News Flash

आगीतून फुफाटय़ात?

अफगाणिस्तानमधील घडामोडींकडे अमेरिकेबरोबरच रशिया, पाकिस्तान, चीन, भारताचे बारीक लक्ष आहे.

‘‘तालिबानच्या राजवटीवेळी मी जन्मासही आले नव्हते. पण त्या काळात महिलांवर कठोर निर्बंध होते, हे मला माहीत आहे. त्यांनी पुन्हा सत्ता काबीज केली तर माझी ओळख संपुष्टात येईल. त्यामुळे प्रश्न अमेरिकेच्या सैन्यमाघारीचा नव्हे, तर माझ्या अस्तित्वाचा आहे’’- अकरावीत असणाऱ्या वहिदा सिद्दिकीची ही भावना. अफगाणिस्तानातील विविध क्षेत्रांतल्या नागरिकांत साधारणत: असाच सूर आहे. अमेरिकेने ११ सप्टेंबपर्यंत अफगाणिस्तानातून संपूर्ण सैन्यमाघारीचा निर्णय घेतल्यानंतर अफगाणी अवकाशात असे चिंतेचे मळभ दाटले आहे. आता अफगाणिस्तानचे काय होणार, या प्रश्नाचे उत्तर शोधताना या देशाच्या भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न माध्यमांनी केला आहे.

११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेच्या ट्विन टॉवर्सवरील हल्ल्यानंतर अमेरिकेसह ‘नाटो’चे सैन्य अफगाणिस्तानमध्ये घुसले. ते तिथे तब्बल २० वर्षे तळ ठोकून आहे. तिथून सैन्यमाघारीस २०११ पासूनच सुरुवात झाली होती. पण पूर्णत: सैन्यमाघार ११ सप्टेंबर २०२१ रोजीपर्यंत होईल. या २० वर्षांच्या युद्धाची किती किंमत मोजावी लागली, याचा हिशेब ‘बीबीसी’च्या वृत्तलेखांत आढळतो. अफगाणिस्तानमध्ये आतापर्यंत २,३०० अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाला असून, २० हजारांहून अधिक सैनिक जखमी झाले आहेत. ब्रिटिश सैन्यासह ‘नाटो’ सदस्यदेशांच्या लष्कराचीही मनुष्यहानी झाली आहे. शिवाय या संघर्षांसाठी अमेरिकेला आतापर्यंत अब्जावधी डॉलर्स खर्च करावे लागले आहेत. हे झाले अमेरिका आणि ‘नाटो’तील सदस्यदेशांचे. पण या संघर्षांतील अफगाणिस्तानची मनुष्यहानी मोठी आहे. आतापर्यंत अफगाण सुरक्षा दलाचे ६० हजार सैनिक मृत्युमुखी पडले आहेत. त्याच्या दुप्पट सामान्य नागरिकांचा बळी गेला आहे. इतकी मोठी ‘किंमत’ मोजणे योग्य होते का, असा सवाल या वृत्तलेखात करण्यात आला आहे.

अफगाणिस्तानमध्ये १९९६ ते २००१ यादरम्यान तालिबानच्या राजवटीत ओसामा बिन लादेनच्या अल्-कायदा या दहशतवादी संघटनेने मोठय़ा प्रमाणात हातपाय पसरले. ‘नाटो’च्या फौजांनी अफगाणिस्तानमध्ये कारवाई केल्यापासून अफगाणिस्तानमधून एकही मोठा आंतरराष्ट्रीय दहशतवादी हल्ला झालेला नाही, हे खरेच. पण २० वर्षांनंतरही अफगाणिस्तानात शांततेचा किरणही दिसत नाही, याकडे अनेक माध्यमांनी लक्ष वेधले आहे. तिथे लोकशाही व्यवस्था बळकटीकरण, महिलांना हक्क मिळवून देण्यात आणि दहशतवादाच्या उच्चाटनासाठी अमेरिकेने प्रयत्न केले असले, तरी ते पुरेसे ठरलेले नाहीत, असेही माध्यमांचे निरीक्षण आहे.

आता अफगाण सैनिक आणि पोलीस मिळून देशात तीन लाख सुरक्षा कर्मचारी असल्याचे मानले जाते. ते तालिबानला तोंड देण्यास समर्थ आहेत का, असा सवाल उपस्थित झाला आहे. अमेरिकेच्या सैन्यमाघारीनंतर जुने तालिबानी पुन्हा डोके वर काढतील का, अशा आशयाचा लेख ‘द वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये आहे. तालिबान राजवट २००१ मध्ये संपुष्टात आल्यानंतर अफगाणच्या नव्या राजकीय प्रक्रियेत शिरकाव करण्याचा या बंडखोरांचा प्रयत्न होता. त्यामुळे अमेरिकी सैन्यमाघारीनंतर तालिबान पुन्हा डोके वर काढू शकेल, अशी भीती या लेखात व्यक्त करण्यात आली आहे.

सैन्यमाघारीनंतर अफगाण सरकारच्या मदतीसाठी आणि दहशतवादविरोधी लढाईत मार्गदर्शनासाठी अमेरिका प्रयत्नशील असेल. मात्र, सप्टेंबरनंतर काही महिन्यांत तालिबान अफगाणिस्तानचा काही भाग ताब्यात घेण्याची शक्यता ‘अरब न्यूज’च्या एका लेखात वर्तवण्यात आली आहे. अफगाणिस्तानची फेरउभारणी आणि तालिबानचा पराभव करण्यास अमेरिका अपयशी ठरली. येत्या काही महिन्यांत अफगाणिस्तानात नागरी युद्ध भडकेल आणि देश संघर्षांच्या खाईत लोटला जाईल, अशी भीती त्यात व्यक्त करण्यात आली आहे.

दशकभरापूर्वी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांनी इराकमधून सैन्यमाघारीचा निर्णय घेतल्यानंतर तीनच वर्षांत तिथे ‘आयसिस’ने डोके वर काढले होते. हा धडा घेत अमेरिका अफगाणिस्तानातून संपूर्ण सैन्य मागे घेताना काय उपाययोजना करत आहे, याचा आढावा ‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या एका लेखात घेण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या शेजारच्या देशांमध्ये सैन्य तैनातीसह अन्य पर्यायांचा समावेश त्यात आहे. मात्र ते कितपत प्रभावी ठरतील, असा प्रश्नही विचारला जाऊ लागला आहे. त्यामुळे अमेरिकी सैन्यमाघारीनंतर अफगाणी नागरिकांच्या आयुष्याचा अवघड काळ सुरू होईल, असे भाकीत ‘द न्यू यॉर्क टाइम्स’च्या दुसऱ्या एका लेखात वर्तवण्यात आले आहे.

अफगाणिस्तानमधील घडामोडींकडे अमेरिकेबरोबरच रशिया, पाकिस्तान, चीन, भारताचे बारीक लक्ष आहे. अफगाणिस्तानातील संभाव्य अस्थर्यामुळे चीनसाठी संधी काय आणि आव्हान काय असेल, याचा वेध ‘साऊथ चायना मॉर्निग पोस्ट’ने घेतला आहे.

अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. देशात अस्थर्याचे ढग जमू लागले असताना नव्या वर्षांच्या पहिल्या तीन महिन्यांत दहशतवादी हल्ल्यांमध्ये ५७३ सामान्य नागरिकांचा बळी गेला. अफगाणिस्तानचा हा प्रवास आगीतून फुफाटय़ाकडे होत असल्याचे सध्याचे चित्र आहे.

(संकलन : सुनील कांबळी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 1:38 am

Web Title: media reaction over us decision to withdraw troops from afghanistan zws 70
Next Stories
1 होरपळ कधीपर्यंत?
2 आशा आणि आव्हाने
3 मुक्ताकाशातून माघार..
Just Now!
X