26 February 2021

News Flash

‘बिनोद’ नाम तो सुना होगा..

सेलिब्रिटींपासून ते सगळ्यांनीच या बिनोदचा इतका ध्यास घेतला की पेटीएम, एचडीएफसी यांनी आपल्या जाहिरातींमध्येही बिनोदला स्थान दिले

संग्रहित छायाचित्र

गायत्री हसबनीस

काही दिवसांपूर्वी ‘बिनोद’ या शब्दाने सोशल मीडियावर पुरता धुमाकूळ घातला. बिनोद हा काय प्रकार आहे हे जाणून घेण्यासाठी व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवरून चर्चा सुरू झाली. सेलिब्रिटींपासून ते सगळ्यांनीच या बिनोदचा इतका ध्यास घेतला की पेटीएम, एचडीएफसी यांनी आपल्या जाहिरातींमध्येही बिनोदला स्थान दिले. या बिनोदचा शोध त्याच्या कर्त्यांपर्यंत गौतमी कावळे आणि अभ्युदय मोहन या दोन युवांपर्यंत पोहोचला.

आजकाल नानाविध गोष्टी झपाटय़ाने सोशल मीडियाच्या मंचावर व्हायरल होतात. त्या व्हायरल का झाल्या? याचा पत्ताही लागत नाही. काही दिवसांपूर्वी दोन तास काहीही हालचाल न करता राहिलेल्या एका इसमाच्या व्हिडीओला तुफान प्रेक्षकसंख्या मिळाली होती. असे व्हिडीओ व्हायरल होण्यामागची नेमकी कारणं काय असतात? आजचे जग हे ‘व्हिडीओ’चे आहे आणि  तो व्हायरल होण्याचं सर्वात महत्त्वाचं व्यासपीठ म्हणजे यूटय़ूब. याच यूटय़ूबच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडीओ तयार करणाऱ्या गौतमी कावळे आणि अभ्युदय मोहन यांनी ‘बिनोद’ या ट्रेण्डमागची गंमत उलगडून सांगितली. ‘बिनोद हा शब्द इतका व्हायरल होईल याची आम्हाला कल्पना नव्हती. आमच्या व्हिडीओवर येणाऱ्या कमेंट्मध्ये काही कमेंट्स फारच विनोदी असतात. व्हिडीओचा विषय वेगळाच असतो आणि त्याखालील कमेंट्स काही भलत्याच असतात. त्यांचा बऱ्याचदा अर्थही लागत नाही. त्यातल्याच काही कमेंट्सवर बिनोद नाव लिहिलेलं आमच्या पाहण्यात आलं. भारतीय प्रेक्षकांच्या या कमेंट्स करण्याच्या पद्धतीवर व्हिडीओतून विनोदी शैलीत भाष्य करायचं आम्ही ठरवलं, त्यात आम्ही ‘बिनोद’चा आवर्जून उल्लेख केला. ९ मिनिटांच्या या व्हिडीओत बिनोदचा उल्लेख फक्त २० सेकं दाचा आहे. पण हा शब्द देशभर प्रचंड व्हायरल झाला, असं ते दोघं सांगतात. बिनोदचा ट्रेण्ड व्हायरल होणं ही एक प्रकारे या व्हिडीओला मिळालेली दाद आहे, असं ते दोघं मानतात.

यूटय़ूबवरचे व्हिडीओ व्हायरल होण्यामागे तरुण प्रेक्षक कारणीभूत असल्याचे ते दोघं सांगतात. यूटय़ूब सर्व वयोगटातील मंडळी पाहतात, पण हे माध्यम प्रामुख्याने तरुणांचं आहे. तरुण यूटय़ूबर आणि तरुण प्रेक्षक.. समवयस्क असल्याने एकमेकांचे विचार, शैली यांची या माध्यमातून देवाणघेवाण होत असते. मुळातच यूटय़ूबवरचा आशय तरुणांना लक्षात ठेवून के लेला असतो, अनेकदा तरुणांनीच केलेला असतो. त्यामुळे या माध्यमावरून ट्रेण्ड व्हायरल करण्यातही त्यांचा वाटा मोठा आहे, असं मत गौतमी आणि अभ्युदय व्यक्त करतात.

तीन वर्षांंपूर्वी बारावी पास झाल्यावर या दोघांनी ‘स्ले पॉइंट’ हे यू—टय़ूब चॅनेल सुरू केलं. कौतुकास्पद बाब म्हणजे यू—टय़ूब चॅनेल सुरू करण्याच्या धडपडीत असूनही बारावीत दोघेही बोर्डात आले. ‘स्ले पॉईंट’मधील ‘स्ले’ म्हणजे ‘हसवणे’. आपण मित्रमैत्रिणी एकमेकांत एखाद्या विषयांवरून जशा गमतीजमती करत संवाद साधतो, त्याच पद्धतीने व्हिडीओ बनवून आम्ही ते पोस्ट करतो. गप्पांमधून के ल्या जाणाऱ्या या संवादाशी प्रेक्षकही रिलेट होतात, असं गौतमी सांगते. आपले शिक्षण पूर्ण करत गेली तीन वर्षे सातत्याने दोघांनी आपलं यूटय़ूब चॅनेल सांभाळलं आहे. ‘यू—टय़ूबवर एकाच ढंगाचे व्हिडीओ करणाऱ्यांवरही ठपका बसतो. उदा. मनोरंजन, पर्यटन किंवा खाद्यपदार्थांचेच व्हिडीओ. परंतु या रूढ विचारातून आम्ही बाहेर पडतो आहोत. विनोदी व्हिडीओ हे सध्या यूटय़ूबवरील चलनी नाणं आहे, तेच करायचं असाही आमचा आग्रह नाही. आम्ही अमेरिकेतील ट्रॅव्हल व्हिडीओही केले आहेत तेव्हा आमच्या हेही लक्षात आलं की लोकांना वेगळं काहीतरी लागतंच. त्यामुळे फक्त विनोदी व्हिडीओच करतात असा काही शिक्का आमच्यावर बसलेला नाही. मात्र क्रिके ट, चित्रपट समीक्षा यावर के लेल्या व्हिडीओपेक्षा विनोदी व्हिडीओमुळे प्रसिद्धी जास्त मिळत गेली’, असंही ते सांगतात. कॉलेजमध्ये असताना अभ्यास-परीक्षा सांभाळून आम्ही यूटय़ूबला जास्त वेळ दिला, असे अभ्युदय सांगतो.

यूटय़ूबचं माध्यम हे नक्कीच सहजसोपं नाही. एखादा व्हिडीओ व्हायरल होणं तर फारच कठीण काम आहे. बाहेरून कदाचित व्हिडीओ करणं आणि ते व्हायरल होणं जरी सोपं वाटतं असलं तरी एक यूटय़ूबर म्हणून आपला व्हिडीओ लोकांपर्यंत पोहचेल की नाही?, याची धाकधूक असतेच.? या यूटय़ूबच्या व्यासपीठावरून कसं यश मिळेल हे काही सांगता येत नाही. प्रामाणिकपणे आपलं कामं यूटय़ूबवरून करत राहायचं हे आम्ही दरवेळी जपतो, असं ते सांगतात. आम्ही याआधी विनोदी व्हिडीओ केले, पण ‘बिनोद’च्या व्हिडीओने आम्हाला चांगलीच प्रसिध्दी मिळाली. बिनोद काय, कोण हे शोधण्यासाठी अनेकजण आमच्या चॅनेलवर आले आणि तो व्हिडीओ क्षणार्धात व्हायरल झाला, असं त्यांनी सांगितलं. अभ्युदय व गौतमीच्या मते प्रयोग करणं म्हणून खूप महत्त्वाचं ठरतं, कारण आपला प्रेक्षक सगळ्या तऱ्हेचे व्हिडीओ पाहण्यासाठी येतो. एकसुरी आणि प्रयोगशीलता नसल्याने अनेक यूटय़ूबर्स मागे पडल्याचं निरीक्षणातून जाणवल्याचंही त्यांनी सांगितलं.

‘स्ले? पॉईंट’चे आज मिलियन सबस्क्राइबर्स आहेत, गोल्डन आणि सिल्वर यूटय़ूब बटणही बहाल करण्यात आलं आहे. मात्र आमच्या चॅनेलला मिलियन सबस्क्राईबर्स मिळूनही आमचं यश पालकांनी स्वीकारलं नव्हतं. ‘बिनोद’मुळे मोठय़ा वर्तमानपत्रांनी आमची मुलाखत घेतली तेव्हा आमच्या पालकांना खरा आनंद झाला, असं ते दोघं प्रामाणिकपणे सांगतात. कल्पकता, मेहनत आणि संयम असेल तरच यूटय़ूबच्या या विश्वात यशाची चव चाखता येईल, असंही ते आवर्जून सांगतात.

viva@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2020 12:24 am

Web Title: article on gautami kavale and abhuday mohan explain the fun behind the trend binod abn 97
Next Stories
1 क्षितिजावरचे वारे : सर्वमंगलाचा पाठपुरावा
2 शिक्षणाच्या विदेशवाटा
3 प्रवासात साथ देणारे हमसफर 
Just Now!
X