ब्रायन अ‍ॅडम्स आता म्हातारा झालाय, तरी त्याचा आवाज मात्र लख्ख तरणा राहिलेला आहे. या वर्षांत त्याचे दोन मोठे कन्सर्ट झाले. त्यातले टेलर स्विफ्टसोबत गायलेले ‘समर ऑफ सिक्स्टीनाइन’ ऐकण्यासोबत पाहणीयही झाले आहे. गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या ‘अल्टिमेट’ या अल्बमच्या प्रसिद्धीनिमित्ताने पुन्हा एकदा ब्रायन अ‍ॅडम्स पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या अल्बमला नवी ओळख देण्याचा एक भाग म्हणून तो पुढील आठवडय़ात भारतात दाखल होणार आहे. गेल्या चाळीस वर्षांपासून जगभरात त्याच्या गाण्यांचे लक्षावधी चाहते आणि गाण्यांच्या प्रभावातून हजारो देशी आवृत्त्या निघाल्या. फक्त आपल्या देशापुरते सांगायचे तर नव्वदोत्तरीतील भारतीय श्रोत्यांची एक पिढी ब्रायन अ‍ॅडम्सच्या संगीतकक्षेत आपसूक ओढली गेली. त्याची कारणे अत्यंत वेगवेगळी होती. १९९४ ते ९६ या कालावधीत इंग्रजी गाणी व्हिडीओजसह आणणाऱ्या एमटीव्ही आणि व्ही चॅनल या दोन वाहिन्या आल्या. त्यात क्लासिक्स ते ताज्या गाण्यांमध्ये ब्रायन अ‍ॅडम्सच्या गाण्यांची चलती होती. याच कालावधीत भारतात घराघरांत डेकस्टॉप कॉम्प्युटर शिरायला लागले होते. एक जीबीच्या हार्डडिस्कपासून सुरू झालेल्या या संगणकांच्या मेमरीमध्ये दर काही महिन्यांमध्ये वाढ होत होती. संगणक विक्रेते एमपीथ्रीचा मोठा साठा कॉम्युटर बसवताना देत होते आणि त्यात ब्रायन अ‍ॅडम्सची गाणी आपोआप कॉपी करून दिली जात होती. कॅसेट आणि सीडीजच्या आरंभाच्या काळात तरुण पिढीला मायकेल जॅक्सनने नाही, तर ब्रायन अ‍ॅडम्सच्या प्रेमगीतांनी वेड लावले होते. पुढे एमपीथ्री पायरसीच्या काळात मुंबई-पुण्यातील आंतरराष्ट्रीय संगीत रसिकांची मागणी केनी जी आणि ब्रायन अ‍ॅडम्स या दोन कलाकारांनाच सर्वाधिक होती. परिणामी, म्युझिक स्टोअर्सपासून रस्त्यावरील सीडीविक्री यंत्रणेत ब्रायन अ‍ॅडम्स हा सर्व अल्बम्ससह सापडणारा कलाकार होता.

यूटय़ुबच्या आगमनानंतर व्हायरल स्टार्सनी संगीतजगत काबीज केले आणि ब्रायन अ‍ॅडम्सच्या संगीताचे युग ओसरत गेले. त्याचे अल्बम तीन-चार वर्षांआड येत राहिले, पण त्यात पूर्वीइतका जोम नव्हता. श्रोत्यांच्या नव्या पिढीच्या गळ्यातले आणि कानातले स्वरतारे वेगळे होते. भारतातील म्युझिक चॅनलवर त्याचे शेवटचे गाजलेले गाणे २००३-४ काळातील ‘हिअर आय अ‍ॅम’ आणि भारतात गाजलेला शेवटचा अल्बमही याच काळातील ‘रूम सव्‍‌र्हिस’ नावाचा. त्यानंतरच्या बदलेल्या संगीतप्रवाहात त्याची केवळ १९९०च्या दशकातील गाणीच टिकून राहिली. ‘एव्हरीथिंग आय डू’, ‘लव्ह फॉर वुमन’, ‘आय अ‍ॅम रेडी (स्लो व्हर्जन), ‘कट्स लाइक नाइफ’, ‘लेट्स मेक नाइट टू रिमेंबर’ या गाण्यांचा चाहता वर्ग आजही प्रचंड आहे. ‘एव्हरीथिंग आय डू’ची शेकडो व्हर्शन्स वाद्यांवर तयार झाली आहेत. दोन हजारच्या काळातील ब्रायन अ‍ॅडम्सचा चाहता वर्ग किती होता, हे पाहायचे असेल, तर यूटय़ुबवर दाखल करण्यात आलेला तेव्हाचा कोणताही कन्सर्ट आवर्जून पाहा. फुटबॉल आणि क्रिकेटचे आवाढव्य मैदान कमी पडेल इतका श्रोतावर्ग त्याच्या प्रत्येक कन्सर्टमध्ये दिसेल.

गाण्यासाठी शिक्षणाला रामराम ठोकणाऱ्या या कलाकाराची शैली प्रत्येक अल्बमगणीक लोकप्रिय होत गेली. एमटीव्हीचा आरंभ झाला होता. कॅनडातून अमेरिकी बिलबोर्ड आणि नंतर जगभरातील म्युझिक चार्टमध्ये तो पसरत गेला. त्याची सगळी गाणी प्रेम, विरहाभोवती फिरतात. ‘ऑन डे लाइक टूडे’, ‘क्लाऊड नंबर नाइन’, ‘फ्लाइंग’ या गाण्यांचे तत्त्वज्ञान वेगळे आहे. ब्रायन अ‍ॅडम्सचा उदय झाला तेव्हा त्याचे समवयीन कित्येक बॅण्ड आणि कलाकार तयार झाले. त्यातले ९९ टक्के हे प्रसिद्धीच्या लाटेत, ड्रग्जच्या नशेत आणि वर्चस्वाच्या कारणांनी संपत गेले. ब्रायन अ‍ॅडम्सच्या यशाचे एक कारण असेही सांगितले जाते की, प्रसिद्धीच्या शिखरावरही त्याचा तोल कुठेही ढळला नाही. गेल्या चाळीस वर्षांपासून या कलाकाराचा सहगिटारवादक कलाकार किथ स्कॉट कायम आहे. गीतलेखकही तोच आहे. त्यामुळे त्याच्या गाण्यांमधील नशाही तीच आहे. अल्टिमेट अल्बममधील २० गाण्यांपैकी बहुतांशी त्याची गाजलेली जुनी गाणीच आहेत. तरीही व्हायरल युगामधली नवी पिढी ती कशी ऐकते ते महत्त्वाचे आहे.

ब्रायन अ‍ॅडम्सच्या गाण्यांच्या प्रभावातून आपल्याकडे हिंदी गाणी बरीच आलीत. आपल्या राज्याचे जयजयकार करणारे एक गाणेही ‘समर ऑफ सिक्स्टी नाइन’वरून प्रभावित आहे. त्याची हिट गाणी सर्वानाच माहिती आहेत. परिचित आणि सुपर-डय़ुपर हिट्स गाण्यांखेरीज त्याची काही आपल्याकडे प्रसिद्ध नसलेली पण उत्तम गाणी आजच्या यादीमध्ये घेण्याचा विचार आहे. या गाण्यांना ऐकणे उत्तम अनुभव ठरेल.

viva@expressindia.com