News Flash

मुलाखत : तद्दन सिनेमांपेक्षा उत्तम मालिका श्रेष्ठच!

वैभव मांगले यांच्याशी मारलेल्या गप्पा..

vaibhav_mangle‘नया है वह’ म्हणत घराघरात पोहोचलेला ‘शाकाल’ अर्थात वैभव मांगले आता ‘माझे पती सौभाग्यवती’ या आगामी मालिकेतून एका स्त्री भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहेत. त्याबाबत त्यांच्याशी गप्पा..

० ‘माझे पती सौभाग्यवती’ या नव्या मालिकेतल्या तुमच्या भूमिकेविषयी सांगा.
एका उभरत्या कलाकाराची कथा मालिकेत मांडली आहे. काम शोधणारा, काम मागणारा असा तो नट आहे. करिअरच्या सुरुवातीला काम न मिळणं, संघर्ष करावा लागणं, कुचंबणा होणं असं कलाकाराचं जीवन मालिकेत दाखवलं आहे. मालिकेतल्या या नटाच्या आयुष्यात अशी परिस्थिती उद्भवते की त्याला या क्षेत्रात काम करताना स्त्रीरूप धारण करावं लागतं. खरंतर तो स्त्री भूमिका न करण्याच्या मताचा आहे. पण, एका कठीण परिस्थितीमुळे त्याला स्त्रीचं रूप घेऊन काम करावं लागतं. अशा वेळी तो सगळ्यांना कसा सामोरा जातो, नेमकं काय घडतं, स्त्री भूमिका करताना त्याची कशी कुंचबणा होते, हे सगळं यात मांडलेलं आहे.
० ही भूमिका स्वीकारण्यामागचं कारण काय?
विविध प्रकारच्या भूमिका करायला मिळणं हे एखाद्या कलाकारासाठी आव्हान असतं. कलाकार साकारत असलेल्या भूमिकांमध्ये वेगळपण असलं पाहिजे. आपल्याकडे विनोदनिर्मितीसाठी स्त्री भूमिका केल्या जातात. यापूर्वीही काही स्किट्समध्ये असे प्रकार बघायला मिळाले आहेत. मीही स्त्री भूमिका केल्या आहेत. त्यातून विनोदनिर्मिती झाली असेल. पण, ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतल्या स्त्री भूमिकेमुळे विनोदनिर्मिती होत नाही. टीव्ही या माध्यमात मला यापूर्वी अशी भूमिका करायला मिळाली नाही. स्त्री व्यक्तिरेखा साकारली असली तरी इतक्या मोठय़ा कालावधीसाठी आणि मालिकेतल्या मुख्य भूमिकेसाठी केली नव्हती. म्हणूनच मी ही भूमिका लगेच स्वीकारली.
० तुम्ही म्हणालात, ‘विनोदनिर्मितीसाठी स्त्री भूमिका केल्या जातात’. याबाबत अनेकदा वाद, मतमतांतरे होतात. तुमचं याबद्दलचं मत काय?
विनोदासाठी एखादा पुरुष कलाकार जसा स्त्री व्यक्तिरेखा साकारू शकतो तसंच एखादी स्त्री कलाकारही पुरुष व्यक्तिरेखा साकारू शकते. ही गोष्ट आपल्याकडे फारशी होताना दिसत नाही, हा भाग वेगळा. पण, एखाद्या पुरुषाने स्त्री भूमिका आणि स्त्रीने पुरुष भूमिका यात विनोदी घटनाच असू शकते. आत्तापर्यंतचे आपल्याकडचे काही सिनेमे बघता असं लक्षात येईल की, ज्या सिनेमांमध्ये पुरुषांनी साकारलेल्या स्त्री भूमिका आहेत त्या विनोदासाठीच आहेत. बालगंधर्व मात्र याला अपवाद आहेत. त्यांनी साकारलेली स्त्री भूमिका वेगळी होती. पण, विनोदनिर्मितीसाठीच पुरुष कलाकार स्त्री व्यक्तिरेखा साकारतो हे खरंच आहे ना. आपल्याकडे हे विनोदी अंगानेच घेतलं जातं.
० स्त्री व्यक्तिरेखा साकारताना कोणकोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं लागलं आणि भूमिका साकारल्यानंतर काय जाणवलं?
‘बाईचं दुखणं हे बाईलाच कळतं’ ही मालिकेची टॅगलाइन तंतोतत खरी आहे. आपण एखाद्या स्त्रीशी बोलतो, वागतो तेव्हा त्या स्त्रीला काय वाटत असेल किंवा तिच्याकडे बघण्याची पुरुषाची दृष्टी काय असते हे मी स्त्री व्यक्तिरेखा साकारल्यानंतर जाणवायला लागलं. मालिकेच्या एका प्रोमोमध्ये ते ठळकपणे स्पष्ट होतं. कुठल्याही पदार्थाला नावं ठेवणं सहज शक्य असतं. पण, जेव्हा तो पदार्थ तुम्ही स्वत: कष्ट करून करता आणि घरातली एखादी व्यक्ती त्याला नावं ठेवते तेव्हा त्याचं वाईट हे बाई झाल्यावरच कळतं. स्त्री भूमिका करायच्या आधीपासूनच माझा स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पूर्वी स्त्री भूमिका केल्यामुळे स्त्रीची विविध रूपं मी अनुभवली आहेत. सात्त्विक, नाजूक, सोज्वळ, नाटकी, विनोदी अशा स्त्रीच्या विविध छटा मला रंगवता येतात. स्त्री भूमिकांचा थोडा अनुभव असल्याचा इथे मला खूप फायदा झालाय.
० मालिकेच्या पहिल्या प्रोमोमध्ये तुम्ही ‘येते.. लवकरच.’ असं म्हणून एक ‘वॉक’ घेतलाय. त्या ग्रेसफुल चालण्याबद्दल प्रेक्षकांमध्ये सकारात्मक चर्चा झाली. ही ग्रेस आली कशी?
हो.. खरंय. प्रोमोमधल्या त्या वॉकबद्दल अनेकांनी मला विचारलं. कौतुकही केलं. मला वाटतं, आपण काही लोकांना विशिष्ट गोष्टींसाठी आपला आदर्श मानत असतो. आदर्श मानण्याची काही कारणंही असतात. तसंच आहे हे. माधुरी दीक्षित आपल्याला का आवडते, तर तिच्यात ग्रेस आहे. तिच्या प्रत्येक हालचालीत एक लय, ताल आहे. ती आवडते म्हणून तिचं ग्रेसफुल चालणं, नाचणंही आवडतं. ‘..सौभाग्यवती’ करताना माझ्यासाठी माधुरी दीक्षित माझी आदर्श आहे. तिच्यातली ग्रेस मी फॉलो केली.
० मालिकांमध्ये यापूर्वी काम केलं असलं तरी ‘सौभाग्यवती’ हा तुमचा पहिलाच ‘डेली सोप’ आहे. काय वाटतं?
हो. हा माझा पहिलाच डेली सोप. पूर्वी ‘शेजारी शेजारी पक्के शेजारी’ आणि ‘मालवणी डेज’ अशा मालिका केल्या, पण त्या आठवडय़ातून दोनदाच असायच्या. मला नेहमी वाटतं की, कलाकारांनी सगळ्या माध्यमांमध्ये काम केलं पाहिजे. ते काम यशस्वी करून दाखवलं पाहिजे. ज्याप्रमाणे नाटक, सिनेमांमधली कलाकारांची कामं प्रेक्षकांच्या लक्षात राहतात त्याप्रमाणे टीव्हीतही कलाकाराने चांगलं काम केलं तर त्याचं निश्चितच कौतुक केलं जातं. टीव्ही मालिकांमधलं काम कशा पद्धतीने करायचं हे त्या त्या कलाकारांच्या हातात असतं. टीव्हीवर रोज दिसण्यावर माझा कधीच आक्षेप नव्हता. रोज दिसत असलात तरी काहीतरी वेगळं करताना दिसा हा माझा मुद्दा होता. टीव्ही हे माध्यम आता कलाकारांसाठी अत्यंत महत्त्वाचं झालं आहे. लोकांपर्यंत पोहोचण्याचं प्रभावशाली माध्यम म्हणून टीव्हीकडे बघितलं जातं. टीव्ही घराघरात पोहोचत असल्यामुळे नाटक-सिनेमांपेक्षा मालिकांमधून कलाकारांचं कौतुक जास्त होतं. तद्दन सिनेमे करण्यापेक्षा टीव्हीवरचं एखादं चांगलं प्रोजेक्ट करावं असा माझा विचार होताच. ‘माझे पती..’मुळे हा विचार प्रत्यक्षात उतरला.
० मोजकेच सिनेमे करायचे, असं काही ठरवलंय का?
असं काही ठरवून केलं नाही. पण, एक साधं गणित आहे. वर्षांला जवळपास २५० सिनेमे रिलीज होतात. त्यातले किती सिनेमे बघितले जातात आणि किती सिनेमे प्रेक्षकांच्या लक्षात राहतात? माझ्या मते वर्षांला साधारण ५ ते ६ सिनेमे थिएटरमध्ये जाऊन बघितले जातात. प्रेक्षक अशा सिनेमांचं कौतुक करतात. मग तो सिनेमा गाजतो, लोकप्रिय होतो. उर्वरित सिनेमे त्याच त्याच विषयांभोवती फिरतात. जे सिनेमे कोणी बघणारच नाही किंवा बघितले तरी त्याला नावंच ठेवणार आहेत असे सिनेमे करुन पैसे मिळवून काय करायचं? त्यापेक्षा इतर माध्यमांमध्ये चांगल्या प्रोजेक्ट्समध्ये काम करून समाधान मिळतं, ते जास्त सुखावह आहे.
० मालिकेतल्या व्यक्तिरेखांच्या नावाने कलाकाराला ओळखलं जातं. काही वेळा कलाकारांना याची खंत वाटते. तुम्हाला काय वाटतं?
प्रेक्षक कलाकारांना फक्त त्यांच्या व्यक्तिरेखांच्या नावाने ओळखतात हे चित्र आता बदलतंय असं मला वाटतं. कारण मालिकांमध्ये काम करणारे कलाकार त्याच वेळी नाटक, सिनेमांमध्येही काम करतात. त्यामुळे कलाकारांची खरी नावंही प्रेक्षकांपर्यंत पोहोचू लागली आहेत. शिवाय कलाकाराने चांगलं काम केलं तर त्याला त्याच्या नावानेच ओळख मिळते. तसंच कलाकार एका कामातून दुसरं आणि दुसऱ्यातून तिसरं अशी कामं करत जातो. एकाच वेळी तिन्ही माध्यमांमधून काम करणारेही अनेक कलाकार आहेत. त्यामुळे असे कलाकार नावानिशी प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. म्हणून मला वाटतं, की व्यक्तिरेखांच्या नावाने ओळखण्याचा मुद्दा आता पुसट झाला आहे.
० डेली सोपचं शूटिंग करताना इतर माध्यमांमध्ये काम करणं थोडसं कठीण होतं. पण, तुम्ही नाटक, सिनेमेही करताय. याचं नियोजन कसं करत आहात?
खरंतर नियोजन असं काही करावं लागत नाही. तुम्ही कोणत्या दिग्दर्शकासोबत काम करताय हे महत्त्वाचं असतं. काही दिग्दर्शकांना कलाकारांकडून काम कसं करून घ्यायचं हे चांगलंच माहीत असतं. अशा वेळी कलाकारालाही त्याचा उपयोग होतो. विशिष्ट वेळेत विशिष्ट काम होतच असतं. कुठेही वेळ वाया जात नसल्यामुळे इतरही कामं घेता येतात. शिवाय दिग्दर्शकाच्याच कामात नियोजन असल्यामुळे कलाकाराला त्यावर विशेष नियोजन करावं लागत नाही. मात्र कलाकाराला याचं महत्त्व कळायला हवं. दिग्दर्शक मंदार देवस्थळीसोबत मी आता डेली सोप करत असताना मला जाणवलं की, टीव्हीमध्ये काम करणं थोडं वेगळं आहे. सिनेमातला अभिनय वेगळा असतो. नाटकात थोडं वेगळं तंत्र वापरावं लागतं. तर मालिकांमध्ये आणखी वेगळ्या बाजाचा अभिनय करावा लागतो. अभिनयकौशल्य तेच असतं. माध्यम फक्त बदलत जातं. हे अवधान कलाकाराने बाळगणं ही त्याची जबाबदारी आहे. वेगळं काम करण्याची जाणीव असणं हे त्या त्या कलाकाराच्या बुद्धीवर अवलंबून असतं.
० तुमचे पुढचे प्रोजेक्ट्स काय आहेत?
सिनेमांच्या ऑफर्स येताहेत. पण, सध्या मी त्या स्वीकारत नाहीये. कारण ‘माझे पती..’ ही मालिका साधारण दोनेक वर्ष चालणार आहे. मालिकेची गोष्टच तशी आहे. तसंच मालिकेत मीच नायक-नायिका असल्यामुळे बाकीचे प्रोजेक्ट्स घेणं थोडं कठीण आहे. मालिकेच्या शूटसाठी महिन्याचे वीस ते पंचवीस दिवस द्यावे लागणार आहेत. त्यामुळे सिनेमांचा विचार सध्या करत नाहीये. ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक मात्र करतोय. कारण त्याचे प्रयोग फक्त शनिवार आणि रविवारी असे दोनच दिवस असतात. याशिवाय नव्याने कोणतंही नाटक मी करणार नाही. एका वेळी अनेक कामं करणाऱ्या वृत्तीचा मी नाही.
० तुमच्या स्वभावातल्या स्पष्टवक्तेपणावर गमतीत का होईना अनेकदा टीका होते. याविषयी काय सांगाल?
‘स्पष्टवक्ता’ यापेक्षा लोक मला ‘आगाऊ’ म्हणतात. आपल्याला जे पटेल, आवडेल तसं समोरच्याने केलं तरच ती व्यक्ती आपल्याला आवडते, पटते. हे सगळ्यांच्या बाबतीत असतं. माणूस म्हणून तो कसा आहे यापेक्षा कलाकार म्हणून तो कसा आहे याला मी महत्त्व देतो. ‘तो माणूस म्हणून चांगला आहे’ असं इंडस्ट्रीत फार बोललं जातं. अरे पण, तो कलाकार म्हणून कसा आहे? टीव्हीवर माणूस दिसणार आहे की कलाकार दिसणार आहे? कलेच्या संदर्भात आपण या क्षेत्रात एकत्र आलो आहोत. मग आपण नेहमी कलेबाबत बोलावं. एखाद्याचं काम आवडलं नाही तर ते ‘आवडलं नाही’ असं एवढंच बोलू नये. तर ते का आवडलं नाही हेही सांगावं. तसंच चांगलं केलं तर त्यातलं काय काय आवडलं हेही सांगता आलं पाहिजे. इंडस्ट्रीत एखाद्याच्या कलाकृतीबद्दल कोणी वाईट बोललं तर त्या वाईट बोलण्यावरच फार चर्चा होते. पण, तो का वाईट बोलला यावर विचार केला जात नाही. मला जर कोणी माझ्या कामाविषयी वाईट बोललं तर मी ते सगळं ऐकून घेतो, विचार करतो. मला ते का जमलं नाही, जमवण्यासाठी काय केलं पाहिजे याचा विचार करतो. ती व्यक्ती आपली टीकाकार नसते तर समीक्षक असते, हे लक्षात घ्यायला हवं. आपल्याकडे एक विचित्र संस्कृती आहे. एखादी कलाकृती फार चांगली नसेल तरी त्याचं भरभरून कौतुक केलं जातं. का, तर त्यांच्यात मैत्री असते किंवा चांगले संबंध असतात. पण, असं न करता स्पष्ट बोललं तर बिघडलं कुठे? आपल्या जवळच्या माणसाची प्रगती व्हावी असं आपल्याला वाटत असेल तर स्पष्ट बोलायला काय हरकत आहे. माणसाच्या वागण्यामध्ये आणि विचारांमध्ये फार तफावत नसावी, असं माझं मत आहे.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 1:25 am

Web Title: vaibhav mangle interview
टॅग : Mulakhat
Next Stories
1 वेग : बिअ‍ॅट्रिक्स पॉटरच्या जगात…
2 नोंद : ‘भारतीय प्राणी सर्वेक्षण’ची शतकी वाटचाल
3 नातं हृदयाशी : पेसमेकरचे प्रकार
Just Now!
X