जपानच्या पंतप्रधानपदावरून शिंझो आबे पायउतार झाले आणि अनपेक्षितपणे योशिहिदे सुगा हे त्यांचे उत्तराधिकारी ठरले. जपानच्या इतिहासात आबे हे सर्वाधिक काळ पंतप्रधानपदावर राहिले. ते २०१२ मध्ये दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होण्याआधीच्या ३० वर्षांत जपानने तब्बल १९ पंतप्रधान पाहिले. त्यामुळे नवे पंतप्रधान सुगा यांच्यापुढील आव्हानांचा पट उलगडतानाच माध्यमांनी जपानच्या राजकीय स्थर्याबाबत प्रश्न उपस्थित केला आहे.

जगभरात शिंझो आबे यांचा चेहरा ओळखीचा झाला होता. शिवाय त्यांच्या नावाचा उच्चारही सरावाचा झाला होता. आता नव्या पंतप्रधानांचा नामोच्चार शिकायला पाहिजे का, हे काळच ठरवेल, अशी सुरुवात करून ‘बीबीसी’च्या लेखात जपानमधील राजकीय स्थैर्याचा प्रश्न अधोरेखित करण्यात आला आहे. निवडणुका जिंकूनच एखाद्या नेत्याला आपले पक्षांतर्गत नेतृत्व सिद्ध करता येते. त्यामुळे आपण पंतप्रधानपदाला पात्र असल्याचे सुगा यांना जनता आणि पक्षनेत्यांना दाखवून द्यावे लागेल. सुगा यांनी मंत्रिमंडळ सचिव म्हणून दीर्घकाळ काम केले आहे. कठोर, शिस्तप्रिय अशी ओळख असलेल्या सुगा यांची प्रशासनावर उत्तम पकड आहे. मात्र, निवडणुका जिंकण्यासाठी या कौशल्यांचा उपयोग होईल का, अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे. ‘वर्षभरात कनिष्ठ सभागृहाच्या निवडणुका अपेक्षित असताना वक्तृत्व कौशल्य नसणे ही सुगा यांची मोठी कमकुवत बाजू ठरेल,’ असे टोक्योच्या सोफिया विद्यापीठाचे प्राध्यापक कोईची नकानो यांचे मत ‘बीबीसी’च्या संकेतस्थळावरील हा लेख नोंदवतो. शिवाय, सुगा यांना पक्षातील गटबाजीचाही फटका बसू शकतो, असा इशाराही देतो.

गेली आठ वर्षे सुगा हे आबे यांच्यामागे सावलीप्रमाणे उभे होते. त्यामुळे त्यांना जपानच्या प्रश्नांची जाण असेलच. पण, करोनास्थितीचा सामना, चीनला कसे हाताळायचे, अर्थव्यवस्था रुळावर कशी आणायची आणि अमेरिकेच्या आगामी अध्यक्षाशी उत्तम संबंध प्रस्थापित करणे आदी आव्हाने सुगा यांच्यापुढे आहेत, याकडे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’च्या एका लेखात लक्ष वेधण्यात आले आहे. आबे यांच्यानंतर जपानमध्ये राजकीय अस्थर्य निर्माण होण्याची भीती ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने एका लेखात वर्तवली आहे. अशा स्थितीत प्रशासकीय यंत्रणेचे फावते. मात्र, राजकीय पोकळीत प्रशासनाचे वर्चस्व निर्माण झाले तर साचलेपणाची स्थिती निर्माण होऊ शकते आणि विकासाचा गाडा रुतू शकतो, असे या लेखात म्हटले आहे.

काही माध्यमांनी सुगा यांच्याबद्दल ‘सकारात्मक’ सूर  लावला आहे. आबे यांचेच धोरण ते आक्रमकपणे रेटतील, असा अंदाज वर्तवणारा डॉ. सुनील चाको यांचा लेख ‘द संडे गार्डियन’मध्ये आहे. भारत-जपान द्विपक्षीय संबंधाची सुगा यांना उत्तम जाण असून, भारताने जपानच्या ‘ट्रेड व्हाइट लिस्ट’मध्ये समावेशासाठी प्रयत्न करण्याची गरज या लेखात व्यक्त करण्यात आली आहे.

चिनी माध्यमांनी सुगा यांच्याबाबत भाष्य करताना सावध भूमिका घेतल्याचे दिसते. अमेरिकेशी उत्तम संबंध ठेवण्यास सुगा यांचे प्राधान्य असेल, असा अंदाज वर्तवतानाच जपानचे चीनशीही सौहार्दाचे संबंध राहतील, अशी आशा चिनी माध्यमांनी वर्तवली आहे. पंतप्रधान झाल्यास जपानचा दावा जोरकसपणे मांडण्यास घाबरणार नाही, या सुगा यांच्या विधानाकडे ‘द ग्लोबल टाइम्स’ने लक्ष वेधले आहे. चीन-जपान द्विपक्षीय संबंध सुधारण्यात शिंझो आबे यांची मोलाची भूमिका होती. आता त्यांनीच निवडलेल्या सुगा यांच्याकडूनही त्याच मार्गावर चालण्याची अपेक्षा ‘द साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’च्या लेखात व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, सुगा हे वेगळा मार्ग निवडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे ‘चायना डेली ’च्या एका लेखात म्हटले आहे. सुगा यांना करोना संकटासारख्या महत्त्वाच्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. त्यात ते कशी कामगिरी करतात, यावर त्यांचे पंतप्रधानपद अल्पजीवी ठरते की ते सार्वत्रिकी निवडणुकीनंतरही ते कायम राहते, हे ठरेल. त्यामुळे आपला ठसा उमटविण्यासाठी ते वेगळा मार्ग निवडण्याची शक्यताही या लेखात वर्तविण्यात आली आहे.

स्ट्रॉबेरी शेतकऱ्याचा मुलगा ते पंतप्रधानपदाचा सुगा यांचा थक्क करणारा प्रवास जगभरातील माध्यमांप्रमाणेच ‘असाही शिम्बून’सह अन्य जपानी वृत्तपत्रांनी उलगडला आहे. करोनामुळे घातलेले निर्बंध जपानने शिथिल केले आहेत.  जपानमधील क्रीडा प्रेक्षागारेही गर्दीने फुलू लागली आहेत. त्यामुळे जपानमधील जनजीवन पूर्वपदावर येत असल्याचे रसभरित  वर्णन तिथली माध्यमे करत आहेत. एकंदर वातावरण आशावादाने भारलेले आहे. मात्र, आबेंच्या काळातील स्थर्य सत्तांतरानंतरही कायम राहील का, या प्रश्नाची थेट चर्चा करणे जपानी छापील माध्यमांनी सध्या तरी टाळलेले दिसते.

संकलन : सुनील कांबळी