहे. तसंच अहमदनगरमधील हरिश्चंद्रगड ते उस्मानाबादमधून गुलबग्र्यापर्यंत जाणारी बालाघाट रेंजही आहे. याव्यतिरिक्त प्रवरा, वैतरणा, तानसा तसंच आंबा, कुंडलिका, वशिष्ठी या नद्याही आहेत.

Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?
mudda maharashtracha indian center for policy and leadership development survey about New problems and demands of western Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… पश्चिम महाराष्ट्र : आहे मनोहर तरी…

या भौगोलिक वैशिष्टय़ांमुळे महाराष्ट्रातील वनसंपदासुद्धा भिन्न किंवा विषम प्रकारची आहे. दक्षिणेकडचं पठार हे खानदेशातून गुजरात आणि मध्य प्रदेशापर्यंत जातं. नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यतील वनसंपदा ही नाग विभागात मोडते तर वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ हे विदर्भाच्या पठारात येतात. याव्यतिरिक्त महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, अहमदनगर, कोल्हापूर, नाशिक, पुणे, सांगली आणि सातारा हे दहा जिल्हे; तसंच सह्यद्रीचा काही भाग व कोकण येथे असणाऱ्या वैशिष्टय़पूर्ण हवामानामुळे तिथल्या वनस्पतींमध्ये तफावत आढळते.

१९०३ ते १९०७ या काळात पुण्याच्या कॉलेज ऑफ सायन्सचे प्राचार्य थिओदोर कुक यांनी प्रथम ‘फ्लोरा ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी’ या पुस्तकाचे तीन खंड लिहिले. या पुस्तकात त्यांनी दोन हजार ५१३ जातींच्या वनस्पती समाविष्ट केल्या. बॉम्बे प्रेसिडेन्सी म्हणजे त्या वेळचे उत्तर कन्नडा-बेळगाव, बिजापूर, धारवाड, सध्या पाकिस्तानात असलेले सिंध आणि कराची, सध्याचा महाराष्ट्र आणि गोवा हे प्रदेश होय. ‘कुक्स फ्लोरा’ म्हणून हे पुस्तक आजही वनस्पतिशास्त्राचे तज्ज्ञ आणि विद्यार्थी यांच्यात लोकप्रिय आहे. कुक यांच्यानंतर ९० ते ९५ वर्षांनंतर म्हणजे १९९६ पासून ते २०१७ या काळात डॉ. मार्सेलीन अल्मेडा यांनी लिहिलेल्या ‘फ्लोरा ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकाचे सहा खंड प्रकाशित झाले. या खंडांमध्ये साधारणपणे पाच हजार वनस्पतींचा अभ्यास डॉ. अल्मेडा यांनी केला आहे. २००० ते २००६ या काळात भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागाने लिहिलेल्या ‘फ्लोरा ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात तीन हजार २५ वनस्पतींचा समावेश केला आहे. या तिघांव्यतिरिक्त ग्रॅहम, निम्मो, डाल्झल अण्ड गिब्सन, व्रुडो, ब्लॅटर, सान्तापाव, वर्तक, कार्तिकेयन, बोले, महाबळे, महाजन आदी शास्त्रज्ञांनीही वनस्पती अभ्यासास हातभार लावला आहे. अलीकडेच डॉ. व्ही. एन. नाईक यांच्या ‘मराठवाडा फ्लोरा’, यादव आणि सरदेसाई यांच्या ‘कोल्हापूर फ्लोरा’, एस. पी. गायकवाड यांच्या ‘सोलापूर फ्लोरा’ आणि उगे-मोगे यांच्या ‘विदर्भ फ्लोरा’ या पुस्तकांमध्येही महाराष्ट्रातील वनस्पतींबद्दल माहिती आहे.

महाराष्ट्रात ६३ हजार ८४२ स्क्वेअर किमी भागात जंगलं आहेत. यापैकी ४६ हजार १४३ स्क्वेअर किमी भाग पूर्ण जंगलाने व्यापला असून २३ हजार ६२२  स्क्वेअर किमी भाग हा घनदाट जंगलं, २२ हजार ३९७ स्क्वेअर किमी भाग हा तुरळक जंगलं आणि १२४ स्क्वेअर किमी भाग हा खारफुटीच्या जंगलाने व्यापला आहे.

कोकणातील वनस्पती

कोकण हा चिंचोळा भाग असून २७ ते ४८ किमी रुंद आणि ८०० किमी लांब असा तापीच्या खोऱ्यापासून ते गोव्यापर्यंतचा प्रदेश हा ‘कोकण’ या संज्ञेत मोडतो. वनस्पतिशास्त्राप्रमाणे इथल्या वनस्पती मलाबार प्रदेशातील जंगलं या प्रकारात मोडतात. ब्लॅटर (१९०५), भरुचा (१९४०-१९४९), नवलकर (१९५१), जैन आणि करमरकर (१९५८), इराणी (१९६२), वर्तक (१९६६-६७), सान्तापाव आणि रान्देविया (१९५५), जैन (१९५९), अल्मेडा (१९९०), अल्मेडा आणि मेस्त्री (१९८७), जी. एल. शहा (१९६२) आणि एस. एम. अल्मेडा (१९९०) इत्यादी वनस्पती शास्त्रज्ञांनी कोकणातल्या वनस्पतींवर अभ्यासपूर्ण शोधनिबंध अथवा पुस्तकं लिहिली आहेत. कोकणचा फ्लोरा हा साधारण सहा प्रकारच्या जंगल प्रकारांमध्ये मोडतो.

समुद्रकिनाऱ्यालगतच्या लिट्टोरल वनस्पती :  या प्रकारात खाडी, खाडीचा किनारा, खाडीमुळे तयार होणारी बेटे, खारफुटीची जंगलं, किनाऱ्यावरील रेतीवर येणाऱ्या वनस्पती (सॅण्ड डय़ुन्स) आणि भरती-ओहोटी रेषेच्या पलीकडील वनस्पती यांचा समावेश होतो.

अ) खारफुटीची झाडे (मँग्रोव्हस्) – अरोंडा, शिरोडा, वेंगुर्ला, मालवण, देवगड, रत्नागिरी, श्रीवर्धन, अलिबाग, किहिम, ठाणे, मुंबई, वसई, नालासोपारा येथील समुद्रकिनाऱ्यालगत खाऱ्या पाण्यात दलदलीच्या प्रदेशात येणारी झाडे म्हणजेच खारफुटीची झाडे. उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास अकॅन्थस इलिसिफोलिअस, एजिसेरास कॉर्निक्युलाटस, अविसेनिया मरिना, ब्रुगियेरा जिम्नोरायझा, सिझलपिनिया क्रिस्टा, सिरिऑप्स तागल, क्लेरोडड्रम इनरमे, सायपरस डिफॉर्मेस, सायपरस रोटंण्ड्स, डेरिस ट्रायफॉलिआटा, एक्झोकारिया आगालोचा, कांदेलिया कांदळ, प्रेम्ना इंटेग्रिफलिआ, रायझोफोरा म्युक्रोनाटा, साल्वाडोरा पर्सिका (मेसवाक), स्कॅविओला टकाडा (अर्धफुल), सेसुवीअम पोटर्य़ुलाकॅस्ट्रम, सोनेरेशिया अल्बा आणि सोनेरेशिया अपेटाला, स्पिनिफेक्स लिट्टोरिअस, सुवेडा मॅरिटिमा या वनस्पती वरील प्रदेशात आढळतात.

ब) समुद्रकिनाऱ्यावरील रेतीच्या टेकडय़ांवरील वनस्पती (सॅण्ड डय़ुन्स) – या प्रदेशात खालील प्रकारच्या वनस्पती मोठय़ा प्रमाणात आढळतात. उदाहरणार्थ क्रोटालारिया व्हेरुकोझा, सायपरस रोटण्ड्स, लाऊनिया पिण्णाटीफिडा आणि स्पिनिफेक्स लिट्टोरिअस. वेली या प्रकारात डेरिस ट्रायफ्लोरिआटा आणि आयपोमिया पेसकार्पे तर झुडुप या प्रकारात व्हिटेक्स ट्रायफ्लोरिआटा आणि पेण्डानस फॅसिक्युलारिस (केवडा) तसंच कोकस न्यूसिफेरा (नारळ), थेस्पेसिआ पॉप्युलिनिआ (भेंडी), कॅलोफिलम इनोफिलम (उंडी) ही झाडे मोठय़ा प्रमाणात आढळतात.

क) भरती-ओहोटी रेषेच्या पलीकडील वनस्पती- यामध्ये उंडी, कॅझ्युआरिना इक्विसेटिफोलिया (सुरू), नारळ, केवडा, भेंडी आणि एरिथ्रिना इंडिका (पांगारा) या व्यतिरिक्त खजूर (फोनिक्स सिल्वेस्ट्रेस) आणि बोरासुस फ्लॅबेलिफेअर ताडगोळे, ही झाडे तसंच मुंबईमध्ये कनावालिया मारिटिमा, सिझलपिनिया क्रिस्टा, कॅलोट्रॉपिस जायजेनशिया (रुई), क्लेरोडेण्ड्रम इनरमी, किरगनेलिया रेटिक्युलाटा, कोलुब्रिना एशियाटिका आणि व्हिटेक्स ट्रायफ्लोरिआटा यांचा समावेश होतो. अलीकडल्या काळात किहिम, अलिबाग, दिवेआगार या भागांत वेडेलिया, कॅलेण्डय़ुला सिया आणि र्अधफुल या वनस्पती समुद्रकिनाऱ्याची धूप थांबवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात लावण्यात आलेल्या आहेत. तसंच अल्युरोपस लागोपोलिऑयडिस, बोहेराविया डिफ्युझा, कॅशिया टोरा (टाकळा), क्रोटालारिया व्हेरुकोझा, सायनोडॉन    डॅक्टिलॉन (दुर्वा), लिऑनोटीस नेपेटिफोलिया (दीपमाळ), पासपालिडम फ्लॅविडम इत्यादी वनस्पती काही प्रमाणात आढळतात. तसंच डॅक्टिलोक्टिनिअम सिंडिकुम आणि लावनिया सार्मेटोजा या दुर्मीळ वनस्पतीही सापडतात.

रुडेराल क्षेत्र (Ruderal): भरती-ओहोटी रेषेच्या पलीकडील जवळपास असणाऱ्या टेकडय़ांपर्यंतचा भाग म्हणजे रुडेराल. या विभागात बरेच क्षेत्रे शेतीच्या लागवडीखाली येत असून तेथे आढळणारे वृक्ष हे बहुधा बाहेरील प्रदेशातून आणून लावण्यात आलेले असतात. तसंच तिथे लोकांचा वावरही असतो. त्यांच्या सततच्या वावरामुळे तेथील वनस्पती भिन्न प्रकारच्या असतात. अकेशिया चुद्रा, अलांजिअम साल्वीफोलिअम (अंकुळ), अल्बिझिया अमारा, बॅरिंगटोनिया रेसेमोझा (समुद्रफुल), बोहिनिया पुरपुरिया (कांचन), बोहिनिया रेसेमोझा (आपटा), बॉम्बॅक्स सीबा (लाल काटेसावर), ब्युटिया मोनोस्पर्मा (पळस), करालिया ब्राकीआटा, करेआ आबरेरिया (कुंभी), कॅशिया फिस्टुला (बहावा), कॉर्डिया डायकॉटमा (भोकर), डाल्बरजिया लॅटिफोलिया (शिसम), डिलेनिआ इंडिका (कमरख), एम्बेलिका ऑफशिनालिस (आवळा), एर्वाटामिया अल्टरनिफोलिया, फायकस आर्नोशिआना (पिंपळी), फायकस बेंगालेन्सेस (वड), फायकस रेलिजिओजा (पिंपळ), फिर्मियाना कोलोराटा (कौशी), गार्सिनिआ इंडिका (कोकम), मेलिना आबरेरिया (शिवण), हल्दीनिया कॉर्डिफोलिया (हेदू किंवा हळदू), हॉलिगार्ना ग्राहमी (बिबोई), होल्पोटेलिया इंटेग्रीफोलिया (पापडी), लाजरस्त्रेमिया लॅन्सीओलाटा, लाजरस्त्रेमिया स्पिशिओझा (तामण), माकारांगा पेलटाटा (चांदा), ओरोक्झायलम इंडिकम (टेटू), पोंगामिया पिन्नाटा (करंज), टेरोकार्पस मार्सूपिअम (बिवळा), साराका अशोका (सीताअशोक), स्पाँडिअस पिन्नाटा (आंबाडा), स्टक्र्युलिया युरेन्स (कहांडोळ), स्ट्रिकनॉस नक्सवोमिका, सायझिगिअम कॅरिओफिलिअम, टर्मिनालिया अर्जुना (अर्जुन), टर्मिनालिया बेल्लेरिका (बेहडा), टर्मिनालिया चेब्युला (हिरडा), टर्मिनालिया क्रेन्युलाटा (ऐन), टर्मिनालिया पॅनिक्युलाटा (किंजळ), रायटिया आबरेरिया, रायटिया टिंकोरिया (काळा खुडा) या प्रदेशातील या स्थानिक वनस्पती आहेत. मोठय़ा प्रमाणात पडणारा पाऊस, कोकणात आढळणारी लाल माती आणि इथले हवामान हे या वृक्षांच्या वाढीस आणि संख्येस कारणीभूत आहेत. वर म्हटल्याप्रमाणे बरीचशी जमीन लागवडीखाली असल्यामुळे तेथे काही फळझाडेही मोठय़ा प्रमाणावर आढळतात. उदाहरणार्थ अनाकार्डिअम ऑक्सिडेण्टाले (काजू), अनोना स्क्वामोझा (सीताफळ), अनोन रेटिक्युलाटा (रामफळ), अनोना म्युरिकाटा (मामफळ), अरेका कटेचू (सुपारी), आटरेकार्पस एटरोफिलस (फणस), अव्हरोव्हा बिलंबी (बिलंबी), अव्हरोव्हा करंबोळा (करंबोळा), कॅरिका पपाया (पपई), सिक्का असिडा, सिट्रस मॅक्झिमा (लिंबू), नारळ, कोकम, आंबा, मानिलकारा झपोटा (चिकू), मोरिंगा कोंकणेन्सेस (कडू शेवगा), मोरिंगा टेरिगोस्पर्मा (शेगवा), म्युसा पॅराडिसिका (केळी), सिडिअम गुजावा (पेरू), सॅपिण्डस ट्रायफोलियाटस (रिठा), साईजिगिअम क्युमिनी (जांभूळ), साईजिगिअम मलाकॅन्सस (जाम), मिरिस्टिका फ्रॅग्रन्स (जायफळ) आणि टॅरामिण्डस इंडिका (चिंच) इत्यादी. याच भागात शोभेची किंवा रस्त्याच्या कडेला आढळणारी झाडे म्हणजे एग्ल मार्मेलोस (बेल), समुद्रफुल, बहावा, कॅशिया सायामिया (कसोद), क्रायझोफिलम कायनिटो (स्टार अ‍ॅपल), कौरोपिता ग्वानेन्सेस (कैलासपती), कट्रेव्हा टापिया (वायूवर्ण), डेलॉनिक्स रेजिया (गुलमोहर), पांगारा, वड, तामण, मामिया लाँजिफोलीया (सुरंगी), मेसुवा फेरिया (नागकेशर), मायकेलिया चंपाका (सोनचाफा), पेल्टोफोरम टेरोकार्पम (सुवर्णमोहर), समानिया समान (विलायती चिंच), सीताअशोक, स्पॅथोडिया कम्पॅन्युलाटा, स्विटेनिया मोहोगोनी (मोहोगोनी) ही होय.

झुडुप या गटात मोडणाऱ्या झाडांपैकी आधातोडा झिलानिका (अडुळसा), ब्रायडेलिया स्कॅण्डन्स, रुई, कॅलिकॉप्टेरिस फ्लोरिबुण्डा (उक्षी), कपॅरिस झिलानिका, कॅरिसा करन्दास (करवंद), कसेरिया एसक्युलेंटा, क्लेरोड्रॅण्ड्रम सेराटम, डालबरजिया व्हॉल्युबिलेस, ग्लॉकिडिऑन व्हेलुटिनम, जास्मिनम मलाबारीकम (रानमोगरा), हेलिक्टेरिस आयसोरा (मुरुडशेंग), हॉलरहेना अण्टिडिसेंट्रिका (सफेद कुडा), एक्झोरा कॉकसिनिया, लांटाना कामेरा (घाणेरी), लिया एशियाटिका (दिंडा), मायक्रोकॉस पॅनिक्युलाटा (हसोळी), ऑक्ना ऑब्टयुझाटा, पावेटा इंडिका, वुडफोर्डिया फ्रुटिकोझा (धायटी) आणि झिझिफुस रुगोजा (बोरं) ही आहेत. मुरुडशेंग आणि सफेद कुडा या दोन औषधी वनस्पती आहेत. यांपैकी मुरुडशेंग ही लहान मुलांना दिल्या जाणाऱ्या गुटीमध्ये वापरतात. पोटातील मुरडा थांबवण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग केला जातो. कदाचित मुरुडशेंग हे त्याचं नाव त्याच्या या गुणधर्मावरूनच आलेलं असावं. तसंच सफेद कुडाच्या खोडापासून कुटजारिष्ट नावाचं औषध सर्वाना परिचितच आहे. याच झुडुप गटात पाण्याकाठी आढळणाऱ्या वनस्पती म्हणजे ग्लॉकिडिऑन झिलानीकम, होमोनोइया रिपारिया, मेलास्टोमा मलाबाथ्रीकम, रोटुला अक्वाटिका, मुराया पॅनिक्युलाटा (कुंती), जात्रोफा कुर्कस, ऑसिमम सॅण्टम (तुळस), लावसोमिया इनरमेस (मेंदी) या आहेत. या भागात वेलींचंही प्रमाण भरपूर आहे. सिझम्पेलॉस परेरा, सिसुसउड्रोइ, कनावालिया, मॅराटिमा, कॉम्ब्रेटम ओवालिफोलियम, क्रिप्टोलेपस बुकानानी, सायक्लिया पेलटाटा,  ग्लोरिओझा सुपरबा (अग्निशिखा), हेमिडेसमुस इंडिकुस (अनंतमूळ), म्युक्युना क्युरिएन्स (खाजकुइली), डायस्कोरिया बल्बीफेरा (कारंद), टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया (गुळवेल), टायलोफोरा इंडिका ही त्यापैकी काही वेलींची नावं आहेत.

या भागात जंगलांचं प्रमाण आणि उपलब्ध असलेलं हवामान यामुळे इतर झाडांवर अधिवास असणारी एपिफाइट्स किंवा अधिपादप वनस्पतींमध्ये ऑर्किड, बांडगूळ, अमरवेल या वनस्पती आढळतात. त्यापैकीच काही म्हणजे अकाम्पे प्रिमोर्झा, एरिडिस क्रिसपम्प, एरिडिस मॅक्युलाटम, डेण्डोब्रिअम, होया व्हाइटी, पोथॉस स्कॅण्डन्स, रिंकोस्टायलस रेटय़ुझा. लोरॅन्थस व्हिसकम आणि कस्क्युटा (अमरवेल) या परजीवी वनस्पतीही दिसून येतात.

पावसाळ्याच्या सुरुवातीस किंवा पावसाळ्यात पाणी मुबलक प्रमाणात असते आणि त्याचा निचराही व्यवस्थित होत असतो तेव्हा छोटी झुडपे किंवा छोटय़ा वनस्पती आढळतात. यापैकी काही – आजेराटूम कॉनिझॉडिस (गोटवेल), आल्टरनानथेरा सॅसिलिस, कॅन्सकोरा डिफ्युझा, कॅशिया टोरा (टाकळा), सेलोशिया आर्जेशिया (कुरुडु), क्लिओम व्हिस्कोझा (पिवळी तीळवण), कोल्डेनिया प्रोकम्बन्स, कोर्कोरस कॅप्सुलरिस, एक्लिप्टा अल्बा, हेलिओट्रॉपिअम इंडिकम, एरिओकाऊलॉन स्पीशीज, फायलान्थस अमारस, फायझालिस मिनिमा, रुंजिया पेक्टिनाटा, स्मिथिया सेन्सिटिवा, ट्रायमफिटा रोम्बॉयडिया.

गवतांच्या प्रकारात मोडणारी वनस्पती या गटात क्रायझोपोगॉन, असिक्युलाटस, डायकॅन्थिअम कॅरिकोसम, एल्युसने इंडिका, हेट्रोपोगॉन कन्टॉर्टस, इझेक्मम अरिस्टाटम, थिमेडा कॉड्रिव्हालवीस आणि डेण्ड्रोकेलॅमस स्ट्रीक्ट्स (कळक).

आद्र्रता असलेलं पाणझडीचं जंगल (मॉइस्ट डेसिडय़ुअस फॉरेस्ट) आणि डोंगरउतारावरील जंगल –

डोंगरउतारावरील जंगलांमध्ये मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील जंगलासारख्या वनांचा समावेश होतो. या वनांमध्ये अकेशिया चुंद्रा (लालखैर), अल्बिझिया प्रोसेरा (सफेद शिरीश), अनोजायसूस लटिफोलिया (धावडा), आटरेकार्पस लाकुचा (ऐरावत), आपटा, काटेसावर, ब्रायडेलिया स्क्वमोझा (असाणा), पळस, कुंभी, गारंबीची वेल, एरिनोकार्पस निमोनी, फ्लकुर्शिया इंडिका, नीटम उला, हिडनोकार्पस पेण्टाड्रस (कडू कवट), इग्झोरा आबरेरिया (लोखंडी) वगैरे वनस्पती आढळतात. वरील वनस्पतींपैकी एरिनोकार्पस निमोनी (चेर) ही वनस्पती प्रदेशनिष्ठ असून ती फक्त त्याच भागात सापडते.

कोकणातील घाटांमध्ये आढळणाऱ्या वनस्पती :

कोकणातील घाटांमध्ये काही प्रमाणात सदाहरित आणि अर्धसदाहरित जंगलांमध्ये मोडणारे प्रकारही आढळतात. या जंगलात सापडणाऱ्या वनस्पतींपैकी अक्टिनोडाफने अँग्विस्टिफोलिया, बिश्चेफिया जवानिका, सिन्नामोमम झिलानिकम (दालचिनी), डायोस्पारॉस मोण्टाना, गार्सेनिआ टालबोटे, मेलॉटस फिलिपेन्सेस (शेंदरी), नोथोपोडायटस न्युमोनिआना (घाणेरा किंवा नरक्या), पॉलिआल्थिया  फ्रॅग्रन्स, टुना हेग्झाण्ड्रा, अब्युटिलॉन पर्सिकम, कोलेब्रोकिआ अपोझिटिफोलिया, राऊलफिया सर्पेटिना (सर्पगंधा) इत्यादी वनस्पती सापडतात. यापैकी नरक्या ही वनस्पती कर्करोगासारख्या गंभीर आजारावर उपचार करण्यासाठी वापरली जाते. सर्पगंधा ही औषधी वनस्पती उच्च रक्तदाबाच्या विकारावर उपचार करण्यासाठी वापरली जाते.

देशावरील वनस्पती

पुणे, सांगली, सातारा, कराड, सोलापूर, अहमदनगर आणि कोल्हापूर हे सात जिल्हे देश किंवा पश्चिम महाराष्ट्र या विभागाखाली मोडतात. राधानगरी हे गव्यांसाठी प्रसिद्ध असलेलं राष्ट्रीय उद्यान हे पश्चिम महाराष्ट्रातच आढळतं. या ठिकाणी आढळणारं जंगल हे काही प्रमाणात आद्र्रता असलेलं पाणझडीचं जंगल तर काही प्रमाणात सदाहरित जंगल आहे. तसंच काही ठिकाणी झुडपं असलेली खुरटी वने आणि गवताळ प्रदेशही आढळतात. रेहिकुरी काळवीट अभयारण्य हे नगर जिल्ह्य़ातील कर्जत तालुक्यात असलेलं खास काळवीट हरणांच्या संरक्षणासाठी घोषित केलेलं शुष्क काटेरी वने या प्रकारात येतं. अशा जंगलांमध्ये प्रामुख्याने अनोजायसिस लॅटिफोलिया (धामोडा), टेक्टोना ग्रॅण्डिस (साग) या प्रजातींचे वर्चस्व असते. त्याचबरोबरीने लान्निया ग्रॅण्डिस (शेमट), टर्मिनानालिया क्रेन्युलाटा (ऐन), डायोस्पायरॉस स्पीशीज यांचेही प्राबल्य आढळते. तसंच बॉसव्हेलिया सराटा (सलाइगुगुळ), अकेशिया कटेचु (खैर किंवा काथ), अकेशिया सुमा, अकेशिया लुकोफ्लीया, मोरिण्डा टिंकोरिया, लांटाना कामेरा, झीझीफुस इनोप्लिया, सेक्युरिनेगा लुकोपायरॉस, कॉर्डिया डायकॉटमा (भोकर), कॅरिझा करांदास (करवंदं) यांसारख्या वनस्पतीही आढळतात. सातारा जिल्ह्य़ातील कास पठार हेही याच प्रदेशात समाविष्ट होते. टोपली कारवीसारख्या (प्लिओकाउलिस रिचिया) चार वर्षांतून एकदा फुलणाऱ्या वनस्पती तसंच नीळ किंवा कारवीसारख्या (कारविया कलो) सात वर्षांतून एकदा फुलणाऱ्या वनस्पती या कास पठार आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या डोंगरउतारावर आणि महाबळेश्वर, पंचगणी या भागांत प्रचंड मोठय़ा प्रमाणात दिसून येतात. कीटकभक्षी वनस्पतींमध्ये ड्रॉसेरा बरमनी, ड्रॉसेरा इंडिका आणि प्लुम्बागो झिलानिका या कास येथे आढळतात. तसंच अपोनोजेटॉन सातारेन्सेस (वायतुरा) ही प्रदेशनिष्ठ वनस्पती कास पठार आणि आजूबाजूच्या भागांत सापडते. कास येथे मोठय़ा प्रमाणात पडणारा पाऊस, जोराने वाहणारे वारे, कमी प्रमाणात असलेला मातीचा थर आणि त्याखाली असलेला मोठा दगड यांमुळे तिथे उगवणाऱ्या वनस्पतींना निसर्गाशी सामना करावा लागतो. जगण्याची धडपड म्हणून या वनस्पती तिथे प्रचंड मोठय़ा संख्येने उगवतात. म्हणूनच कास पठार हे तिथे दिसणाऱ्या रंगीबेरंगी फुलांच्या कार्पेटसाठी प्रसिद्ध आहे. तसंच पठारावरील मातीमध्ये नत्रपदार्थाची कमतरता असल्यामुळे तेथील गवताळ भागात कीटकभक्षी वनस्पती मोठय़ा प्रमाणात दिसून येतात. याच पठारावर सेरोपेजिया अक्युलाटा, सेरोपेजिया विन्सिफॉलिया हे कंदीलपुष्प या गटात मोडणारी दुर्मीळ वनस्पतीही आढळतात.

पश्चिम महाराष्ट्र शिवकालीन किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये पुरंदर, सिंहगड, लोहगड, राजमाची, शिवनेरी यांसारखे किल्ले पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्य़ांत येतात. हे सर्व गडकिल्ले डोंगराळ भागात असल्यामुळे तिथे आढळणाऱ्या वनस्पतीसुद्धा इतर ठिकाणांपेक्षा थोडय़ाफार प्रमाणात वेगळ्या आहेत. उदाहरणार्थ- हेट्रोफ्रॅग्मा कॉड्रिलॉक्युलारिस (वारीस), ग्रेव्हिया टिलिफॉलिया, लाजरस्र्ोमिया लान्सिओलाटा (नाना), अर्जेरिया क्युनिआटा, आर्टिमिसिआ पाव्‍‌र्हिफ्लोरा, बार्लेरिया प्रीओनोटिस, बार्लेरिया प्रातेन्सेस, डायस्कोरिया अपोझोटिफॉलिया, लुबेलिया निकोटिफॉलिया, सेनेशिओ डालझली (सोनकी), सेनेशिओ एडवर्थाय, लेपिडागाथस कुस्पिडाटा आणि झिनझीबर सेरनम, झिनझीबर मॅक्रोस्टॅचिअम इत्यादी.

खानदेशातील वनस्पती

सातपुडा पर्वतरांगा परिसरात असलेल्या वनस्पती या संपूर्ण खानदेशात बहुतांशी प्रमाणात आढळून येतात. खानदेशातील बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे वृक्षांची संख्या पश्चिम घाटाच्या तुलनेत कमी दिसून येते. तापी नदीचे खोरेही याच भागात आढळते. येथे प्रामुख्याने साग आणि ऐन ही झाडे शिरपूर, चोपडा, रावेर, यावळ आणि तळोदा या भागांत आढळतात. साग आणि ऐन ही झाडं संपूर्ण खानदेशात एकूण वनस्पतींपैकी ६० टक्के जागा व्यापतात. त्याचबरोबर खैर, धावडा, शिसम, गरुगा पिनाटा (काकड), लाजरस्त्रेमिया पाíव्हफ्लोरा, टेरोकार्पस मार्सोपिअम (बिवळा किंवा बिबळा) ही झाडं आढळतात. यावळ आणि अनेर या भागात हेदू आणि साग याचं प्रमाण जास्त असून त्यांच्या बरोबरीने सलाइगुगुळ, धामोडा, शिसम, कळक, मित्रागायना पाíव्हफोलिया (कळंब), औजिनिया डालबरजिऑडिस (काळा पळस किंवा तीवस), बिवळा किंवा बिबळा या वनस्पतीही आढळतात. तसंच शिरपूर या भागात खैर आणि धावडा या प्रामुख्याने आढळणाऱ्या प्रजातींबरोबरच करंज, बलानायटस इजिप्टिका (हिंगण), सॉयमिडा फेब्रिफ्युज (रुहीन किंवा रोहन), सलाइगुगुळ, डायोस्पायरॉस मेलानोझायलॉन (तेंडू) या प्रजातीही आढळतात. शुष्क आणि काटेरी वने ही रावेर आणि यावळ या खानदेशाच्या पूर्व भागात येणाऱ्या प्रदेशात हार्डविकिया बायनाटा (अंजन), खैर, सलाइगुगुळ, बिवळा, धावडा या वनस्पती दिसून येतात. तळोदा आणि शहादा विभागात येणाऱ्या डोंगरउतारावर कळक, अण्ड्रोपोगॉन हॅलेपेन्सेस, अथ्र्राझॉन, अरुणदिनेला टेनेला, क्वायेक्स लॅक्रिमाझोबाय (कोल्ह्य़ाचे अश्रू), सिंबोपोगॉन मार्टर्निी, थिमेडा ट्राएण्ड्रा हे गवतांचे प्रकार दिसून येतात.

विदर्भातील वनस्पती :

विदर्भामध्ये गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, अकोला, वाशिम हे जिल्हे येतात. विदर्भामधील ताडोबा, चंद्रपूर, भंडारा, मेळघाट येथील जंगलांना तेथे असणाऱ्या वन्य आणि हिंस्र प्राण्यांच्या अधिवासामुळे संरक्षित जंगले म्हणून घोषित करण्यात आले आहे. चंद्रपूरच्या जंगलात शिरीष, काटेसावर, क्लोरोक्झायलॉन स्वीटेनीया (बेहेरू), शिसम, रुहीन किंवा रोहित, बांबूझा अरुंदिनेशिया (बांबू), कॅलामस (वेत), बुकानानिया लांझान (चारोळी), बहावा, सेमीकॉर्पस अनाकाíडअम (भिलावा), अर्जुन आणि बेहडा या वनस्पती असतात. तसंच तेंडू, मुरुडशेंग, सफेद कुडा, भिलावा, धायटी, असाणा, पळस, हेदू, गार्डेनिया गमिफेरा (डिकामली), काकड, घाणेरी, अकेशिया निलोटिका (बाभूळ), मधुका लाँजिफोलिया (महुआ) ही झाडे-झुडपं आढळतात. वेलींमध्ये अकेशिया चुंद्रा, कोक्युलस हिर्सुटस, कारंद, अनंतमूळ, स्मायलॅक्स झिलानिका (चोपचिनी), अ‍ॅब्रस प्रिकाटोरीअस (गुंज पत्ता), अरिस्टोलोकिया इंडिका (बदकवेल), खाजकुइली, ड्रेजिआ व्हॉल्युबिलस, कॉम्ब्रेटम ओवलीफोलिअम (पिळुकी), कपॅरिस झिलानिका (गोविंदी) या आहेत. जमिनीलगत असलेल्या लहान वनस्पतींमध्ये अब्युटीलॉन इंडिकम, अचिरान्थस अस्पेरा (आघाडा), अलिसिकार्पुस वॅजिनालस, अमानिआ बॅसिफेरा, अण्ड्रोग्राफिस पॅनिक्युलाटा (काळमेघ), कॉम्मेलिना बेंघालेन्सेस, क्रोटालारिया हिरटा, एलेफंटोपस स्कॅबर (गोजिंव्हा), युफोरबिया हिरटा, प्लुम्बागो झिलानिका (चित्रक), सीडा अक्युटा (बला), स्केपारिया डुलसिस, वर्नोनिया सिनेरा, युरेना लुबाटा, हायग्रोफिला शुली (तालीमखाना), घोटवेल, एनीकोसटेमा अक्झिलारस या वनस्पती सापडतात. विदर्भातील नद्यांच्या परिसरात कीर्गनेलिया रेटिक्युलाटा, रोटुला अ‍ॅक्वाटिका, होमोनोइया रिपारिया, टमॅरिक्स एरिकॉइडस त्याचबरोबर करंज, जांभूळ, तालीमखाना, अर्जुन या वनस्पती आढळतात.

विदर्भामध्ये भंडारा जिल्ह्य़ात तलावांची संख्या जास्त आहे. या तलावांमध्ये नीमफिया प्युबेसन्स (कुमुदा), अपोनोजेटॉन नाटन्स, नीमफिऑडिस क्रिस्टाटा (कुमुदिनी), पोटोमोजेटॉन नोडोसस, आयपोमिया अ‍ॅक्वाटिका, आयकॉर्निआ क्रासेपेस (जलकुंभी), तसंच पिस्टिया स्ट्राटिओटस, लेम्ना आणि ओल्फिया या वनस्पती आढळतात. ओल्फिया ही आकाराने सर्वात सूक्ष्म असे फूल येणारी वनस्पती आहे.

मराठवाडय़ातील वनस्पती :

मराठवाडा म्हणजे औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड, जालना, परभणी, लातूर हे जिल्हे आणि गोदावरी आणि पूर्णा नदीचं खोरं. मराठवाडा हा साधारणपणे दुष्काळी भाग असल्यामुळे पाण्याचा प्रादुर्भाव असतो. त्यामुळे वाढणारी जंगलं ही खुरटी, शुष्क पर्णझडीची किंवा गवताळ या प्रकारात मोडणारी आहेत. येथील जंगलात साग, सलइगुगुळ, हिरडा, धावडा, शिसम तसंच अझाडिराक्टा इंडिका (कडुनिंब), आयलॅन्थस एक्सेलसा (महारुख), शेमट, अंजन, असाणा, डॉलिकॉण्ड्राने फलकाटा, अर्जुन हे वृक्ष तसंच पॉलिगाला फ्युलोथ्रिक्स, बर्जिआ अम्मानॉयडिस, बायोफायटम सेन्सिटीव्हिम, क्रोटोलारिया, मेडिकाजिनिआ, लुडविगिया पाव्‍‌र्हिफ्लोरा, न्यूओनोटिस लान्सिफोलिया, सोपुबिया डेल्फिनिफॉलिया, लवांडुला बर्मनी, युफोरबिया, रॉथिआना, कुरकुलिगो, ऑर्किऑयडिस (काळी मुसळी), सायानोटिस टय़ुब्रोजा या वनस्पती साधारणपणे मोठय़ा प्रमाणावर आढळतात. तसंच खाजखुइली आणि कारंद या वेलीही सापडतात. खुरटय़ा जंगलांमध्ये कपारिस हॉरिडा, कोक्लोस्पर्मम गॉसिपिअम (पिवळी सावर), झिझिफुस ग्लॅबरिमा, मौलवा स्पिकाटा (वाघेटी), निकटान्थस आबरेर-स्ट्रीस्ट्स (पारिजातक), अकेशिया फेरोजिनिया, मायमोझा हमाटा, प्रोसोपिस स्पायसीजेरा, व्हेंटिलागो कॅलिसिना, कडाबा इंडिका याही वनस्पती काही प्रमाणात आढळतात. मराठवाडय़ातील किनवट, अजंठा आणि कन्नड या डोंगराळ प्रदेशात आपटा, चारोळी, हेदू, किंजळ, तसेच धावडा, शिसम, अर्जुन, हिरडा, पारिजातक, काळा कुडा या वनस्पती पश्चिम घाटातील प्रमाणापेक्षाही जास्त प्रमाणात या डोंगराळ भागात आढळतात.

एकंदरीत महाराष्ट्रात १८७ कुळांतील १०८१ जातींच्या ३०२५ प्रजाती सापडतात (बीएसआय २००६). त्यामध्ये गवतकुळातली १०४, लेग्युम्स या कुळातील १७६, सूर्यफुलाच्या कुळातील ५७, कार्वी कुळातील ४०, कॉफी कुळातील ३८, ऑर्किड्स ३४, रुई कुळातील २५, स्क्रॅफुलारिएसी कुळातील २४ आणि तुळशी कुळातील २२ वनस्पतींची नोंद असून वरील १० कुळे यांचं महाराष्ट्रातील वनस्पतींमध्ये वर्चस्व आहे. सद्य:स्थितीमध्ये अंदाजे २५ जाती आणि ६९४ प्रजाती या भारतात सापडणाऱ्या प्रदेशनिष्ठ वनस्पती असून त्यापैकी आठ जाती आणि १५७ प्रजाती महाराष्ट्राशीच प्रदेशनिष्ठ आहेत. त्यापैकी सेरोपिजिया सहय़ाद्रिका ही सहय़ाद्रीच्या कुशीत सापडणारी वनस्पती दुर्मीळ असून फक्त त्याच परिसरात सापडते. स्मिथिया पुरपुरिया ही दुर्मीळ वनस्पती कास, महाबळेश्वर, सावंतवाडी या परिसरांत सापडते.

वनस्पती

पूर्वीच्या काळी फक्त वापरात येऊ शकणारी झाडे/ वनस्पतीच बाहेरून आणून महाराष्ट्रात त्यांची लागवड केली जायची. चिंचेचे शास्त्रीय नाव हे टॅमॅरिन्ड इंडिका असून हे झाड आफ्रिका खंडातून मुंबई आणि परिसरात व्यापाराचा एक भाग म्हणून आणले गेले. किंबहुना, चिंचबंदर हे नाव त्याचाच एक भाग असावा.

महाराष्ट्रातील वनस्पतींपैकी एकंदर १५ टक्के वनस्पती या उपऱ्या (बाहेरून आलेल्या) आहेत. व्यापारी किंवा आर्थिकदृष्टय़ा महत्त्वाची झाडे इतर देशांतून येथे आणून लावली गेलीत. अमेरिकेतून भारतात आलेल्या वनस्पतींपैकी काजू, अननस (अननस सटाइव्हस्), बटाटे (सोलानम टय़ुबरोजम), टोमॅटो (लायकोपर सिकम येस्क्युलँटम, तंबाखू (निकोटियाना टबाकम), सीताफळ (अ‍ॅनोना स्कॉमोझा), रामफळ (अ‍ॅनोना रेटिक्युलाटा) ही सर्व झाडे पोर्तुगिजांनी सर्वप्रथम अमेरिका खंडातून आणून गोवा प्रांतात लावली.

महाराष्ट्रात काकोआ (कोको) या झाडाची लागवड प्रथम डलगाडो या पोर्तुगीज वनस्पतिशास्त्रज्ञाने सावंतवाडी येथे केली.

नुकतेच चर्चेत आलेले उंदीरमार हे झाड कोको या झाडाबरोबरच भारतात आले. कोकोला वाढीसाठी सावली हवी असल्यामुळे म्लिरिसिडिया सेपेअम (उंदीरमार) या झाडाचा प्रसार झाला. विसाव्या शतकात आणखीही काही वनस्पती परदेशांतून महाराष्ट्रात आल्या आणि हळूहळू स्थानिक म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या.

त्यांपैकी काही –

अकॅनथोस्परमम हिस्पिडम – दक्षिण अमेरिका अ‍ॅश्चिनोमिनी अमेरिकाना ही वनस्पती अल्मेडा यांनी १९८८ साली खोपोली या भागातून प्रथम नोंदवली. ही वनस्पती अमेरिकेतून खोपोलीत कशी पोहोचली हे एक गूढच.

अल्टरनानथेरा पॅरोनिकॉयडिस, अल्टरनानथेरा पनज्नस, अमारानथस डुबिअस, बोहेराविया इरेल्टा, क्लिओम रुटिडोस्परमा, आइकॉरनिया क्रासिपेस, पार्थेनिअम हिस्टरोफोरस (काँग्रेस ग्रास, गाजर गवत), युपॅटोरिअम रिपेन्स या आणखी काही बाहेरून येऊन येथे स्थायिक  झालेल्या वनस्पती.

महाराष्ट्र हे भौगोलिकदृष्टय़ा वैविध्यपूर्ण वनस्पतींनी नटलेले राज्य असून येथे असलेल्या दुर्मीळ वनस्पतींचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

संदर्भ
अल्मेडा एम. आर.
(१९९६ -२०१६), फ्लोरा ऑफ महाराष्ट्र खंड १-६, मुंबई.
सिंग एन. पी., एस. कार्तिकेयन आणि इतर
(१९९९-२००१) फ्लोरा ऑफ  महाराष्ट्र राज्य, वनस्पती सर्वेक्षण विभाग, पुणे

कुक थिओवोर
(१९०१-१९०७), द फ्लोरा ऑफ द बॉम्बे प्रेसिडेन्सी.
(सर्व छायाचित्रे – डॉ. राजदेव सिंग)
लेखक हे वनस्पतिशास्त्रतज्ज्ञ असून झेवियर्स महाविद्यालय, मुंबई येथे वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
(शब्दांकन : चैताली जोशी)
डॉ. राजेंद्र शिंदे – response.lokprabha@expressindia.com